गावई

बबन मिंडे

/media/JUbw7dDSnuij.jpg

जागतिकीकरणात होरपळणाऱ्यांच्या कथा-व्यथा - डॉ. ज्ञानेश्वर भोसले

दुष्काळ पडला की ज्या देशाची अर्थव्यवस्था ढासळते, तिथला शेतकरी किती महत्त्वाचा असला पाहिजे! गावखेडय़ांचा देश अशी ओळख असणाऱ्या या देशाचं जागतिकीकरणानंतर वेगानं शहरीकरण झालं. यात इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेतकरी नेमका कुठं आहे आणि तो कसा जगत आहे याचं भीषण वास्तव बबन मिंडे यांच्या ‘गावई’ कादंबरीत येतं. शेतकरी, मजूर, विस्थापित, वंचित घटकांचा आवाज वाटाव्यात अशा बबन मिंडे यांच्या आजवरच्या कादंबऱ्या आहेत. ‘गावई’ ही त्याच मालिकेतील पुढची महत्त्वाची कादंबरी आहे.

कादंबरीतील पहिलंच वाक्य यातील पात्रांची दशा अधोरेखित करते. ‘पेटलेल्या उन्हात सगळं रान होरपळत आहे.’ इथून पिंगळी गावाची आणि नथूची कथा सुरू होते. त्या अंग जाळणाऱ्या उन्हाच्या झळा सोसत नथूची आई भुजी रानातली कण्हेर तोडत आहे. ती फक्त कण्हेर तोडत नाही तर मुळापासून उपटत नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. हे विषारी झुडूप मुळापासून नष्ट करण्यासाठी ती जिवाचा एवढा आटापिटा का करते, याचा उलगडा कथा पुढे सरकते तसा होत जातो. ती एकीकडे कण्हेरीच्या झाडाशी हाडवैर असल्यासारखी झटा घेत असताना जवळच नथू आपल्या वावराशेजारच्या फुटलेल्या ओढय़ाला बांध घालण्यासाठी दगडांशी झटत आहे. नथूच्या वडिलांनी याच रानातल्या कण्हेरीच्या मुळ्यांमधील पाणी पिऊन आत्महत्या केलेली आहे. शेतीवर जगणारा हा माणूस निसर्गापुढे हतबल होतो आणि आत्महत्या करतो. पुढे नथू त्याच चक्रात अडकतो. आभाळ आणि सरकारच्या भरवशावर शेतातल्या पिकांकडे बघत तो जगायला लागतो तेव्हा भुजीला तिचा नवरा आठवत राहतो. या असल्या जगण्याचा शेवट काय होतो हे तिनं पाहिलेलं आहे. म्हणूनच नथूच्या नजरेला रानातील कण्हेर पडू नये म्हणून ती तोडण्याची तिची धडपड आहे. कादंबरीत हे प्रतीकात्मकतेनं येतं.

जगण्या-मरण्याची ही लढाई सुरू असतानाच गावातून ओरड ऐकायला येते. कित्येक वर्षे अंथरुणाला खेळलेला आणि मृत्यूला चकवा देत घाणेरीत पडल्यासारखा सटवा धुमाळ आज खरंच मेला की काय असं वाटून सगळं गाव त्याच्या घरासमोर जमा होतं तेव्हा कळतं की आजही त्यानं मृत्यूला परत पाठवलं आहे. ‘गावई’मध्ये इथपर्यंत नथू आणि त्याचं गाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. नथूच्या मुख्य कथेच्या पार्श्वभूमीवर येणारी उपकथानकेही प्रभावीपणे लेखकाने उभी केली आहेत. यातील पात्रं जगण्याच्या अनुभवातून आलेलं जीवनविषयक तत्त्वज्ञान सहज बोलून जातात. भुजी, सखुबाई, लक्ष्मी या विधवा स्त्रियांचे चित्रण जे वास्तव घेऊन येतं ते अभावानेच मराठीत आजवर आलं आहे. समाजाच्या भीतीने मनाला मुरड घालत जगणाऱ्या आणि तरीही नीतिमत्ता न सोडता जीवनाशी दोन हात करत जगणाऱ्या या अशिक्षित स्त्रिया फार उंचीच्या वाटतात.

इथल्या गावकऱ्यांसह त्यांचं जगण्याचं साधन असलेली शेती, त्याभोवतीच्या श्रद्धा, परंपरा, गावाची संस्कृती, रीतीरिवाज, राजकारण, जातीपातीला चिकटून राहणं अशा सगळ्यातून पिंगळी गाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. गावातील सुष्ट-दुष्ट माणसांमधील एक नथू. त्याच्या आयुष्यात जे घडत जातं, ते असं विश्व आहे की त्यातील जगणं ज्यांना माहीत नाही त्यांना आतून हादरवून सोडतं. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या या देशात अजून ही माणसं इतकी अभावग्रस्त जीवन जगताहेत याचं वैषम्य वाटतं. या माणसांच्या वाटय़ाला असं जगणं का येतं, याचं उत्तर नथूच्या आयुष्यात आलेली माणसं, घडणाऱ्या घटना- प्रसंगांतून सापडतं. त्याच्या आयुष्यात जगण्याचा सर्वात मोठा आधार आहे तो आभाळाचा. हे आभाळ कधी नायक वाटतं, तर कधी खलनायक. आभाळाकडे बघत असतानाच त्याचं लक्ष सरकारकडेही आहे. सरकार एखादा निर्णय घेते तेव्हा तळातील व्यक्तीच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, हे वाचताना अस्मानी संकटापेक्षा ही सुलतानी संकटंच शेतकऱ्यांच्या जीवाशी जास्त खेळत असल्याचं दिसतं. नथू भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांचा कसा शिकार होतो, हे पीककर्ज वाटपात सूक्ष्मपणे आलं आहे.

आपली गरिबी उंबऱ्याबाहेर येणार नाही याची काळजी घेणारा नथू गावासाठी ‘अण्णा’ असतो. ही प्रतिष्ठा त्याच्या जगण्याचा आधार आहे. संकटांना सामोरं जाण्याचं बळ ही प्रतिष्ठाच देत आलेली असते. पण सावकार दावणीची म्हैस सोडून नेतो तेव्हा ती धुळीस मिळते आणि नथू खचत जातो. त्याचा हा मानसिक प्रवास मनोविश्लेषणाच्या अंगाने येतो. एकाच गावात राहणारी, उदरनिर्वाहाचं साधन समान असणारी माणसं एका बाजूला नरकयातना सोसतही जगण्याची आस सोडत नाहीत, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यातलाच कुणी एक मृत्यूला कवटाळतो.

दुसरीकडे जागतिकीकरणाने गावाचं गावपण हरवत चाललं आहे. कादंबरीच्या ‘पाठराखण’मध्ये म्हटलं आहे : गावाला गावपण येतं ते इथल्या नांदत्या माणसांमुळे. माणसं आहेत म्हणून गाव आहे. त्यांनी गाव सोडलं की गाव उठलं. मग उरते ती फक्त जमीन. ‘गावई’ होते म्हणजे गाव उठते. हा लोप पावत आलेला शब्द इथे चपखल वाटतो. आधुनिकीकरणाने दिलेल्या नव्या गरजाच आता माणसाला मूलभूत वाटायला लागल्या आहेत. केवळ मातीतून उगवलेला दाणा आता त्या पूर्ण करू शकत नाही. आता मातीतून नाही, तर यंत्रातून आलेली संस्कृती रुजते आहे. भौतिक सुखांची चटक शहराकडे खेचत आहे. ‘शहर आणि गाव’, ‘आहे रे आणि नाही रे’मधील संघर्ष शेतकरी नेत्यांच्या भाषणांतून, चळवळीच्या गाण्यांतून, पथनाटय़ांतून मांडल्याने मनाच्या तळापर्यंत पोहोचतो. शहरी मध्यमवर्ग सुखासीन जगतो आहे. वीकेंडला तो निसर्ग शोधत खेडय़ात जातो तो केवळ विरंगुळा म्हणून. पण आपल्या ताटात जे अन्न येतं त्याचा प्रवास जाणून घेण्याची त्याची मानसिकता नाही. मनोरंजन विश्वात रममाण हा वर्ग बुद्धीला त्रास देत नाही. सत्याला सामोरा जाऊन शेतकरी वर्गाची वेदना समजून घेण्यात तो कमी पडतो. कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्याविषयीच्या पथनाटय़ातून ‘आहे रे आणि नाही रे’ वर्गातील हा भेद आणि कमालीची विषमता समोर येते.. या देशाच्या भविष्याविषयी विचार करायला लावते. नथू केवळ वाढत्या गरजा आणि भौतिक सुखाच्या आकर्षणातून नाही, तर जगण्याच्या धडपडीतून गावातून शहरात येतो. यामुळे ‘गावई’ ही केवळ महाराष्ट्रातील पिंगळी गावाची कथा न राहता ती देशाची, नव्हे जगाचीच कथा होते. अस्मानी आणि सुलतानी संकटाला कंटाळून गाव सोडणे म्हणजे ‘गावई’! गावं आकसत आहेत किंवा त्यांचं शहरीकरण तरी होत आहे. पण गाव जन्माबरोबर शरीराच्या एखाद्या अवयवासारखंच चिकटून येतं. त्या अर्थाने कादंबरीची अर्पणपत्रिका बोलकी आहे : ‘पोटासाठी मुलखावर गेलो तरी ज्याच्याबरोबरची नाळ तुटली नाही अशा माझ्या गावाला..’

नथू गाव सोडतो आणि शहरात येतो. लेखक शहरी आणि ग्रामीण वास्तव तितक्याच समर्थपणे मांडतात. निसर्गातला, शेतीमातीतला एक कुशल निर्माता शहरातल्या बकाल वस्तीत राहतो. इथल्या मजूर अड्डय़ावर बिगारी म्हणून तो उभा राहतो तेव्हा मन हेलावून जाते. गावासाठी अण्णा असणाऱ्या नथूचा शेतकरी ते मजूर या शोकात्म प्रवासाची ही कथा. ही नुसती नथूची कथा नाही, नथू हा प्रातिनिधिक आहे. हा कुलवृत्तांत वाटतो आभाळाकडे बघत जगणाऱ्या शेतकऱ्याचा. नथूची कथा सांगता सांगता ती मानवी जीवनाचा शोध घेत जगण्याचा अर्थ शोधते. ओघवती शैली, प्रतिमा, प्रतीकांमुळे आलेलं भाषासौष्ठव यामुळे कादंबरी मुख्य कथानकाबरोबरच अनेक उपकथानकांना घेऊन पुढे सरकत राहते. ती कुठेही कंटाळवाणी होत नाही. आपण त्या गावातला एक घटक होऊन तिच्याशी एकरूप होतो आणि त्या गावातले असंख्य अनोळखी शब्द आपल्या मनात साठवत जातो. आपल्या मनात वसलेलं पिंगळी गाव आणि त्या गावातील नथूचा शहरातला नथ्या कसा होतो, याचा विदीर्ण करणारा प्रवास मनातून जात नाही. हा प्रवास फक्त एकटय़ा नथूचा नाही, तर तो एका गावाचाही आहे. या प्रवासात आपणही नकळत सहभागी होतो. नथूच्या शोकांतिकेने अस्वस्थ होतो. मात्र त्याचबरोबर एका कलात्मक अनुभतीने आपण सुखावूनही जातो. अभिजात कलाकृती वेदनेतही सुखाची अनुभूती कशी देते याचा प्रत्यय येतो.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा