पाऊल वाजे

विवेक गोविलकर

/media/FEiXmhXtgVI4.jpg

कॉर्पोरेट विश्वाचा वेध - अभय जोशी

मराठीच्या साहित्यविश्वावर गेली अनेक दशके कथांनी अत्यंत परिणामकारक अशी मोहोर उमटवलेली असली तरी कंपन्या, औद्योगिक विश्वातील वातावरणाचा वेध फार कमी साहित्यिकांनी घेतला आहे. आधीच्या पिढीतले दिवंगत ज्येष्ठ कथाकार ह. मो. मराठे यांनी औद्योगिक क्षेत्रातले ताणतणाव अनेक कथासंग्रहांमधून लक्षणीयरीत्या चितारले आहेत. कंपन्यांमधले डावपेच, तेथील राजकारण, पुढे जाण्यासाठी इतरांच्या डोक्यावरून बिनदिक्कतपणे जाण्याची निर्दयी वृत्ती, कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या सामान्य कामगारांची असहाय्यता, आदींवर मराठे यांनी चांगल्या प्रकारे झोत टाकला होता.

आताच्या पिढीतले विवेक गोविलकर यांनी अशाच प्रकारे 'पाऊल वाजे' या कथासंग्रहातून औद्योगिक विश्वातले आधुनिक वातावरण रंगविण्याचा परिणामकारक प्रयत्न केला आहे. आताचे वातावरण अर्थातच पूर्णपणे वेगळे आणि त्यामुळे स्पर्धा, परस्परसंबंध प्रस्थापित करताना आपलेच हितसंबंध कसे शाबूत राहतील, याकडे संबंधितांचे पराकोटीचे लक्ष असल्याचे गोविलकर यांच्या कथांमधून वारंवार जाणवते आणि त्यामधून कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सध्याच्या साठमारीवर त्यामधून चांगला झोत पडतो.

प्रस्तुत कथासंग्रहात पाच दीर्घकथा आणि लेखिका गौरी देशपांडे यांच्या `कारावासातून पत्रे` या कथेतल्या पत्रांना उत्तरे असा एक वेगळा प्रकार हाताळण्यात आला आहे. `इन्व्हेस्टमेंट` या कथेत कारवारहून मुंबईसारख्या महानगरात करियरसाठी आलेल्या तरुण मुलीचे चित्रण आहे. तरुण मुलींनी उच्चस्तरीय कामे स्वीकारताना त्यांना पुरुषांकडून मिळणारी वागणूक, सहकार्य करताना या स्त्रियांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे येणारे दैनंदिन अनुभव, हाताखाली काम करीत असलेल्या महत्त्वाकांक्षी पुरुषांची होणारी काहीशी कुचंबणा, त्यातून निर्माण होणारे `ईगो` या कथेत आढळतात. त्याचवेळी या मुलीला आईकडून विवाहासाठी होणारा आग्रह, त्यासाठी `करियर`कडे मुलीने काहीसे दुर्लक्ष करण्याची आईची अपेक्षा एकीकडे आणि कार्यालयीन स्पर्धा दुसरीकडे अशा कात्रीत सापडलेली ही आजच्या जमान्यातली तरुणी आपल्याला हवा तसा आणि तोच मार्ग काढते, त्यासाठी कार्यालयातल्याच काहीशा कनिष्ठ माणसाशी विवाहबद्ध होऊन त्याच्यासमवेत अमेरिकेत जाते. तिथेही कंपनीतल्या दैनंदिन डावपेचांना तोंड देत आपले भवितव्य अधिक उज्ज्वल घडवण्यासाठी पुढचे कोणते पाऊल उचलते, त्यासाठी कोणत्या गोष्टीवर काही प्रमणात तरी पाणी सोडण्याची तयारी करून आपल्या पतीची समजूत कशी घालते, याचे चित्रण मुळातच वाचायला हवे. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या काऴात `करियर`साठी तुम्हाला नातेसंबंधांमध्ये कशा प्रकारे `इन्व्हेस्टमेंट`करायला लागते, त्याचवेळी तडजोडीही कराव्या लागतात, याचा धांडोळा या कथेमध्ये घेतला गेला आहे.

या कथासंग्रहातल्या `बॅकग्राऊंड चेक` आणि `बळी` या कथा वेगळ्या असल्या तरी त्यांचा काहीसा बाज एकसारखा जाणवतो. विषयसंदर्भ वेगळे असले तरी. आधुनिक तरुणी कितीही पुढारलेल्या, सुशिक्षित असल्या तरी, अजूनही कौटुंबिक रीतीरिवाज, बंधने यांचा तीव्र पगडा त्यांच्या मनावर पक्का असल्याचे या कथांमधून स्पष्टपणे जाणवते, विशेषत: `बळी` या कथेमधून. अर्थात मानवी स्वभाव आणि विकार यास कारणीभूत ठरू शकतात, असे त्यावर म्हणता येईल.

या कथासंग्रहातली `PROCESS AUDIT` ही कथा सगळ्यात परिणामकारक वाटली. वरच्या पदावरील निरुपमा आणि आलोक यांच्यातील व्यावसायिक तसेच खासगी संबंधांच्या अनुषंगाने फुलत जाणारी ही कथा कमालीची वेधक ठरली आहे. दैनंदिन कामांच्या प्रचंड दबावाखाली आलोकने केलेली व्यावसायिक चूक कशी उघडकीस आल्यानंतर निरुपमा या सगळ्या गोष्टींना कसे तोड देते, हे सगळे मुळातूनच वाचण्याजोगे. आलोकला शेवटचा फटका मारताना निरुपमाने व्यक्त केलेल्या मनोगतामधून व्यावसायिक संबंधांवर वेगळाच प्रकाश पडतो आणि त्याचबरोबर आलोकच्या हताशपणावरही...

`मित्र` या कथेत दोन मित्रांची व्यावसायिक स्पर्धा, त्यामधून निर्माण होणारे तणाव, अखेरीस एका मित्राचा राजीनामा, प्रतिस्पर्धी कंपनीत जायचा निर्णय घेऊन मूळ कंपनीला अप्रत्यक्षपणे आव्हान द्यायचा प्रयत्न, त्याचे हे प्रयत्न कसे हाणून पाडायचे, याचे शेवटच्या भागात रचण्याचे डावपेच आदी बाबी सध्याच्या कॉर्पोरेट वातावरणास साजेश्याच.

गौरी देशपांडे यांच्या मूळ कथा न वाचलेल्या वाचकांना त्या कथांमधल्या पत्रांना उत्तरे या शेवटच्या भागाचे प्रयोजन या कथासंग्रहात काहीसे स्पष्ट होत नाही.

गोविलकर यांच्या या कथा आजच्या कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींवर झोत टाकतात, यात शंकाच नाही. स्वत: गोविलकर हे व्यवसायानिमित्ताने आय. टी. क्षेत्रात दीर्घकाळ वावरलेले असल्यामुळे या क्षेत्रातील एकूणच वातावरण त्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केल्याचे कथांमधून, त्यामधील भाषेवरूनही जाणवते. देशात परदेशातही त्यांचे व्यावसायिक वास्तव्य असल्यामुळे या क्षेत्रातले टोकदार कंगोरे त्यांनी जवळून अनुभवल्याचे स्पष्ट होते. साहजिकच कॉर्पोरेट क्षेत्राची आजची इंग्रजी भाषा, तिथले स्त्री-पुरुष संबंध (सगळ्याच पातळीवरचे) याचे सूचक किंवा काही ठिकाणी काही प्रमाणात थेटही चित्रण या कथांमधून होते. गोविलकर यांच्यावर इंग्रजीचा चांगलाच प्रभाव असल्याचे कथांच्या भाषाशैलीवरूनही सातत्याने जाणवते. परिणामी काहीवेळा कथांचा `फ्लॅशबॅक` लक्षात यायला कदाचित वेळ लागू शकतो. त्याच वेळी दोन ओळींमधला गुप्त मजकूर वाचायची कला अवगत असलेल्यांना या कथा आकर्षक वाटतीलच, परंतु कॉर्पोरेट क्षेत्रात सध्या सक्रीय असलेल्यांना आपल्याच आजूबाजूला जे काही घडत आहे, त्याचेच चित्रण वाचत असल्याचा अनुभव येईल.

ख्यातनाम कथाकार गंगाधर गाडगीळ यांनी, `प्रत्यक्ष जीवनात समोरचा माणूस पुढच्या क्षणी कसा वागेल, हे जसे आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे कथेतली पात्रेही नंतर कसे वर्तन करतील, असे आपल्याला सांगता येत नाही`,असे मत काही दशकांपूर्वी मांडले होते. गोविलकर यांच्या या कथासंग्रहातली अनेक पात्रांचे वर्तन याच प्रकारचे जाणवते, खासकरून `बळी` ही कथा वाचताना हे प्रकर्षाने जाणवते. आजच्या 'कॉर्पोरेट' संस्कृतीचे हेच प्राक्तन मानायचे का, या प्रश्नाचे उत्तर शेवटी वाचकांनी आपल्या मनाशी शोधायचे आहे.

...
मुखपृष्ठ : सतीश भावसार

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा