माझे किहीम

मीना देवल

/media/yMMXbfMx0tc8.jpg

किहीमची आपलेपणाची गोष्ट - वासंती दामले

किहीम एक नितांत सुंदर गाव! टूरिस्ट स्पॉट झाल्यापासून समुद्र किनाऱ्याची मात्र रया गेली आहे. त्यापूर्वी लांबचलांब, जवळजवळ निर्मनुष्य समुद्रकिनारा, खळाळणाऱ्या स्वच्छ लाटा असा तो मला आठवतो. मीना देवलांच्या 'माझे किहीम' पुस्तकातही अशा अनुभवाचे वर्णन येते. ते स्वच्छ, शांत किहीम मला खूप आवडले होते. त्या किहीम एवढेच 'माझे किहीम' हे पुस्तकही मला आवडले. मीना माझी मैत्रीण आहे, एवढेच त्याचे कारण नाही. तर मीनाचा स्वत:वर विनोद करणारा, जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर असणारा, स्वभाव. पुस्तकही असेच तिच्या स्वभावासारखे विसंगतीकडे हसून बघणारे व त्यामुळे हलकेफुलके झाले आहे. उत्तम भाषा व वैचारिक स्पष्टता व काही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे बोलणे, यामुळे हे पुस्तक चांगले झाले आहे.

हे पुस्तक आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात आलेले बाबा देवल यांचे चित्रण. पुस्तकाच्या मनोगतातच आपल्याला वैचारिक तफावतीमुळे त्या दोघांच्यात आलेल्या दुराव्याविषयी कळतं. मात्र संपूर्ण पुस्तक वाचताना हे सतत जाणवत राहतं की डॉ. बाबा देवल या माणसाशिवाय लेखिकेचं अस्तित्व नाही. बाबांचे गुण-अवगुण, चक्रमपणा, भोळेपणा, भाबडेपणा, त्यांच्या अंगातली कला या सर्वांचे चित्रण रोखठोकपणे पण अतिशय सहृदयतेने झाले आहे.

इतिहासात सध्या स्थानीय इतिहासाची एक नवीन शाखा आहे. लेखिका विज्ञानाची पदवीधर. पण किहीम गाव, देवल जोडपे तिथे गेले त्यावेळची स्थिती, संस्कृती व नंतर व्यापारीकरणामुळे झालेले सांस्कृतिक बदल हेही लेखिकेने उत्तम टिपले आहे. अशा टिपणांचे, इतिहासाच्या दृष्टीने दस्तावेजाचे मूल्य आहे. हे कोकणी किहीम गाव! याने देवलांना आपले म्हटलेही आणि नाहीही. बाबा देवलांनी मात्र हे गाव आपले बनवण्याचा मनापासून प्रयत्न केला, कधीकधी अट्टाहासही केला. पण गावाने त्यांना ते आपले आहेत, पण स्थानिक नाहीत, हे वेळोवेळी दाखवून दिले. मुलांपैकी अतुलचे अमेरिकेत राहूनही गावातल्या लोकांशी संबंध टिकून आहेत. अजितला गावाविषयी प्रेम नाही. असे का? याचेही उत्तर पुस्तकात मिळते. लेखिकेने गावावर प्रेम केले, ज्याकाही लोकांना आपले मानले त्यांना वेळोवेळी मदत केली, गरजेच्या गोष्टी शिकवल्या. पण अट्टाहास कुठल्याच गोष्टीचा केला नाही. हे वंदना आणि उमेशच्या उदाहरणावरून दिसते. उमेश, वंदना अजूनही लेखिकेला जवळचे आहेत. कारण तिने त्यांच्यासाठी जे योग्य ठरवले होते, तसेच त्यांनी वागायला पाहिजे याचा हट्ट केला नाही. ज्यांना-ज्यांना मदत केली त्यांच्या आयुष्याचे सुकाणू आपल्याच हातात राहावे याचा आग्रह नसल्यामुळे ते सुखी व लेखिकाही सुखी. मात्र आता किहीमचे घर जरी विकले गेले असले, तरी अजूनही लेखिकेला किहीम माझेच वाटते आहे!

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा