आलटून पालटून!

मधुकर धर्मापुरीकर

/media/ijKLruy3P8BJ.jpg

समजून, उमजून हसताना...! - श्रीकांत बोजेवार

मनुष्याची सगळी अंगं दृग्गोचर असतात, एक अंग मात्र दिसत नाही. अगदी क्ष किरणांनीही दिसत नाही. ते अंगं असतं विनोदाचं. सहज, सोपा, ढोबळ, बटबटीत असे ऐकता क्षणी हास्य निर्माण करणारे विनोद आपल्या आजूबाजूला खूप असतात, ते समजण्यासाठी या वेगळ्या अंगाची गरज नसते. परंतु समाज, इतिहास, जग, वेगवेगळ्या प्रवृत्ती, स्वभाव, विविध क्षेत्रातील घटना, व्यक्ती यांच्याबद्दलच्या विनोदाचं आकलन होण्यासाठी हे वेगळं अंगं लागतं. कारण, असा विनोद विचारपूर्वक हसवतो त्यामुळे तो टिकाऊ असतो. त्यातही व्यंगचित्रासारखा प्रकार समजून घेण्यासाठी शिवाय दृष्यात्मक समजही हवी असते. चित्रांविषयीची किमान समज असेल तर व्यंगचित्र आस्वादाची लज्जत अधिक वाढते. मधुकर धर्मापुरीकर यांचे 'आलटून पालटून' हे पुस्तक वाचताना, पाहताना आपल्याला स्वतःच्याच अशा आस्वादाची पातळी उंचावण्यास मदत होते. चित्र पाहावे, त्यातील विनोदाविषयी स्वतःचे एक मत बनवावे आणि मग आस्वादाकडे वळावे, ताडून पाहावे... हा एक बौद्धिक आनंद देणारा रोमांचक अनुभव ठरतो.

अशा आस्वादाच्या प्रक्रियेत कधी आपल्याला विनोद बरोब्बर कळल्याचा आनंद, कधी आडाखा चुकला तरीही हाती काही तरी नवीन गवसल्याचा आनंद, कधी फसवणूक झाल्याचा आनंद, तर कधी यात काय बुवा विनोद? या प्रश्नाशी अडून बसण्याचे हिरमुसलेपण... धर्मापुरीकर या पुस्तकातून आलटून पालटून असे विविध अनुभव देतात. व्यंगचित्रांचे अभ्यासक आणि भाष्यकार म्हणून ते आता महाराष्ट्राला परिचित आहेत. श्रेष्ठ जागतिक व्यंगचित्रकारांच्या चित्रांचे संग्रह त्यांनी जमवले आहेत आणि त्यातील एकेका चित्रातलं 'परकीय हास्य' उलगडवून सांगण्यात त्यांना आनंद वाटत असतो. हे हास्य जरी परकीय असलं तरी ते मानवी भावभावनांशी निगडित असल्याने सार्वकालिक आणि सगळ्यांना कळेल असं असतं. ते कळून घेण्याची आस्वादकाची तयारी मात्र हवी असते. शास्त्रीय संगीताची प्राथमिक माहिती असेल तर गाण्याचा आस्वाद अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो, तसंच व्यंगचित्रांचंही आहे.

कागदाच्या घड्या कराव्यात, तशा जणू व्यक्तिरेखांच्या घड्या करून त्या उकलाव्यात, अशा शैलीत चित्रं काढणाऱ्या शि. द. फडणीस यांचं चपखल असं व्यंगचित्र मुखपृष्ठावर आहे. पुढे धर्मापुरीकर यांनी निवडलेलं एक-एक व्यंगचित्र आणि त्याविषयीचं विवेचन आहे. परंतु हे विवेचन त्या विशिष्ट चित्रापुरतंच मर्यादित राहत नाही. त्या ओघात इतरही अनेक गोष्टी सांगतं, माहिती देतं. फ्रेंच व्यंगचित्रकार सेम्पे हा लेखकाचा जरा जास्तच आवडता चित्रकार, त्यामुळं त्याच्या चित्रांची संख्या जास्त आहे. लक्ष्मण, सरवटे, फडणीस, ठोकळ, अजित निनान आदी भारतीय चित्रकार, तर हॅन्स मोजर, मायकेल फोक्स, नॉर्मन थेलवेल, निक होबार्ट, रेबर, आंद्रे फ्रान्स्का, जे डब्ल्यू टेलर असे बरेच परकीय व्यंगचित्रकार या पुस्तकातून भेटतात, उलगडतात. लेखकाच्या खास शैलीत!

आंद्रे फ्रान्स्का या व्यंगचित्रकाराच्या शैलीची ओळख करून देताना धर्मापुरीकर म्हणतात, 'त्याची रेषा ओबडधोबड, जुन्या मॉडेलची गाडी खडखडाट करीत निग्रहानं चालवल्यासारखी आहे.' व्यंगचित्रातली स्पेस, चित्राला चौकट आवश्यक की अनावश्यक अशा, आस्वादनाची पातळी उंचावणाऱ्या गोष्टी सांगता सांगता ते सहज सांगून जातात की हसण्यासाठीची उत्सुक मनःस्थिती ही व्यंगचित्र समजण्यासाठीची प्राथमिक गरज आहे. खरंतर हे कोणत्याही विनोदाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

एकेका चित्रातले सौंदर्य आणि विनोदाची जातकुळी समजावून सांगताना त्यांनी निवडलेली चित्रं नमुनेदार आहेत. पोरांचं लटांबर मागे ठेवून प्रियकरासोबत निघून गेलेल्या बायकोचं पत्र वाचणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आणि लटांबरांचे चेहरे पाहून आपण खुदकन हसतो. परंतु त्या चित्राविषयी धर्मापुरीकरांनी लिहिलेलं वाचल्यावर आपण ते चित्र पुन्हा पाहतो आणि आधी न दिसलेल्या अनेक गोष्टी त्यात दिसू लागतात. या पुस्तकातील बहुसंख्य चित्रांबाबत हे होतं. मंद स्मित, हास्य, नुसतीच खळी, खळखळून हास्य यांसोबतच हसता हसता गंभीर. अंतर्मुख करणारी काही व्यंगचित्रंही यात आहेत. पुस्तकाची दोन्ही पानं व्यापणारं, काळ्याकभिन्न अंधारात, चांदण्या रात्री स्वतःच्या आयुष्यावर चिंतन करणाऱ्या व्यक्तिरेखेचं, सेम्पे यांचं अप्रतिम चित्र हे या पठडीतलं आहे.

अशा इतर चित्रांविषयीही सांगण्याचा मोह होतो, परंतु समोर ते चित्र ठेवून वाचण्यातली गंमत त्यामुळे कमी होईल. व्यंगचित्रांची पुस्तकं आपल्याकडे क्वचितच निघतात. धर्मापुरीकरांचं हे पुस्तक त्यामुळे अधिकच महत्त्वाचं आहे. ते पाहून, वाचून, मग आपल्या आयुष्याकडे आलटून-पालटून पाहावं, जगण्यातली मौज नक्कीच वाढेल!

मुखपृष्ठ : शि. द. फडणीस

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा