गांधी, विनोबा आणि जयप्रकाश

मिलिंद बोकील

/media/3PsUwUBtveWj.jpg

महापुरुषांचा अभ्यासपूर्ण वेध - गणेश कदम ganesh.kadam@timesinternet.in

कुणी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करा! महात्मा गांधीजींची ओळख करून देताना सर्रास वापरलं जाणारं हे वाक्य... पण गांधीजी खरंच कधी असं म्हणाले होते? या उदाहरणाशी त्यांचा खरंच काही संबंध होता?

...

'आणीबाणी हे तर अनुशासन पर्व आहे',… अपवाद वगळता अवघा देश आणीबाणीच्या विरोधात उभा ठाकला असताना विनोबा भावे खरंच असं म्हणाले असतील? नसतील तर खरं काय?

...

ज्यांच्या आवाहनातून समाजसेवेला वाहून घेणारी एक पिढी निर्माण झाली ते जयप्रकाश नारायण सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषा कधी बोलले होते? की त्यांचं संपूर्ण क्रांतीचं आवाहन समजण्यात गफलत झाली?

...

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश यांच्या बद्दलचा हा संशयकल्लोळ नवा नाही. आणि त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न आजवर झाला नाही, असंही नाही. या आधीही याविषयी लिहिलं, बोललं गेलंय. मात्र, या साऱ्याची एकत्रित चर्चा क्वचितच कुठं झालीय! मिलिंद बोकील यांच्या 'गांधी, विनोबा आणि जयप्रकाश' या पुस्तकानं ती उणीव भरून काढलीय. अर्थात, केवळ काही प्रश्नांची चर्चा करणं हा पुस्तकाचा हेतू नाही. लेखकाच्याच शब्दांत सांगायचं तर हा विसाव्या शतकातील भारतीय विचारदर्शनाचा आणि सामूहिक कृतीचा आलेख आहे. बोकील यांचं हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या दीर्घ लेखांचं विस्तारित रूप आहे. मात्र, लेखकाच्या प्रामाणिकपणामुळं त्याला एका ग्रंथाचं स्वरूप आलंय. गांधी, विनोबा व जयप्रकाश यांच्याबद्दलचं ममत्व लेखकानं कुठंही लपवून ठेवलेलं नाही. पण म्हणून लेखक भारावूनही गेलेला नाही. तिन्ही नेत्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न इथं दिसतो. गांधी, विनोबांच्या विचाराचं महत्त्व सांगताना त्यांच्या मर्यादाही इथं दिसतात.

गांधी हे केवळ सत्य व अहिंसा या दोन कोनातूनच समजून घेता येणार नाहीत. सत्य, अहिंसेबरोबरच अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, अस्वाद, भयवर्जन, सर्वधर्मसमानता, स्वदेशी आणि स्पर्शभावना ही त्यांची ११ व्रते समजून घ्यायला हवीत, असं लेखकाला वाटतं. त्या व्रतांची चर्चा लेखकानं इथं केली आहे.

गांधी, विनोबा यांच्या तुलनेत जेपींचा राजकारणाशी अधिक आणि थेट संबंध आला होता. राजकीय भूमिका घेतल्यामुळं आपोआपच देशाचं अर्ध जनमानस (विशेषत: काँग्रेसच्या प्रभावाखालील) त्यांच्या विरोधात गेलं. त्यामुळं त्यांचा मूळ विचार बाजूला पडला. हा विचार पुन्हा एकदा आकळण्याची संधी या पुस्तकानं दिलीय.

विनोबांचं नाव काढलं की भूदान आणि आणीबाणीतील त्यांची भूमिका एवढंच सर्वसाधारणपणे डोळ्यांपुढं येतं. सर्वोदय, भूदान, ग्रामदान, लोकनीती याच्याशी विनोबांचा संबंध आहेच, पण ते म्हणजेच विनोबा नव्हेत. त्यांना व्यापक स्वरूपात उलगडण्याचा प्रयत्न लेखकानं केलाय. इतकंच काय, बोकील यांनी विनोबांना 'दुसरा ज्ञानेश्वर' असा दर्जा दिलाय. तो का, हेही पुस्तकात वाचायला मिळतं.

तिन्ही व्यक्तिमत्त्वांच्या विचारातील साम्यस्थळंही इथं दिसतात. त्यातील प्रमुख म्हणजे या तिघांचीही भगवद्गीतेवर असलेली श्रद्धा. तिघांच्याही जीवनात गीतेचं स्थान महत्त्वाचं होतं. गांधीजींचा विचार उचलताना विनोबा आणि विनोबांचा विचार उचलताना जयप्रकाश त्याचा परीघ कसा विस्तारतात, हेही लेखकानं दाखवून दिलंय. विज्ञानाबदद्ल गांधीजींचा दृष्टिकोन काहीसा रुढीवादी होता. विज्ञान म्हणजे 'पाश्चात्त्य' अशाच काहीशा नजेरतून गांधीजी पाहत होते, असं लेखकानं म्हटलंय. विनोबांनी मात्र, विज्ञान आणि अध्यात्माची अशी योग्य सांगड घातली होती. विज्ञानाच्याद्वारेच ब्रह्मविद्या सिद्ध होईल, असं त्यांचं प्रतिपादन असल्याचं लेखकानं मांडलं आहे. ते आवर्जून वाचण्यासारखं आहे. विज्ञान व धर्माला एकमेकांचे शत्रू बनविणाऱ्यांनी विनोबांचे हे विचार मुळातून अभ्यासायला हवेत.

जयप्रकाश हे केवळ राजकारणी वा समाजकारणी म्हणून आतापर्यंत पुढं आले आहेत. बोकील यांनी त्यांची अध्यात्मिक बाजू इथं मांडलीय. एवढंच नव्हे तर, तरुणांच्या पुढचे प्रश्न अध्यात्मिक असतात हे सांगणारे जेपी हे एकमेव नेते होते, असा लेखकाचा दावा आहे. जेपींच्या या नवदर्शनामुळं त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा होते.

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश ही तिन्ही व्यक्तिमत्त्वं अफाट आहेत. त्यांच्यावर बरंच साहित्यही उपलब्ध आहे. तरीही नव्या साहित्याची गरज भासते. कारण, हे महापुरुष प्रत्येक वेळी नवं काहीतरी देतात. त्यांचे विचार मुळांचं भान सुटू देत नाहीत. त्यांना एका पुस्तकात बसवणं कठीण आहे. ती एक या पुस्तकाची मर्यादा आहेच. पण म्हणून त्याचं मूल्य कमी होत नाही. 'शाळा'सारखी कादंबरी व अनेक प्रकारचं समाजशास्त्रीय लिखाण करणाऱ्या बोकील यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत तिन्ही व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिलीय. पुस्तकाचं मुखपृष्ठ आशय, विषयाला साजेसं असंच आहे. आपली मूळं घट्ट ठेवण्याची प्रेरणा हे पुस्तक नक्की देतं!

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा