गगन समुद्री बिंबले

विजय पाडळकर

/media/5Q9CTt449lco.jpg

भन्नाट दुहेरी अनुभव - सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा रसास्वाद - गणेश कदम

वाचक खेचण्यासाठी पुस्तकाचं शीषर्क महत्त्वाचं असतं का?... ‘वाचस्पती’ लोकांसाठी याचं उत्तर ‘नाही’ असं असू शकतं. पण आपलं पुस्तक केवळ ‘ठराविकांनीच’ वाचावं असं कुठल्या लेखकाला वाटेल? विजय पाडळकर यांनाही तसं वाटत नसावं. त्यामुळंच ‘गगन समुद्री बिंबले’ असं नाव देण्याचं प्रयोजन समजत नाही. अर्थात, एका प्रतिभावंताच्या कृतीतून दुसऱ्या प्रतिभावंतानं निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे अशा अर्थानं त्यांनी हे शीर्षक वापरल्याचं मलपृष्ठावर स्पष्ट केलं आहे. तरीही शीर्षकाच्या बाबतीत इतकं प्रतीकात्मक होणं खटकतंच!

हे एक सोडलं तर ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे. दोन वेगवेगळ्या अभिजात कलाकृतींचा एकत्रित रसपान केल्याचा भन्नाट अनुभव. चार महान साहित्यिकांच्या तितक्याच महान साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा रसास्वाद हा खरेतर या पुस्तकाचा विषय. पण हा रसास्वाद घेताना वाचक नकळत अभिजात साहित्याची सफर करून येतो. सत्यजित राय यांच्या ‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’, ‘अपूर संसार’, ‘मोनिहारा’, ‘पोस्टमास्तर’, ‘समाप्ती’, ‘चारुलता’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘गणशत्रू’ या चित्रपटांची चर्चा यात आहे. यातील पहिले तीन चित्रपट प्रख्यात बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘पाथेर पांचाली’ व ‘अपराजितो’ या कादंबरीवर बेतलेले आहेत. तर पुढचे चार चित्रपट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या तीन लघुकथा व एका दीर्घकथेवर आधारित आहेत. ‘शतरंज के खिलाडी’ हा हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेवर तर, ‘गणशत्रू’ हा हेन्रिक इब्सेन याच्या ‘अॅन एनिमी ऑफ द पीपल’ या नाटकाचं रूपांतरण आहे.

विजय पाडळकर यांनी राय यांच्या चित्रपटांचा रसास्वाद घेताना सोबत मूळ कथांचं व कादंबऱ्यांचंही विवेचन केलं आहे. ते चित्रपटाच्या अनुषंगानं येत असल्यामुळं सविस्तर नाही. पण तरीही आपण एकाच वेळी राय यांचा चित्रपट पाहतोय आणि त्या दिग्गजांचं साहित्य वाचतोय, असं वाटत राहतं.

‘पाथेर पांचाली’ आणि सत्यजित राय हे एक अतूट नातं आहे. पण त्याआधी ‘पाथेर पांचाली’ व विभूतीभूषण बंदोपाध्याय यांचं एक नातं आहे आणि तेही तितकंच अतूट व प्रत्ययकारी आहे, हे फार थोड्यांना माहीत असतं. लेखकानं ते व्यवस्थित उलगडून दाखवलंय. सत्यजित राय हे काय रसायन होतं, याचीही कल्पनाही यातून येते. या महान साहित्यकृतींचं चित्रपटीय रूपांतर करताना राय यांनी केलेल्या खटपटी, तडजोडी हे मुळातून वाचण्यासारखं आहे. पाडळकर यांनी अनेक ठिकाणी मूळ साहित्यकृती आणि चित्रपट यांची तुलना केली आहे, पण कोणाचीही बाजू न घेता. खरंतर हे पुस्तक वाचताना आपल्यालाही कुणा एकाची बाजू घ्यावीशी वाटत नाही, ही पाडळकरांच्या मांडणीची जमेची बाजू आहे. ‘शतरंज के खिलाडी’मध्ये राय यांनी केलेल्या चुका त्यांनी जशा दाखवल्या आहेत. तसंच, राय यांच्यातील दिग्दर्शक कोणत्या जागी मूळ कलाकृतीपेक्षा वरचढ ठरला आहे हेही दाखवून दिलं आहे. महान साहित्यकार व सिनेनिर्मात्यांविषयीचं हे पुस्तक असल्यानं साहजिकच त्याला एक वेगळं संदर्भमूल्य आहे. त्यामुळंच चित्रपट अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्यांसाठीही हा एक संग्राह्य दस्तावेज ठरतो. नव्या, वाचत्या पिढीला रवींद्रनाथ, प्रेमचंद, विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या अभिजात साहित्याकडं खेचून नेण्याची क्षमता या पुस्तकात आहे.

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा