गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम

महमूद ममदानी अनुवाद: प्रा. पुष्पा भावे- मिलिंद चंपानेरकर

/media/dZukMB8AGAfD.jpg

‘चांगले’ मुसलमान आणि‘वाईट’ मुसलमान - लोकसत्ता टीम

शीतयुद्धानंतरच्या जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. पुष्पा भावे- मिलिंद चंपानेरकर यांनी केला असून तो लवकरच रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील ‘आधुनिकता आणि हिंसाचार’ या प्रकरणाचा संपादित अंश..
‘९/११’ च्या घटनेपूर्वी मला असे वाटत होते की, माणुसकीशी नाते जोडण्याच्या शक्यता आजमावयाच्या असतील तर ते शोकांतिकेच्या माध्यमातूनच शक्य आहे; सुबत्तेत ते शक्य नाही. सुबत्तेत माणसांना एकटे पाडण्याकडे कल असतो; शोकात्म परिस्थितीत माणसे एकमेकांशी जुळली जात असतील, असे मला वाटायचे. परंतु आता माझ्या लक्षात आले आहे, नेहमीच तसेच घडेल असे काही सांगता येत नाही. शोकांतिकेतून एक दुर्दैवी प्रतिक्रिया अशी संभवते की, आपल्या स्वत:च्या परिस्थितीबद्दल जाणून घेताना शोकांतिकेचे बळी ठरलेल्यांमध्ये, आपल्याला समजेल तेच बरोबर अशी भावना बळावते; त्या अवस्थेतही तो आपले जगात विशेष स्थान असल्याचे सिद्ध करू पाहतो.
‘९/११’नंतरच्या काळातील अमेरिकन समाजातील चर्चा पाहिल्या हे लक्षात येते की, ‘ऑशवित्झ’चा धडा अशा चर्चाच्या कंेद्रवर्ती असतो. अशा वेळी एखादा बाहेरचा निरीक्षक उपस्थित असला, तर त्याला एका गोष्टीचे आश्चर्यच वाटते; म्हणजे याचे की, इतर कोणत्याही घटनेपेक्षा प्रामुख्याने ‘होलोकॉस्ट’च्या स्मृतींच्या संदर्भानिशीच अमेरिकनांची दहशतवादावरील चर्चाविश्वे आकार घेत असतात. ‘९/११’पश्चातची चर्चा-विश्वे एका गोष्टीविषयी ठाम असल्याचे जाणवते- ‘नेव्हर अगेन’ अर्थात ‘पुनश्च कधीही नाही.’ एखाद्या वंशाची वा समूहाची हत्या (जेनोसाइड) आणि दहशतवाद यात फरक आहे. परंतु या दोहोंमध्ये एक पैलू सामायिक आहे- दोन्ही प्रकारांत नागरी समाजालाच लक्ष्य केलं जातं.
अशा घटनांमध्ये जे बळी ठरतात, त्यांच्याकडे सांस्कृतिकदृष्टय़ा अपराधी म्हणून पाहिले जाते; या प्रकारे पाहिल्यास गुन्हा करणाऱ्यांची मनोभूमिका कितपत उघड होऊ शकणार? त्यामुळे यात काहीच आश्चर्य वाटायला नको की, या प्रश्नावर जेव्हा वादचर्चा घडते, तेव्हा ती सांस्कृतिक आणि राजकीयदृष्टय़ा त्यांची ओळख काय होती, याभोवतीच घुटमळत राहते. विशेषत: ‘९/११’च्या संदर्भातील चर्चा धार्मिक मूलतत्त्ववाद आणि राजकीय दहशतवाद, याभोवतीच फिरत राहते. या चर्चेत अल्पसे योगदान करावे, या उद्देशानेच मी हे पुस्तक लिहिले आहे. विशेषत: ‘९/११’च्या घटनेकडे राजकीय संघर्षांच्या संदर्भात पाहावे; ऐतिहासिक प्रतिक्रियेत त्या संघर्षांने कसा आकार घेतला त्याकडे पाहावे, असा माझा प्रयत्न आहे.
‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ हे पुस्तक दोन भागांत विभागलेले आहे. पहिल्या भागात एकच प्रकरण समाविष्ट केलेले आहे. हे प्रकरण राजकारणाचा सांस्कृतिक अन्वय ज्या प्रकारे लावला जातो- ज्याला मी ‘संस्कृती चर्चा’ म्हणतो- त्यावर भाष्य करते. यातून राजकीयदृष्टय़ा इस्लामविषयी विचार करण्यासाठी वेगळी पद्धतही सुचवलेली आहे. अलीकडच्या काळात जी दहशतवादी चळवळ उदयास आली आहे, त्या चळवळीसह ज्या विविध प्रवृत्तींचा विकास झालेला दिसून येतो, त्याचा मागोवा या प्रकरणात घेतला आहे. यापुढील भागात, इस्लामी दहशतवाद, जो आतापर्यंत परिघावर होता, तो आता इस्लामी राजकारणाच्या कंेद्रस्थानी कसा आला आहे, ते स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे यातून मी ‘९/११’च्या घटनेचा पर्यायी अन्वयार्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अन्वयार्थ लावताना खोलवर रुजलेल्या संस्कृती-संघर्षांचे चित्र निर्माण करण्यापेक्षा, मी प्रतिवाद करीत असे विधान करतोय की, अलीकडच्या इतिहासातील म्हणजे, शीतयुद्धाच्या अखेरच्या पर्वातील घडामोडींमधून ‘९/११’ची घटना उद्भवलेली होती.
व्हिएतनाममधील अमेरिकी युद्ध संपुष्टात आल्यापासून ते १९९० मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन होईपर्यंतचा काळ म्हणजे शीतयुद्धाचे अखेरचे पर्व अशी मी व्याख्या करतो.. शीतयुद्धाच्या अखेरच्या पर्वातील ‘प्रॉक्सी’ युद्धांचा काळ दोन घडामोडींमुळे महत्त्वाचा ठरतो. त्या काळात आपल्या परराष्ट्रीय धोरणानुसार अमेरिकेचे अध्यक्ष रेगन यांच्या प्रशासनाच्या पुढाकाराने दोन वैशिष्टय़पूर्ण निर्णय घेतले गेले आणि त्यानुसार त्या दोन घडामोडी घडल्या. त्यातून तेव्हाच्या रेगन प्रशासनातील आणि बुश प्रशासनातील महत्त्वाची साम्यस्थळे प्रतीत होतात. त्याचप्रमाणे त्यातून ‘९/११’नंतरच्या ‘दहशतवादाविरुद्ध युद्ध’ पुकारण्यामागच्या मानसिकतेवर लख्ख प्रकाश पडतो.
१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात शीतयुद्धाची रणभूमी दक्षिण आफ्रिकेकडून मध्य अमेरिका आणि मध्य आशियाकडे सरकल्यावर अमेरिकेने आपले धोरण बदलले. म्हणजे तोवर अमेरिकेने राजकीय दहशतवादाबाबत जे सौम्य असे धोरण अवलंबले होते, त्याची जागा उघड व निर्लज्जपणे राजकीय दहशतवादाला जवळ करण्याच्या धोरणाने घेतली. आधी निकारागुआमधील कॉण्ट्राज आणि नंतर अफगाणिस्तानातील अल् काईदा व तालिबान या दहशतवादी संघटनांना अमेरिकेने शीतयुद्धादरम्यान आपले सहकारी मित्र-गट म्हणून स्वीकारले. त्यांना पािठबा देण्याच्या धोरणातून अमेरिकेचा शीतयुद्ध कसेही करूनजिंकण्याचा दृढ्निश्चय दिसून आला. ‘बाय आल मीन्स नेसेसरी’ अर्थात ‘आवश्यक त्या सर्व मार्गाचा वापर’ अशा शब्दप्रयोगांमधून अन्याय्य मार्गच ध्वनित होत होते. मात्र अशा सहकारी मित्रगटांसोबतचे संबंध बिघडल्यावर त्याचे परिणामही कडवट झाले. ‘९/११’ची घटना समजून घेताना शीतयुद्धातील अधुऱ्या राहिलेल्या या व्यवहारांचा विचार होणे गरजेचे आहे.
राजकीय इस्लामचा विचारही परदेशातून नाही तर देशातच निष्पन्न झालेला असतो; परंतु दोन्हीपैकी कोणताच विचार असा स्वतंत्रपणे, अलगपणे निर्माण झालेला नव्हता; पाश्चात्त्य शक्तींसोबतच्या टकरावातूनच निर्माण झालेला होता. राजकीय इस्लामचा जन्म वसाहतवादाच्या काळातच झाला होता; परंतु शीतयुद्धाच्या काळापर्यंत त्यातून दहशतवादी चळवळ निर्माण झाली नव्हती. अशी कोणती विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की, ज्यामुळे दहशतवादाला एका सैद्धान्तिक प्रवृत्तीचे राजकीय शक्तीमध्ये रूपांतर करणे शक्य झाले? माझ्या मते, सत्तरच्या दशकाच्या मध्यापासून ‘ब्लॅक-टू-ब्लॅक’ अर्थात कृष्णवर्णीयांनी कृष्णवर्णीयांवर केलेला िहसाचार आणि ऐशीच्या पूर्वार्धापासूनचा जागतिक ‘इस्लामी दहशतवाद’ दोन्हींचे पोषण एकाच सामायिक आधारभूत कारणास्तव झाले. ते सामायिक आधारभूत कारण म्हणजे, व्हिएतनाम युद्धानंतरचे शीतयुद्धाचे अखेरचे पर्व. उपरोक्त दोन्ही प्रकारच्या िहसाचाराला स्थानिक कच्च्या मालाद्वारेच आकार दिला गेला, हे जरी खरे असले तरी दोन्ही प्रकारच्या राजकीय प्रवृत्तींचा शीतयुद्धजिंकण्यासाठी व्यूहनीतीसाठी स्पष्ट रूपाने वापर केला गेला, हेसुद्धा खरे आहे.
मी माझा दृष्टिकोन मांडताना अगदी पूर्वीच्या काळातील, म्हणजे आफ्रिकेतील शीतयुद्धाच्या अखेरच्या पर्वाच्या काळातील िभगे डोळ्यावर चढवून ‘९/११’च्या घटनेकडे पाहत आहे, अशी काहींना जर काळजी वाटत असेल, तर त्यांना मी इतकेच म्हणेन- ‘आपले जे सामायिक असे चिंतेचे विषय आहेत, त्या विषयांवर माझ्या दृष्टिकोनामुळे नवा प्रकाश पडेल, अशी मला आशा आहे.’ या दृष्टिकोनातून मांडणी करताना, अमेरिका आणि संपूर्ण जगासाठीच ‘९/११’ची घटना म्हणजे किती प्रकारे एक महत्त्वाचे वळण ठरते, याचे भान मी कुठेही धूसर होऊ दिलेले नाही.
‘९/११’नंतर अमेरिकेत ज्या जाहीर चर्चा झाल्या, त्या ऐकताना महाशक्तीला जणू स्मृतिभ्रंशाचा जबरदस्त फटका बसलेला आहे की काय, असे मला वाटू लागले. कालपटावर लक्षणीय प्रभाव टाकणारी ती घटना होती, असे मानून त्याची दखल घेणे, याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही त्या घटनेचा सर्व ऐतिहासिक व राजकीय संदर्भ बाजूला सारून विचार करावा. दुर्दैवाने अमेरिकेने अधिकृत स्तरावर नेमके याच गोष्टीला प्रोत्साहन दिलेले आहे. काहीही मागेपुढे न पाहता ‘क्रुसेड’ अर्थात ‘धर्मयुद्धा’चा संदर्भ देऊन, राष्ट्राध्यक्ष बुश यांनी ‘गुड मुस्लीम’ व ‘बॅड मुस्लीम’ यांत फरक करण्याच्या प्रकाराला सुरुवात केली. या दृष्टिकोनानुसार कथित ‘वाईट मुसलमान’ स्पष्टपणे दहशतवादासाठी जबाबदार होते. त्याच काळात राष्ट्राध्यक्ष बुश अमेरिकन जनतेला आवाहन करताना असे आश्वासन देऊ पाहत होते की, या भयानक गुन्ह्य़ामुळे आपल्या नावावर व विवेकबुद्धीवर बालंट येऊ नये, यासाठी ‘भले मुसलमान’ उत्सुक आहेत आणि ‘आपल्या’ या ‘त्यांच्या’ (‘वाईट मुसलमानां’च्या) विरुद्धच्या लढाईत ते आपले समर्थन करतील यात शंका वाटत नाही. पण अशा वक्तव्यात बुश यांचा जो कंेद्रवर्ती संदेश दडलेला होता, तो काही लपून राहत नव्हता. तुम्ही ‘भले’ मुसलमान आहात हे जोवर सिद्ध होत नाही, तोवर तुम्ही ‘बुरे’ आहात असेच गृहीत धरले जाईल, असाच तो संदेश होता.
‘चांगले’ मुसलमान आणि ‘वाईट’ मुसलमान अशी विभागणी करण्यासाठी कोणतेही असे तयार निकष उपलब्ध नाहीत, की ज्यायोगे ‘चांगल्या’ मुसलमानाला जवळ करता येईल आणि ‘वाईट’ मुसलमानाला दूर सारता येईल. अशा विभागणीसाठी वर्गवारी अस्तित्वात आहे, असे गृहीत धरणे म्हणजे खरे तर आपल्या काळाचे राजकीय विश्लेषण करण्यास आपल्याला आलेले अपयश नाकारण्यासारखे आहे; त्यावर पांघरूण घालण्यासारखे आहे. सार्थ, खरी राजकीय निवड करण्यापूर्वी राजकीय विश्लेषण आवश्यक आहे आणि राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने हे पुस्तक काही योगदान करणारे ठरेल, अशी मला आशा आहे.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा