अ-अमिताभचा

जी बी देशमुख

मेहता पब्लिशिंग हाऊस

/media/5U2l7eSJ7vEo.jpg

पाने : ☀ 254 मुल्य (₹): 280.0

वेध महानायकाच्या कलाचंद्राचा ! - सकाळ वृत्तसेवा

हिंदी चित्रपटसृष्टीची स्पर्धा कुणाशी असेल तर हॉलिवूडपटाशी आणि दाक्षिणात्य चित्रपटांशी. मात्र इतकी प्रचंड आणि कडवी स्पर्धा असतानाही भारतात हिंदी चित्रपटांची लोकप्रियता इतकी आहे की हाच प्रवाह चित्रपटसृष्टीतला मुख्य प्रवाह मानला जातो. खेळांमध्ये जसे क्रिकेटने स्थान मिळवलंय तसं या हिंदी चित्रपटसृष्टीचं आहे. या चित्रपटसृष्टीत अनेक नामवंत अभिनेते होऊन गेले त्यात अमिताभ बच्चन यांचं स्थान काही वेगळंच ठरलंय. सुरुवातीला अमिताभच्या यश अपयशाच्या चर्चा होत असताना ‘बॉक्स ऑफिस’वर त्याचा चित्रपट अयशस्वी झाला की चर्चा होत असत. पण अशी काहीतरी जादू झाली की हा अभिनेता एकदम इतका वरच्या श्रेणीत गेला की त्याच्या चित्रपटाच्या तिकीट खिडकीवरील कामगिरीला काहीच महत्त्व राहिलं नाही. ती जबाबदारी, तो सोडून इतरांच्या खांद्यावर आली आणि तो चित्रपटात असणं यालाच महत्त्व आलं. त्याचा अभिनय, त्याचा वावर आणि त्याची उपस्थितीच कधीही दुर्लक्ष न करता येण्यासारखी झाली.

अर्थात हे काही रात्रीत झालं नव्हतं. अनेक वर्षांची त्याची ती साधना होती. हे घडलं कसं याचा शोध घ्यायचा झाला तर जी. बी. देशमुख यांचं `अ- अमिताभ’चा हे पुस्तक मोलाचं ठरतं. सकाळच्या ‘सप्तरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या देशमुखाच्या सदरातील लेखांचं हे पुस्तक. देशमुख यांनी यातल्या लेखातून त्या वेळची परिस्थिती आणि त्या चित्रपटाचं वेगळेपण मांडत त्यांनी अमिताभ नायकाचा महानायक कसा झाला ते सांगितलं आहे.

देशमुख यांनी हे सांगताना बच्चन यांनी ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं त्यांच्या चित्रपटाचा वेध घेतलाय. यातले लेख म्हणजे त्या चित्रपटाचं रूढ समीक्षण नाही किंवा त्या चित्रपटाबद्दलचा तो लेख नाही. इथं त्या चित्रपटात अमिताभ वावरला कसा, त्याची भूमिका कशी फुलली आणि त्याचा प्रेक्षकांवर कसा परिणाम झाला याचा तपशील आहे. इतर अभिनेत्याबद्दल ते लिहीत नाहीत असं नाही, पण त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू अमिताभ आहे. अन्य अभिनेत्यांना नावं न ठेवता ते अमिताभ त्यात वेगळा कसा होता, त्यानं ती भूमिका कशी वठवली त्यामुळे तो त्या चित्रपटात कसा लक्षात राहतो, याबद्दलची माहिती नेमकी आणि अमिताभच्या चाहत्या मंडळींना तर आवडेलच पण त्याचे चाहते नसलेल्या प्रेक्षकांनाही ती लक्षात येईल अशा पद्धतीने दिली आहे.

प्रत्येक दिग्दर्शकाबद्दल सांगताना देशमुख फार महत्त्वाची माहिती देऊन जातात, प्रकाश मेहरांच्याबद्दल लिहिताना ते ‘मुकद्दर का सिंकदर’ चित्रपटाचा संदर्भ देताना मेहरा यांनी वीस रिळात दोन मिनीटसुद्धा अमिताभ नसलेलं दृष्य ठेवलं नाही असं मार्मिक निरीक्षण नोंदवतात. दिग्दर्शकाबद्दल असं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवताना ते मनमोहन देसाई यांनी अमिताभला किती रूपात सादर केलं ते सांगतात त्याचवेळी ‘अमर अकबर ॲन्थनी’ मध्ये त्याने विनोदाची पद्धत कशी बदलली ते सांगतात आणि त्यानं लांबलचक इंग्रजी वाक्य तो कसा सुलभतेनं म्हणतो हे सांगतात. त्याचवेळी त्यांनं उपहासात्मक विनोदाची शैली ‘नमकहलाल’ मध्ये कशी वापरली तेही ते स्पष्ट करतात. ‘शक्ती’ मधल्या दिलीपकुमार आणि त्याच्यातल्या अभिनयाच्या जुगलबंदीबद्दल लिहिताना उगीचच ते अमिताभमय होत नाहीत किंवा अंधभक्तीतून दिलीपकुमार यांच्याबद्दल नकारार्थी लिहीत नाहीत. त्या प्रकरणाचा शेवट करताना ते शेवटी जी ओळ लिहितात ते फार महत्त्वाची आहे. ‘अब दिलीपकुमार की खैर नही ’ या उन्मादात ‘शक्ती’ची तिकीट काढून थिएटरात गेलेले अमिताभचे चाहते, चित्रपट संपल्यानंतर ती भावना विसरून गेले होते. सर्वोत्तमातला आनंद काय असतो, त्याच अनुभव तसल्या उथळ तुलनेवर मात करणारा ठरला होता.’ देशमुख प्रत्येक लेखात अमिताभचं गुणवर्णन न करता त्याला ती भूमिका करताना लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक कसे मदत करणारे ठरले हे सुद्धा सांगतात. काहीवेळा त्या चित्रपटातल्या प्रसंगाचा मागे येऊन गेलेल्या चित्रपटातल्या दृश्याशी कसं नाते होतं ते सांगतात आणि तो प्रसंग अधिक ठळक करतात.

चित्रपटांचा आपला अभ्यास किती दांडगा आहे अशा कुठलाही आव न आणता ते प्रसंगाप्रसंगाने वेगवेगळी माहिती देतात मग ती माहिती गीतकारासंबंधीची असो किंवा सहकलाकारांबद्दलची असो. ‘मुछे हो तो नथ्थूलालजी जैसी हो, वरना ना हो असं शराबीतलं वाक्यं किंवा नमकहलाल मधलं ‘लो कल लो बात’ अथवा ‘अल्टिमेटली’ या शब्दाची फेक कशी केवळ अमिताभचा ठसा उमटवणारी होती हे स्पष्ट करतात. १९६९ मध्ये सुरू झालेली अमिताभची कारकीर्द २०२२ मध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ प्रर्यंत सुरूच आहे. देशमुख या प्रदीर्घ प्रवासाचा वेध ६२ लेखांमधून घेतात त्यामध्ये काही चित्रपटांचा मनावर संयम ठेवून समावेश करत नाहीत. अमिताभने मी दिग्दर्शकाचा अभिनेता आहे असं एका मुलाखतीत सांगितलं होतं.देशमुख त्या वाक्याची प्रचीती आणून देताना त्याच्या अभिनयाचा चंद्राप्रमाणे वाढणाऱ्या कलांचा वेध घेताना दिग्दर्शकाला बरोबर घेऊन चित्रपटसृष्टीतल्या सगळ्या नभांगणाचाच चपखल वेध घेतात. हिंदी चित्रपटसृष्टीचा हा प्रदीर्घ प्रवास व बदलत्या समाजजीवनाचा धांडोळाही ते अमिताभच्या माध्यमातून घेतात. त्यामुळं हे पुस्तक रंजक तर होतंच पण त्यापलीकडं जाऊन वेगळा आनंद देतं.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा