पंख फुलवू या प्रतिभेचे

डॉ. नलिनी गुजराथी

ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन, पुणे

/media/KnERRh3WcAMa.png

पाने : ☀ 192 मुल्य (₹): 250.0

शिकवण प्रतिभाविकसनाची! - डॉ. अ. ल. देशमुख

आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे विज्ञान. दैनंदिन घटनांचं सुव्यवस्थित, सामान्यरुपी व यथार्थ ज्ञान म्हणजे विज्ञान. निसर्गात घडणाऱ्या घटनांचे पृथ्थ:करण, वर्गीकरण करुन त्यांचा संदर्भ तपासून त्यामागे असणारा कार्यकारण भाव तपासण्याच्या दिशेने घडणारा प्रवास म्हणजे विज्ञान. घटनांचे निरीक्षण, परीक्षण व प्रयोग करून विज्ञान वस्तुनिष्ठ स्वरुपाचे ज्ञान देते. वैज्ञानिक माहिती, प्रवृत्ती, पद्धती, कृती व दृष्टिकोन ही विज्ञानाची महत्वाची अंगे आहेत. कुतुहल जागृती व प्रतिभा शोधन हे विज्ञानाचे पायाभूत घटक आहेत. ज्ञानप्रबोधिनीच्या डॉ. नलिनीताई गुजराथी यांचे ‘पंख फुलवू या प्रतिभेचे’ हे पुस्तक याचे प्रतिबिंब आहे. डॉ. नलिनी गुजराथी या १९६७ मध्ये मंडळाच्या परीक्षेत दोन सुवर्णपदके व सोळा बक्षिसे मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमधे पहिल्या व एकूणात तिसऱ्या आल्या होत्या. ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कै. अप्पा पेंडसे यांच्या मुशीत तयार झालेल्या कृतिशील विज्ञान शिक्षिका.

या पुस्तकात प्रामुख्याने सर्जनशील विचार कौशल्यांचे प्रशिक्षण कसे करावे तसेच विविध तंत्रे वापरुन प्रतिभेचा विकास कसा करावा हा विषय मांडला आहे. कल्पना, कल्पना आणि कल्पना या एकाच शब्दाभोवती पुस्तकातली सर्व प्रकरणे गुंफलेली आहेत. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. माशेलकर म्हणतात, “वैज्ञानिक संशोधन आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांचे नेतृत्व यामध्ये आज मी जवळजवळ सहा दशकं कार्यरत आहे, असं असतानाही डॉ. नलिनी गुजराथी यांचं हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटतं की मी शाळेत असताना हे पुस्तक वाचलं असतं, तर मी अजूनही चांगला संशोधक झालो असतो.'

पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहेत. त्यांच्या केवळ नावामधूनच आपल्याला पुस्तकाच्या वैज्ञानिक व शैक्षणिक मूल्याचा अंदाज येईल. वैज्ञानिक प्रतिभेची ओळख, निरीक्षण कौशल्य, प्रश्न कौशल्य, कल्पना विस्फोट, गुणधर्म सूची, रूपांतरण-बहुदिश निर्मिती, रचनात्मक विश्लेषण, सिनेटिक्स, काल्पनिक विज्ञान कथा, समस्यां विषयी संवेदनशीलता, सृजनशील समस्या परिहार व वैज्ञानिक प्रतिभेचे उपयोजन. प्रस्तुत प्रकरणांमधून विज्ञान युगासाठी लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यांमधे रुजवणे शिक्षकांना खूप सोपे जाणार आहे. कोणत्याही पाठ्यक्रमातून त्या त्या विषयाबद्दल विद्यार्थ्यांत रुची निर्माण होणे, जिज्ञासा जागी करणे, मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे ही गरज या पुस्तकामधून पूर्ण होईल.

पुस्तकाच्या मांडणीत लेखिकेने जाणीवपूर्वक संवाद शैलीचा वापर केला आहे. स्वतः लेखिका प्रतिभाताईच्या भुमिकेत असून कल्पना, सृजन, नवीन आणि प्रेरणा हे त्यांचे चार प्रतिभावान विद्यार्थी आहेत. वर्गात ३५ मिनिटे व्याख्यान पद्धतीचा वापर करून शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना संवाद, कृती व शोधवृत्तीतून विषय स्पष्ट केला तर सर्वच विषयांचे अध्यापन रंजक, आनंददायी, प्रभावी व परिणामकारक होते हे या पुस्तकाच्या प्रत्येक पानामधून जाणवते.

प्रतिभा म्हणजे काय हे अनेकांना माहित आहे पण ती मोजायची कशी हे खूप कमी लोकांना माहित आहे. प्रतिभा म्हणजे जास्तीत जास्त कल्पना सुचणे (ओघ), वेगवेगळ्या कल्पना सुचणे (लवचिकता), व अद्वितीय, नेहमीपेक्षा वेगळ्या कल्पना सुचणे (नावीन्य) या तीन्हींचा समुच्चय आहे. या तिन्हींच्या समूहामधून कोणालाही आपला व विद्यार्थ्यांचा प्रतिभागुणांक काढता येतो हे या पुस्तकात फार सोप्या पद्धतीने दाखवले आहे.

अगदी पालकांना सुद्धा आपल्या घरी आपल्या पाल्याचा प्रतिभागूणांक काढता येईल एवढी सोपी पद्धत या पुस्तकातून लेखिकेने सांगितली आहे. सहजता व सोपेपणा हे या पुस्तकाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकात ओघ, लवचिकता, कल्पनाविस्फोट, निर्मिती, संवेदनशीलता, चल (व्हेरिएबल) या शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञउदाहरणार्थ :- प्रश्न कौशल्यावर काम केलेले सचूमन, कल्पनाविस्फोटाचे जनक अॅलेक्स ऑसबॉर्न, क्रिएटिव्ह आणि क्रिटिल थिंकिंग चे अभ्यासक एडवर्ड डी बोनो, कल्पनेला महत्त्व देणारे आल्फ्रेड व्हाईटहेड, नवनिर्मितीची पाच तत्त्वे मांडणारे रॉबर्ट क्रॉफर्ड, प्रतिभा विकसनाचे ''रचनात्मक विश्लेषण' हे तंत्र शोधणारे डॉ. फर्ट्झ झ्विकी, सिनेक्टिस चे तंत्र विकसित करणारे जे. जे. गॉर्डन, विज्ञान कथा लेखक डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, सृजनशील समस्यापरिहाराचे सहा टप्पे मांडणारे इसाकसेन आणि ट्रॅफिंजर या शिक्षणतज्ञ व वैज्ञानिकांच्या माहितीमुळे शिक्षकांना आपलं अध्यापन रंजक, प्रभावी, परिणामकारक व विशिष्ट उंची गाठणारं करता येईल. या पुस्तकाचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक धडा किंवा प्रकरण संपल्यानंतर दिलेले संकल्पना चित्र आणि ओघतक्ते.

शिक्षक, पालक आणि बालक या सर्वांच्या दृष्टीने या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त भाग म्हणजे प्रश्न कौशल्ये हा आहे. आपले अध्यापन किती परिणामकारक झाले हे ठरविण्यासाठी अचूक, अर्थपूर्ण व अपेक्षित प्रतिसाद देणारे प्रश्न शिक्षकाने विचारणे हे एक महत्त्वाचे तंत्र आहे. हे तंत्र अधिक परिणामकारक पद्धतीने वापरता यावे या दृष्टीने लेखिकेने खेळाच्या माध्यमातून प्रश्न म्हणजे काय? तो निर्माण कसा होतो? प्रश्नाचे प्रकार कोणते? मोठेपणी आपण कमी प्रश्न विचारतो, असं का? विचारप्रवर्तक, शोधक प्रश्न कसे काढायचे? प्रश्नांचं वादळ निर्माण करणे म्हणजे नेमकं काय? इत्यादी गोष्टींचा उहापोह व मार्गदर्शन फार उत्तम केलं आहे.

प्रश्नपत्रिका काढताना किंवा वर्गाध्यापन करताना शिक्षकांना नेहमी नावीन्यपूर्ण, वेगळे, प्रभावी प्रश्न कसे काढायचे हा प्रश्न पडतो. त्यासाठी हे पुस्तक आपल्याला उत्तम मदत करेल. आपल्या प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता वाढविणे आणि अध्ययनअध्यापन-मूल्यमापन प्रक्रियेत जाण आणणे यासाठी हे पुस्तक वापरावे असे मला वाटते. प्रश्नपत्रिका काढणे आणि त्यावरून मूल्यमापन करणे हा सध्या शिक्षणप्रक्रियेचा आत्मा आहे. हा आत्मा सचेतन ठेवण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी घेतले पाहिजे, वाचले पाहिजे, अभ्यासले पाहिजे आणि वापरले पाहिजे.

विज्ञानयुगासाठी लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यांमधे रुजवणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मांडले आहे. त्यासाठी शालेय स्तरावर इनोव्हेशन करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी. या पुस्तकाचे ''Let''s unfold the Wings of Creativity'' हे इंग्रजी भाषांतरही प्रकाशित झाले आहे.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा