प्रतिभावंतांचं गाव

संपादक : सुनीताराजे पवार

संस्कृती प्रकाशन, पुणे.

/media/PDKXZ6PEu08V.jpg

पाने : ☀ 372 मुल्य (₹): 500.0

घराबद्दलची व्याकूळ जाणीव - विश्‍वास वसेकर

आपल्या सगळ्यांचं एक घर असतं... खूप गोड, संपूर्ण आणि सुरक्षित. मग आपण ‘मोठे'' होतो तर घर ‘छोटं’ होत जातं. मागं पडतं आयुष्यभर, आपण त्या घराच्या शोधात भटकतो. कधी विचारात, तर कधी स्वप्नात, कधी साहित्यात, तर कधी भौतिक उपलब्धीमध्ये.

पण विश्‍वासाचं, मूल्यांचं, भावनेचं आणि सुरक्षिततेचं ते घर आपल्याला कधीच भेटत नाही. मागे वळून आलो तरी ते घर राहिलेलं नसतं. आपणही पूर्वीचे राहिलेलो नसतो... जे काही मिळतं ते आपलं घर नसतं आणि आम्ही विचारात पडतो की खरंच असं घर कुठं असतं. या सत्याला सामोरे जायला देखील आपण घाबरतो, की खरंच घर नाहीच आहे आणि आपण उगीचंच भ्रमात जगतोय. हे घर आणि गाव मनात असतंच. ‘प्रतिभावंतांचं गाव’ या पुस्तकातून आपण एका वेगळ्या जगात जातो.

सुनीताराजे पवार या केवळ एक संपादक नाहीत. त्यांनी मोजकं लेखन केलं असलं तरी त्या मनस्वी आणि प्रतिभासंपन्न लेखिका आहेत. जीवनाबद्दल आणि साहित्याबद्दल स्वतःचं एक सखोल चिंतन त्यांच्याकडे आहे. ‘प्रतिभावंतांचं गाव’ हा विषय केवळ त्यांनाच सुचू शकतो. आणखी एक. लेखकाची संवेदनशीलता लहानपणी, आपल्या गावातच घडायला आरंभ होत असतो. संवेदनशीलता म्हणजे बाह्य वास्तवाबद्दल, वास्तवातील घडामोडींबद्दल प्रतिक्रिया देण्याची पद्धत म्हणजे संवेदनशीलता. लेखकाची संवेदनशीलता त्याला मिळणाऱ्या अनुभवांची, स्वनिरपेक्ष, उपयुक्तता निरपेक्ष व्यवस्था लावण्यातून घडत असते. सजग लेखकाला या जडणघडणीत आपला गाव कितपत सामील आहे हे शोधता आले पाहिजे. या दृष्टीने विचार करता प्रा. व. बा. बोधे यांचा लेख मला महत्त्वाचा वाटतो. आजही त्यांना असे वाटते की त्यांच्या साहित्य लेखनात त्यांचे कोरेगाव केंद्रवर्ती आहे. त्यांची संवेदनशीलता आणि त्यांचा गाव यांच्या आंतरिक नात्याचा वेध प्रा. बोधे यांनी घेतला आहे. एका लेखकासोबत त्यांच्या वक्तृत्वाचा गुण या गावात कसा विकसित झाला हेही इथं प्रस्तुत ठरतं.

रामचंद्र देखणे यांचा लेखही संपादकाच्या अपेक्षेला उतरणारा आहे. गावातील भक्तिमय वातावरण रंगवताना आपल्या जन्माची चित्तरकथा देखणे सांगून म्हणतात, ज्याचा जन्मच मुळी आईच्या पोटातून जनाबाईच्या ओव्या गाता गाता झाला आहे तो आयुष्यभर संतसाहित्याची सेवा करणार नाही तर काय करणार? (पृ. ७७). रामचंद्रांनी लहानपणी गुरे वळली आणि आपल्या गुराखी जीवनातील समग्र अनुभवावर ‘गोपा- निनाद’ ही कादंबरी लिहिली. संपादकांनी सुचवलेल्या विषयाचे मर्म लक्षात घेऊन लिहिलेला आणि सर्वांत समर्पक शीर्षक असलेला उत्कृष्ट लेख भारत सासणे यांचा झाला आहे. त्यांच्या लेखाचे शीर्षक आहे ‘दूर गेलेले घर’. या परीक्षणाच्या सुरुवातीला घराबद्दल मी जे लिहिले त्याच संपूर्ण परिप्रेक्ष्यातून हा उत्तम लेख निर्माण झाला आहे. सासणे यांनी सुरुवातीलाच म्हटले आहे की माणूस ज्या कुठल्या घरापासून पारखा होतो, त्या घराचा शोध म्हणजे त्याचा पुढचा सगळा अस्वस्थ प्रवास असतो. (पृ. १५५). अत्यंत सुंदर अशा चिंतनाच्या अंगानं हा व्यामिश्र विषय आपल्या समर्थ प्रतिभेने भारत सासणे यांनी पेलला आहे. अनेकदा वाचून अंतर्मुख व्हायला लावणारा या पुस्तकातला सर्वांत सुंदर असा हा लेख.

भारत सासणे यांच्या तोडीची श्रेष्ठ प्रतिभा असणारा लेखक आहे श्रीकांत देशमुख. त्यांचा लेख त्यांच्या प्रतिभेच्या मुशीतून जन्मलेला आणि चिंतनाचे व्योम व्यापणारा असा झाला आहे. गावातल्या वाईटातल्या वाईट माणसाला समजून घेत त्यालाही आपलं मानणं हे त्यांच्या संवेदन स्वभावाचं अद्‌भुत वैशिष्ट्य या लेखात आपल्याला थक्क करून जातं. माझे गुरुवर्य प्रा. वा. ल. कुलकर्णी म्हणायचे ब्युटी डिस्टर्बस्‌ अँड ग्रेट ब्युटी डिस्टर्बस्‌ ग्रेटली. सौंदर्य माणसाला अस्वस्थ करते आणि महान सौंदर्य अत्याधिक अस्वस्थ करते. उर्दू गझलमधील सर्वांत सुंदर शेराला हासिक- ए- गझल शेर म्हणतात. या पुस्तकातला अशा प्रकारचा सर्वांत सुंदरतेचा बहुमान द्यायचा झाल्यास मी तो डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना देईन. प्रतिभा आणि प्रज्ञा यांचा उत्कृष्ट समन्वय असणारे दुसरे व्यक्तिमत्व या पुस्तकातील लेखकांत तरी मला दिसत नाही. आपल्यातला लेखक आणि समीक्षक कसा घडला आणि त्याचे त्याच्या गावाशी उत्कट आणि सातत्यपूर्ण नाते कसे राहिले याचे मार्मिक चित्रण कोत्तापल्ले करतात.

या ग्रंथातील प्रतिभावंतांच्या सर्वच लेखांनी मला ब्युटी डिस्टर्बस्‌ न्यायाने अस्वस्थ केलंय. आपले घर हरवलेल्या प्रत्येकाच्या मनात व्याकूळ करणारी घराबद्दलची जाणीव या ग्रंथातील प्रतिभावंतांचे लेख करतात हे या ग्रंथाचे मोठेच यश म्हणता येईल. गोकुळातून द्वारकेत गेलेल्या कृष्णाला आयुष्यात पुन्हा कधीही गोकुळात जाणे शक्‍य झाले नाही. परंतु त्याच्या मनातले गोकुळ कधीही आणि किंचितही विसरले गेले नाही.

संस्कृती प्रकाशन, पुणे.
(०२०- २४४९७३४३, ९८२३०६८२९२)

द्वारा : सकाळ वृत्तसेवा