जय शिवराय

प्रशांत शांताराम देशमुख

सिद्धहस्त प्रकाशन

/media/UHGN1kpQ1bzr.jpg

पाने : ☀ 240 मुल्य (₹): 300.0

वेध शिवरायांच्या प्रेरणादायी आयुष्याचा... - सकाळ वृत्तसेवा

शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचं ‘जय शिवराय ’ हे पुस्तक केवळ शिवचरित्र नसून छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील विविध घडामोडीमधून आपण काय शिकायचं याबद्दल मार्गदर्शन करतं. शिवचरित्राचा वर्तमानाशी सांधा जोडणाऱ्या या पुस्तकाला ज्येष्ठ पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेतच त्यांनी हे पुस्तक कसं वाचायचं आणि या पुस्तकाकडं कुठल्या दृष्टीने पाहायचे हे स्पष्ट केले आहे. पुस्तकाचं वेगळेपण विविध उदाहरणं देत त्यांनी स्पष्ट केलंय. प्रशांत देशमुख यांनी सकाळच्या ‘मुंबई आवृत्ती’त ‘गुड मॉर्निंग’ हे व्यक्तिमत्व विकास विषयक मार्गदर्शन करणाऱ्या सदराचं लेखन केलं होतं. पुढं त्याचं पुस्तक झालं. त्यानंतर आलेले त्यांचं हे दुसरं पुस्तक. शिवचरित्राचा बरीच वर्षे अभ्यास करून मग शिवरायांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची त्यांनी निवड केली आणि त्यातून नव्या पिढीनं काय शिकायला हवं ते सांगितलंय.

शिवरायांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांकडे केवळ भावनिक दृष्टीने न बघता त्यातून नव्या पिढीने काय शिकायला पाहिजे, याचा विचार करून ह्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाची रचना त्यांनी केली आहे. "त्यांचे राज्य बुडवू नका'' या प्रकरणात शिवरायांनी आपले बंधू व्यंकोजीराजे यांच्या संदर्भात कठोरपणाने कसा निर्णय घेतला आणि त्याच वेळी वडीलकीच्या जबाबदारीतून व्यंकोजीराजांना कशी मदत केली हे सांगितलं आहे. छत्रपती शिवरायांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाबाई यांच्याबद्दलच्या एका प्रकरणात शिवरायांच्या पराक्रमात तसेच त्यांच्या स्वराज्य निर्मितीत जिजामातांचा सहभाग कसा मौलिक होता ते लक्षात येते.

औरंगजेबाच्या भेटीला गेलेले छत्रपती शिवराय या भेटीतच औरंगजेबाला मारता येईल का? याचा विचार करतात, असा वेगळा मुद्दाही देशमुख येथे मांडतात. औरंगजेबाच्या विरुद्ध शिवरायांनी विविध राजांना कसे जोडून घेतले ते छत्रसाल राजाला केलेल्या मदतीवरून कळते. त्याचबरोबर शत्रूच्या गोटात आपला माणूस कसा राहील ह्याची काळजी त्यांनी कशी घेतली ते ‘शत्रूच्या गोटातही आपला समर्थक’ या प्रकरणातून कळते. औरंगजेबाचा मुलगा शाहजादा मुअज्जम महाराजांना कशी मदत करतो त्याचा तपशील या प्रकरणात आहे. औरंगजेबाने पाठविलेले फर्मान व त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वीच छत्रपती शिवरायांना हा कशी मदत केली ते कळते आणि राजांच्या मुत्सद्देगिरीचा परिचय होतो. सुरतेवरील छत्रपती शिवरायांची स्वारी इतिहासात सांगितली गेली आहेच, पण शिवरायांनी सुरतेवरच का हल्ला केला याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देशमुखांनी येथे एका प्रकरणात केले आहे.

अपयश किंवा प्रचंड अडचणी असताना आपण निराश होतो या संकटातून कसा मार्ग काढायचा हे कळत नाही, अशा वेळी छत्रपतींसमोर कोणत्या अडचणी आल्या याचा दाखला देत देशमुख येथे नेमके मार्गदर्शन करतात. ‘जय शिवराय’ या शीर्षकाचे हे पुस्तक केवळ मिरवणुकीपुरता किंवा शिवरायांचा केवळ दिवसापुरता जयजयकार करण्यापुरते तात्पुरते रहात नाही तर शिवरायांच्या चरित्रातून आपण नेमके काय शिकायचे आणि आचरणात काय आणायचे याबद्दल मौलिक मार्गदर्शन करते. पुस्तकाचं हे बलस्थान आहे.

प्रकाशक : सिद्धहस्त प्रकाशन, हातनोली, खोपोली जिल्हा रायगड, (संपर्क : ९८२२६५०२८० )

द्वारा : सकाळ वृत्तसेवा