कर्कविज्ञानाची गोष्ट

डॉ. आनंद जोशी व शेखर देशमुख

राजहंस प्रकाशन, पुणे

/media/kkvkatha.jpg

पाने : ☀ 184 मुल्य (₹): 250.0

कर्करोगाविरुद्धचा यशस्वी सामना! - शशिकांत कोठेकर


‘बाबू मोशाय.. जिंदगी बडी होनी चाहिए.. लंबी नही... मै मरने से पहले मरना नही चाहता...’ १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ या हिंदी चित्रपटातील सुपरस्टार राजेश खन्ना यांचा हा डायलॉग आजही अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणतो. कर्करोगाच्या आजाराची मोठ्या प्रमाणावर भीती या चित्रपटामुळे भारतीयांच्या मनात घर करून बसली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कर्करोग अर्थात कॅन्सर झाला की माणूस मरणारच... हे अनेकांच्या डोक्यात बसलेलं आहे. कॅन्सर शब्द वाचला, ऐकला की खेकड्याचं चित्र नजरेसमोर येतं. ज्याप्रमाणे खेकडा भक्ष्याला त्याचे पाय आणि नांगी यांत पकडतो आणि मग ते भक्ष्य त्याच्या तावडीतून सुटू शकत नाही, त्याप्रमाणे कॅन्सरच्या तावडीतून कोणी सुटू शकत नाही, असा एक मोठा गैरसमज अनेकांचा आहे.

पण हा कॅन्सर, ज्याला मराठीत कर्करोग म्हणतात तो नक्की काय आहे ? हा कसला आजार आहे? तो नक्की कसा होतो? कॅन्सर झाला की माणूस काही दिवसांत मरतो का? त्याच्या उपचारांचा खर्चदेखील मोठा असतो?... असे अनेक प्रश्न आहेत. कॅन्सर नक्की काय आहे, तो कसा आणि कोणाला होऊ शकतो, त्याच्यावर उपाय काय, त्याच्यावर सुरू झालेलं संशोधन, उपचारपद्धती कोणती.... अशा शेकडो प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’ या पुस्तकातून करण्यात आला आहे.

कर्करोगावर उपचारासाठी कोणती औषधं कशी वापरली जातात, किमोथेरपी म्हणजे नक्की काय, या उपचारांचा शरीरावर नक्की काय परिणाम होतो, त्यांचा वापर कसा केला जातो... याची माहिती देताना या उपचारपद्धतीचा शोध कसा लागत गेला त्याची अभ्यासपूर्ण माहिती लेखकांनी यात दिली आहे. कोणत्या रुग्णालयात कर्करोगावर उपचार केले जातात त्याची यादीदेखील शेवटी पुस्तकात दिली आहे. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिची मावशी, आई हिला कॅन्सर झाल्यावर वंशपरंपरेने तिलादेखील कॅन्सर होण्याची शक्यता होती, त्यासाठी तिने काय केलं? भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग याला कॅन्सर झाल्यावर त्यावर मात करून तो मैदानात पुन्हा कसा उतरला; शस्त्रक्रियेनंतर कॅन्सरविरोधी लढ्यात, जागरूकता मोहिमेला कसा वेग आला, याची माहिती पुस्तकात आहे. स्त्री व पुरुष दोघांनाही कोणत्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो? ज्यांच्या घराण्यात कॅन्सरचा रुग्ण असेल, त्याचा परिणाम पुढील पिढीवर होतो का?... अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुस्तक वाचल्यावर मिळू शकतात.

विकसित देशांत १९९२ नंतर कॅन्सरविरोधी जागरूकतेमुळे कॅन्सरचे रुग्ण सापडणं कमी होऊ लागलं आणि त्या उलट भारतासारख्या विकसनशील देशात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजाराबद्दल असलेले गैरसमज व अनास्था यामुळे कॅन्सर शरीरात बळावल्यानंतर उपचारासाठी धाव घेणारे अनेक जण आहेत. सुरुवातीच्या काळात जर कॅन्सरचं निदान झालं, तर आधुनिक विज्ञानाच्या सहकार्याने त्यावर उपचार करून रुग्ण बरा होऊ शकतो. हे पुस्तक म्हणजे कर्करोगाची माहिती देणारं गाइड नाही, की केवळ डॉक्टरांनी किंवा कर्करोग झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी वाचायचं पुस्तक नाही, तर कर्करोग काय आहे, त्याची काय लक्षणं आहेत, त्यावर कोणते उपाय आहेत याची माहिती देणारं हे पुस्तक असल्याने आपल्या डोक्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक वाचून मिळू शकतात.

युग माहिती-ज्ञानाचं असलं तरीही, केवळ माहिती आणि ज्ञान तुमच्या पुढ्यात असून चालत नाही, त्याचं आकलन व्हावं, त्या माहिती-ज्ञानाचा यथायोग्य अर्थ लागावा, यासाठी ते सारं साध्या-सोप्या आणि सुगम शैलीत असावं लागतं. प्रस्तुत पुस्तक ही गरज भागवतंच; परंतु सतत उत्क्रांत नि प्रगत होत गेलेल्या कर्कविज्ञानाला निर्णायक वळण देणाऱ्या शोधांच्या रंजक आणि रोमांचक कथा पुस्तकाला वेगळेपण देऊन जातात. यात किमोथेरपीचा शोध कसा लागला, किंवा कर्करोग शरीराच्या विशिष्ट भागातच का पसरतो इथपासून ते भारतीय वंशाच्या संशोधकाने कर्करोग नियंत्रणात साथ देणाऱ्या कृत्रिम व्हिटॅमिन्सचा शोध कसा लावला आणि गुंतागुंतीच्या कल्पना-संकल्पना कशा प्रत्यक्षात येत गेल्या इथपर्यंतच्या अनेक अपरिचित गोष्टी वाचकांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणाऱ्या ठरतात.

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२० - २४४७३४५९, २४४६५०६३)

द्वारा : सकाळ वृत्तसेवा