जे.आर.डी. टाटा - टाटापर्वातील सुवर्णकाळ
जयप्रकाश झेंडे
साकेत प्रकाशन
जे.आर.डी. टाटा - टाटापर्वातील सुवर्णकाळ
जयप्रकाश झेंडे
साकेत प्रकाशन
पाने : ☀ 288 मुल्य (₹): 350.0
आपल्या अनेक संस्थांबरोबरच अवघ्या देशाला प्रगतीची वाट दाखवणाऱ्या एका सार्वकालीन महान उद्योगपतीचं वेधक चरित्र ‘जे.आर.डी. टाटा - टाटापर्वातील सुवर्णकाळ’ या पुस्तकातून जयप्रकाश झेंडे यांनी मांडलं आहे. त्यांनी टाटा मोटर्समध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून तीस वर्षं काम केलं आहे.
आपल्या मनोगतामध्ये झेंडे म्हणतात, ‘नवीन युगातील स्पर्धात्मक वातावरणात मूल्यांचा ऱ्हास होऊ न देता प्रगती कशी करता येते, हे ‘जे.आर.डीं.’नी स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिलं आहे, ते आजच्या होतकरू आणि तरुण उद्योजकांना उद्बोधक आणि मार्गदर्शक ठरेल.’
जे.आर.डी. टाटा या चरित्रनायकाविषयी ते म्हणतात, ‘‘जेव्हा महायुद्ध सुरू होतं आणि जग यांत्रिकी आणि तंत्रज्ञानात प्रगती करीत होतं, तेव्हाच जे.आर.डीं.नी आपल्या विमानप्रेमाला उजाळा द्यायचं ठरवलं. जे.आर.डीं.नी केवळ विमान्नोड्डाणाचा परवानाच घेतला नाही, तर १९३२ मध्ये भारतातील पहिल्या व्यावसायिक विमान वाहतूक कंपनीची ‘टाटा-एअरलाइन्स’ची स्थापनादेखील केली. टाटा-एअरलाइन्स पुढे ‘एअर-इंडिया’ या नावाने ओळखली जाऊ लागली. जे.आर.डीं.च्या समृद्ध नेतृत्वामुळे ‘एअर-इंडिया’ ही कंपनी आदर्श म्हणून ओळखली जात होती. जगातील अनेक विमान कंपन्या त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी ‘एअर-इंडिया’त पाठवीत असत.’’ जमशेदजी टाटा यांनी सुरू केलेल्या टाटा उद्योगसमूहाचा जे.आर.डीं.नी प्रचंड विस्तार केला व एक सुवर्णयुगच निर्माण केलं.
झेंडे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘टाटांचं वेगळेपण हे त्यांच्या समूहाच्या वाढत्या आकारात नाही, तर त्यांच्या अस्तित्वाच्या उद्देशात आहे. जमशेदजी टाटा यांनी संस्था उभारणीसाठी एक उद्दिष्ट, दृष्टिकोन समोर ठेवला होता. जिथे समाज हा केवळ व्यवसायातील एक भागधारक नव्हता, तर तो व्यवसायनिर्मितीचा आणि अस्तित्वाचा एकमेव उद्देश होता. ‘टाटा ट्रस्ट’ हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचं अतिशय बोलकं उदाहरण आहे. ‘टाटा ट्रस्ट’तर्फे सर्व पैशांची गुंतवणूक समाजोपयोगी कामांसाठी केली जाते.’
जे. आर. डी. म्हणतात, ‘जे समाजाकडून आम्हाला मिळतं, तेच कितीतरी अधिक पटीने आम्ही समाजाकडे परत करतो.’
टाटा उद्योगसमूहाचं कार्य पाहता याची प्रचिती येते. उदा.- स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक उद्योगपती निर्माण झाले आहेत आणि त्यांनी आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला आहे; पण जेव्हा नैतिकतेचा विचार समोर येतो, तेव्हा टाटा उद्योगसमूहाचं नाव प्रथम क्रमांकावर असतं.
झेंडे यांनी जे.आर.डी. टाटांच्या या चरित्रग्रंथाचा अनुक्रम एवढा छान रचला आहे की, जे.आर.डीं.चं चरित्र वाचकांच्या मनात हळुवार झिरपत जातं. जे.आर.डीं.च्या वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक आणि स्वदेशकार्याचा एक सुरेख आलेख आणि प्रतिमा त्यांनी वाचकांसमोर ठेवली आहे.
पुस्तकातून औद्योगिक धाडसाची, मूल्यवर्धित व्यवहाराची आणि देशप्रेमाची अत्यंत आवश्यक अशी प्रेरणा तरुण उद्योजकांना मिळेल. सखोल विचार आणि कठोर परिश्रम याशिवाय आयुष्यात नाव घेण्यासारखं काही मिळवता येत नाही, याची आपल्याला हे पुस्तक आठवण करून देत राहील. जे.आर.डी. यांचं व्यक्तिमत्त्व एवढं प्रभावी व आकर्षक होतं की, त्यांचं चरित्र लिखाण करण्याचा मोह बऱ्याच जणांना झाला असावा; पण हे काम सोपं नव्हतं. जयप्रकाश झेंडे यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. मला खात्री आहे, या चरित्रग्रंथाच्या अनेक आवृत्ती निघतील.
प्रकाशक : साकेत प्रकाशन, पुणे. (०२०-२४४३६६९२, औरंगाबाद ०२४०- २३३२६९२, २३३२६९५)
द्वारा : सकाळ वृत्तसेवा