आरंभबिंदूच्या अल्याड पल्याड (होने से न होने तक)

लेखिका:सुमती सक्सेना लाल अनुवाद: सुनीता डागा

सृजन संवाद प्रकाशन

/media/8vv1vziP9F5Z.jpg

पाने : ☀ 300 मुल्य (₹): 360.0

संवेदनशीलतेचा अबोल, उत्कट प्रवास - प्रा. सुजाता राऊत

एक जुनी लोककथा आहे, ‘भिंतींशी बोलणारी बाई’ एक एकाकी वयस्क स्त्री जिने मनात खूप काही साठवून ठेवले आहे, जिच्या मनात शल्य भरभरून गेली आहेत आणि त्यामुळे ती जाड गोलमटोल होऊन गेली आहे अशी स्त्री. ती एकदा एका पडक्या घरापाशी गेली आणि तिथल्या अर्धवट राहिलेल्या भिंतींना आपल्या व्यथा सांगू लागली. तिचे बोलणे ऐकून भिंती कोसळू लागल्या आणि तिचे शरीर मन हलके होऊन गेले. स्त्रीला योग्य रीतीने स्वतःला व्यक्त करता येणे म्हणूनच महत्त्वाचे असते.

शिकू लागलेली स्त्री ज्यावेळी स्वतःच्या अनुक्त भावना समोर मांडते त्यावेळी संवेदनशील साहित्याची निर्मिती होते. हिंदीतील ख्यातनाम लेखिका "सुमती सक्सेना लाल" यांच्या "होने से न होने तक" या कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध अनुवादक सुनीता डागा यांनी केला आहे. ठाण्याच्या सृजनसंवाद प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले हे पुस्तक एका स्त्रीचे भावविश्व तर उलगडतेच पण त्याचबरोबर मानवी आयुष्याचा, भावनांचा शोध घेण्याची चिंतनशीलता या कादंबरीत दिसते.

मुळात कादंबरीमध्ये अनुभवांचा पट मांडण्यासाठी मोठा अवकाश मिळत असतो. मोठा कालखंड कवेत घेण्याची क्षमता कादंबरीत असते. तसेच नायक नायिकांचे अत्यंत सखोल चित्रण करण्याची संधीही इथे मिळू शकते. कारण कादंबरी या साहित्यप्रकाराची व्याप्ती किंवा आवाका हा बहुपटली बहुकेंद्रीय असतो. ‘आरंभबिंदूच्या अल्याड-पल्याड’ या अन्वर्थक शीर्षकाचा कादंबरीचा मराठी अनुवाद वाचताना वाचक येथील भावविश्वात पूर्णतः एकरूप होतो. कादंबरीत असणारा प्रवाहीपणा त्यातील मानस विश्व, तिथली पात्रं, घटना, घटितांमधून प्रतीत होणारा आशय या सगळ्या निकषांवर ही कादंबरी उजवी ठरते.

अंबिका ही या कादंबरीची नायिका एका सुशिक्षित सुस्थापित घरातील पण अनाथ आहे. वडिलांना तिने लहानपणीच गमावले व शालेय वयात असताना आईचा मृत्यू अशा मानसिक दुखापती तिने कोवळ्या वयातच अनुभवल्या आहेत. हॉस्टेलवर राहून शिकणारी अंबिका आत्याकडे येते तेव्हा एकटेपणाच्या सावल्या तिला सतत घेरत राहतात. तिचे पालकत्व तिच्या आईची मैत्रीण सहगल आंटीकडे असते.

याच मिसेस सहगल यांचा मुलगा यश याच्याबरोबर अंबिका मैत्रीच्या स्नेहाच्या धाग्यात बांधली गेली आहे. अबोध वयातली मैत्री एखाद्या उमलणाऱ्या फुलाप्रमाणे प्रेमात रूपांतरित होतेय. कादंबरीची सुरुवात होते ती अंबिकाच्या एम. ए. परीक्षेच्या निकालापासून. तिच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय आत्या, आंटी इतर मंडळीच घेत असतात. मुळातच अंतर्मुख असणारी अंबिका परिस्थितीनुसार अधिक अबोल, मनाच्या पाकळ्या मिटवून घेणारी अशी होत जाते.

तिला चंद्रासहाय कॉलेजमध्ये नोकरी मिळते आणि तिच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाला सुरुवात होते. ती स्वतंत्रपणे राहू लागते कारण हॉस्टेल वा नातेवाइकांच्या घरी आश्रितासारखे राहणे तिला रुचत नाही. मुळात हुशार, कष्टाळू असणारी ती कॉलेज विश्वात विरघळून जाते. त्यातल्या अनुभवांच्या चित्रमय, तपशीलवार वर्णनातून ही कादंबरी पुढे प्रवाहित होते. यश आणि तिच्या अव्यक्त प्रेमाचा धागा यात मिसळलेला आहे.

कादंबरीची भाषा अनलंकृत, सोपी पण प्रवाही आहे. या चित्रणात एक जिवंतपणा आहे जो वाचकाला आपलेसे करतो. कादंबरी लखनौ शहरात घडते आणि साधारणतः १९९५-२००० मधील काळाचे यात चित्रण आले असले तरीही त्यातील मूल्य संकल्पना व मानवी स्वभाव चित्रण आजही समकालीन वाटते. मानवी नातेसंबंधांसोबतच महाविद्यालयातील मॅनेजमेंट आणि शिक्षकांमधील शह-काटशह यात अतिशय विस्तृतपणे रेखाटलेले आहेत. प्राचार्यपदावरील एखाद्या विवेकी व्यक्तींचा मॅनेजमेंट पॉलिटिक्सने घेतलेला बळी या कादंबरीला कलाटणी देणारा असल्याने ही फक्त अंबिकाचीच गोष्ट राहत नाही.

या सत्तासंघर्षात स्त्रीच दुसर्‍या स्त्रीला खाली खेचण्याचा प्रयत्न करते त्यामुळे ही कादंबरी स्त्रीवादी न होता स्त्रीकेंद्री अशी होते व अत्यंत संयतपणे स्त्रियांमधील नात्यांची वीण उलगडून दाखवते. अंबिकाच्या महाविद्यालयीन अनुभवांचे चित्रण करताना तिच्या वैयक्तिक आयुष्याचा धागा मात्र नंतर अधांतरी सोडल्यासारखा वाटतो किंबहुना वैयक्तिक आयुष्याला वळसा घालून ती मनाच्या प्रवासाला निघाली आहे असे सूचित केले आहे. कलाकृतीत येणारे हे सूचन अनेकार्थता अनेक परींनी तिला श्रेष्ठत्व बहाल करते.

कादंबरीचा अनुवाद अतिशय सरस असा उतरला असल्याने ती अनुवादित आहे अशी कुठेही शंका येत नाही, हेच या कादंबरीच्या मराठीकरणाचे खरे श्रेय आहे. मूळ लेखिकेची शैली आपल्याकडील सानिया, अंबिका सरकार, नीरजा या लेखिकांच्या लेखनशैलीची आठवण करून देते. ही कादंबरी मराठीत वाचतानाही या शैलीचे सातत्य अबाधित ठेवले आहे आणि हे अनुवादकाचे मोठे यश म्हणावे लागेल. कादंबरीतील अंबिका फक्त स्वतःशी बोलत राहते आणि तिच्या मनातील भिंती कधीच कोसळत नाही अशी एक जाणीवही शेवटी होते.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा