सखा नागझिरा

किरण पुरंदरे

/media/LptiWsQVVaKi.jpg

प्रस्तावना - माधव गणेश गोगटे

माझ्या अंगाखांद्यावर फुलपाखरं बसलेली होती.
मला डास फोडत होतै. एक बुरखा हळद्या आणि एक सुभग
यांच्या आवाजांच्या मी नंकला करत होतो.
ते मला भरभरून प्रतिसाद देत होते.
जंगलात मी एकटा होतो.
माझ्या आयुष्यातले अतीव सुखाचे क्षण अनुभवत होतो.
माझं किती छान चाललं होतं!

एक-दोन नाही, तर तब्बल ४00 दिवस नागझिऱ्याच्या जंगलात राहून किरण पुरंदरे यांनी अत्यंत कष्टपूर्वक गोळा केलेल्या माहितीचा ठेवा म्हणजे 'सखा नागझिरा'.

कविमनाच्या लेखकाची तरल संवेदनशीलता आणि शास्त्रीय अभ्यासाचा रोखठोख बाज यांचा सुंदर मिलाफ पुस्तकात झाला आहे. जंगलाशी, तिथल्या मातीशी एकरूप होऊन पुरंदरे यांनी त्यांच्या सुपरिचित ओघवत्या शैलीत अवघं जंगल आपल्या समोर उभं केलं आहे.

विशेष म्हणजे, शास्त्रीय बैठक असली, तरीही हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं. महाराष्ट्रातील कोणत्याही अभयारण्याबद्दलचं अशा धर्तीचं हे पहिलंच पुस्तक आहे.

सूक्ष्म निरीक्षणशक्तीमधून आलेली खणखणीत निरीक्षणं आणि जंगलाविषयीचं अपार प्रेम यांचा सुंदर अविष्कार या पुस्तकात झाला आहे.

----------------------------------------------------------------------

प्रथम मला किरणचं मनःपूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं, कौतुकही करावंसं वाटतं. मी माझ्या वनखात्याच्या ४० वर्षांच्या सेवेत अनेक संशोधकांना, अभ्यासकांना जवळून पाहिलंय. लोक निवासव्यवस्था, जेवण, वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडून मिळणारं सहकार्य अशा किरकोळ गोष्टींच्या बाबतीत चक्क तक्रारी करतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून अकांडतांडव करतात. वैयक्तिक, शारीरिक गरजा महत्त्वाच्या मानतात. अशा लोकांमध्ये आणि किरणच्या कामात मला एक खूप महत्त्वाचा फरक जाणवतो, तो म्हणजे किरणने कमीत कमी साधनांचा वापर करून, स्थानिक मंडळींच्या पोटात शिरून, निसर्गाशी समरस होऊन, प्रचंड हालअपेष्टा सहन करून खणखणीत माहिती गोळा केली आहे. ही माहिती अत्यंत अमूल्य आहे. असं सर्वस्पर्शी आणि संपूर्णतः शास्त्रीय काम महाराष्ट्रातील कोणत्याही अभयारण्याच्या अथवा राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीत झालेलं माझ्या पाहण्यात आलेलं नाही.

किरणचं काम एखादा नवस बोलल्यासारखं आहे. नवस बोलणारी व्यक्‍ती स्वतःच्या शरीराला कष्ट देत, शेकडो साष्टांग नमस्कार घालत देवाच्या पायाशी लीन होते, तसा किरण नागझिऱ्याच्या जंगलाशी लीन झाला, एकरूप झाला. जंगलात राहून संशोधन तर करायचं आहे, पण अंगाला माती लागू द्यायची नाही, अशा हस्तिदंती मनोऱ्यात राहण्याच्या वृत्तीपासून किरण शेकडो कोस दूर आहे. त्याने झोकून देऊन, अक्षरशः घाम गाळून काम केलं आहे. अत्यंत साधी निवासव्यवस्था, एकसुरी जेवण, वीज नाही, दवाखाना नाही, पावसाळ्यात माणूसकाणूस नाही अशा परिस्थितीत आनंदाने राहून, कोणतीही क्षुल्लक तक्रार न करता त्याने नागझिऱ्याच्या जंगलाविषयी फार महत्त्वाची माहिती गोळा केली आहे. हे काम नुसतंच महत्त्वाचं आहे असं नाही, तर हे काम करणारा तो माझ्या माहितीतला पहिला मराठी माणूस आहे.

या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्यं मला जाणवली आहेत. पहिलं म्हणजे जंगल या परिसंस्थेच्या जवळजवळ सर्व पैलूंना किरणने स्पर्श केला आहे. प्राण्या-पक्ष्यांच्या 'ग्लॅमरस' जाती सोडून तो खाली आला आहे. तो वाघ एके वाघ करत बसला नाही. दुसरं म्हणजे तेंदूपत्ता, बांबू यांसारख्या वनोपजांचा व्यापार कसा चालतो, गोंदियासारख्या शहरातली बडी मंडळी यांत कशी गुंतली आहेत याच्या लिंक्स या पुस्तकात दिलेल्या आहेत. जंगलांवर आघात करणाऱ्या लोकांविषयी, मार्केट फोर्सेसविषयी सहसा कुणी बोलत नाही. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने स्थितप्रज्ञ वृत्तीने, त्रयस्थ भावनेने लिहिलंय. वनखात्याच्या कामातील चुका, मर्यादा, उणिवा दाखवून स्वतःची ताकद आणि उंची वाढवण्याचा (केविलवाणा!) प्रयत्न करणारे आणि आयुष्यभर याचाच ध्यास घेणारे शेकडो लोक आणि किरण यांच्यात फरक आहे. त्याने वनखात्याच्या चुका, उणिवा आणि प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केलेलं नाही. सर्व बाजूंनी विचार करून मांडणी केलेली आहे. जे काही पाहिलं ते जसंच्या तसं आपल्या समोर ठेवलं आहे. उदाहरणार्थ, एका वनरक्षकाबरोबर जंगलात हिंडत असताना त्यांना बांबू चोरणारी टोळी भेटते, याचा उल्लेख पुस्तकात आहे. या घटनेचा बाऊ करून तिचं ग्लोरिफिकेशन करणं सहज शक्य होतं; पण ४० बांबूचोर विरुद्ध एक वनरक्षक ही ग्राउंड रिअलिटी मांडण्याबरोबरच किरणने अशा चोरीच्या घटनांमुळे अभयारण्यावर किती ताण येऊ शकतो, याचं स्पष्ट विवेचन केलं आहे. या उदाहरणावरून वनखात्याचे कर्मचारी किती भयंकर परिस्थितीत काम करतात, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात येईल.

१९७० साली नागझिरा अभयारण्याचा उद्‌घाटन सोहळा झाला, तेव्हा श्री. शरद साठे आणि श्री. केळावकर यांच्या सोबत मीही उपस्थित होतो. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कामानिमित्त, तसंच 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'चा संचालक म्हणून माझं या भागात नेहमी फिरणं असायचं. मला स्वतःला या कामाविषयी खूप उत्सुकता होती. किरण जंगलात असताना नागझिऱ्याला माझ्या दोनदा भेटीदेखील झाल्या होत्या. आता पुस्तक पाहिल्यावर मला खात्रीने म्हणावंसं वाटतं की, या पुस्तकाने माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. अशा प्रकारच्या अभ्यासाला चालना मिळावी, म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे, निसर्ग पर्यटनात काम करणाऱ्या व्यक्‍ती आणि संस्थांच्या सहकार्याने एखादी वन्यजीवन अभ्यास शिष्यवृत्ती (वाइल्ड लाइफ स्कॉलरशिप) सुरू करता येईल, असं सुचवावंसं वाटतं.

महाराष्ट्रातीलच नाही, तर जगातील सर्व वाचकांना आणि निसर्ग रसिकांना माझी विनंती आहे की, त्यांनी या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद द्यावा. नागझिऱ्याच्या जंगलात जाण्यापूर्वी हे पुस्तक जरूर वाचा. तुम्हाला वेगळा नागझिरा बघायला मिळेल. हे पुस्तक म्हणजे एक उत्कृष्ट फिल्ड गाइड आहे.

माधव गणेश गोगटे
(निवृत्त) प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य

द्वारा : पुस्तकातुन साभार