द नटमेग्ज कर्स – पॅराबल्स फॉर अ प्लॅनेट इन क्रायसिस

अमिताव घोष

/media/9780226815459.jpg

जायफळकांड! - अतुल देऊळगावकर

जायफळे स्वस्त झाली, तरी पर्यावरण-विनाशामागची वसाहतवादी, नववसाहतवादी वृत्ती संपत नाही. हे पुस्तक या वृत्तीच्या कथा सांगते…

अमिताव घोष यांच्या ‘द नटमेग्ज कर्स – पॅराबल्स फॉर अ प्लॅनेट इन क्रायसिस’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, निळ्याशार समुद्रकाठांवरील घनदाट अरण्याच्या पाठीमागे ज्वालामुखीतून उसळणारा लाव्हा व आसमंतात पसरलेला धूर दिसतो. अशी पाश्र्वभूमी तयार करून लेखक आपल्याला हिंदी महासागरातील इंडोनेशियामधील बांदा द्वीपसमूहावर घेऊन जातात. सन १६२१. सेलामोन गाव निर्मनुष्य करण्याचा आदेश घेऊन डच महसूल अधिकारी तिथं दाखल झाला आहे. याआधी काही दशकांपासूनच बांदा परिसर डचांना सामोरा जात होता. त्या स्थानिकांनी त्यांच्या कुवतीनुसार जमेल तेवढा विरोध केला. परंतु लवकरच शस्त्रास्त्रांनी सुसज्ज डचांसमोर आपला निभाव लागणं अशक्य, हे वास्तव लक्षात येताच कैकजण आसपासच्या जंगलात आश्रयास गेले. शिल्लक राहिलेले नाइलाजाने गाव रिकामं करण्याच्या मोहिमेस सहकार्य करत होते. वातावरणातील ताण व त्याची कारणं त्या अधिकाऱ्याला काही केल्या समजत नव्हती. काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री काहीही दिसणं शक्य नव्हतं. तेव्हा कोणीही आपल्या समोर नसताना, भयंकर शत्रू आहे व तो चालून येण्याच्या तयारीत आहे, अशी कल्पना करून डचांनी गोळ्यांचा भडिमार केला. त्या कत्तलीतील बळींच्या संख्येचा अंदाज कोणालाही आला नाही. ती का होतेय? हे मरणाऱ्यांना माहीत नव्हतं आणि काबीज केलेल्या वनस्पतीला किती किंमत येणार, हे अधिकाऱ्याला पुरेसं ठाऊक नव्हतं. इतरत्र कुठेही उपलब्ध नसलेलं, दुर्मीळ व बहुमूल्य जायफळ हस्तगत करण्याची ही प्रक्रिया होती. जायफळाला खूप किंमत होती, तेव्हा डचांनी स्थानिकांचा संहार करून व उरलेल्या स्थानिकांना गुलाम करीत बांद्याच्या जायफळांचा ताबा घेतला. पुढे जायफळाचा पुरवठा अती झाल्यावर मागणी कमी असल्यामुळे बाजारभाव पडू लागले. तेव्हा जायफळाच्या वृक्षांचा विनाश करून बाजारातील भाव वधारून घेतला. शतकानुशतकं शांत व सुस्थिर आयुष्य जगणाऱ्या स्थानिक जनतेचा वंशविच्छेद करून अनमोल वनसंपदा खरवडण्यासाठीची मोहीम अशी असते. घोष यांनी या पुस्तकातून, डचांनी जायफळाचं साम्राज्य असलेल्या बांद्यात केलेल्या विध्वंसाची बखर सादर केली आहे.

ज्ञानपीठाने सन्मानित घोष हे १९८६ पासून सातत्याने कल्पित व कल्पितेतर साहित्य निर्मिती करीत आहेत. ‘वसाहतवादी अत्याचार व त्यामुळे झालेली स्थानिकांची परवड’ हे त्यांच्या लेखनांचं मुख्य सूत्र आहे. वर्तमानातील अवस्थेस जबाबदार असलेल्या भूतकाळातील सूक्ष्म बारकावे हेरून अनेकांगांनी लोकजीवनावर टोकदार भाष्य हे घोष यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. ते, अनेक सुट्या घटनांचे तपशील व त्यांना गुंफणारा धागा यांच्या मनोवेधक मांडणीनंतर निष्कर्ष सादर करतात. त्यांनी ‘इन अ‍ॅन अँटिक लँड’ (१९९२) मध्ये नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशातील वसाहतवादी कारवाया दाखवल्या होत्या. तर ‘हंग्री टाइड’ (२००४) मध्ये समुद्राची पातळी वाढत चालल्यामुळे जमीनच नाहीशी होत चाललेल्या गंगाकाठच्या सुंदरबनची कैफियत मांडली होती. ‘द ग्लास पॅलेस’ (२०००) मधून म्यानमार व मलेशियामधील रहिवाशांची कहाणी सादर केली होती.

पर्यावरण विनाशांमुळे पृथ्वीवर येत असलेल्या संकटमालिकांनी व्यथित झालेल्या घोष यांनी २०१६ साली ‘द ग्रेट डिरेंजमेंट – क्लायमेट चेंज अँड द अर्नंथकेबल’ हे पुस्तक लिहिलं होतं. अनेक शोधनिबंध वाचून, वैज्ञानिकांशी चर्चा करून त्यांनी कार्बन अर्थव्यवस्थेची वंशावळ उलगडून दाखवणारा इतिहास सादर केला होता. अकराव्या शतकात चीनमध्ये कोळशाचा तर १८ व्या शतकात ब्रह्मदेशात तेलाचा (ऑइल) वापर सुरू झाला तेव्हापासूनच ‘कर्ब उत्सर्जन आणि सत्ता’ हे समीकरण रुजलं आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी वसाहतकाळातील आणि नववसाहत काळातील उद्योगधंद्यांच्या कारवाया व त्यांचे परिणाम दाखवले होते. ‘राजकारण’ या विभागात ‘हवामान बदल ही संकल्पानाच नाकारण्यामागील राजकारणाचं’ विश्लेषण तसंच हा करार अमलात न आल्यास आणि जगाची तापमान वाढ न रोखल्यास काय होईल, याचं धावतं वर्णन घोष यांनी केलं होतं.

ग्लासगोत होत असलेल्या महत्त्वपूर्ण हवामान परिषदेच्या निमित्तानं त्यांचं हे नवीन पुस्तक दाखल झालं. (पर्यावरणविषयक मजकुरांना मिळालेल्या प्रसिद्धीचा आलेख पाहिला तर कोपनहेगन व पॅरिस परिषद काळात दोन मोठे उच्चांक आढळत होते. वाढत्या हवामान संकटांमुळे यंदाची परिषद प्रसिद्धीबाबत तरी नवा विक्रम करण्याची चिन्हं दिसत आहेत. याचा अंदाज घेऊन या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत.)

निसर्ग आणि भांडवलशाही

प्रस्तुत पुस्तकात घोष यांनी आजच्या हवामान- आणीबाणीची पाळंमुळं शोधताना सोळाव्या शतकातील पाश्चात्त्य वसाहतवादी देशांच्या निर्घृण पर्वाचा दस्तऐवज सादर केला आहे. इंडोनेशियानंतर डचांनी उत्तर अमेरिकेतील स्थानिकांची दैना केली. पुढे सर्व वसाहतवादी देशांनी मसाल्याचे पदार्थ, चहा, ऊस, अफू, खनिज इंधन व अन्य किमती ऐवजांचा खजिना लुटून त्या भागातील गावकरी व आदिवासींचं जगणं अशक्य करून टाकलं. पाश्चात्य वसाहतवादी देशांचं ‘विकास सूत्र’ कॉर्पोरेट कंपन्यांनी अधिक वेगाने पुढे नेत, जंगलावर अवंलबून असलेल्या स्थानिक जनतेला पर्यावरण निर्वासित करून टाकलं आहे. लेखक म्हणतात, ‘‘डच ईस्ट इंडिया काळापासून आजपर्यंत, एक टक्क्यांकडून ९९ टक्क्यांचं शोषण हेत आलेलं आहे. भांडवलशाहीचं स्वरूप व व्यवहार यांत फरक पडलेला नाही. आपण, हयात असलेल्या वनस्पतींवर अन्नासाठी; तर गोठून गेलेल्या जीवाश्म रूपातील वनस्पतींवर ऊर्जेबाबत पूर्णपणे अवलंबून आहोत. आजवर कधीही नव्हतं एवढं आपलं जीवन वनस्पतीकेंद्रित झालं आहे. इंधनांपासून लिथियमपर्यंत आणि पाम तेलापासून कोकोपर्यंत सर्व कारणांसाठी निसर्गसंपदेला खरवडणं अथक चालू आहे. त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणं हे वरचेवर जटिल होत चाललं आहे.’’ निसर्ग व माणूस दोघांचंही शोषण करणाऱ्या मनोवृत्तीचं विश्लेषण करताना लेखक म्हणतात, ‘‘फ्रान्सिस बेकन, अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन व फ्रान्सिस गॅल्टन यांनी ही हिंस्रा मानसिकता घडवली. गोऱ्यांचा वर्णाहंकार व श्रेष्ठत्वाचा भ्रम यातून त्यांची वसाहतवादी वृत्ती जोपासली गेली. इतरेजनांपेक्षा आपली भाषा व संस्कृती हीच उच्च असल्याचा दुरभिमान वाढवणाऱ्या साहित्यामुळे त्यांची स्थानिकांविषयीची तुच्छता बळावत गेली.’’ स्थानिक म्हणजे ‘असंस्कृत’, ‘जंगली’, ‘बिनडोक’ अशी समीकरणं रूढ होत गेली.

एडवर्ड सैद यांनी यासंबंधीची प्रखर चिकित्सा १९७४ सालीच केली होती. त्यांनी वसाहतवादी सत्तेच्या क्रूर वर्तणुकीविषयीचा ‘ओरिएंटॅलिझम’ सिद्धान्त मांडला. त्यात,‘‘श्वेतवर्णीयांनी साहित्यामधून, आशियाई व अफ्रिकी देश हे रानटी, असंस्कृत, आळशी व नालायक असल्याचे दाखले देण्याचा प्रघात घातला. आपण गुलाम असणं हेच योग्य, हे ठसवण्याकरिता कृष्णवर्णीयांमध्ये जबरदस्त न्यूनगंड व अपराधगंड निर्माण करणं आवश्यक होतं. हे कार्य श्वेतवर्णीय साहित्यातल्या प्रतिमांनी केलं.’’ असं म्हटलं आहे.

हे संदर्भ असते, तर…

लोकशाहीच्या स्थापनेनंतर साम्राज्यवादी व वसाहतवादीवृत्तीनं नवीन रूप धारण केलं. ती व्यक्त करण्यासाठी, १९५६ साली जाँ पॉल सात्र्र यांनी ‘नववसाहतवाद’ ही संज्ञा निर्माण केली. १९६८ साली अर्थवेत्ते गन्नार मिर्दाल यांनी ‘एशियन ड्रामा- एन्क्वायरी इन टू पॉव्हर्टी ऑफ नेशन्स’ या त्रिखंडीय ग्रंथातून वसाहतवादाचं अर्थकारण स्पष्ट केलं होतं. अमेरिकेतील कृष्णवर्णीय असोत वा आशिया- अफ्रिकेतील गरीब जनता, त्यांच्या दारिद्र्याला वसाहतवादी श्वेतवर्णीय हेच जबाबदार असल्याचं त्यांनी सिद्ध केलं होतं. आशिया, अफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांत नववसाहतवाद्यांनी हाच कित्ता पुढे चालू ठेवला आहे, हे व असे संदर्भ घोष यांच्या पुस्तकात आले असते तर नववसाहतवाद ही संकल्पना अधिक स्पष्ट झाली असती.

‘फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’चं अलीकडचं सर्वेक्षण सांगतं, ‘दरवर्षी जगातून सुमारे ७३ लाख एकर जंगल नष्ट होत आहे.’ २००१ ते २०१८ या काळात जगातून ३६ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं (भारतापेक्षा अधिक) जंगल नाहीसं झालं. जगानं गेल्या ४० वर्षांत १०० कोटी हेक्टर अरण्य गमावलं आहे. या सतत वाढत्या वेगानं २१०० साली जगातील सदाहरित अरण्यांचा अंत झालेला असेल.’

त्यामुळे वनस्पती, खनिज व जल ही नैर्सिगक संपदा विपुल असल्यानं त्या प्रदेशाचा विकास होतोच असं नाही. उलटपक्षी त्याच संसाधनांना बळकावण्यासाठी बलवान येतात आणि स्थानिकांची पिळवणूक होते. १९९३ साली डॉ. रिचर्ड आँटी यांनी ‘विपुलतेचा विरोधाभास’ स्पष्ट करणारा ‘संसाधनांचा शाप’ हा सिद्धांत मांडला आणि त्या प्रतिपादनाची प्रचीती वारंवार येत आहेच. पृथ्वी नष्ट केली तरीही दुसरा ग्रह अस्तित्वात असल्याच्या थाटात जगातल्या धनाढ्यांचं वर्तन आहे. धनिकांच्या टोळीसत्तेमुळे लोकशाही धोक्यात आली आणि पृथ्वी कडेलोटाच्या उंबरठ्यावर आली आहे. सध्याची भांडवलशाही ही ‘कॉर्पोरेटोक्रसी’ धाटणीची झाली आहे. जगातील १२० कोटी गरिबांचं अन्न, औषध, जळण व रोजगार म्हणजे संपूर्ण जीवन पर्यावरणीय यंत्रणांवर अवलंबून आहे. साधनसंपदा गेल्यामुळे भूमिहीन, अल्पभूधारक, ग्रामीण कारागीर, पशुपालक व छोटे मच्छीमार, भटके व आदिवासी यांचं जगणं उद्ध्वस्त होत आहे. बिल मॅककिबन- ‘एन्ड ऑफ नेचर’, नाओमी क्लाइन- ‘कॅपिटॅलिझम व्हर्सेस क्लायमेट’, अँड्र्यू माल्म -‘व्हाइट स्किन, ब्लॅक फ्युएल’ व ‘करोना, क्लायमेट अँड क्रॉनिक इमर्जन्सी’, जोएल कॉव्हेल-‘एनिमी ऑफ नेचर’, मायकेल मान-‘द न्यू क्लायमेट वॉर’, जॉर्ज मॉनबियो- ‘आऊट ऑफ द रेकेज’, आदी लेखकांनी हे सर्व, काटेकोर संशोधनाअंती आलेल्या चोख पुराव्यानिशी दाखवून दिलं आहे. वर उल्लेख केलेल्या लेखकांमुळे जगाला, भांडवलशाही व हवामानबदल यांच्यातील आंतरसंबंधांचं आकलन होऊ शकलं. घोष यांच्या पुस्तकामुळे या विचारांची नव्याने उजळणी झाली आहे, इतकंच.

जीवनवादी राजकारण

घोष यांना ‘क्रमशङ्म उपभोग वाढवत नेणारी जीवनशैलीच हवामान बदलास कारणीभूत आहे. निसर्गाची जपणूक करणारी जीवनशैली व ‘जीवनवादी (व्हायटॅलिस्ट) राजकारण’ हाच या विनाशकालातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.’ असं वाटतं. निसर्गाशी सुसंवाद साधणारी स्थानिक जनता ही अतिशय कल्पक व सर्जनशील असते. नैर्सिगक आपत्तींचा सामना करण्यासाठी सभोवतालच्या उपलब्ध साधनांतून ते उपाययोजना करत असतात. त्यांच्या सुसंस्कृतता अधोरेखित करण्यासाठी घोष यांनी देशोदेशींच्या आदिवासींच्या कहाण्या सादर केल्या आहेत. मानववंशशास्त्रज्ञ ब्रूस अल्बर्ट्स यांच्यामुळे अ‍ॅमेझॉनच्या अरण्यातल्या यानोमामी जमातीचे प्रवक्ता दावी कोपेनावा यांचं ‘द फरॉंलग स्काय’ हे बहुर्चिचत आत्मकथन प्रसिद्ध होऊ शकलं. त्यात त्यांनी ‘तऱ्हतऱ्हेच्या सुरक्षितता देण्यासाठी स्थानिक परंपरा कशा घडत जातात? त्यातून अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना कसा करता येतो? शांतीप्रिय अरण्यांवर आक्रमणे का व कशी होतात? त्यांचा मुकाबला कसा करावा? हवामान बदलाच्या काळात निसर्ग कसा जपावा? पाश्चात्त्यांर्चे हिंसक उद्योग व उपभोगवाद जगासाठी कसे घातक आहेत?’ अशा अनेक विषयांवर सविस्तर ऊहापोह केलेला आहे. कोपेनावा यांच्या वक्तव्यातून उपजत व संसर्गरहित बुद्धिमत्ता व्यक्त होते. त्यामुळे कोपेनावा यांना जगभर अनेक परिषदा व समारंभांची आमंत्रणं येऊ लागली. ते आता जगातील आदिवासींचे भाष्यकार झाले आहेत. ‘असे आवाज आता अधिक बुलंद होत आहेत. नदी-नाले, डोंगर-दऱ्या, कुरण व अरण्य जपणारं सामाजिक बळ हे छुपं असतं. ठिकठिकाणी प्रदूषणास विरोध व निसर्गसंवर्धनासाठी उठाव यामागे हे अदृश्य बळच कारणीभूत आहे. ते र्वृंद्धगत व्हावं’ अशी घोष यांची सुयोग्य इच्छा आहे.

घोष यांची भाषा व मांडणी कमालीची आकर्षक आहे. या पुस्तकातील विशाल पटामुळे निसर्ग-विनाशातून आलेल्या व येऊ घातलेल्या आपत्तींचा अदमास येतो. हवामान बदलामुळे होणाऱ्या स्थलांतराच्या यातना समजतात. ‘भविष्यासाठी शुक्रवार’ ते कृष्णवर्णीय चळवळ, उच्चाटनाकडे निघालेल्या वनस्पती व प्राणी प्रजाती ते करोना महासाथ, असे अनेक संदर्भ येतात. एकंदरीत योग्य वेळी आलेल्या व नवे तपशील देणाऱ्या या पुस्तकानं पर्यावरण जपणुकीच्या साहित्यात भर पडली आहे.

लेखक पर्यावरणीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

atul.deulgaonkar@gmail.com

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा