कहाणी लंडनच्या आजीबाईंची

सरोजिनी वैद्य

राजहंस प्रकाशन

/media/UHtj85CGGSge.jpg

पाने : ☀ 188 मुल्य (₹): 225.0

एक विलक्षण व्यक्तिमत्व- आजीबाई बनारसे - रसिका राजीव हिंगे

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथंही ती निरक्षरच होती; त्यामुळे लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वतःच्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं.

-----

"अवोS काय सांगू? मले लिवता आलं असतं ना तर एक मोSठं बुक, मोठंS बुक लिवलं असतं बघा!" असं म्हणणाऱ्या निरक्षर आजीबाई स्वतः एक मोठंS बुक झाल्या आहेत हे त्यांनाही कळले नाही.
सरोजिनी वैद्य यांनी लिहिलेल्या कहाणी लंडनच्या आजीबाई या पुस्तकाचे वैशिष्टये म्हणजे एका निरक्षर स्त्री ने स्वतःच्या जीवनाचा आलेख कसा उंचावत नेला हे होय.
जिद्द , कष्ट, दैन्य , सुख दुःख, कठोर योगायोग यांचं मिश्रण म्हणजे अशिक्षित असलेल्या विदर्भातील राधाबाई, ज्या पुढे लंडनच्या आजीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.राधाबाईंचा जन्म 10 फेब्रुवारी1910 रोजी देवळी तालुक्यातील चौंडी या गावी म्हणण्यापेक्षा 100 ते 150 मातीच्या आणि कुडाच्या घरांची वसाहत असलेल्या ठिकाणी झाला. राधाबाईंचे आजोबा गोमाजी डहाके यांनी ही वसाहत वसवली होती.

तीन भाऊ आणि दोघी बहिणी अशी पाच भावंड आईवडिलांसोबत गुण्यागोविंदाने राहत होती. परंतु नियती वेगळंच काहीतरी ठरवित होती. लहान बहीण एक दीड वर्षाची असतांना चौंडी गावात आलेल्या प्लेग च्या साथीमध्ये गावातील बरेच मृत्युमुखी पडले त्यात राधाबाईंचे आईवडील ही ह्या रोगाच्या साथीचे बळी ठरले. घराची संपूर्ण जबाबदारी राधाबाई वर येऊन पडली. कामसू आणि कष्टाळू राधाने हळूहळू ही जबाबदारी लीलया पेलली.

घर सांभाळत असतांना एकीकडे वय वाढत होते. तेरा वर्षाच्या राधाचे लग्न करणे गरजेचे होते. तिच्यासाठी मुले बघण्यासाठी जनात्या आणि तिचा नवरा यवतमाळ मध्ये जातपंचायत मध्ये कोणाचे मुले मोठी आहेत याबाबत चौकशी करत असत. पाहिलेल्या तीन चार स्थळांपैकी यवतमाळ मधील डेहणकर पाटील यांचा पस्तिशीतील चौथेपणाचा तुळशीराम राधाबाईच्या मनात भरतो आणि राधाबाई डेहणकरांच्या घरात गृहप्रवेश करतात. सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस बरे जातात. पण मुळातच कजाग असलेली सासू राधाबाईंना त्रास द्यायला लागते. दोन अडीच वर्षानंतर त्यांना पहिली मुलगी होते आणि त्यानंतर लागोपाठ चार मुली झाल्यामुळे सासूचा जाच वाढत जातो.

मुलासाठीच सर्व काही असं समजणाऱ्या समाजात आजही कुठे विशेष फरक पडला आहे? समाज अशिक्षित की सुशिक्षित याने काही फरक पडत नाही. समाज सुजाण असायला हवा हेच सत्य आहे. पुढे मुलगा नाही म्हणून काय करायचे जमीन जुमला असा विचार करून तुळशीराम शेतात जाणे बंद करतात. त्यातच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो आणि एक दिवस राधाबाई आणि चार मुली मागे ठेवून तुळशीराम या जगाचा निरोप घेतो. राधाबाईवर आभाळ कोसळतं. एकीकडे चार मुलींची जबाबदारी तर दुसरीकडे दीर आणि जाऊ सगळं हडप करण्याच्या मागे असतात. तुळशीरामच्या आजारपणात घरातील होत नव्हतं ते सगळं गेल्यावर त्यांच्याजवळ काहीच उरत नाही. चार मुलींचे पोट कसे भरायचे हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा होता. पण आहे त्या परिस्थितीत कोंड्याचा मांडा करून जगणे हे बालकडू मिळाले असल्यामुळे यातून एकच मार्ग त्यांना दिसत होता तो म्हणजे दोन मुलींचे लग्न करायचे निदान दोन घास खायला तरी मिळतील मुलींना. मोठ्या भावाला सांगून आपल्या दोन मुलींचे लग्न राधाबाई लावून देतात. दिराला न सांगता स्वतः पण लग्नास उपस्थित नसतात. मनावर दगड ठेवणे म्हणजे काय याची जाणीव इथे होते. लग्नासाठी त्यांना त्यांचे स्वतःचे घर गहाण ठेवावे लागते.

अठराविश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी राधाबाई त्यांच्या परीने खूप प्रयन्त करत होत्या. हे वाचतांना अक्षरशः मन हेलावून जातं.भाजी विकणे,धुणी भांडी करणे यासारखी पण कामं त्यांनी केली. जोडीला देवधर्म सुरू होतेच. पण दोन वेळेचे कसेबसे पुरेल एवढेच त्या कमवू शकत होत्या. घर सोडविणे गरजेचे होते. दीराचे जातपंचायतीच्या माध्यमातून दबाव आणण्याचे प्रयत्न चालूच असतात. पैसे नाहीतर पाट लाव म्हणजे दुसरे लग्न कर असा अनाहूत सल्ला दीर जातपंचायत च्या समोर देतो. त्यावेळी अगतिक राधाबाई सगळ्यांसमोर या गोष्टीला नकार देतात. एकदा का स्त्रीने ठरविले तर ती काहीही करू शकते, तिची जिद्द, तिचा निर्धार हेच तिची इच्छाशक्ती होऊन जाते.

राधाबाईचे असे हलाखीचे दिवस काढणे चालूच होते. राधाबाईंच्या ओळखीचे पांडुरंगपंत जिरापुरे यांचेकडे विलायतेचा वारकरी म्हणजे सीताराम उर्फ आबाजी बनारसे ही व्यक्ती डेरेदाखल होते. आबाजींचे तीन मुले अतिशय हुशार आणि कष्टाळू. एक इंग्रज अधिकाऱ्याच्या पाठीमागे त्यांचा मोठा मुलगा लंडन ला नशीब आजमावयास जातो आणि तिकडेच राहतो. उद्योगाच्या मदतीसाठी आबाजींचे तिन्ही मुले लंडन मध्ये स्थायिक होतात. मुलांमागे आबाजी पण तिकडेच रमतात कारण त्यांची बायको त्यांना मुले लहान असतांनाच सोडून गेलेली असते. पाच सहा वर्षानंतर आबाजी भारतात येतात. पांडुरंगपंत जिरापुरे आणि आनंदीबाई जिरापुरे यांना 55 वर्षाचे आबाजी पुन्हा लग्न करण्याविषयी सांगतात. यवतमाळ चे मिठेमास्तर आणि आनंदीबाई जिरापुरे राधाबाईचे स्थळ सुचवतात पण राधाबाई स्पष्टपणे नकार देतात.

माणसाने ठरविलेले जे आहे त्याच्या अगदी विरुद्ध नियती करण्यास भाग पाडते. परिस्थिती जसं शिकवून जाते तसंच काहीवेळेस लाचार पण करते. असच काहीसं राधाबाईच्या बाबतीत झाले. राधाबाईंच्या अनुपस्थितीत मुलींचे दिराशी भांडण होते त्यावेळी मुलींना रस्त्यावर उभे राहून भीक मागा पण इथे राहू नका. असे ऐकल्यावर राधाबाई खूप चिडतात, त्रागा करतात पण काही उपयोग होत नाही. खूप विचारांती दोघी मुलींचे पोट भरण्यासाठी आणि या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी थोडक्यात काय तर उपजीविकेसाठी राधाबाई आबाजी बरोबर पाट लावायला तयार होतात. गावाच्या बाहेर मारुतीच्या मंदिरात रात्री बारा वाजता राधाबाईचा आबाजीसोबत पाट लागला म्हणजे लग्न होतं कारण हे पाट लावणे असेच मध्यरात्री करावयाचा विधी आहे अशी रूढी आहे.

राधाबाईंचा दुसरा संसार तर सुरू झाला पण दुर्दैवाने इथेही त्यांची पाठ सोडली नाही. आबाजींनी लग्नाआधी दिलेली सगळी वचनं मोडीत काढली. दोघी मुली सांभाळण्याचे दिलेले वचन तर त्यांनी अजिबातच पाळले नाही. दोन्ही मुलींना राधाबाईंच्या लग्न झालेल्या मुलीजवळ पाठवून दिले आणि त्यांचा सगळा खर्च मात्र आबाजी करतात.

मुलींना आणण्याबद्दल राधाबाई काही बोलल्या तर त्यांना मार खावा लागे.जगायचे म्हणून जगणे चालू होते. आणि एक दिवस दोन्ही मुली इथेच ठेवून आबाजी समवेत राधाबाई लंडन ला जातात. लंडनला सावत्र मुलांकडे राहून पडेल ते कामे करीत राधाबाई जगत होत्या. उपजीविकेचे साधन म्हणून आबाजीसोबत पाट लावलेल्या राधाबाईंना पुन्हा वैधव्य येत. जलोदराचे निमित्त होऊन आबाजी चार वर्षात राधाबाईना सोडून गेले.सावत्र मुलांनी राधाबाईंना फसवून सगळी इस्टेट स्वतःच्या नावावर करून घेतात. पण राधाबाई सावत्र सुनांच्या मदतीने स्वतःच्या दोघी मुलींना लंडन मध्ये बोलावून घेतले. मुलांच्या घरात राहून मोलमजुरी करून राधाबाई दिवस काढत होत्या. मुलीही शाळेत जाऊ लागल्या. 1952 सालात बनारसे कुटुंबावर बऱ्याच आपत्ती कोसळल्या. या काळात त्यांची नातवंडे त्यांच्या अधिक जवळ आले. आणि राधाबाई या आजीबाई झाल्या.

सगळं सुरळीत चालू असतांना त्यांचा सावत्र मोठा मुलगा बोटीचे तिकीट काढून आणतो आणि त्यांना भारतात परत जाण्यास सांगतो. दहा दिवसात घर रिकामे करावयास सांगतो. पण आजीबाई पक्का निर्धार करतात कोणत्याही परिस्तिथीत लंडन सोडायचे नाही. सोबत असतात त्यांच्या दोन मुली आणि त्यांच्याकडे राहणारे विद्यार्थी.

आजीबाईंचा देवावर फार श्रद्धा,विश्वास असतो. त्यांचे आराध्य साईबाबा यातून काहीतरी नक्की मार्ग काढतील याबर त्यांचा विश्वास असतो. स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असूनही प्रत्येकवेळी नियतीचा खेळ वेगळाच होता. घर सोडायच्या दोन दिवस आधीच त्यांना एका घराचा पत्ता कुणीतरी एजंट आणून देतो. लगेच आजीबाई त्यांच्या मुलीच्या मदतीने त्या पत्त्यावर जाऊन मालकाशी बोलून त्या घर भाड्याने मिळवतात आणि पंचवीस हुप लेन येथे रहावयास येतात. डोक्यावर छप्पर मिळालं आता मला आकाश मोकळं आहे या श्रद्धेने त्या देवाचे आभार मानतात.

पंचवीस हुप लेन मध्ये राहायला आल्यावर आजीबाईंनी मागे वळून पाहिले नाही. अपार कष्ट, आणि सुग्रास जेवण आजीबाई करत गेल्या आणि अवघ्या तीन महिन्यात भाड्याने घेतलेले घर स्वतः विकत घेतले. लंडन मध्ये सुरूवातीला आजीबाईंना काम करतांना सगळ्यात मोठी अडचण होती ती भाषेची. परंतु त्यावर ही मुलीच्या मदतीने त्यांनी हळूहळू मात केली. रोज मार्केट मध्ये जाऊन ओळखी वाढल्या, काहींनी मदत केली तर काहींनी फसवले सुद्धा. पण हरतील त्या आजीबाई कशाला. त्यांचा जम त्यांनी लंडन मध्ये बसविलाच. मराठमोळ्या आजीबाईच्या जेवण आणि आजीबाई वनारसे खानावळ लंडनमध्ये प्रसिद्ध होऊ लागली. लंडनमध्ये असणाऱ्या मराठी माणसांच्या जीभेचे चोचले पुरवण्याचं काम आजीबाईच्या खानावळीतून होत असे. शिक्षणासाठी आणि कामासाठी वास्तव्य करणाऱ्या लोकांची खानावळीसाठी गर्दी होते. तिथून पुढचा प्रवास म्हणून आजीबाईंची खानावळ मोठ्या जागेत विस्तारली. आजीबाईंची खानावळ नावारुपाला आली. निरक्षर असणाऱ्या आजीबाईंचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला.

पंचवीस खूप लेन मध्ये तर जणू प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरली आहे असे वाटत असे. भारतातून लंडन ला गेलेले बहुतेक सगळेच आजीबाई कडे गेले नाही असे होत नसे. यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर,पु.ल.देशपांडे , ज्योत्स्ना भोळे, अत्रे यांसारखे आणि लंडनमधील आर्चबिशप कॅटरबरी अशी बरीच मंडळी आजीबाईकडे असत. भारतातून आलेल्या मराठी लोकांना लंडनमध्ये आजीबाई चे घर म्हणजे एकत्र भेटण्याचे एक ठिकाण होतं.
आजीबाईंनी लंडन मध्ये स्वतःचे साम्राज्यच जणू उभे केले असे म्हणायला काही हरकत नाही. जवळपास बारा ते तेरा इमारती आजीबाईच्या मालकीच्या होत्या. त्यांच्या घरातील गणपती उत्सव म्हणचे एक महोत्सव असे लंडन मध्ये. त्यांचे आराध्य साईबाबा याचे भव्य मंदिर त्यांनी तिथे उभे केले. लहानपणापासून प्रत्येक वळणावर आलेली स्थित्यंतरे, त्यातून हिमतीने स्वबळावर काढलेला मार्ग हे सगळं कल्पनेच्या पलीकडचे आहे.एका निरक्षर स्त्री ने अनेक हालअपेष्टा सहन करून लंडन सारख्या परक्या देशात स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला ही सामान्य गोष्ट नाहीच.

03 डिसेंबर 1983 साली त्यांच्या सगळ्या इच्छापूर्ती झालेल्या असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गोर्‍या मेयरनं - मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली!

अशा आजीबाईंची खरी कहाणी ऐकून एका गोष्टीचं तात्पर्य लक्षात घ्यायला हवं जीवनात संघर्ष अनेक येतील. पण त्याच जिद्दीने पुढे जाण्याची धमक तुमच्यात असली तर तुमचं आयुष्यात यश नक्की मिळतं!

अशी ही साठा उत्तराची लंडनच्या आजीबाईंची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

द्वारा : https://rasraj1964.blogspot.com/