छंद देई आनंद

कवी : एकनाथ आव्हाड

/media/1My6uiblQkwP.jpg

धमाल कवितांचे पुस्तक - लक्ष्मीकांत देशमुख

कवी एकनाथ आव्हाड यांचे ‘छंद देई आनंद’ या नावाचे मजेदार कवितेचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ते मोठ्या आवाजात वाचताना मजा वाटेल आणि आपल्या मनाच्या कल्पनेमध्ये अनेक रंग भरले जातील. हे पुस्तक वाचताना मी या वयातही मुलाहून मूल होत गेलो आणि एकेका कवितेचा आस्वाद घेताना मजा आली. मुलांना हे पुस्तक जादूसारखे आनंद व आश्चर्य देणारे नक्की वाटेल. हे पुस्तक आपल्या आसपासच्या जगाची, आपल्या घरदार- परिसराची, शाळा, मित्र-मैत्रिणी, छंद, खेळ, नातेवाइक, पक्षी-प्राणी आणि झाडे-फुले आदींची दुनिया मस्तपणे दाखवते.

मुलांना ज्याची जिज्ञासा आहे, जे अनुभवावेसे वाटते, ते सारे यात आहे. मुलांना सर्वांत जास्त काय आवडतं? खेळ..! त्यावर दोन-तीन सुंदर कविताही आहेत. त्या वाचताना किंवा मोठ्याने म्हणताना खेळांची दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतात. उदा.

‘कॅरम खेळताना घरात, चुरस लागते जिंकायची

स्ट्रायकरने क्वीन काढण्यात, चढाओढ असते साऱ्यांची’

दुसरी एक कविता आहे पतंग उडविण्याची, ‘मीच पतंग झालो’ नावाची. पोहण्याच्या छंदामुळे एक बालवीर नदीत बुडत असणाऱ्या मुलाचे प्राण कसे वाचवतो व त्याला राष्ट्रपती पदक कसे मिळते, हे सांगणारी ‘शाबासकी’ ही कविता प्रेरणा देईल. मुलांना निसर्ग, पाऊस, वारा, चंद्र-तारे आणि शेते-पिके भुरळ घालतात. त्यांच्या सहवासात मन रमते. इथे तर एकापेक्षा एक सरस व मनाला आनंद देणाऱ्या कविता आहेत. ‘खरंतर’ ही फारच मजेशीर कविता आहे. त्यात आव्हाडांनी गंमत केली आहे. यातील एक कडवे पाहा,

‘पाऊस कसा येतो, येतो नभातून

नाही नाही तो येतो, काळ्या मेघातून’

समजली ना यातली गंमत आणि वैज्ञानिक सत्य? दुसरी कविता आहे ‘छटा रंगांच्या’. ‘हिरवागार मळा’, ‘पिवळाधमक झेंडू’, ‘लालचुटुक गाजर’ आणि ‘काळाकुट्ट अंधार’ अशा रंगांच्या छटा या कवितेत आल्या आहेत. ही कविता वाचताना नजरेसमोर रंगांचा समुद्र उफाळून येतो. आणखी एक मस्त कविता म्हणजे ‘नवलनगरी’. त्यातला या ओळी पाहा, वाचताना ते निसर्ग दृश्य आपल्या मनात साकार होते व मन प्रसन्न होते.

‘आकाशाचा कागद, केवढा आहे निळा

कधी दिसे पांढरा, कधी काळा सावळा

रात्रीच्या चंद्राचा, पहावा थाट

चांदण्यांशी खेळतो, जणू सारीपाट

शाळेचा पहिला दिवस कसा असेल? यावरची कविता मला तर फार आवडली.

‘शाळेचा हा पहिला दिवस, आनंदाची पहाट फुटणार

नवी पुस्तके, नवीन गणवेश, नवे जुने ते मित्र भेटणार’

अशीच आणखी एक धमाल कविता पुस्तकात आहे, ‘गाणारा वर्ग’ शीर्षकाची. त्यात माधव पोवाडा गाणारा, संगीता लावणी म्हणणारी, अहमदचे भावगीत, जोसेफचे भक्तीगीत, सुखविंदरची प्रार्थना, तर रिटाची गझल - यातून तुम्हाला काय जाणवते? हे सारे वेगवेगळ्या धर्माचे आहेत; पण तरीही सारे एकच मानव आहेत व साऱ्यांचा धर्म असेल, तर तो संगीताचा आहे, गाण्याचा आहे.

आव्हाड यांनी साऱ्याच कविता मुलांच्या मनात शिरून व त्यांच्या वयाचे होऊन लिहिल्या आहेत. ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत त्यांच्या विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक आहेत. महाराष्ट्रातील सर्व मुलांना पुस्तकातून आनंद मिळावा म्हणून ते सातत्याने बालकथा, गंमतगाणी, बालकुमार कविता, नाट्यछटा, काव्यकोडी लिहितात. आव्हाडांची पुस्तके मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात.

या काव्यासंग्रहामध्ये पुस्तकावरच्या कविता आहेत ‘दोस्ती माझी पुस्तकांशी’ या कवितेत त्यांनी लिहिले आहे,

‘आईचे मी ऐकून सारे, विचार पक्का केला मनाशी

परीक्षेची भीती कशाला, जर दोस्ती माझी पुस्तकांशी.’

‘ग्रंथसखा’ ही कविताही पुस्तकांचे महत्त्व सांगणारी आहे, त्यात आव्हाड म्हणतात,

‘पुस्तके जरी छोटी मोठी, विचार नवा देतात

ग्रंथसखा होऊन आपले, आयुष्य घडवतात’

शेवटी एवढेच सांगेन, एकनाथ आव्हाड यांचे ‘छंद देई आनंद’ हे पुस्तक नावाप्रमाणे मुलांनी वाचनाचा छंद कसा करावा व वाचनाचा आनंद कसा लुटावा हे सहजपणे सांगून जाते.

मुखपृष्ठ : सागर नेने

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स