पंतप्रधान नेहरू

नरेन्द्र चपळगावकर

मौज प्रकाशन

/media/BgCwSBNSSfrf.jpg

पाने : ☀ 240 मुल्य (₹): 600.0

नेहरू नव्याने जाणून घेताना.. - प्रा. प्रकाश पवार

भारतीय राजकीय व्यवस्थेत भारताचे पंतप्रधानपद हे सर्वोच्च सामथ्र्यशाली पद म्हणून ओळखले जाते. या पदावर जे विराजमान झालेत त्यांनी घेतलेल्या भूमिका, अवलंबलेली धोरणे, त्यासाठी केलेले राजकारण, त्यांचा झालेला परिणाम हे समजून घेणे क्रमप्राप्त असते. त्यातूनच आपला देश किती पुढे गेला हे पाहणे आवश्यक ठरते, तो इथल्या राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. ते समजून घेतल्याशिवाय संसदीय लोकशाही पुढे जाऊच शकत नाही. याच पार्श्वभूमीवर ‘पंतप्रधान नेहरू’ हे राजकीय चरित्र असलेले पुस्तक महत्त्वाचे ठरते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांचे नुकतेच ‘पंतप्रधान नेहरू’ हे पुस्तक मौज प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान. सर्वात जास्त काळ या पदावर राहिलेले एकमेव पंतप्रधान आहेत. यापूर्वी नेहरूंवर प्रदीर्घ असे लिखाण झाले आहे. अनेक अभ्यासकांनी, लेखकांनी त्यांच्या चाहत्यांनी, पत्रकारांनी इतकंच नाही तर त्यांच्यावर टीका करण्यात प्रसिद्ध असलेले प्र. के. अत्रे यांनीही ‘सूर्यास्त’ हे पुस्तक लिहून त्यांचे यथायोग्य मूल्यमापन केले आहे. नेहरूंवरील बरेचसे लेखन हे इंग्रजीत झाले आहे, तुलनेने मराठीत खूपच कमी लिखाण झाले आहे. बदलत्या सद्य:परिस्थितीत चपळगावकरांना नेहरूंना नव्याने समजून घेण्याची गरज वाटते. त्यातूनच या राजकीय चरित्राची निर्मिती झाली आहे. नेहरू हे सगळय़ाच बाबतीत कसे चुकीचे आहेत हे सांगण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न होत असताना या पुस्तकाचं महत्त्व अधिक आहे. या ग्रंथात ‘नेहरूंच्या नेतृत्वाची जडणघडण’, ‘नेहरू आणि वल्लभभाई’, ‘काश्मीर आक्रमण’, ‘काश्मीरसाठी राज्यघटना’, ‘सरहद्दीचा तंटा’, ‘चीनचे आक्रमण’, ‘नेहरूंचा नवभारत’, ’नेहरू पंतप्रधान आणि माणूस’ अशी उपप्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये लेखकाने अतिशय तटस्थ पद्धतीने सखोल विश्लेषणात्मक मांडणी केली आहे. स्वातंत्र्य चळवळीत असताना स्वातंत्र्यपूर्व दीड दशकापूर्वीच नेहरूंना देशाचे नेतृत्व करावे लागेल याचे संकेत मिळत होते. याच पार्श्वभूमीवर भारतातील मूलभूत प्रश्न काय आहे आणि त्याला कसे सामोरे जाता येईल याचा विचार नेहरू तेव्हापासून करत होते. त्यात भारतातील मुख्यत: आर्थिक-सामाजिक प्रश्न लोकशाहीच्या मार्गाने कसे सोडवता येतील याचाही ते विचार करतात, याबाबत लेखकाने सविस्तर लिहिले आहे. यासंबंधातले धोरण, नियोजन, त्यावरील चर्चा, विरोध, प्रतिक्रिया या सगळय़ांचा तपशील ते देतात, तसेच विज्ञानविषयक भूमिकाही विशद करतात. नेहरूंच्या मते, विज्ञान हा माणसाच्या बुद्धीचा सर्वात मोठा विजय आहे, तो माणसाचा आधार आहे. विज्ञानाने भूक, दारिद्रय़ यावर मात करायला शिकवल्यामुळेच नेहरूंनी विज्ञानवादाचा पाया घातला. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पंधरा वर्षांत वेगवेगळय़ा देशांची मदत घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले आय.आय.टी. खरगपूर, पवई (मुंबई), मद्रास, कानपूर, दिल्ली अशा पाच जगभर मान्यता पावलेल्या संस्थांची त्यांनी उभारणी केली. त्याचबरोबर दिल्लीतील राष्ट्रीय भौतिक विज्ञान प्रयोगशाळा, मैसूरमधील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा किंवा पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा अशा संस्था उभ्या केल्या, तर होमी भाभा, मेघनाद साहा, विक्रम साराभाई या शास्त्रज्ञांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय विज्ञान तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर पोहोचवले.

याच पुस्तकाच्या एका प्रकरणात लेखक नेहरूंच्या नेतृत्वाची जडणघडण कशी झाली याचा तपशील देतात. नेहरूंचे नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीच्या मुशीतून तयार झाले असल्याने ते ताऊन सुलाखून निघाले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही रुजवण्याची जबाबदारी त्या पिढीवर होती, ती नेहरूंनी पूर्ण ताकदीने पार पाडली. त्यासाठी लोकशाहीच्या संस्था उभ्या केल्या. नेहरूंच्या नेतृत्वाचे गमक सांगताना लेखक सांगतात, नेहरूंनी लोकांच्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. खेडय़ा पाडय़ातील सामान्य माणसाला आपण देशाचे मालक आहोत याचे भान निर्माण केले, विरोधकांबद्दल कमालीची आस्था बाळगली. परदेशातील शिष्टमंडळाला अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख करून देताना ‘देशाचे भावी पंतप्रधान’ अशी करून दिली. नेहरू हे सर्वात जास्त लोकप्रियता मिळालेले भारतातील नेते होते, पण ते या लोकप्रियतेमुळे हुकूमशाहीकडे झुकले नाहीत. निष्ठापूर्वक भारतात लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांचे नेतृत्व फुलत गेले.

या पुस्तकातील ‘नेहरू आणि वल्लभभाई’ हे प्रकरण खूपच महत्त्वाचे आहे. दोघेही स्वातंत्र्य चळवळीतील कडवे नेते, दोघांनीही स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाची भूमिका बजावलेली. त्यांच्या स्नेहाचा आणि ताणतणावाच्या संबंधांचा लेखकाने तपशीलवार आढावा घेतला आहे. आजच्या संदर्भात तो वाचकांना दिशादर्शक आहे. नेहरू-पटेल यांच्यात जे काही महत्त्वाचे मतभेदाचे मुद्दे होते त्यापैकी एक आर्थिक धोरणाचा आहे. नेहरू हे समाजवादाकडे जाणाऱ्या धोरणाचा पुरस्कार करणारे होते. पटेल मात्र खाजगी उद्योगधंद्याचे समर्थक होते. त्यांचा राष्ट्रीयीकरणास विरोध होता, तसेच औद्योगिक क्षेत्रात पुरेशी उत्पादन वाढ होईपर्यंत नियंत्रण आणू नये असे पटेलांचे मत होते.

या पुस्तकाला राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सुहास पळशीकर यांची यथोचित अशी प्रस्तावना आहे. त्यांनी अचूक शब्दात परामर्श घेतला आहे. त्यांनी सूत्ररूपाने नेहरूंची मर्मस्थाने मांडली. नेहरूंच्या सार्वजनिक धोरणातील आधुनिकता, आधुनिक दृष्टीचा पाठपुरावा करणाऱ्या संस्था, आधुनिक राज्य संस्थेचे भान ठेवून सत्तेचा योग्य वापर करणे, जागतिक व्यवस्थेत नव्या आव्हानांना कसे सामोरे जायचे याचे भान, धर्म आणि सार्वजनिकता यांचे संबंध.. नेहरूंची ही पाच सूत्रे त्यांनी मांडली आहेत.

या पुस्तकातून लेखकाची संशोधक दृष्टी दिसते. लेखक आंधळेपणाने कसलेच समर्थन करत नाही. स्वातंत्र्याची चळवळ, काँग्रेस पक्ष संघटना, समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष यांच्यातील परस्पर संबंध, त्यांच्यातील आंतरविरोधही मांडले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नेहरू हे पुस्तक केवळ राजकीय चरित्र न राहता तत्कालीन राजकीय प्रक्रिया समजावून घेण्यास हातभार लावणारा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरतो.

prakashpawar2010 @gmail.com

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा