महासम्राट: झंझावात

विश्वास पाटील

/media/tBtcOET4oqyy.jpg

चाकोरीबाहेरच्या शिवकाळाचे उत्कट चित्रण - अशोक समेळ


कादंबरीकार विश्वास पाटील छत्रपती शिवरायांच्या जीवनावर ‘महासम्राट’ नावाची कादंबरी मालिका लिहीत असल्याची बातमी वाचली होती. या विषयावर अनेक समर्थ लेखकांनी या आधी बरेच लेखन केले आहे. त्यामुळे पाटील हे आणखी कोणत्या वेगळ्या इतिहासाच्या कक्षेत वाचकांना घेऊन जाणार, असा प्रश्न माझ्या मनाला पडला होता. याचे कारण छत्रपती शिवराय हा बालपणापासूनच प्रत्येकाच्या मनाच्या कुडीत जाऊन बसलेला विषय आहे.

नुकताच पाटील यांच्या ‘महासम्राट’चा ‘झंझावात’ हा पहिला भाग वाचून झाला. एका नव्या चाकोरीतून शिवकाळाचा वेध ही कादंबरी घेते. त्या कालखंडातील अनेक अज्ञात गोष्टी, व्यक्तिरेखा व प्रसंग पाटील यांनी अभ्यासाच्या जोरावर नव्याने पटलावर आणले आहेत. ही कादंबरी लिहिताना पाटील यांनी रियासतकार देसाई, बखर वाङ्मय, तत्कालीन पत्रांचा सारसंग्रह; तसेच शिवरायांच्या परदेशी इतिहासकारांनी लिहिलेल्या कागदपत्रांचाही पुरेसा धांडोळा घेतला आहे. शिवकाळातील ह्या महत्त्वाच्या घटना ज्या-ज्या परिसरात घडल्या, त्या-त्या परिसरांना अनेकदा जागरूकपणे भेटीही दिल्या आहेत. कादंबरीकारास फक्त आपल्या चरित्रनायकाच्या चरित्राचा विचार करून चालत नाही, तर त्याच्यासोबतच नायकाच्या बालपणापासून त्याच्यावर संस्कार करणाऱ्या मातापित्याच्या, त्याच्या सहकाऱ्यांच्या चरित्राचाही गांभीर्याने विचार करावा लागतो. त्या दृष्टिकोनातून पाटील यांनी तो काळ जागवण्यासाठी विजापूरपासून प्रतापगड, भातवडीचे गनिमी काव्याचे प्रसिद्ध मैदान; तसेच पेमगडचा परिसर स्वतः धुंडाळला आहे.

‘महासम्राट’ या कादंबरीचा पहिला भाग ‘झंजावात’ हा इतर शिवचरित्रांपेक्षा वेगळे काय सांगतो, तर मुख्यतः शिवरायांच्या जीवनाचे खरे शिल्पकार पिताश्री शहाजीराजे भोसले यांच्या कर्तृत्वाकडे इतिहासकारांनी व नाट्यलेखकांनीही संपूर्ण दुर्लक्ष केलेलं होतं. हा नेमका धागा आपल्या सखोल अभ्यासाच्या बळावर पाटील यांनी पकडला असून शिवराय, शहाजीबाबा व मातोश्री जिजाबाई या तिघांच्या नात्याची गुंफण मोठ्या कौशल्याने साधलेली आहे. त्या काळातील अनेक घटनाप्रसंग पाटील आपल्या चित्रमय शैलीमध्ये मांडतात. कथानकाचा धावता ओघ विजापूरची आदिलशाही, कुतुबशाही, दिल्लीची पातशाही आणि नंतर शिवरायांनी पाषाणातून कोरलेली लाजवाब मराठशाहीही वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे करतात. त्यांनी रेखाटलेला प्रतापगडचा युद्धकालीन परिसर अंगावर थरार निर्माण करतो. त्या दृष्टीने अफजलखान प्रसंगामध्ये फक्त वाघनख नव्हे, तर शिवरायांचे विलक्षण बुद्धीचातुर्य आणि त्यांनी अफझलखानाच्या विरोधात जागवलेला अवघा निसर्ग, स्वराज्याच्या भावनेने जावळीच्या परिसरातील पेटलेली सामान्य माणसे आणि गावखेड्यातील बहादूर स्त्रिया यांच्या योगदानाचीही लेखक उत्तम नोंद घेतो.

भातवडीच्या लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी हे ज्या पद्धतीने जहांगीर बादशहाचे चारशे हत्तींचे दल मोडून काढतात, स्वतः हुतात्मा होऊन विजयश्री खेचून आणतात; परंतु त्यांच्या त्यागाचे मोजमाप करण्यात निजामशहा कमी पडतो. त्याचवेळी इब्राहिम आदिलशहा शहाजीराजांना विजापूरचे सरलष्कर बनवतो. निजामशाही राजवटीमधील मलिक अंबर नावाचा हबशी सरदार, त्याचे व्यक्तीमत्त्व आणि त्याच्या सहवासातच शहाजी महाराजांनी शोधून काढलेला गनिमी कावा याचे सुंदर चित्रण पाटील करतात. जगातील अनेक बंदरांमधून प्रवास करून आलेला मलिक अंबर मोठा ज्योतिषीसुद्धा असतो. तो शहाजीराजांना त्यांच्या पुत्राचे भविष्य वर्तवतो, ‘तेरा बच्चा बनेगा इस मिट्टी का रखवाला. जो देश, धर्म और गरीबों का पालनहार होगा. वो चमकेगा इंसानो की भीड में भगवान जैसा, सजेगा देवताओं की कतारमे एक राजयोगी बनकर, ये मेरा दावा हैं.’ आदिलशाही काय किंवा दिल्लीची मुघलशाही, त्यांचे राजप्रासाद कितीही भव्य असले, तरी त्या खालून अशुभाचे नाले वाहत होते, याचेही दर्शन कादंबरीकार घडवतात. निजामशाहीकडून जिजाऊंचे पिता लखोजीराजे व त्यांच्या कुटुंबियांच्या झालेल्या हत्येचा दर्दनाक प्रसंग डोळ्यांसमोर उभे करतात. तेव्हा पोटात बाळ असलेल्या जिजाऊसाहेब शहाजीराजांना सांगतात, ‘माझ्या नेत्रासमोरची ही खुनी निजामाची दौलताबादची राजधानी आताच पेटवून द्या. तिची राख खाण्याचे मला डोहाळे लागले आहेत राजे! माझे डोहाळे पुरवा.’

शहाजीराजे यांनी दिल्लीचा बादशहा जहांगीर आणि शहाजहान या दोघांशी युद्धात कसा मुकाबला केला होता, ही अपूर्व गोष्ट पाटील एकीकडे कादंबरीकाराच्या बाण्याने सांगतात. त्याचवेळी त्या घटनांचे तारीखवार पुरावेही, कादंबरीची रसहानी न होऊ देता कथानकाच्या ओघात सहज सांगून जातात. पुण्यावरून गाढवाचे नांगर फिरले म्हणजे काय, मुळामुठेच्या काठावर भरणारा बटकींचा म्हणजेच गुलाम स्त्रियांचा राजरोस व्यापार बालशिवरायांनी कसा उधळून लावला होता, अशा अनेक अज्ञात गोष्टी पाटील यांनी सखोल अभ्यासाच्या धारेतून वाचकांसमोर मांडल्या आहेत. शिवरायांच्या सहकाऱ्यांची व्यक्तीचित्रणे ही कादंबरीकाराची खास मिळकत समजावी. बहिर्जी नाईकांसोबतच विश्वासराव दिघे या नावाचा राजांचा आणखी एक चाक्षाण गुप्तहेर मुस्लीम होऊन अफजलखानाचाच जवळचा शागीर्द कसा झाला होता, नेताची पालकर हा जळता वारा आणि पेटता निखारा कसा होता, मुरार जगदेवचा विलक्षण नटखटपणा; तसेच अफजलखान दुष्ट असूनही कर्तबगारही कसा होता, प्रतापगडच्या प्रचंड पावसात पेरलेल्या सैनिकांना वाचवण्यासाठी गावोगावच्या माताभगिनींनी भाकरतुकडा कसा पुरवला, त्या रानातल्या जळवांशी हुशारीने कसा मुकाबला केला गेला अशा अनेक बारीक-सारीक तपशिलांनी ही ऐतिहासिक कादंबरी एकीकडे वास्तववादी आणि तितकीच रसदार बनविण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

शिवरायांच्या कादंबरीमालिकेचा पहिला गड पाटील यांनी यशस्वीपणे सर केला आहे. सुमारे शंभर वर्षांमागे मराठीमध्ये कादंबरीमालेची परंपरा होती. तिचे आता एक प्रकारे पुनर्जीवन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटलांच्या ‘महासम्राट’च्या येणाऱ्या नव्या ‘रणखैंदळ’ या खंडाची धार किती टिकून राहते, याची माझ्यासारख्या वाचकास उत्सुकता आणि आतुरताही आहे.

मुखपृष्ठ - विजयराज बोधणकर

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स