महाराष्ट्राची लोकयात्रा: सामाजिक संघर्ष आणि चळवळींचा इतिहास
डॉ. सदानंद मोरे
सकाळ प्रकाशन
महाराष्ट्राची लोकयात्रा: सामाजिक संघर्ष आणि चळवळींचा इतिहास
डॉ. सदानंद मोरे
सकाळ प्रकाशन
पाने : ☀ 724 मुल्य (₹): 1299.0
प्राचीन धर्मग्रंथ, मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ, धर्म, पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह, अर्वाचीन काळातील अनेक समाजसुधारक, ब्रिटिश शासन काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा भूतकालीन, वर्तमानकालीन आढावा आणि भविष्यकालीन दिशा महाराष्ट्र द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी जेवढा घडवला तेवढाच तो इथल्या संतांनी, विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनीही घडवला. या नेत्यांसोबत पुढे जाणाऱ्या इथल्या सर्वसामान्य लोकांनीही महाराष्ट्र घडवला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमधून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रवास हा आपल्याला प्रगत समाजाकडे घेऊन जातो. स्वार्थासाठी सामाजिक प्रगतीमध्ये अडथळा आणणारी अनेक प्रतिगामी माणसंही याच समाजात असतात; आणि कालसुसंगत बदल स्वीकारत, चुकीच्या रूढी पुसून समाजाला पुढे नेणारी माणसंसुद्धा आपल्याच समाजात जन्माला येतात. महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या घटना-प्रसंगांचा आढावा घेत केलेली मांडणी काळाच्या पुढे असणारे संत, वारकरी, महानुभाव, लिंगायत आदी पंथ संस्थापक आणि त्यांचे आचारविचार, महात्मा फुले, न्या. रानडे, गो. ग. आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड, विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशा अनेक थोरांमोठ्यांच्या विचारसरणी आणि कार्यासोबतच असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामाचीही नोंद डॉ. मोरे घेतात. महाराष्ट्राच्या इतिहासाला वळण देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग, घटना, असंख्य संदर्भ डॉ. मोरे सहज सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडतात. (This is people's history in people's language.)
"महाराष्ट्राची लोकयात्रा" ग्रंथ कोणासाठी?
★ महाराष्ट्राची जडणघडण, संस्कृती, भाषा, साहित्य, राजकारण, समाजकारण यांपैकी कोणत्याही क्षेत्रात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी
★ राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आदी विषयांचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक
★ स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी
★ धोरण ठरवणारे सत्ताधारी, सनदी अधिकारी
★ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले आणि होऊ पाहणारे
महाराष्ट्राची लोकयात्रा हा प्रा. डॉ. सदानंद मोरे देहूकर यांच्या 'महाराष्ट्र चतुष्टय' या ग्रंथमालेतील चौथा महाग्रंथ.
“साप्ताहिक सकाळ झालेल्या चार दीर्घ आणि दर्जेदार 'लेखमालांमधून ग्रंथचतुष्टय साकार झालेले आहे. प्रा. मोरे हे अष्टपैलू प्रज्ञा आणि प्रतिभा लाभलेले, बहुप्रसबा लेखणी धारण करणारे, आंतरविद्याशाखीय दृष्टीचे, जीवनवादी आणि लोकाभिमुख अभ्यासक आहेत. त्यांच्या लेखनात मोठी विविधता असली तरी महाराष्ट्र हा त्यांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. तुकाराम दर्शन (१९९६), दविखंडीय लोकमान्य ते महात्मा (२००७), गर्जा महाराष्ट्र (२०१३) आणि महाराष्ट्राची लोकयात्रा (२०२२) या चार ग्रंथांचे विषय बाह्यतः भिन्न वाटले तरी त्यांचा अंतरात्मा एकच आहे. महाराष्ट्राचे सम्यक आणि संयत दर्शन ते घडवतात. त्यांचे मर्म असे की, महाराष्ट्र-संस्कृती श्रेष्ठ दर्जाची आहे आणि वारकरी परंपरा तिच्या केंद्रस्थानी आहे. ही परंपरा आणि आधुनिक महाराष्ट्र यांच्यात सातत्य-बदलाचे नाते आहे. महाराष्ट्राची अस्तित्व-ओळख आणि भारतीयत्व यांच्यात विसंवाद नाही. अशी व्यापक भूमिका घेतल्याने प्रादेशिक अस्मिता व्यक्त करूनसुद्धा प्रा. मोरे यांचे इतिहासलेखन संकुचित प्रादेशिकतावादी बनत नाही. त्यांचे महाराष्ट्र चतुष्टय हे एका विशाल रंगपटावरील महाराष्ट्रविश्वरूपदर्शन आहे आणि ते मराठी सारस्वतातील एक मौलिक लेणे आहे.
महाराष्ट्राची लोकयात्रा हा आधीच्या ग्रंथत्रयीशी सुसंगत असा चौथा टप्पा आहे. पहिल्या तीन ग्रंथांमध्ये सामाजिक चळवळींचे उल्लेख येत असले तरी त्या चळवळींचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतले अभिन्नत्व स्वतंत्रपणे अधोरेखित करण्यासाठी अशा ग्रंथाची आवश्यकता होती. 'संतांचा मध्ययुगीन कालखंड' आणि “सुधारकांचा आधुनिक कालखंड' अशा महाराष्ट्रेतिहासाच्या दोन भागांचे आणि त्यांच्या अंतःसंबंधांचे साक्षेपी विवेचन आणि विश्लेषण मोरे यांच्या या ग्रंथात पाहायला मिळते. धर्मक्षेत्र हे कुरुक्षेत्र बनवून खेळल्या गेलेल्या समतेच्या लढ्यात संत हे सुधारकांचे पूर्वसुरी होते, आणि काही संदर्भ वेगळे असले तरी सातत्याच्या धाग्यांनी ते जोडले गेलेले आहेत, अशी यथार्थ भूमिका इतिहासाचे गतिशास्त्र जाणणाऱ्या डॉ. मोरे यांनी या ग्रंथात घेतलेली आहे. स्वातंत्र्य आणि समता यांच्यात काही वेळा निर्माण होऊ शकणाऱ्या आंतर्विरोधांचे सूक्ष्म पदर उलगडत समतेच्या लढ्याच्या वाटचालीचा मागोवा ते घेतात. सुधारकांच्या युगातील पर्वाची 'फुले-रानडे पर्व', 'टिळक-शिंदे-शाहू पर्व' आणि 'गांधी-शिंदे-आंबेडकर पर्व' अशी नवी विभागणी करून सर्वांगीण समतामार्गी प्रवास ते शब्दांकित करतात. भारतीय संविधानामुळे समतेच्या लढ्याची परिसमाप्ती झाली, तरी व्यवहारात काही संघर्ष चालूच राहिले. या वास्तवाला अनुलक्षून फ्रान्सिस फुकुयामाच्या पद्धतीचा 'इतिहासोत्तर इतिहास' असा शब्दप्रयोग प्रा. मोरे त्यांच्या ग्रंथासंदर्भात वापरतात.
हा ग्रंथ वर्तमानाच्या स्वच्छ आकलनासाठी तर आहेच; पण तो भविष्यलक्ष्यीही आहे. 'लोकयात्रा' हा शब्दच मुळात प्रवाहाचा आणि गतीचा द्योतक आहे. तुम्ही-आम्हीच ही लोकयात्रा पुढे न्यायची आहे, असा संदेश लेखकाने दिलेला आहे आणि पुरोगामित्वासाठीचे दिशादर्शन केलेले आहे. उपनिषदांमधील ब्रह्मवाद, गौतम बुद्ध, मध्ययुगीन मराठी वारकरी संत-परंपरा, आधुनिक समाज-सुधारक आणि भारतीय संविधान असा समतेचा प्रेरक प्रवास प्रा. मोरे यांनी विवेकवादी नरेंद्र दाभोलकरांपर्यंत आणून सोडला आहे आणि सामाजिक संबंधांच्या लोकशाहीकरणाशी तो जोडला आहे. इतिहास हे केवळ घटनांचे वर्णन नसून ती मूल्यांची कहाणी कशी आहे, याचा हा एक वस्तुपाठच म्हटला पाहिजे.
डॉ. राजा दीक्षित
अध्यक्ष व प्रमुख संपादक,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई व वाई
सुप्रतिष्ठित प्राध्यापक, इतिहास बिभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे