कवितायन

डॉ. सुधीर रसाळ

राजहंस प्रकाशन

/media/05JkMFOPJ1wG.jpg

पाने : ☀ 362 मुल्य (₹): 490.0

विंदांच्या काव्याचा वेध - प्रा. विश्वास वसेकर

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या समीक्षेला सध्या बहर आलेला आहे. त्यांच्या समीक्षेची एकाहून एक महत्त्वाची पुस्तकं लागोपाठ प्रसिद्ध होत आहेत. विशेषतः १९५० च्या दरम्यान नव्याने मराठी कविता घडविणाऱ्या आणि त्यात आपापले स्वतंत्र प्रवाह निर्माण करणाऱ्या कवींवरचा आपला अभ्यास मांडण्याचा मोठाच उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. बा. सी. मर्ढेकर, पु. शिं. रेगे आणि विंदा करंदीकर या तीन कवींवरचे प्रत्येकी दोन- दोन ग्रंथ सिद्ध करून डॉ. रसाळ यांनी एक अभियान पूर्णत्वाला नेलं आहे. उपरोक्त तीनही कवींवरच्या सहा ग्रंथांत सर्वांत मोठा ग्रंथ आहे ‘कवितायन’ हा. या ग्रंथात रसाळ यांनी विंदा करंदीकरांचं नवं आकलन आणि मूल्यमापन प्रस्तुत केलं आहे.

नवं आकलन मांडताना जुन्या संकल्पना, कसोट्या निरुपयोगी ठरणं स्वाभाविक आहे, त्यासाठी डॉ. रसाळ नव्या संकल्पना, कसोट्या सूचित करतात. नुसते संदर्भित शब्द वाचकांवर थोपवून रसाळ थांबत नाहीत, तर करंदीकरांच्या कवितेच्या संदर्भात चर्चा करत त्यांचं अन्वर्थकत्व पटवून देतात. ‘संप्रेषणप्रेरणा’ ही करंदीकरांच्या कवितेमागील एक स्थिर स्वरूपाची प्रेरणा आहे असं रसाळ म्हणतात. त्यामुळे त्यांची प्रारंभिक कविता निश्चितार्थी बनली आहे, कारण आपल्याला काय मांडायचं आहे, हे स्वतःला समजून घेणं (म्हणजे ‘संदेशन’) आणि वाचकांपर्यंत ते पोचवण्यासाठी विंदा जी भाषक कृती करतात ते ‘संप्रेषण.’ याचं अधिक स्पष्टीकरण देताना रसाळ म्हणतात, ‘‘करंदीकरांच्या संप्रेषणप्रेरित कवितेचा पायाभूत आकार निबंधरचनेचा आहे. त्यांची अशी कविता सामाजिक वास्तवाचं चित्रण करणारी आहे. हे वास्तवदर्शन परिणामकारक बनविण्याकरिता ते वास्तवाचं रूप वर्धित करतात.’’ इथे हे लक्षात घेतलं पाहिजे, की या प्रक्रियेमुळेच करंदीकरांची कविता ‘तशी’ दुर्बोध वाटत नाही.

करंदीकरांच्या कवितेचा मागोवा घेताना त्यांच्या भूमिकेतील आणि त्यांच्या कवितेतील बारीक-बारीक परिवर्तनं रसाळ नोंदवीत जातात. गंगाधर गाडगीळांनी मर्ढेकरांना दुसरे केशवसुत म्हटलं होतं; परंतु वाङ्‍मयीन नात्याच्या संदर्भात गाडगीळांना हे पटवून देता आलं नव्हतं. इथे रसाळ यांनी करंदीकरच दुसरे ‘केशवसुत’ कसे ठरतात, ते दोघांच्या कवितेच्या आंतरिक तपासणीतून सिद्ध केलं आहे. (पृ. ३४). करंदीकरांच्या कवितेतून व्यक्त होणाऱ्या जाणिवांचं स्वरूप बदलत जात असतानाच ती अधिकाधिक वास्तवाभिमुख होत गेली, हे रसाळ स्पष्ट करतात. त्यातही करंदीकरांमध्ये एक विकास आहे. ‘मृद्‍गंध’ ते ‘धृपद’ या कवितासंग्रहांमधून ही कविता प्रवाहित होताना करंदीकर संप्रेषणाऐवजी वास्तवासंबंधीच्या अनुभवाच्या अभिव्यक्तीला महत्त्व देऊ लागले, तेव्हा स्वाभाविकच या कवितेत व्यामिश्रता (complixity) येत गेली आणि पुढे ती कविता याच कारणाने आकलन कठीण आणि दुर्बोधही होत गेली. तरीदेखील अशा कवितेसोबत अधूनमधून प्रत्यक्षपणे संप्रेषण करणारी कविताही ते सातत्याने लिहीत राहिले.

१९५० नंतरची नवकविता घडवण्यामध्ये त्या काळातल्या काही महत्त्वाच्या जागतिक घडामोडींचे संदर्भही रसाळ देतात. औद्योगिक क्रांती, पहिलं व दुसरं महायुद्ध, विज्ञान, मार्क्सवाद, मानसशास्त्र व मनोविश्लेषणशास्त्र या सर्वांना पचवून करंदीकरांची कविता पुढे जात आहे. माणसाच्या मनावरच्या उदा. ‘कसा मी कळेना’ कवितांचं फार सुरेख विश्लेषण रसाळ यांनी केलं आहे. याचबरोबर करंदीकरांच्या कवितेचं विज्ञाननिष्ठ इहवाद हे अधिष्ठान कसं बनत गेलं हेही विवेचन येतं. मराठीमध्ये स्त्री-पुरुषांमधील शृंगारसंबंधविषयक कविता करंदीकरांनी वैज्ञानिक इहवादी भूमिकेतून लिहिली.

करंदीकरांच्या स्त्री-पुरुष संबंधविषयक कवितांमध्ये ‘संहिता’ ही मुक्त सुनीत मालिका रसाळांना महत्त्वाची वाटते. त्यांचं एक विधान ‘आपल्या स्त्री-पुरुषविषयक जाणिवांना ‘संहिता’ रूप देऊन करंदीकर इहवादाचं नवं धर्मशास्त्रच निर्माण करू पाहताहेत.’ करंदीकरांच्या ‘वासनाकाव्यां’चं हे एकदम नवं, मौलिक आकलन रसाळ मांडतात. ‘देहाच्या थोडं वरती, आत्म्याच्या थोडं खाली’ अशी ही मराठीतील अनन्यसाधारण कविता डॉ. रसाळ यांच्यामुळेच आपल्याला कळू शकली. हे मराठी रसिकतेवरील रसाळ यांचे मोठेच उपकार आहेत.

नंतरची प्रकरणं थोडीशी लहान होत गेली आहेत. यांतून करंदीकरांची तालचित्रं, गझल व इतर कवितांची चर्चा रसाळ करतात. खूपच खटकलेली गोष्ट म्हणजे, डॉ. रसाळ यांनी करंदीकरांच्या बालकवितांचा केलेला अनुल्लेख. बालकवितेच्या इतिहासात करंदीकरांनी जे गौरिशंकर गाठलं ते अजूनही कोणाला शक्य झालं नाही. डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या मते तर करंदीकरांच्या मंत्रकविता जागतिक स्तरावरच्या बालकविता आहेत. तरीही १९५० नंतरच्या तीन महत्त्वाच्या कवींचं जे नवं आकलन आणि मूल्यमापन डॉ. रसाळ यांनी केलेलं आहे, त्याने एकूणच मराठीतील उपयोजित समीक्षेची उंची वाढली आहे, हे त्यांचं श्रेय कुणालाही नाकारता येणार नाही.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा