द स्कॅम

लेखक : देबाशिष बसू, सुचेता दलाल अनुवाद : अतुल कहाते, पूनम छत्रे

मनोविकास प्रकाशन

/media/ZzUznQDKOLJ6.jpg

पाने : ☀ 414 मुल्य (₹): 499.0

आर्थिक घोटाळ्यांवर भेदक प्रकाश - प्राची गावसकर

भारतीय शेअर बाजारात १९९२ मध्ये घडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यानं सगळा देश हादरला. पहिल्यांदाच शेअर बाजारातील आर्थिक उलाढालींचं गौडबंगाल या घोटाळ्यामुळे सगळ्यांसमोर आलं. बिग बुल म्हणून ओळखला जाणारा शेअर दलाल हर्षद मेहता याने केलेला सुमारे पाच हजार कोटींचा हा घोटाळा रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार, तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था या सर्व यंत्रणांना आव्हान देणारा ठरला. टाइम्स ऑफ इंडिया आणि बिझनेस टुडेच्या पत्रकार सुचेता दलाल आणि देबाशिष बसू यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. या मती गुंग करणाऱ्या आर्थिक घोटाळ्याची पोलखोल करणारं ‘द स्कॅम’ हे इंग्रजी पुस्तक देबाशिष बसू आणि सुचेता दलाल यांनी लिहिलं आहे. त्याचा मराठी अऩुवाद आता आलाय.

१९९२ मध्ये हर्षद मेहतानं केलेला घोटाळा पाच हजार कोटींचा होता, तर २००१ मध्ये केतन पारेख याने केलेला घोटाळा सहा हजार कोटींचा होता. बुद्धिमत्तेच्या जोरावर बँका, सरकारी यंत्रणेतील अधिकारी यांच्याशी संगनमत करून वर्षोनुवर्षं बेकायदा व्यवहार बिनबोभाट कसे घडवतात, याचं दर्शन या पुस्तकातून होतं. या दोन महाघोटाळ्यांमध्ये नेमकं काय घडलं? या लाखो लोकांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर तपशीलवार देण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर आपण यातून काही शिकलो आहोत का? पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत यादृष्टीने काय पावलं टाकली आहेत? यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. शेअर बाजारातील इनसायडर ट्रेडिंग, एखाद्या कंपनीच्या शेअरचे अचानक वाढणारे भाव अशा अनेक घडामोडींची, तांत्रिक बाबींची माहिती यात स्पष्ट होते.

या पुस्तकाची इंग्रजीतली पहिली आवृत्ती १९९२-९३ मध्ये प्रकाशित झाली. पुस्तकाच्या विक्रीने खपांचे विक्रम मोडले. त्यानंतर २००१ मध्ये शेअर दलाल केतन पारेख याने केलेला घोटाळा, तसंच अन्य काही घोटाळ्यांचा समावेश करून हे पुस्तक पुनर्प्रकाशित करण्यात आलं. तीही आवृत्ती संपल्याने या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती काढण्यात आली आहे. यात हर्षद मेहता, केतन पारेख घोटाळा, तसंच जेपीसी फियास्को आणि ग्लोबल ट्रस्ट बँक या घोटाळ्यांची सुरस कहाणी अतिशय रंजक पद्धतीने सांगण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक, त्यातही शेअर बाजाराशी संबंधित अशा किचकट बाबी असल्या तरी पुस्तकातला तपशील वाचकांना खिळवून ठेवतो. अतुल कहाते आणि पूनम छत्रे यांना हा जटिल विषय सहजसोप्या मराठीतून मांडण्यात यश आलंय.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा