कर के देखो

संपादक : सदा डुम्बरे

समकालीन प्रकाशन

/media/g5UbZwxTNKFM.jpg

पाने : ☀ 216 मुल्य (₹): 200.0

कर के देखो : कृतीशील माणसांनी केलेल्या भाषणांचा संग्रह - राहुल शेळके

एखादी कल्पना आपल्याला सुचते आणि आपण ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यावेळी आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. आपण हाती घेतलेलं काम होईल का ? आपल्याला काम जमेल का ? अशा वेळी महात्मा गांधींजींनी सांगितलेली गोष्ट आठवते ती म्हणजे, आपल्याला जेंव्हा अशा प्रकारचे प्रश्न पडतात त्यावेळी एकच गोष्ट करायची ती म्हणजे, "कर के देखो."

आज आपल्यासमोर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा अनेक प्रकारचे प्रश्न आ वासून उभे आहेत. या प्रश्नांना सामोरं कसं जायचं, ते आपल्याला कळेनासं झालं आहे. मात्र आपल्यातलीच काही माणसं आपापल्या पध्दतीने या प्रश्नांवर उत्तरं शोधत आहेत. आपलं जगणं अधिक चांगलं होण्यासाठी काही मार्ग सुचवत आहेत.'साप्ताहिक सकाळ' या नामवंत साप्ताहिकाच्या वार्षिक समारंभात केलेल्या भाषणांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही कृतीशील, ख्यातकीर्त माणसांनी केलेल्या भाषणांचा लेखाजोखा या पुस्तकात आहे.

साहित्य, संस्कृती, जीवनशैली, पर्यावरण, आर्थिक धोरण, शेती, सामाजिक प्रश्न आणि राजकारण या क्षेत्रांविषयीची समज वाढवणारी, विचारांना नवी दिशा देणारी आणि विचार करायला प्रवृत्त करणारी भाषणं या पुस्तकात आहेत. प्रा. अनंतमूर्ती, एम. टी. वासुदेवन नायर, प्रमोद तलगेरी आणि जावेद अख्तर यांनी भाषा, वाङ्मय, कला, संस्कृती या मानवी जीवन अर्थपूर्ण करणाऱ्या, जगणं समृद्ध करणाऱ्या, मानवी समूहांना स्वतःची सांस्कृतिक, प्रादेशिक ओळख मिळवून देणाऱ्या प्रश्नांचा उहापोह त्यांच्या भाषणात केला. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भाषा आणि साहित्य क्षेत्रात नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. इंग्रजीमुळे प्रादेशिक भाषांचं काय होणार ? प्रादेशिक भाषा आणि त्यांचं साहित्य टिकून राहील का? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा विचार या भाषणांमध्ये झालेला आहे.

भारतात दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे. हवेचं, पाण्याचं, घाणीचं प्रदूषण वाढत आहे. औद्योगीकरण, शहरीकरण आणि मोटारीकरण यामुळे प्रदूषणाची समस्या हाताबाहेर जाऊ पाहत आहे. नद्यांचं प्रदूषण होत आहे आणि पिण्याच्या पाण्याचे खोत प्रदूषित होत आहेत. यातून कर्करोगासारख्या मृत्युदायी रोगाचा विळखा वाढत चालला आहे. सर्व थरांवर होणाऱ्या या पर्यावरण प्रदूषणाशी झगडा केला नाही, तर मोठा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. पर्यावरणाचा प्रश्न निर्णायकपणे अर्थव्यवस्थेशी जोडला गेलेला आहे, ही बाब आपण स्वीकारली तर या प्रश्नावर मात करण्याचा मार्ग आपल्याला सापडू शकतो. निसर्ग आणि आर्थिक व्यवस्था एकमेकांत गुंतलेल्या आहेत. म्हणून पर्यावरण रक्षणार्थ काही करायचं असेल तर आर्थिक धोरणात बदल करावे लागतील. त्यासाठी काय करावं लागेल? कोणती धोरणं आपल्याला राबवावी लागतील? याची चर्चा अनिल अगरवाल, वंदना शिवा आणि सुनिता नारायण यांच्या भाषणांमध्ये झालेली आहे.

आजघडीला हृदयरोग, कॅन्सर आणि बालमृत्यू हे आरोग्याचे तीन महाप्रश्न आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. तणावग्रस्त जीवनशैलीमुळे हृदयरोग, पर्यावरण आणि जीवनामध्ये पसरलेल्या रासायनिक प्रदूषणामुळे कॅन्सर आणि अपुऱ्या आरोग्यसुविधा व आरोग्यशिक्षणामुळे बालमृत्यू हे तीन प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत. या प्रश्नांचा सामना करण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर काय कृती करायची? आरोग्याच्या तीन महाप्रश्नांपासून मुक्तीचा मार्ग कसा शोधायचा? या प्रश्नांचा विचार डॉ. अभय बंग यांच्या भाषणांमध्ये झालेला आहे.

जागतिकीकरण आणि खासगीकरणाच्या धोरणाचा अपरिहार्य परिणाम म्हणजे रोज होणाऱ्या शेकडो शेतकरी आत्महत्या. जागतिकीकरणामुळे शेतीव्यवसाय संकटात सापडला आहे; ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई विकास बँक वगैरेंच्या आर्थिक दिशादर्शनाचा तो घातक परिणाम आहे. ग्रामीण भागाच्या बाजारीकरणामुळे ग्रामीण जीवन उद्ध्वस्त होत आहे. ग्रामीण भागातील प्रश्न नेमके काय आहेत? देशातील शेती संकट किती भीषण आहे? यावर आपण काय करायला पाहिजे? याची चर्चा पी. साईनाथ यांच्या भाषणामध्ये झालेली आहे.

प्रा. योगेंद्र यादव हे देशातील महत्वाचे राजकीय विश्लेषक आणि निवडणूक तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. लोकशाही मजबूत आणि लोकाभिमुख कशी बनेल आणि पर्यायी राजकारण कसं आकाराला येईल, हे त्याचे अभ्यासाचे विषय आहेत. भारतीय राजकारणासमोरील प्रश्नांची आणि उपायांची चर्चा त्यांच्या भाषणामध्ये झालेली आहे. भारतीय लोकांचं क्रिकेट बद्दलच प्रेम, क्रिकेट वेडाबद्दल आणि राष्ट्रवादाबद्दल इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा यांचं भाषण महत्वपूर्ण आहे. डॉ. राजा रामण्णा हे भारताच्या अणुकार्यक्रमाचे एक शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारताला 'अण्वस्त्रधारी' देशांच्या रांगेत बसवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. १९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली चाचणी केली त्यावेळची भारताची भूमिका काय होती? 'आण्विक पर्यायाच्या' विचाराबद्दल भारताची भूमिका काय आहे? भारत या साऱ्या प्रक्रियेकडे कसा पाहतो? याची चर्चा डॉ. राजा रामण्णा यांच्या भाषणामध्ये झालेली दिसते.

या पुस्तकातील सर्व भाषणं ही त्यांच्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या माणसांची आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांच्या विचारांना आणि कृतीला समाजमान्यता आहे. त्यांच्या बोलण्याला अभ्यासाची आणि अनुभवाची जोड आहे. त्यांना समाजाचं समग्र भान आहे. त्यामुळे ही भाषणं वाचल्यानंतर आपली सामाजिक जाणीव उंचावते. आपण नवा विचार करायला प्रवृत्त होतो. हे या पुस्तकाचं यश आहे.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा