आमार मेयेबेला(माझं कुवारपण)

लेखिका तस्लिमा नसरीन, मराठी अनुवाद-मृणालिनी गडकरी

मेहता पब्लिशिंग हाऊस

/media/HDGiQ0AhA0Fu.jpg

पाने : ☀ 295 मुल्य (₹): 200.0

छात्रानां अध्ययनम तपः - आशुतोष गं जोगळेकर

तस्लिमाचा जन्म १९६२ चा. ती राहिली वाढली बांगलादेशातल्या मयमनसिंग शहरात. सुरुवातीला ती वर्तमानपत्रात सदर लिहीत असे. कविता करीत असे. तिच्या लेखनाला बांगलादेशात बऱ्यापैकी लोकप्रियता लाभली होती. या पुस्तकात तिने आपले जन्मापासून बालपणापर्यंतचे आयुष्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही कहाणी तिची स्वतःची आहे. काही प्रमाणात आजूबाजूला असलेल्या तिच्या नातेवाईकांची आहे तिचे कुटूंब-घरात आई वडिल, दोन मोठे भाऊ, एक लहान बहीण. दोन भावांच्या जन्मानंतर वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांना मुलगी झाली ती ही तस्लिमा. मोठा भाऊ शांत, सज्जन. ढाक्याला जाऊन शिकून परत आला. नोकरीला लागला. शेजारीच तिच्या नानीचे कुटूंब. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे तिथे नाना नानी अनेक मामा आणि मावश्या. अनेकदा तस्लिमाची आई आणि आजी एकाच वेळी बाळंतीण. नाना एकदम अवलिया मनुष्य. तरुणपणी घर सोडून अक्षरशः आभाळाच्या छताखाली राहीले. पण नानीशी लग्न झाल्यावर तिच्या व्यावहारीकपणामुळे आयुष्य मार्गी लागले अन्यथा सतत गरजू गरीब लोकांना मदत करायला ते तयार असत.

वडिल रजब अली-उच्चशिक्षित. मूळचे शेतकरी कुटूंबातले. पण शहरात येऊन उत्तम शिक्षण घेतात. नोकरी चाकरी करतात. त्यामुळे तस्लिमाची कौटूंबिक परिस्थिती उत्तम. ते नेहमी शिक्षणाचा पुरस्कार करीत. १९७१ च्या लढ्याच्या वेळी पाकिस्तान्यांकडून बांगलादेशातल्या हिंदूंवर प्रचंड अन्याय होऊ लागले. हिंदू बांगलादेश सोडून भारतात गेले. त्या काळात रजब अलींनी एका हिंदू तरुणाला मुस्लिम नाव देऊन आश्रय दिला. त्याला नोकरीवरही ठेवले.

धर्म-सुरुवातीला फारशी धार्मिक नसलेली आई नंतर धर्माकडे वळते. तिच्या बहिणीचे सासरे पीरसाहेब हे धार्मिक प्रवचनकार आहेत. आई त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागते. पीरसाहेब हे वेगळेच प्रकरण आहे. बांगलादेशामध्ये बंगाली भाषेचा प्रभाव मोठा. पाकिस्तानच्या प्रभावाखाली त्यांना राहायचे नव्हते. उर्दूची सक्ती त्यांना नको होती. बांगलादेशात पंजाबी लोकांचा वावरही या लोकांना जाचक वाटत असे. तरीही उर्दू बोलणारा एक बिहारी मनुष्य केवळ इस्लामचा प्रवचनकार आहे म्हणून यांना वंदनीय पूजनीय वाटतो. त्या अबंगाली घरात ते आपली बंगाली मुलगी द्यायला सहज तयार होतात. कधी धर्म तर कधी भाषा प्रभावी ठरते. लौकिक शिक्षणाला पीरसाहेबांचा विरोध आहे त्यांच्या घरातली कुणीही मुलगी लौकिक शिक्षण घेत नाही. शाळेत जात नाही. त्या मुली दिवसभर धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. अभ्यास करतात. ज्या खोल्यांमध्ये त्या बसतात त्यां खोल्यांना एकही खिडकी नाही कारण अरबस्थानातल्या घरांना कुठल्याशा काळात खिडक्या नव्हत्या. त्यांनी स्वतः मात्र लौकिक शिक्षण घेतलेले आहे. ते इंग्रजीतून बोलू शकतात. तस्लिमाची आई पीरसाहेबांच्या प्रवचनाला जाऊ लागली आणि बराच काळ त्यांचा तिच्यावर प्रभाव राहिला. तिचे विचार बदलले, तिचा वेष बदलला. तिचा हिंदूंकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. धर्मग्रंथ अरबीमध्ये असल्याने अरबी भाषा, अरबस्थान याबद्दल आदराची भावना. एक दिवस तस्लिमाला अंगणात पडलेला अरबीत लिहिलेला कागद सापडतो. त्यात काहीतरी पवित्र लिहीलेले असेल त्यावर पाय पडायला नको म्हणून ती तो आईकडे आणून देते. मोठा मामा तिथेच असतो तो त्या कागदावर अरबीमध्ये अपशब्द शिव्या लिहिलेल्या आहेत असे सांगतो. पण हे लोक विश्वास ठेवत नाहीत. त्यावर तो अरबी ही अरबस्थानातल्या लोकांची भाषा आहे. बाकीच्या लोकांसारखेच ते देखील चिडतात रागावतात शिव्याही देतात त्यामुळे अरबी भाषेतही शिव्या आहेत, असे सांगतो.

सर्वात मोठा सिद्दीक मामा हा घरात सगळ्यांचा लाडका मदरशात शिकला. अरबी भाषा शिकला. पुढे ढाक्याला जाऊन नोकरी करू लागला. परिचय नसताना त्याला अरबी भाषा, धर्म याबद्दल आदर होता पण परिचय होत गेल्यावर तो आदर कमी होत गेला. ईदच्या दिवशी बैलाची दिली जाणारी कुर्बानी त्याला पाहवत नसे आणि तो त्या गोष्टी खातही नसे.

बांगलादेशातील अनेक मुस्लिम कुटुंबे धर्माच्या प्रभावाखाली असली तरी तस्लिमाचे घर धर्माच्या फारशा प्रभावाखाली नव्हते. वडिलांच्या धार्मिक समजूतींना कडक विरोध. वर्षातून एकादा येणार्‍या ईदपुरताच वडिलांचा धर्माशी संबंध. ते नेहमी व्यावहारीक शिक्षणाचा पुरस्कार करीत. एखादा पुरुष पत्नीला मारहाण करतो. क्षुल्लक कारणावरून सगळ्यांदेखत तीनदा तलाक उच्चारून पत्नीला सोडून देतो. हे ती पाहते. पुरुषांच्या अन्यायामुळे काही स्त्रिया आयुष्यातून उठतात, तर काही आयुष्य संपवतात. पण कुणीच काही बोलू शकत नाही सगळे बघ्याची भूमिका घेतात कारण या सगळ्याला धर्माचे अधिष्ठान आहे हेही तिला दिसून येते.

स्त्रीने पुरुषाला नसीहत देणे हा फार इंटरेस्टिंग प्रकार आहे

“जगातली प्रत्येक गोष्ट ही उपभोगासाठी आहे आणि चारित्र्यसंपन्न स्त्री ही उपभोगाची सर्वोत्तम गोष्ट आहे” धर्मग्रंथातल्या अशा वाक्यांकडे लेखिका लक्ष वेधते.

सामाजिक- इथे उच्चनीचता खूप आहे, गरिबी प्रचंड आहे. घरकाम करणाऱ्या एका मुलीला काढून टाकल्यानंतर झोपडपट्टीतून अगदी सहजपणे दुसरी मुलगी घर कामासाठी उपलब्ध होते. या लोकांना छोटे लोक, खालचे लोक म्हटले जाते. त्यांना बरोबरीची जाऊ द्या, जनावरांच्या इतकी सुद्धा वागणूक चांगली मिळत नाही. त्यांना मारा झोडा, मोबदला न देता कामावरून काढून टाका. ते तक्रार करू शकत नाहीत.

भारतीय संस्कृती-बांगलादेश निर्मितीच्या वेळी नेत्यांना सर्व धर्मीयांचा पाठींबा हवा होता. पण बांगलादेश निर्माण झाल्यानंतर मात्र इस्लामिक कट्टरता वाढू लागली. हिंदूंचे जीवन अवघड बनू लागले. पण पाकिस्तानच्या तुलनेत तिथे हिंदू लोकसंख्या आजही जास्त आहे. तस्लिमा यांच्या आयुष्यावर त्यांच्या वडिलांचा मोठा प्रभाव आहे. वडिलांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थी दशेतल्या तस्लिमाला ते छात्रानां अध्ययनम तपः असे पुन्हा पुन्हा सांगतात. त्यांच्या घराचे नाव अवकाश आहे. तस्लिमासाठी लहानपणी निरनिराळी नावे सुचविली जातात त्यात शोभा, उषा अशीही नावे असतात. शाळेचे नाव विद्यामयी स्कूल असते. ईश्वरचंद्र विद्यासागर, रविंद्रनाथ टागोर, शरदबाबू अशा अनेक व्यक्तिमत्वांची नावे यात येतात. अमुक गोष्ट झाली तर काय महाभारत अशुद्ध होईल का हा वाक्प्रचार ऐकायला मिळतो. शाळेमध्ये एक प्रसंग ओढवतो तेव्हा तस्लिमा म्हणते, आता धरती दुभंगावी आणि तिने मला पोटात घ्यावे पण तसे झाले नाही कारण मी काही सीतामाता नव्हते. तिचे वडील म्हणत कष्टाशिवाय केष्ट नाही. कष्टाशिवाय कृष्ण प्राप्ती नाही. केष्ट=कृष्ण हिच्या कवितेला दादा नाव देतो रामधनु. बांगलादेश निर्मितीसाठी मुक्ती वाहिनी तयार झाली. नंतर बांगलादेशच्या रक्षणासाठी रक्षा वाहिनी तयार झाली.

अशाप्रकारे व्यक्तिगत जीवन, कुटुंबातले सदस्य, सामाजिक परिस्थिती, धर्म या गोष्टींचे दर्शन होते. लेखिका कुठल्या भागात राहिली, कुठल्या कालखंडात ती वावरली. आजूबाजूला काय परिस्थिती तिला पाहायला मिळाली ते समजते.

यानिमित्ताने लज्जा लिहिणाऱ्या या लेखिकेची जडणघडण कशी झाली ते या पुस्तकातून वाचायला मिळते.

मोब-9860573051

द्वारा : समीक्षक