मंदिर कसे पहावे

गो. बं. देगलूरकर

स्नेहल प्रकाशन

/media/ZpboIrWAuteo.jpg

पाने : ☀ 94 मुल्य (₹): 180.0

मनोगत - गो. बं. देगलूरकर


मंदिराच्या अभ्यासानिमित्त अनेक राज्यात प्रवास करताना लक्षात असे आले की, मंदिर मोठे असो 'की लहान, भक्‍तप्रिय असो की ग्रामीण भागातील असो- देवदर्शनाला तेथे जाणारा क्वचितच मंदिराकडे लक्षपूर्वक पाहात असतो. अशा वेळी वाटते की इतक्या परिश्रमाने, विविध प्रकारच्या कलाकुसरीने, लहान मोठ्या शिल्पाकृतीने, अनेक देव-देवतांच्या प्रतिमांनी सजविलेली ही मंदिरे दर्शेच्छूंनी डोळा भरून पाहायला हवीत, शिल्पाकृतीतून उलगडत जाणाऱ्या कथा समजावून घ्याव्यात, रसिकाच्या दृष्टीने त्यातील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा. स्टेला व्रॅमरीशसारख्या पाश्‍चात्त्य विदूषीचे म्हणणे असे की, मंदिरातील व मंदिरावरील कोणतेही शिल्पांकन विनाकारण नसते. (दि हिन्दू टॅपल, पृ. १). सिवराममूर्तींचे म्हणणे की, शिल्पाकृती म्हणजे संस्कृतीचा आरसाच होय. (मिरर्स ऑफ इंडियन कल्चर).

याशिवाय मंदिराच्या स्थापत्याची काही वैशिष्ट्ये असतात. मंदिराच्या प्रत्येक भागाला नाव असते, अगदी अधिष्ठानापासून ते शिखराच्या टोकावरील कलशापर्यंतच्या भागापर्यंत. ते समजावून घेतले पाहिजे. मंदिर स्थापत्य जेव्हा परिणतावस्थेला पोचले तेव्हा त्यातून भारतीय तत्त्वज्ञान उलगडत गेले असे जाणकार मानतात. या सर्वांचा विचार करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

शास्त्र सांगते की, आधी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालावी म्हणजे त्याच्या अंगोपांगाची माहिती होते, तसेच त्यावरील इतर देवता, गाभाऱ्यातील मुख्य देवतेची अनेक रूपे (उदाहरणार्थ, मंदिर शिवाचे असल्यास अंधकासुरवध- शिवमूर्ती, नटराज इत्यादी; आणि विष्णूचे असल्यास नृसिंह, वराह इत्यादी) यांचे दर्शन होते. याला बहिर्देवपूजा म्हणतात, आणि अशा तऱ्हेने मंदिराचा परिचय झाला म्हणजे मग मंदित प्रवेश करायचा असतो.

हे सर्व आणि मंदिर व मूर्ती यांच्यात अंतर्भूत किंवा अनुस्यूत असलेले तत्त्वज्ञान येथे उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लिखाणाचा उपयोग करून मंदिर पाहाणाऱ्यास अतीव समाधान मिळेल, असा लेखकाचा विश्‍वास आहे.

या पुस्तकासाठी भारतीय मंदिरस्थापत्यासंबंधी लिहिणाऱ्या स्टेला व्रॅमरीश, पर्सी ब्राऊन, कझेन्स, कृष्णदेवा, अ. वि. नाईक यांचेपासून ते अँडम हर्डी, अ. प्र. जामखेडकर या सर्वांच्या ऋणात प्रस्तुत लेखक आहे. खरे तर हे आणि असे अनेक पूर्वलेखक यांच्याकडेच याचे श्रेय जाते असे म्हणता येईल. प्रस्तुत लेखक फक्त निमित्तकारण आहे.

असे एक पुस्तक पाहिजेच असे आग्रहपूर्वक सांगणारे, त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणारे, आमचे स्नेही प्र. प्र. के. घाणेकर, हे प्रकाशित करण्याचे तत्परतेने मान्य करणारे स्नेहल प्रकाशनचे श्री. रवींद्र घाटपांडे, मंदिराच्या विविध भागांचा चित्ररूप परिचय करून देणारे, त्यासाठी आवश्यक ती रेखाचित्रे आणि प्रकाशचित्रे रेखाटणारे वा उपलब्ध करून देणारे आमचे स्नेही डॉ. श्रीकांत प्रधान, श्री. देवदत्त फुले, श्री. पराग पुरंदरे आणि विद्यार्थिनी सौ. धनलक्ष्मी तिळे आणि बिनचूक टंकलेखन करणाऱ्या सौ. स्नेहा अरवंदेकर या सर्वांचे आभार मानायला मजकडे पुरेसे शब्द नाहीत. योग्य त्या सूचना करून पुस्तक शक्‍यतो. निर्दोष होईल असे पाहाणार्‍या डॉ. सौ. सुचेता परांजपे आणि लिखाण परिष्कृत करुन प्रकाशचित्रांची ही योग्य मांडणी करणारे आमचे स्नेही श्री. पराग पुरंदरे यांचाही लेखक ऋणी आहे.

माझा विश्‍वास आहे की, येथून पुढे देवदर्शनाला जाणारे, हे पुस्तक हाती घेऊन मंदिरदर्शनही घेतील आणि यामुळे त्यांना कृतकृत्य झाल्याचे समाधानही लाभेल. अधिक काय सांगणे?

- गो. बं. देगलूरकर

द्वारा : पुस्तकातुन साभार