विघ्न विराम : Who Painted My Money White

लेखक: श्री अय्यर अनुवाद: दीपक करंजीकर

परम मित्र पब्लिकेशन्स

/media/vignaviram.jpg

पाने : ☀ 236 मुल्य (₹): 400.0

मनोगत - दीपक करंजीकर

८ नोव्हेंबर, २०१६ रोजी रात्री ८ वाजता भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली. हा निर्णय त्यांनी अचानक घेतला होता का? की त्यामागे काही कारणे होती? श्री अय्यर लिखित Who Painted My Money White या कादंबरीत या सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. त्याचेच "विघ्न विराम" हे मराठीतील रूपांतर.

या पुस्तकाच्या आगेमागे मी काहीही गृहीत धरलं नव्हतं.

ज्याचे हे मराठी रूपांतर आहे ते मूळ पुस्तक मी वाचलेलं नव्हतं किंवा माझ्या चर्चेतही नव्हते.

पण एखादं पुस्तक आपला जणू पाठलाग करत असतं अखंडपणे आणि मग त्या बाबतीत योगायोग हाच महत्त्वाचा भाग बनतो.

बघा, एका व्याख्यानाच्या ठिकाणी हे पुस्तक सुचवलं जातं, त्यानंतरच्या दुसर्‍या गावातील कार्यक्रमात जी पुस्तके भेट दिली जातात त्यात हेच पुस्तक असतं, नंतरच्या आठवड्यात अमेरिकेत गेल्यावर खुद्द लेखक श्री अय्यर यांचा फोन येतो; मीच हे मराठीत आणावे असे ते आग्रह धरतात. मी अमेरिकेत कोरोना मुळे अडकून पडतो-दुर्मिळ असणारा वेळ मिळतो आणि केवळ दीड आठवड्यात याचे रूपांतर घडून येते.

परम मित्र पब्लिकेशन्सचे माधवराव जोशी माझे “घातसूत्र" वाचून भारावलेले असतात. एका भेटीत ते एक विषय सुचवतात, त्यावर पुस्तक लिहा असं सांगतात. माझं तयार असलेलं भाषांतर आणि माधवरावांचा आग्रह असं अचानक जुळून येतं.

हे सगळे एका रेषेत असे उभे राहणे यालाच योगायोग असे म्हणतात.

पुस्तक फिक्शन प्रकारात गणले जाणारे आहेत पण Truth is Stranger than Fiction असे जे म्हणतात त्याचा चाणाक्ष वाचकांना प्रत्यय येईल.

या शतकातील पहिली दोन दशके अनेक वर्ष हा देश आठवत राहील अशी आहेत.
जगात ही ९/११ घडले तशी ही कहाणी, म्हणजे गोष्ट, भारतातील एका सत्तेचा पट सामान्य चेहरा नसलेल्या माणसांनी उधळून लावल्याची.

कोणतेही बंड, अराजक न होता एका देशातील नादान आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांना, धर्मांध शक्तींना, प्रशासन पोखरलेल्या आतल्या आणि बाह्य ताकदींना, या सगळ्यांच्या साटेलोट्यांनी, कारस्थानांनी हतबल झालेल्या भारतातील अर्धपोटी माणसांनी आपले बदलाचे मार्ग शोधले.

त्यांच्या विराण वाटेवरती ज्यांनी अव्यवस्थेचे, कुटील राजकारणाचे सुरुंग पेरूनही ही साधी जनता त्यावर बेडरपणे चालत गेली आणि तीने हे अरेरावीचे आणि बेबंद भ्रष्टाचाराचे जोखड झुगारले.

हा बदल जो घडला त्याच्या आधीच्या अराजकात काय काय घडत होते याची मनाला विकल करणारी गोष्ट मांडलीय श्री अय्यर यांनी. त्याचा अनुवाद करतांना मला आपण एक योगदान देतो आहोत असे का वाटलं? कदाचित उलगडून नाही सांगता येणार, पण ही भावना आली मनात हे खरंय मात्र आणि त्याचे श्रेय श्री. अय्यरजी यांचे आहे.

आपल्याला, जगत असताना आजूबाजूला काय घडते याचे भान देणारे, या जगातील आपल्या प्लेसमेंटचे नेमके स्थान सांगणारे असे मनोरंजना पलीकडचे लिखाण असते.

मी अशा लिखाणाचा लमाण झालो याचा मला आनंद आहे.

हे भाषांतर करतांना त्यातला चित्रमय भाग मला दिसत राहिला त्यामुळे यावर एखादी वेब सिरीज आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही.

पाणी जसे उताराकडे जाते तसे लिखित साहित्य, दृश्यात्मक प्रभावी माध्यमांकडे येणाऱ्या काळात जात राहील असे मला वाटते. आकलन आणि सगळ्यांपर्यंत पोचणे हे दोन्ही त्यामुळे साध्य होते.

आपल्याला हा आनंद मिळावा या अपेक्षेत.

थांबतो...
इतके अगत्य असो द्यावे.

द्वारा : पुस्तकातुन साभार