सातवाहनकालीन महाराष्ट्र

डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

अपरांत प्रकाशन

/media/CdNN4SSAxB4c.jpg

पाने : ☀ 500 मुल्य (₹): 500.0

सातवाहन म्हणजे महाराष्ट्रातील आद्य राजघराणे. - हर्षल भानुशाली


आज आपल्याला जो महाराष्ट्र दिसत आहे, त्याचा पाया सातवाहन कालखंडात रचला गेला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सातवाहनांचा फार मोठा सहभाग आहे. गोदावरी खोरे, नर्मदा खोरे आणि कृष्णा खोरे म्हणजेच आजचा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यासारख्या विस्तीर्ण आणि संपन्न प्रदेशावर सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनांनी राज्य केले. सातवाहन राजे स्वतःचा उल्लेख 'दक्षिणापथपती' असा करत असत. सातवाहन काळात राजकीय स्थैर्य, आर्थिक सुबत्ता, सामाजिक सहिष्णुता आणि सांस्कृतिक तथा कलाक्षेत्रात समाजाने अत्युच्च शिखर गाठलेली होती. ज्येष्ठ पुरातत्व अभ्यासक आणि इतिहास संशोधक प्रा डॉ रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर यांनी सातवाहन कालखंडाचा ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, व्यापारी, कला व साहित्यिक आणि पुरातत्वीय दृष्टीने केलेला अभ्यास म्हणजेच 'सातवाहनकालीन महाराष्ट्र'.

सातवाहन कालीन महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी मोरवंचीकर सरांनी हिंदू,बौद्ध तसेच जैन साहित्य; प्लिनी, टॉलेमी, स्ट्रोबो, 'पेरीप्लस ऑफ द इरीथ्रीयन सी' चा अज्ञात लेखक, एरियन यांसारख्या परकीय लेखकांचे उपलब्ध साहित्य; सातवाहनांचे ३७ व क्षत्रपांचे २८ असे एकूण ६५ शिलालेख; विविध ठिकाणी उत्खननात सापडलेली नाणी,भांडी,आभूषणे तसेच विविध वस्तू; सातवाहन काळात खोदल्या गेलेल्या शेकडो लेण्या, स्तूप, शैलगृहे; त्या काळात निर्माण झालेले प्राकृत आणि संस्कृत भाषेतील साहित्य यांचा आधार घेतला आहे.

इ.स. पूर्व २३० ते इ.स. २३० अशी तब्बल ४६० वर्षे सातवाहनांनी महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांनी शक-क्षत्रप यांची आक्रमणे परतवून लावत महाराष्ट्रावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला. पुराणांमध्ये सातवाहन संस्थापक म्हणून सिमुकाचे नाव दिलेले असले तरी 'सातवाहन' हाच कुळाचा संस्थापक होता, हे आता त्याच्या सापडलेल्या नाण्यांवरून सिद्ध झाले आहे. सातवाहन राजाच्या नावावरून घराण्याला सातवाहन हे नाव प्राप्त झाले. 'सालाहन' त्याचे प्राकृत रूप असून, 'शालिवाहन' हे त्याचे संस्कृत नाव आहे. सुरुवातीला जुन्नर ही सातवाहनांची राजधानी असावी असे तज्ञांचे मत होते. परंतु आता जुन्नर ही क्षत्रपांची राजधानी होती आणि सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) हीच होती हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. पुराणानुसार सातवाहनांचे तीस राजे होऊन गेले. परंतु सापडलेल्या नाण्यांनुसार ही संख्या जास्त असावी. सातवाहन सत्तेच्या कालखंडाचे सातवाहन ते शिवस्वाती पर्यंत पहिला आणि गौतमीपुत्र सातकर्णी पासून तृतीय पुळूमावीपर्यंत दुसरा असे दोन कालखंड पडतात.

सातवाहन नंतर सिमुक राजा बनला. त्याने 23 वर्षे राज्य केले. त्यानंतर त्याचा भाऊ कृष्ण याने अठरा वर्ष राज्य केले. कृष्ण नंतर त्याचा पुतण्या सातकर्णी प्रथम हा सातवाहन सम्राट झाला. सातवाहन घराण्यातील हा सर्वात पराक्रमी राजा मानला जातो. त्याने तब्बल पन्नास वर्षे राज्य केले. त्याची पत्नी नागणिका हिचा जुन्नर जवळील नाणेघाट येथील शिलालेख प्रसिद्ध आहे. सातकर्णीने दोन अश्वमेध, एक राजसूय आणि अनेक श्रौतयाग करून हजारो गाई,अनेक अश्व, गज, वस्त्रे, कार्षपण (नाणी) आणि धान्याच्या राशी यज्ञातील ब्राह्मणांना आणि यज्ञ सेवकांना दान दिल्याचे नाणेघाट येथील शिलालेखात स्पष्ट म्हटले आहे. प्रथम सातकर्णी नंतर त्याचा मुलगा वेदीश्री , त्यानंतर दुसरा मुलगा शक्तीश्री, त्यानंतर द्वितीय सातकर्णी, मेघस्वाती, हाल हे राजे झाले. सातवाहन नृपती हाल हा त्याच्या गाहासत्तसई (गाथासप्तशती) या शृंगार प्रधान काव्यसंग्रहामुळे सर्वपरिचित आहे. हालानंतर पुराणात मंटलक, पुरींद्रसेन, सुंदर सातकर्णी, चकोर सातकर्णी आणि शिवस्वाती यांची नावे येतात. परंतु यांच्या बद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. शिवस्वातीच्या कालखंडात शक कुलीन नहपान क्षत्रप याने सातवाहनांवर आक्रमण करून त्यांचा बराचसा भूभाग बळकावला. त्याने पैठण वर आक्रमण केल्यामुळे सातवाहनांना आपली राजधानी दक्षिणेकडील धन्यकाकटक येथे स्थलांतरित करावी लागली.

शिवस्वाती नंतर त्याचा मुलगा गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन सम्राट बनला. सातवाहनांच्या दुसऱ्या कालखंडातील हा सर्वात पराक्रमी राजा होता. त्याने प्रथम विदर्भावर आक्रमण करून पौनी (कुशावती) परिसरातील क्षत्रपांचा बीमोड केला. नंतर नाशिकजवळील गोवर्धन परिसरामध्ये क्षत्रप राजा नहपान याचा पराभव करून सातवाहन साम्राज्य पुनर्प्रस्थापित केले. त्यामुळे त्याची आई गौतमी बलश्री हिने नाशिक येथे कोरलेल्या शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख 'क्षहरातवंशनिर्वंशकर' म्हणजे नहपान क्षत्रपाचे क्षहरात कुळ नष्ट करणारा असा केला आहे. त्याच प्रमाणे त्याला ' ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे 'ज्याच्या घोड्यांनी तिन्ही (पूर्व, पश्चिम व दक्षिण) समुद्राचे पाणी प्याले आहे असा' असेही म्हटले आहे. यावरून त्याच्या साम्राज्य विस्ताराची कल्पना येईल. गौतमीपुत्र सातकर्णी नंतर त्याचा मुलगा वाशिष्ठी पुत्र पुळुमावी राजा बनला. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पुळुमावीची कारकीर्द ही अखेरची समृद्ध कारकीर्द होय. पुळुमावी नंतर सातवाहनांच्या साम्राज्याचे विभाजन झाले असावे असे वाटते. महाराष्ट्रात स्कंद सातकर्णी तर आंध्र प्रदेशात वाशिष्ठी पुत्र सातकर्णीने राज्य केले असावे. वासिष्ठी पुत्र सातकर्णी नंतर यज्ञ सातकर्णी नृपती बनला. त्याने तीस वर्षे राज्य केले. त्यानंतर माढरी पुत्र शकसेन राज्यकर्ता झाला. शकसेना नंतर सातवाहन आणि महाराष्ट्र यांचा संबंध संपला. आंध्रा मध्ये मात्र नंतर विजय सातकर्णी, चंडस्वाती, रूद्र सातकर्णी व पुळुमावी असे नृपती झाले.तृतीय पुळूमावी हा शेवटचा सातवाहन सम्राट ठरला.

पश्चिमी क्षत्रपांच्या प्रभावी हल्यांमुळे सातवाहनांचा पश्चिमेकडील व्यापार बसला. त्यामुळे व्यापारातील प्रचंड घट हे सातवाहन सत्तेच्या विनाशाचे मूलभूत कारण आहे. सातवाहनांच्या विस्तृत साम्राज्यामध्ये अभिर, वाकाटक, चुटू, इश्वाकू आदी अनेक प्रभावी सरंजामदार घराणी होती. सातवाहनांच्या कडून कमकुवतपणाचे प्रदर्शन होताच ही सर्व घराणी स्वतंत्र झाली व सातवाहन साम्राज्य नामशेष झाले.

सातवाहन वैयक्तिक जीवनात ब्राह्मण धर्मीय असले आणि त्यांनी वैदिक चळवळींना पाठिंबा दिला असला, तरी लौकिक जीवनामध्ये त्यांनी धर्म सहिष्णूत्वाचा पुरस्कार केल्याचे स्पष्ट होते. सातवाहनांनी अनेक यज्ञ केले तसेच त्यांनी जैन व बौद्ध धर्मीय यांनाही आश्रय दिला होता. सातवाहन कालीन समाजामध्ये स्त्रियांना विशेष स्थान होते. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत.

सातवाहन काळात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होऊन अनेक नगरांची व बंदरांची निर्मिती झाली. या काळात प्रतिष्ठान (पैठण), तगर (तेर), जिर्णनगर (जुन्नर), नाशिक, भोगवर्धन (भोकरदन), ब्रह्मपुरी (कोल्हापूर), करहाटक (कऱ्हाड) ), स्थानक (ठाणे), धेनुकाटक (धन्यकाकटक), उज्जैन ही प्रमुख व्यापारी केंद्रे तर भरुकच्छ (भडोच), शुर्पारिक (नालासोपारा), कलियान (कल्याण), चेमुल (चौल), वस्य (वसई) ही प्रमुख बंदरे होती. पैठण ते जुन्नर मधील नाणेघाट मार्गे कल्याण हा सर्वात प्रमुख व्यापारी मार्ग होता. या बंदरांमधून पर्शिया, इजिप्त, ग्रीस, रोम या सारख्या देशांमध्ये हस्तीदंती कलाकुसरीच्या वस्तू, रेशीम कापड, सुती व तलम कापड, कापूस, काळीमिरी, मसाल्याचे पदार्थ, सुगंधी द्रव्य, लोणी, तूप, मध, चंदन, लाख या वस्तू निर्यात केल्या जात असत. तसेच सोने,चांदी,रत्ने, प्रवाळ, औषधी, उंची मद्य पेये ,सुंदर ललना आणि सर्वोत्कृष्ट सौंदर्यप्रसाधने यांची आयात होत असे.

सातवाहन काळात रचलेले हालाची गाथासप्तशती, गुणाढयाचा बृहत्कथाकोष, शर्ववर्माचे कातंत्रव्याकरण, शुद्रकाचे मृच्छकटिक हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सातवाहन काळात प्राकृत भाषेला लोक मान्यता प्राप्त झाली. सातवाहन काळात देशात अनेक ठिकाणी स्तूप विहार व चैत्यगृह यांची निर्मिती करण्यात आली.
पौनी, तेर, अमरावती येथील स्तूप तर कार्ले, भाजे, कोंडाणे, पितळखोरे, जुन्नर, अजिंठा, बेडसे, नाशिक, कान्हेरी, महाड, कुडा याठिकाणची लेणी, चैत्यगृहे व विहार प्रसिध्द आहे. येथील शिल्पांवरून आपल्याला सातवाहकालीन संपन्नतेची कल्पना येते.

सातवाहनांच्या काळास दक्षिण भारताचे सुवर्णयुग मानले जाते. कारण या काळात जे आर्थिक स्थैर्य आणि जी संपन्नता महाराष्ट्राला लाभली ती नंतर केव्हाच लाभली नाही. सातवाहन काळात रोमवरून येणाऱ्या संपत्ती मध्ये एवढी प्रचंड वाढ झाली होती की शेवटी रोमन सभेला भारतातून येणाऱ्या आयातीवर बंदी घालावी लागली. भविष्यात वैभव संपन्न महाराष्ट्र घडवायचा असेल तर सातवाहनां सारख्या पूर्वजांचा अभ्यास करायलाच हवा. त्यासाठी मोरवंचीकर सरांनी अतिशय अभ्यास पूर्वक आणि खूप कष्ट घेऊन लिहिलेले 'सातवाहनकालीन महाराष्ट्र' हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे.

द्वारा : पुस्तक स्टेशन