सैबेरियातून पलायन: As Far as My Feet Will Carry Me
लेखक: जे. एम. बॉअर अनुवाद: वसुधा माने
चंद्रकला प्रकाशन
सैबेरियातून पलायन: As Far as My Feet Will Carry Me
लेखक: जे. एम. बॉअर अनुवाद: वसुधा माने
चंद्रकला प्रकाशन
पाने : ☀ 192 मुल्य (₹): 250.0
'सैबेरियातून पलायन 'ही दुसऱ्या महायुद्धातील एक विलक्षण कहाणी आहे .
ही कहाणी आहे फोरेल नावाच्या एका जर्मन सैनिकाची. फोरेल रशियामध्ये युद्ध कैदी झाला आणि दीर्घकालीन कारावास भोगत असताना तिथून आपल्या गावाच्या, मातृभूमीच्या आणि आपल्या माणसांच्या ओढीनं, विलक्षण धाडस करून तुरुंगातून पळाला. सलग तीन वर्षं - कधी बर्फातून तर कधी रणरणत्या उन्हातून, कधी रेल्वेतून तर कधी नावेतून प्रवास करून ,विलक्षण जिद्दीने तो पुन्हा आपल्या घरी परतला!
त्याचा हा तीन वर्षांचा चित्तथरारक प्रवास म्हणजे त्याची अनोखी कहाणी! अत्यंत वाचनीय! वाचकाला खिळवून ठेवणारी!या एका कहाणीत अनेक कहाण्या दडल्यात!
दुसऱ्या महायुद्धाचे अंतरंग उलगडताना , या महायुद्धाचा जगभरातल्या सामान्य माणसांना किती आणि कसा फटका बसला ,किती त्रास त्यांना सहन करावा लागला ,किती नाहक बळी गेले ,हे सांगणारी ही कहाणी!
या प्रवासात फोरेलला अनेक प्रकारची माणसे भेटली .दुष्ट, चोर वृत्तीची, शिकारी , त्याच बरोबर प्रेम करणारी ,समजून घेणारी ,तर कधी जीव घ्यायला उठलेली!
या साऱ्या अनुभवांचा मिळून झालेला हा प्रवास म्हणजे फोरेलची कहाणी !' सैबेरियातून पलायन'!
मूळ लेखकाचे टिपण
१९५४ च्या ऑटमच्या शेवटी शेवटी म्यूनिख मधल्या एका प्रकाशकानं फ्रांझ एरेटिवर्थनं एका व्यक्तीशी माझी ओळख करून दिली. ही व्यक्ती म्हणे सोव्हिएत रशियातल्या सैबेरियात कैदेत होती आणि तिथून तीन साडेतीन वर्षे पायी प्रवास करून ईस्ट केपमार्गे पळून आली होती. जवळजवळ जगातल्या सर्व विषयांवर आमच्या गप्पा चालू होत्या; पण त्याच्या या अचाट पराक्रमाबद्दल तो अवाक्षर काढीना आणि मला तर तेवढंच हवं होतं. कधी त्याला फार राग येत असल्याचं जाणवत होतं, तर कधी भीती डोकावत होती. सोव्हिएत न्यायाच्या कल्पनेबद्दल बोलताना तर त्याचा तोल सुटत होता. आपण साधंसुधं आयुष्य जगायला नालायक बनलो आहोत याची त्याला जाणीव होती आणि त्याचं खापर तो सोविएत रशियावर फोडत होता. मुक्त होण्याच्या त्याच्या या प्रयल्लाचं अफाट, गंभीर स्वरूप काळ्याभोर आकाशात लक््कन् चमकणाऱ्या विजेच्या रेघेसारखं दिसून नाहीसं होत होतं. पुऱ्हा कोणीतरी आपल्याला रशियन सरकारच्या ताब्यात देईल की काय, याची त्याला भीती वाटत असल्याचं सतत जाणवत होतं.
'त्याचे हे लोकविलक्षण अनुभव लेखनबद्ध करावेत का?' याविषयी आम्ही दोघं बरेच दिवस विचार करत होतो. शेवटी २ जानेवारी १९५५ ला आम्ही पुन्हा भेटलो पण तरीही त्यानं आपल्या अनुभवांची उजळणी करून, त्यांचा कालानुक्रम निश्चित करायला आणखी काही दिवस जावे लागले. बरेच वेळा स्थळ-काळ-वेळाची गल्लत व्हायची.
त्याच्या म्हणण्याची शहानिशा करणं मला काही शक्य नव्हतं आणि मग मी एखाद्या गोष्टीवर थोडा जरी संशय प्रगट केला, की तो रागवत असे. त्यानं जेव्हा 'अंडाया'मधल्या उंचच उंच वृक्षांचा उल्लेख केला, तेव्हा आमचा पहिला खटका उडाला. मी थंडपणे सांगितलं, की तो म्हणतो त्या प्रदेशात वृक्ष तर सोडाच उंच उंच झुडपंदेखील उगवणं शक्य नाही. मी असा आग्रह धरला याला कारण होतं. एके काळी मी शिपाईगिरी केली होती; आणि लेनिनप्राडपर्यंत गेलो 'होतो-तोही कॉकेशसमार्गे; पण मी जेव्हा तज्ज्ञांना विचारलं तेव्हा समजलं, की त्याचं बरोबर आहे, माझंच चुकलं आहे. त्याची कहाणी एखाद्या भयाण स्वप्नासारखी, अंगावर शहारे आणणारी होती, त्यामुळे मी सारख्या शंका काढायचो, प्रश्न विचारायचो; पण नेहमी त्याचंच बरोबर ठरत गेलं.
जसजसे काम चालू होते तसतसे हे पुस्तक लिहिण्याचा माझा निर्धार वाढत गेला. ही कहाणी प्रकाशित करायचं मी केव्हाच ठरवलं होतं. 'सांगताना' त्याचा साहित्यिक दर्जाही उत्तम राहील याकडं मी लक्ष पुरवलं होतं. आता नायकाला एखादं नाव देणं आलंच. त्याला स्वतःचं नाव उघड करायचं नव्हतं. म्हणून 'क्लेमेन्स फोरेल' असं नाव दिलं.
पलायनाचे तिसरे वर्ष देखील तितकेच धोक्याने भरलेले होते आणि ते अनुभव पुर्वघटिताची पुनरावृत्तीच होते. म्हणून अतिरिक्त तपशीलांसह आणखी शंभर पृष्ठांची भर न घालण्याचे मी ठरविले.
१० मे १९५५ रोजी मी पुस्तकाचं संपूर्ण हस्तलिखित 'फॉरेल'ला दिलं. एखाद-दुसरा किरकोळ बदल करण्यापलीकडं त्यानं काही फेरबदल केले नाहीत.
द्वारा : पुस्तकातुन साभार