वाघ सिंह माझे सखे सोबती

लेखक: दामू धोत्रे शब्दांकन: भानू शिरधनकर

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

/media/FbjV7cF1dBLs.jpg

पाने : ☀ 306 मुल्य (₹): 300.0

सर्कशीतील अद्भूत विश्व, त्यातील थरार या विषयावरील हे गाजलेलं पुस्तक - विक्रम शेठ

दामू धोत्रे यांचं हे पुस्तक १९६९ साली प्रथम प्रसिद्ध झालं.

आणि वाचकांसमोरएक आगळवेगळ जग खुलं झालं. वाघ, सिंह, बिबटे, अस्वले, जाग्वारसारख्या जंगली श्वापदांकडून सर्कशीच्या प्रेक्षकांसमोर सहजगत्या कामे करून घेण्यात धोत्रे प्रसिद्ध होते.इंग्लंड, फ्रांस, अमेरिकेतील विख्यात सर्कशीतून त्यांनी काम केले. तिथले प्रेक्षकही त्यांच्या करामतीने थक्क होत. साहस, धाडस याचे दुसरे नाव म्हणजे दामू धोत्रे असे समीकरणबनले होते. या साऱ्याची चित्तरकथा पुस्तकात मांडली आहे. प्राणी आणि माणसाचे अपरिचित नाते सर्कस कलाकारांचे जीवन आणि तो काळही त्यातून उलगडत जातो.जगप्रसिद्ध अ‍ॅनिमल ट्रेनर दामू धोत्रे यांचे रोमांचकारी अनुभव सांगणारे आत्मकथन.

जॉन रिंगलिंग नॉर्थ यांच्या लेखणीतुन ......
'रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नुम बेली' सर्कसमधील कार्यक्रमांचा निर्माता म्हणून दरसाल नवनवे कार्यक्रम सादर करताना मला अमाप आनंद वाटत आला आहे. पण आल्फ्रेड कोर्ट व त्यांचे सहकारी दामू धोत्रे यांचा हिंस्र श्वापदांचा नवा कार्यक्रम आम्ही सादर केला, ते साल आणि तो प्रसंग मोठा अभिमानाचा म्हटला पाहिजे. आल्फ्रेड कोर्ट हे जगातील सर्वश्रेष्ठ पशुशिक्षक, यात संशय नाही. पण निबळ्या वाघासारख्या कपटी व क्रूर जनावरांना हाताळण्याची व शिकवण्याची कला दामूंप्रमाणे कुणालाच साधलेली.नव्हती, हे खुद्द कोर्ट यांनीही मान्य केले असते.

कोर्ट निवृत्त झाल्यावर देखील दामू कित्येक वर्षे आमच्या सर्कशीत जनावरांची कामे घेत असत आणि या अवधीत रिंगणातील त्यांचा प्रत्येक कार्यक्रम टाळ्यांच्या गजरातच पार पडत असे. गुरगुराट करणाऱ्या हिंस्र बिबळ्यांनी भरलेल्या रिंगणात शिरून दामू जेव्हा बेडरपणे त्यांना हुकूम फर्मावीत, तेव्हा त्यांचा तो डौल आणि आवेश नुसता पाहात राहावासा वाटे. जनावरांवरील दामूंची हुकूमत, ही केवळ त्यांचा कमालीचा निधडेपणा, असीम संयम आणि जनावरांचे मनोगत जाणून घेण्याची हातोटी यांमुळेच त्यांना साध्य झालेली होती. त्यांच्या शिकवण्यात धाक किंवा शिक्षा यांना थारा नसून जनावरांना आपलेसे करण्याची - प्रेम आणि सहानुभूती हीच त्यांची मुख्य साधने होती.

दामूंच्या या कौशल्यामुळेच जनावरांची- विशेषत: निबळ्या वाघांची नवनवी कामे आम्ही प्रेक्षकांसमोर दरसाल सादर करू शकलो. आणि आता दामू या व्यवसायातून निवृत्त झाल्यामुळे असली कामे यापुढे लोकांना पाहावयास मिळतील, की नाही, याबद्दल मला तरी आता संशयच वाटत आहे.

जॉन रिंगलिंग नॉर्थ
झ्युरीक, स्वित्झरलंड, एप्रिल १९६८

द्वारा : समिक्षक