वावटळ
व्यंकटेश माडगूळकर
मेहता पब्लिशिंग हाऊस
वावटळ
व्यंकटेश माडगूळकर
मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने : ☀ 98 मुल्य (₹): 130.0
तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस
नवी दिल्ली : आज संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी गांधीजी सायंप्रार्थनेच्या जागी आले. आभाबेन आणि मनू या आपल्या नातींच्या खांद्यांवर दोन्ही हात टाकून ते हळूहळू चालत होते. सायंप्रार्थनेसाठी जमलेल्या दुतर्फा गर्दीतून व्यासपीठाकडे जाताना लोकांचे नमस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी नातींचा आधार सोडला आणि दोन्ही हात जमावाला जोडले.
एवढ्यात गर्दी वारीत नथुराम विनायक गोडसे हा माणूस पुढे आला आणि अगदी समोर उभे राहून त्याने हातातील पिस्तुलाने लागोपाठ तीन गोळ्या गांधीजींवर झाडल्या.
'हे राम!” असे उद्गार काढून गांधीजी धरणीवर पडले.
"गांधी हत्या आणि त्यानंतर ब्राम्हणविरोधात उसळलेल्या दंगली" ह्या सगळ्या कटू आठवणी आजही वेदनादायक. ब्राम्हण कुटुंबात जन्म घेतलेल्या व्यंकटेश माडगूळकर यांच्याही मनावर ह्या घटनेने आघात केला अन घरावर ही. त्याच वेदना व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या ‘वावटळ’ ह्या कादंबरीतून व्यक्त केल्या आहे.
नथुराम गोडसे नामक जातीने ब्राम्हण असणार्या व्यक्तीने गांधीहत्या केली त्यावेळी त्याची तीव्रता काय असेल याची जाणीवच पुरेशी आहे. ज्याप्रमाणे पारधी समाजाला सरसकट गुन्हेगार ठरवण्याचा प्रघात इंग्रजांनी पाडला तसेच गांधींना मारणारा केवळ ब्राम्हण होता म्हणून सरसकट सगळ्या ब्राम्हण समाजाला दोषी धरण्यात आलं.
ही कथा माणदेशातील माडगुळे गावाच्या पार्श्वभुमिवर लिहिलेली आहे आणि त्यावेळी सांगली संस्थानात होते. सांगली संस्थानाचे संस्थानिक पटवर्धन घराणे होते. ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. सांगली संस्थान हे मराठा साम्राज्याचाच भाग होता. कादंबरीतील नायक शंकर अन त्याचा मित्र यशवंत, त्याच्यासारखी निम्न आर्थिक वर्गातील ब्राम्हण असणारी कुटुंबे ह्या दंगलीत होरपळून निघतात. जाळपोळ अन लुटालुट यामुळे अनेकांची घरे अन मने उध्वस्त होतात. गाव पातळीवर अनेक वर्षे सुखाने नांदणारे अठरापगड लोकं ह्या दंगलींमूळे विलग होतात. समाजाची एक वीण उसविते.
आपल्या घरांना लागून असलेली घरे,
अडीनडीला आपली मदत घेणारी,
आपल्याला मदत करणारी,
आपल्याच गावातील ही माणसे आपली ‘शत्रू होतील,
असे त्यांना कधी वाटले नव्हते.
त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे,
ही जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथमच होत होती.
हा धक्का अगदी अनपेक्षित होता.
त्याने ही मंडळी मनापासून कलली होती.
कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत.
आपले असे म्हणायला कोणी नाही.
आता कशाची शाश्वती नाही.
केव्हा काय होईल त्याचा नेम नाही!
एका ‘वावटळी’मुळे हे सर्व घडले होते...
द्वारा : समिक्षक