गदिमांच्या पंचवटीतून

शीतल (माया) माडगूळकर

डिंपल पब्लिकेशन, वसई

/media/TzqUhylfUygH.jpg

पाने : ☀ 414 मुल्य (₹): 600.0

गदिमायनातील नवा अध्याय... - विनया बापट

फार कमी लेखकांच्या वाट्याला येत असेल असं भाग्य गदिमांच्या वाट्याला आलं. त्यांच्या मृत्यूला जवळजवळ अर्धशतक लोटलं तरी मराठी सारस्वतावर आणि मराठी जनमानसावर उमटलेली त्यांची नाममुद्रा अजूनही तितकीच लखलखीत आहे. त्यांची गीतं, त्यांचं गद्य साहित्य, त्यांचे चित्रपट यांतील काहीही विस्मृतीच्या पडद्याआड गेलेलं नाही. त्यांच्या साहित्याप्रमाणेच त्यांचं व्यक्तिमत्त्वही इतकं प्रभावी की, त्याबद्दलही त्यांच्या सहवासात आलेल्या अनेकांनी विपुल लेखन केलं. तेही तितक्याच आवडीने वाचलं गेलं. ‘कवी तो होता कसा आननी?’ हे कुतूहल रसिकांच्या मनात कायम असतंच. खुद्द गदिमांनी ‘वाटेवरल्या सावल्या’ या आत्मकथनातून स्वतःचं बालपण आणि तरुणपण उलगडलं.

‘आकाशाशी जडले नाते’ या आत्मकथनातून त्यांच्या पत्नी विद्याताई यांनी त्यांचं दाम्पत्यजीवन रेखाटलं. त्यांचे तीन सुपुत्र श्रीधर, आनंद आणि शरदकुमार यांनीही स्वतंत्र पुस्तकांतून आणि अनेक कार्यक्रमांतून त्यांच्या आठवणी जागत्या ठेवल्या. त्यांच्या असंख्य आप्त सुहृदांनी त्यांच्यावर लेख लिहिले. गदिमा आणि त्यांचं ‘पंचवटी’ हे घर किंवा माडगूळमधील ‘बामणाचा पत्रा’ याबद्दल जेवढं लिहिलं गेलं तेवढं क्वचितच एखाद्या लेखकाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा त्यांच्या निवासस्थानाबद्दल लिहिलं गेलं असेल.

गदिमांच्या ज्येष्ठ स्नुषा, श्रीधर यांच्या पत्नी, शीतल (माया) माडगूळकर यांनी नुकतंच लिहून प्रसिद्ध केलेलं आत्मकथन ‘गदिमांच्या पंचवटीतून’ हाही गदिमायनातील एक नवा अध्याय आहे. मुखपृष्ठावरील पंचवटीचं छायाचित्र आणि मलपृष्ठही यादृष्टीने पुरेसं बोलकं आहे. वास्तविक मायाताईंच्या विवाहानंतर (१६ मे १९७४) ते गदिमांच्या मृत्यूपर्यंत (१४ डिसेंबर १९७७) म्हणजे अवघी साडेतीन वर्षं त्या गदिमांच्या प्रत्यक्ष सहवासात राहू शकल्या... आणि तरीही त्यानंतरच्या त्यांच्या संपूर्ण आत्मकथनावर ‘गदिमा’ नावाचं गारूड पसरून राहिलं आहे, असं स्पष्टपणे दिसून येतं. त्यांच्या आयुष्यात पती, मुलं, सासूबाई विद्याताई, दीर, नणंदा, जावा, आई-वडील अशा व्यक्ती येतातच; पण या साऱ्यांची आयुष्यं व्यापून आणि भारून टाकणारं आणि मृत्यूनंतरही प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्त्व एकच - आणि ते म्हणजे गदिमांचं!

या आत्मकथनात गदिमांच्या मृत्यूनंतरही गदिमांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अखंड जाणवत राहतो. इतर सर्व नाती सांभाळूनही मायाताई स्वतःची ओळख कायम जपतात ती ‘गदिमांच्या थोरल्या सूनबाई’ म्हणूनच! आणि ही भूमिका साकारताना त्या कुठंच कमी पडत नाहीत. प्रसिद्ध लेखकाच्या पत्नीने आत्मचरित्र लिहिण्याची एक परंपरा मराठी साहित्यात दिसून येते. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मकथनापासून ते सुनीताबाई देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’पर्यंत अनेक नावं यात येतील. मुलांनी माता-पित्यांबद्दल किंवा काहींनी आपल्या बंधू-भगिनींबद्दलही लेखन केलेलं आढळून येतं. परंतु, एखाद्या सुनेने सासू किंवा सासऱ्यांबद्दल लिहिल्याची उदाहरणं मात्र अगदीच कमी. वास्तविक भारतीय कुटुंबव्यवस्थेत सुनेचं; विशेषतः थोरल्या सुनेचं स्थान अतिशय महत्त्वाचं असूनही अशा तऱ्हेने व्यक्त होणाऱ्या ‘सूनबाई’ फारच कमी आढळतात. ‘गदिमांच्या पंचवटीतून’ मायाताईंनी लिहिलेलं हे आत्मकथन यादृष्टीनेही वैशिष्ट्यपूर्ण ठरावं.

गदिमांचं घरातलं ‘पपा’ हेच संबोधन मायाताई आपलंसं करतात. साहित्यिक म्हणून आपल्या सासऱ्यांचं मोठेपण त्यांनी जाणलेलंच आहे; पण त्याबरोबर त्यांचं ‘माणूस’ म्हणून असलेलं मोठेपणही त्या दाखवतात.

एकत्र कुटुंबाचा विस्तृत परीघ स्वतःच्या संसारात अधिक स्थिरावतो. श्रीधर यांचा राजकारण प्रवेश हा यातील जरासा वेगळा टप्पा. या वेळी घराबाहेर पडून प्रचारकार्यातही मायाताई सहभागी होतात. दोन निवडणुकांत हातातोंडाशी आलेलं यश हुलकावणी देतं. या सर्व काळात श्रीधर यांच्याबरोबरीने मायाताईंच्याही मनोबलाची कसोटी लागते, तशीच कसोटी लागते ती तरुण वयातच श्रीधर यांच्यावर जी अवघड हृदय शस्त्रक्रिया करावी लागली त्या वेळेस. प्रिया, गृहिणी, सखी, सचिव या भूमिका तन्मयतेने साकारणाऱ्या मायाताई सावित्री बनून श्रीधर यांना प्राणसंकटातून सोडवतात.

यानंतर श्रीधर यांनी लेखक, सामाजिक कार्यकर्ता, गदिमांवरील अनेक कार्यक्रमांत त्यांच्या आठवणी जागविणारा वक्ता, संयोजक या नात्याने भरीव अशी कामगिरी केली. त्यांच्या प्रत्येक कार्याची सविस्तर नोंद मायाताईंनी घेतली आहे. तसंच, मुलांच्या अभिमानास्पद कामगिरीचाही त्या आनंदाने उल्लेख करतात. सर्वांच्या कामगिरीमध्ये मायाताईंचा वाटा खूप मोठा होता; पण त्याबद्दल त्यांनी फारसं लिहिलेलं नाही.

मायाताईंच्या लेखनशैलीबद्दल आवर्जून असं सांगावंसं वाटतं की, त्यांची शैली ‘सहज सुंदर’ म्हणावी अशी आहे. अलंकारांचा सोस नसलेलं साधेपणातील सौंदर्य त्यांच्या लेखनात आढळतं. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्या अगदी खुलवून, रंगवून सांगतात. लग्नाआधी श्रीधर यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचं वर्णन, लग्नानंतर स्वयंपाकाचा फारसा अनुभव नसल्यामुळे खूप माणसांसाठी ‘ब्रेड रोल’सारखा पदार्थ करताना उडालेली तारांबळ, सुमित्र आणि लताताईंचा अभिराम लहान असताना त्यांनी देवांना फुलांच्या ऐवजी वाहिलेले कांदे-बटाटे, असे गमतीदार प्रसंग मायाताई अगदी रंगवून सांगतात. त्यांच्या कथनात त्यांनी केलेल्या अनेक प्रवासांचीही सुंदर वर्णनं आहेत. गदिमांच्या आठवणींचे कार्यक्रम, गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव व साठ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त झालेले भव्य कार्यक्रम... अशा अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचं वर्णन वाचताना ते प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर उभे करण्याचं कौशल्य त्यांच्या लेखनात आहे.

मायाताईंचं लेखन विपुल तपशिलांनी युक्त असं आहे; पण गंमत म्हणजे हा दोष न ठरता लेखनाची रंगत वाढविणारा गुण ठरला आहे. एखादा कुशल चित्रकार ज्याप्रमाणे कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी बारीकसारीक तपशील भरून चित्रात जिवंतपणा आणतो, त्याप्रमाणे मायाताई महत्त्वाचे सर्व तपशील आवर्जून सांगून सर्व घटना, प्रसंग, व्यक्तिविशेष रसरशीत, जिवंत करून आपल्यासमोर ठेवतात. आपले प्रिय पती श्रीधर यांना उद्देशून लिहिलेल्या अर्पणपत्रिकेत मायाताईंनी म्हटल्याप्रमाणे गदिमांच्या पंचवटीत अनुभवलेल्या ‘गतस्मृतींचा बकुळी बहर’ वाचकांनाही त्याच्या सौम्य सुगंधाने दीर्घकाळ आकर्षित करत राहील.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा