नापास मुलांचे प्रगतीपुस्तक

संपादन: अरुण शेवते

ऋतुरंग प्रकाशन

/media/Zb7oWzkGPvdl.jpg

पाने : ☀ 240 मुल्य (₹): 250.0

...आणि जगाच्या शाळेत पास झालो! - अरुण शेवते

दहावी, बारावीच्या निकालाच्या दिवशी मी खूप अस्वस्थ असतो. हजारो मुलं नापास झाल्याची बातमी ऐकून जीव कळवळतो. या मुलांचं काय होणार? नापास झालेल्या मुलांच्या घरचं वातावरण उदासीन असतं. मुलांना टोमणे ऐकावे लागतात. खरंतर आपला मुलगा का नापास झाला, हे समजून घेऊन त्याला धीर देण्याची ती वेळ असते; पण असं तुरळक प्रमाणात घडतं. मी बारावीला नापास झालो तेव्हा आमचे शिक्षक मला म्हणाले होते, आमच्या तोंडाला काळं फासा.

माझ्या आईने मला समजून घेतलं. नापास झालेल्या मुलांना भोगाव्या लागणाऱ्या मनस्तापाने माझं मन कावरंबावरं होतं, या मनाला दिशा सापडत नव्हती. पण, दिशा ही गोष्ट कधीकधी अचानक सापडून जाते. माझ्या बाबतीतही तसंच झालं.

२००३ ची गोष्ट असेल. माझ्या ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकासाठी कुठला विषय घ्यावा याचा मी विचार करत होतो. ऋतुरंग दिवाळी अंकाचा दरवर्षी वेगळा विषय असतो. दिवाळी झाली की माझं विचारचक्र सुरू होतं. त्याच दरम्यान माझ्या वाचनात आलं की, महात्मा गांधी लॅटिनच्या परीक्षेत नापास झाले होते. मला गांधींनी दिशा दाखवली आणि नापास होऊनही कर्तृत्ववान झालेल्या माणसांचा शोध सुरू झाला. २००३ च्या दिवाळी अंकाचा विषय ‘नापास मुलांची गोष्ट’ निश्चित झाला आणि माझ्यापुढे नवीनच विश्व उभं राहिलं.

मुलाला परीक्षेत कमी गुण मिळाले, तो नापास झाला तर आई-वडील निराश होतात, मुलं आत्महत्या करतात. अनेकांचं मानसिक संतुलन बिघडतं. नापास होणं हा क्षणिक अपघात असतो. एखाद्या विषयाची, विशेषतः इंग्रजी आणि गणित यांची मनात भीती बसलेली असते. अनेकदा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. याचा अर्थ असा नसतो की, त्यांचा बुद्ध्यांक कमी असतो. मुलं हुशारच असतात, फक्त योग्य वेळी पालकांचं, शिक्षकांचं मार्गदर्शन आवश्यक असतं. ते त्यांना त्या वेळी मिळालं की मुलं पुढे जातात. तिमाही, सहामाहीत नापास झालेली मुलं वार्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्याचं दिसून येतं. नापास मुलांची हेटाळणी करण्यात काही अर्थ नसतो. मुलांना त्या त्या टप्प्यावर समजून घेणं गरजेचं असतं.

नापास झालेल्या मोठ्या माणसांचा शोध घेताना नव्याने अनेक गोष्टी उलगडत गेल्या. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण पहिल्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. दया पवार एसएससीला नापास झाले. आर. के. नारायण इंग्रजी विषयात नापास झाले. आर. के. लक्ष्मण कन्नड विषयात नापास, गुलजार गणितात नापास, सुशीलकुमार शिंदे अनेकदा नापास.

जयंत साळगावकर मॅट्रिकच्या परीक्षेत दोनदा नापास, चंद्रशेखर धर्माधिकारी एलएल.बी.च्या परीक्षेत नापास. यशवंतराव गडाख अकरावीच्या परीक्षेत नापास. व्ही. शांताराम पोस्ट खात्याच्या कारकुनाच्या परीक्षेत नापास. नेल्सन मंडेला एलएल.बी.च्या परीक्षेत नापास. न्यूटन शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नापास. किशोरी अमोणकर इंटरला नापास. बाबासाहेब पुरंदरे शाळेच्या पूर्वपरीक्षेत नापास. डॉ. श्रीराम लागू चौथीच्या परीक्षेत नापास. दादा कोंडके दरवर्षी गणित विषयात नापास. मधु मंगेश कर्णिक चौथीत नापास. अच्युत पालव दहावीत नापास. मारुती चितमपल्ली इंटरमिजिएटच्या परीक्षेत मराठी विषयात नापास. रवींद्र पिंगे मॅट्रिकला नापास. श्रीकांत बोजेवार बारावी नापास. इंद्रजित भालेराव मॅट्रिकला इंग्रजीत नापास... अशी शंभरएक मोठ्या माणसांची एक यादीच तयार झाली.

ऋतुरंग दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर अनेकांना विशेष वाटलं. मोठी माणसं नापास होऊनही त्यांचं आयुष्य थांबलं नाही, आयुष्यात त्यांनी प्रचंड यश मिळवलं, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनातही ते यशस्वी झाले. याचं कारण त्या त्या वेळी आपण नापास झालो तो क्षणिक अपघात आहे, या अपघातापुढेही प्रचंड आयुष्य आपल्यापुढे आहे, याची जाणीव त्यांना वेळच्यावेळी झाली. प्रगतीची बीजं त्या भूतकाळात दडलेली असतात. कर्तृत्वाची, सुख-समाधानाची पदकं छातीवर मिरवता येतात; पण त्या छातीवर दुःखाचे, निराशेचे घाव बसलेले कुणाला दिसत नाहीत. पुढच्या पिढीने ते डोळसपणे पाहायचे असतात, हाच माझा हेतू होता.

ऋतुरंग दिवाळी अंकाला खूप चांगलं यश मिळालं. एके दिवशी गुलजारांना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरुण अंक खूप चांगला झाला, तू याचं पुस्तक कर आणि तुझ्याच ऋतुरंग प्रकाशनाकडून प्रकाशित कर. तुझ्या पुस्तकाला चांगलं यश मिळेल. काही अडचण आली तर मला सांग.’’ पुस्तक स्वतः प्रकाशित करण्याचा माझा हेतू नव्हता; पण गुलजार साहेबांनी दिशा दाखवली आणि २००४ ला ‘नापास मुलांची गोष्ट’ पुस्तक प्रकाशित झालं. याचं सारं श्रेय गुलजारांना जातं, त्यांच्यामुळेच हे सगळं घडून आलं.

सुशीलकुमार शिंदे त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की, अनेकदा नापास होऊनही तुम्ही हार मानली नाही. आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तेव्हा तुमच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करू या. त्यांनी स्वतः यात रस घेऊन सह्याद्री अतिथिगृहात पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्यावेळेस धो धो पाऊस पडत होता, मंत्रिमंडळाची मीटिंग लांबतच चालली होती; पण शिंदे साहेब कार्यक्रमाला आले आणि त्यांच्या हस्तेच पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यानंतर ‘नापास मुलांचं प्रगतिपुस्तक’ हे पुस्तक मी प्रकाशित केलं आणि आताही ‘नापास मुलांची गोष्ट’चा दुसरा भाग लवकरच प्रकाशित होणार आहे. पुस्तक प्रकाशित झालं आणि सर्व थरांतून पुस्तकाचं स्वागत झालं. माझा उद्देशच हा होता की, नापास झालेल्या मुलांच्या घरचं वातावरण बदललं पाहिजे, नापास मुलांनी या पुस्तकातून प्रेरणा घेतली पाहिजे.

आज पुस्तक प्रकाशित होऊन वीस वर्षं झाली. या वीस वर्षांत अनेक पालकांचे मला फोन आले, येतात. तुमच्या पुस्तकामुळे आमचा मुलगा पास झाला. नापास झाल्यावर आम्ही त्याला समजून घेतलं. एक विद्यार्थी लॉच्या परीक्षेत नापास झाला, तेव्हा त्याची प्रेयसी नाराज झाली. त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्याच्या हाती नापास मुलांची गोष्ट पुस्तक पडलं आणि तो पास झाला, एका प्रियकर-प्रेयसीमधला दुरावा पुस्तकामुळे संपला. ही हकिगत त्याच्याच एका मित्राने मला सांगितली. एका हमालाने आपल्या नापास झालेल्या मुलासाठी हे पुस्तक विकत घेतलं. अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी यातून प्रेरणा घेतली. मुंबई, कोल्हापूर अशा उत्तम विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात हे पुस्तक लागलं. मी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता शिकत होतो आणि त्याच विद्यापीठात माझं पुस्तक अभ्यासक्रमात लागलं, याचाही आनंद वाटतो.

आयुष्यात केवळ परीक्षेत नाही, तर अनेक क्षेत्रांत व्यक्तिगत जीवनात आपल्याला अपयश येतं; पण अपयश हे पळून जाणारं आहे, ते कायमच्या आयुष्यात वस्तीला आलेलं नसतं, याची समज येणं गरजेचं असतं. मी एका शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो तेव्हा मी म्हणालो, ‘‘शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांचं शिबिर घेत जा.’’ आज बदलत जाणारं गतिमान आयुष्य पालकांनी समजून घेऊन आपल्या मुलांशी संवाद साधला पाहिजे. काही चुका झाल्या म्हणजे टोमणे टामणे देण्यापेक्षा त्यांच्या मनात मन घातलं पाहिजे. आपल्या मुलाचा कल कशात आहे, त्याला कशाची भीती वाटते, परीक्षेविषयी त्याच्या मनात काही न्यूनगंड आहे का, ते पाहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांचा शिक्षकांबरोबरच संवाद नुसता चालणार नाही, तर पालकांचाही संवाद विद्यार्थ्यांशी असला पाहिजे, तरच आजच्या स्पर्धेच्या युगात आपला टिकाव लागेल. मी स्वतः बारावीत नापास झालो; पण जगाच्या शाळेत ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक काढून मात्र पास झालो. मला हे उमगलं नसतं, तर नापासचा शिक्का कपाळावर मिरवला गेला असता; पण मी असं घडू दिलं नाही.
- shevatearun@gmail.com

(लेखक ‘ऋतुरंग’ या प्रकाशनसंस्थेचे संचालक आणि ऋतुरंग दिवाळी अंकाचे संपादक आहेत.)

द्वारा : सकाळ वृत्तसेवा