ललाटलेख

डॉ शोभना गोखले

कॉटिंनेंटल प्रकाशन

/media/AUdEbAwsEfCK.jpg

पाने : ☀ 115 मुल्य (₹): 150.0

पुरातत्व संशोधकाचे आत्मकथन - आशुतोष गं जोगळेकर

पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ शोभना गोखले यांचे ललाटलेख हे आत्मचरित्र

त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1928 सांगलीचा. या पुस्तकामधे शोभना गोखले यांची बालपणापासूनची सगळी हकीगत वाचायला मिळते. जन्म झाला त्या सांगलीच्या करमरकर सराफांकडचे आजोळ, बापट माहेर, सासर गोखले या ठिकाणच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या घरांची वर्णने वाचायला मिळतात.

लेखिका शकुंतला फडणीस त्यांची सख्खी धाकटी बहीण. शकुंतला फडणीस यांचे पती म्हणजे विख्यात चित्रकार शि. द. फडणीस. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुद्धा फडणीस यांनीच केलेले आहे. भूकंप शास्त्रज्ञ अरुण बापट हे त्यांचे सख्खे धाकटे भाऊ. बऱ्याचदा अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती आपल्याला स्वतंत्रपणे माहीत असतात पण त्या एकमेकांशी अशा नात्याने जोडलेल्या आहेत याची कल्पना नसते. अशा आत्मचरित्रांमुळे त्या गोष्टी समजतात. त्यांचे वडील वामनराव बापट हे अमरावतीमधे वकिली करीत, त्यामुळे आयुष्याची सुरुवातीची वर्षे अमरावतीतच गेली. तिथेच त्यांचे शाळा कॉलेजचे शिक्षण पार पडले. सुरुवातीची शिक्षिकेची नोकरीही तिथेच केली. त्या मराठी आणि संस्कृत शिकवीत. अमरावतीत त्याकाळी राहत असलेली अनेक थोर थोर व्यक्तिमत्वे त्यांना पाहायला मिळाली. 1945 पूर्वीच्या जुन्या अमरावतीचे छान चित्रण त्यांनी केलेले आहे.

लग्नानंतर त्या पुण्यात आल्या. पती ल.ना. गोखले केसरीमध्ये उपसंपादक म्हणून काम करीत. पुढे ते पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख झाले.

पुण्यात आल्यावर शोभनाताईंनी एम ए च्या शिक्षणाला सुरुवात केली. भांडारकर इन्स्टिट्यूट्मधे अर्धवेळ नोकरी, विद्यापीठात एम ए चे शिक्षण, अधून मधून डेक्कन कॉलेजला जाणे हे सगळे फार जिकीरीचे होते. तेव्हा पुण्यात वाहतुकीची साधनेही फारशी नहती. एम. ए. ला त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृती हा विषय त्यांनी घेतलेला होता. थोरले काका पु वि बापट हे त्या विषयाचे पु वि बापट विभागप्रमुख होते. बौद्ध धर्माचे ते जागतिक कीर्तीचे अभ्यासक होते. विद्यापीठात शोभनाताईंनी इतिहास, वास्तुशास्त्र, नाणकशास्त्र, पुराभिलेख या विषयांचा अभ्यास केला.

कॉलेज शिक्षणानंतर डेक्कन कॉलेजमध्ये नोकरी करताना सांकलियांचे मार्गदर्शन लाभले. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ग.ह. खरे यांचेही मार्गदर्शन लाभले.

पुरातत्व विभागाच्या संशोधनासाठी अनेकदा महिनाभर बाहेर जाऊन राहावे लागे. मुले लहान असताना प्रत्येक वेळी ते शक्य नसे. पण सांकलीयांसारख्यांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले.

एकदा वाशिमजवळ हिस्सेबोराळा इथे त्यांना एक ब्राह्मणी शिलालेख सापडला. खूप प्रसिद्धी मिळाली. नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू वि भि कोलते यांनी संशोधनाच्या श्रेयाबद्दल वाद सुरू केला. शिलालेखाचा दगड नागपूरच्या संग्रहालयात नेताना फुटला. परंतु त्याचे फोटो शोभनाताईंकडे असल्यामुळे त्याचे श्रेय शोभना गोखले यांच्याकडेच राहिले. वाकाटक राजाच्या इतिहासात या शिलालेखाने मोलाची भर घातली.

कान्हेरीला संशोधन करताना स्मशान गुंफेजवळच्या दरीत त्यांना काही कातीव दगड पालथे पडलेले दिसले म्हणून त्या दरीत उतरल्या. तिथे 26 शिलालेख सापडले त्यावर बौद्ध भिक्षूंची नावे लिहीलेली आढळली. यातून त्यांना कान्हेरी हे बौद्धांचे शैक्षणिक केंद्र होते, हे सिद्ध करणे शक्य झाले.

जुनी नाणी, शिलालेख, ताम्रपट शोधून त्यावर संशोधन करणे हे त्यांचे नोकरीतले काम होते. त्यासाठी कधी खोल दरीत उतरावे लागे, तर कधी उंच गुहेत शिडीवर चढावे लागे. लांबलांबच्या ठिकाणांना भेटी द्याव्या लागत. कामासाठी दरीत उतरताना अनेक अडचणी येत. साप, विंचू, वानरे यांचाही सामना करावा लागत असे. शिलालेख वाचणे सोपे नसते. साध्या डोळ्यांनी ते वाचता येतीलच असे नाही. हात लावून स्पर्शज्ञानाने ते जाणून घ्यावे लागतात. कधी नदीच्या पाण्यातूनही वाट काढावी लागे.

कधी लहान मुलांना बरोबर घेऊन तर कधी मुलांना नातेवाईकांकडे सोपवून त्या संशोधनासाठी त्यांना बाहेरगावी जात. जुनी नाणी, शस्त्रे सापडल्याची बातमी पेपरमधे छापून आली की लहान असताना मुले पेपरचे ते पान लपवून ठेवीत. कारण आईला ही बातमी दिसली तर आई लगेच त्या गावाला जाईल आणि आपल्याला आठवडाभर आईला सोडून रहावे लागेल.

आपले सहजीवन या विषयावर बोलताना त्या म्हणतात, लग्नानंतर लगेच पुढच्या शिक्षणाला सुरुवात झाली. दोघांची नोकरी, मुले, बाळे, घरात येणारे पै पाहुणे, अभ्यास या चक्रव्यूहात एकमेकांशी भांडायला वेळच मिळाला नाही. पु ल देशपांडे त्यांच्या यजमानांना गोखल्यांना गमतीने म्हणत, तुमची बायको भांडण उकरून काढते का? खोदून खोदून प्रश्न विचारते का?

गोखले वर्तमानपत्रात काम करीत असल्यामुळे ते वर्तमानात वावरत. मी प्राचीन इतिहासाची अभ्यासक असल्यामुळे भूतकाळात वावरत असे. माझ्या संशोधनामध्ये त्यांचे पूर्ण सहकार्य असे. माझ्या पुस्तकांची मुद्रिते तपासण्याचे काम ते आवडीने करीत.

निवृत्तीनंतर एके ठिकाणी त्या आणि त्यांचे पती एकत्र गेले. तेव्हा तिथे भेटलेल्या एकाची प्रतिक्रिया होती, "मी तुम्हाला दोघांना स्वतंत्रपणे ओळखतो, पण तुम्ही पती-पत्नी आहात हे माहीत नव्हते"

उमेदीच्या काळात कुठे एकत्र कुठे जाता आले नाही याचे शोभनाताईंना वैषम्य वाटले पण यावर गोखले म्हणाले, "एका अर्थाने हे बरेच झाले. यामुळे आपली स्वतंत्र ओळख निर्माण झाली"

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे काम थांबले नाही. सहकाऱ्यांच्या मदतीने त्या जुन्नर येथील शिलालेखांचा अभ्यास करीत होत्या.

पुस्तकाचे लेखन करीत असताना शोभना गोखले यांचे वय 80 च्या पुढे होते. आजारपणांना तोंड देत त्यांनी लेखन पूर्ण केले.

पुस्तक लिहून झाले तरी प्रकाशनाला विलंब लागला. हे पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाले. पुस्तक प्रकाशन त्या पाहू शकल्या नाहीत.

ज्यांना या संशोधनाविषयीआणि ते करणार्‍या संशोधकांविषयी उत्सुकता आहे अशांनी हे पुस्तक वाचायला हरकत नाही.

द्वारा : समीक्षक