अष्टावक्र गीता

चारुशीला भिडे

राजश्री प्रकाशन

/media/eE7i2UuH5jb2.jpg

पाने : ☀ 586 मुल्य (₹): 555.0

अंतर्यात्रेचे आरंभ..... - चारुशीला भिडे

अध्यात्माच्या क्षेत्रात भारताने जे सर्वोच्च शिखर गाठले आहे, ते आहे अद्वैताचे! संपूर्ण सृष्टी ही एका आत्म्याचीच विविध रंगरूपातील अभिव्यक्ती आहे. एका आत्म्याशिवाय कुठेही दुसरे काहीही नाही, हाच अद्वैत सिद्धांत' अष्टावक्र ऋषी ह्या ग्रंथात सांगत आहेत.

“अष्टावक्र गीता" हा ग्रंथ म्हणजे भारतीय अध्यात्म ग्रंथातील एक अद्वितीय आणि अतुलनीय ग्रंथ आहे. 'श्रीमद्भगवद्गीता' सगळ्या भारतीयांना माहीत आहे. गीतेचे स्वरूप संवादाचेच आहे. अर्जुन प्रश्‍नकर्ता (शिष्य) व भगवान श्रीकृष्ण (गुरू) त्या प्रश्‍नांना उत्तरे देत आहेत. अर्जुनाच्या मनात असंख्य शंका, कुसंदेह आहेत व त्या सर्वांचे निराकरण भगवान श्रीकृष्ण करतात. म्हणज शंका व शंका निरसन अशा प्रकारचा संवाद आहे.अष्टावक्र गीतेतही गुरू-शिष्य संवादच आहे, पण इथे राजा जनक (शिष्य) पूर्णपणे नि:संदेह आहे. गुरू अष्टावक्रांना त्याने केवळ तीन प्रश्‍न विचारले आहेत. वरवर दिसायला हे प्रश्‍न साधे वाटतात.

ते असे-
१) ज्ञान कसे प्राप्त होते?
२) मुक्‍ती कशी मिळते?
३) वैराग्य प्राप्त कसे होते?

पण या प्रश्‍नांची उत्तरे म्हणजे संपूर्ण अध्यात्माचे सार आहे. भगवान श्रीकृष्णांची गीता सामान्य प्रापंचिक माणसासाठी सांगितलेली आहे, ज्याने 'अध्यात्मात' नुकतेच पाऊल टाकले आहे, शिकायला सुरुवातच करतो आहे अज्ञ माणसासाठी मार्गदर्शनपर सांगितलेली आहे. कर्मयोगावर भर देऊन कर्म करायला माणसाला प्रवृत्त करणारी आहे. कर्म करूनसुद्धा फळाची अपेक्षा न ठेवता ते करावे. कर्म करणे माणसाच्या हाती आहे पण फळ ईश्वराच्या मर्जीवर सोपवलेले आहे. असा निष्काम कर्मयोग सांगताना सामान्य प्रापंचिक (जो थोडा भित्रा, थोडा आळशी, करू का नको अशा संभ्रमात असणारा, जबाबदारीची फारशी जाणीव नसणारा, पण तरीही पापभिरू, सदाचारी असा माणूस) नजरेसमोर ठेऊनच भगवंतांनी उपदेश केलेला आहे.

तर अष्टावक्र-गीता म्हणजे ज्याचे अध्यात्मिक शिक्षण पूर्ण झाले आहे- आता फक्त शेवटची परीक्षा देऊन पदवी मिळवायची आहे अशा माणसासाठीच आहे.

कृष्णाची गीता ही अध्यात्मशिक्षणाचा आरंभ आहे, तर अष्टावक्र गीता ही अध्यात्म शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव (प्रचिती) देणारा पूर्णविराम आहे.

कृष्णाची गीता भक्‍ती शिकवते. जप-तप-दान-धर्म-अनुष्ठान शिकवते तर अष्टावक्र नि:संदिग्धपणे व ठामपणे सांगतात, 'जप-तप-दान-धर्म-अनुष्ठान' इ प्रकारच्या कुठल्याही क्रियांनी मोक्ष मिळत नाही. उलट अहंकार वाढतो. मुख्य गोष्ट आहे ती द्वन्द्वाच्या पलीकडे पोहोचणे. कुठलीही क्रिया न करता "मी म्हणजे शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा आहे" हा बोध होणे हाच मोक्ष होय.

पण हा प्रक्रिया मार्ग सामान्य माणसाच्या आवाक्‍यातला नाही. तीव्र प्रतिभासंपन्न व प्रखर बुद्धिमान व्यक्तीच या प्रक्रिया मार्गाने जाऊ शकते. 'आत्मज्ञान प्राप्ती' म्हणजे अज्ञान (अंधकार) नाहीसे होऊन 'ज्ञान' प्राप्त होणे. अंधार नाहीसा करायचा असेल तर त्याला बाजूला ढकलणे, उपसून काढणे, नाहीसा करण्यासाठी खटपट करणे म्हणजे निव्वळ वेडेपणाच आहे. कारण अंधाराला स्वत:चे असे स्वतंत्र अस्तित्वच नाही. प्रकाशाचा अभाव म्हणजेच अंध:कार! एक दिवा पेटवला की अंधार आपोआपोच नाहीसा होतो, त्याला घालवण्यासाठी दुसरा कुठलाही उपाय उपयोगी पडत नाही. हेच सत्य अष्टायक्र क्रषी ठामपणे प्रतिपादन करतात.

आत्मा म्हणजे काही एखादी हरवलेली वस्तू नव्हे की जी शोधून काढायची आहे. ती वस्तू (आत्मा) आपल्याजवळच आहे. फक्त आपल्याला विसर पडल्यामुळे ती आठवत नाही आणि हा विसर फक्त अज्ञानामुळेच पडतो. बोध झाला की विस्मरण संपते आणि ज्ञान प्राप्त होते.

'मी म्हणजे शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा आहे' हा बोध होणे व अनुभवणे म्हणजेच ज्ञानप्राप्ती! हाच मोक्ष! हीच मुक्‍ती! हीच आहे सर्वश्रेष्ठ अवस्था!

राजा जनकाच्या प्रश्‍नांना उत्तरं देताना अष्टावक्रमुनींनी त्याला हेच सांगितले आहे. जनकासारखा सुयोग्य शिष्य लाभल्यावर गुरु अष्टावक्रांनी आपल्याजवळील ज्ञानभंडार त्याच्यासमोर रिते केले. ज्ञानाच्या अमृत वर्षावात राजा जनक न्हाऊन निघाला, तृप्त झाला.

अष्टावक्रांचे सांगणे कमीत कमी शब्दांत आणि पूर्णपणे वैज्ञानिक आहे. कोणताही तर्क, दंतकथा, दृष्टांत यांचा आधार न घेता शुद्ध गणितासारखी स्पष्ट सूत्रे त्यांनी सांगितली आहेत. इतक्या स्पष्ट व शास्त्रशुद्ध पद्धतीने दुसर्‍या कुणीही अध्यात्म सांगितले नसेल.

म्हणूनच देश, काळ, समय यांच्या सीमा अष्टावक्रांच्या सूत्रांना बांधून ठेवू शकत नाहीत. संपूर्ण जगात अशा तर्‍हेने अध्यात्मिक, शाश्वत, नित्य नूतन व लखलखणाऱ्या विजेसारखे तेजस्वी वक्तव्य अष्टावक्रांखेरीज दुसर्‍या कुणाचेच नसेल!

मुनीश्रेष्ठ अष्टावक्र यांची सूत्रे म्हणजेच एक अंतर्यात्राच आहे. बाह्य कुठल्याही उपचारांची किंवा कसल्याही कर्मकांडाची त्यासाठी गरज नाहीये. अशा या अंतर्यात्रेला आपण आता आरंभ करीत आहोत.

द्वारा : पुस्तकातुन साभार