डॅडी लॉंगलेग्ज
लेखक: जीन वेब्स्टर अनुवादक: सरोज देशपांडे
राजहंस प्रकाशन
डॅडी लॉंगलेग्ज
लेखक: जीन वेब्स्टर अनुवादक: सरोज देशपांडे
राजहंस प्रकाशन
पाने : ☀ 143 मुल्य (₹): 130.0
जॉन ग्रीअर होम. एक अनाथालय. जेरुशा अबट या अनाथालयातली, इतर चार मुलांसारखीच; पण डोळ्यांत विशेष चमक असणारी पोरकी मुलगी. अनाथालयात आलेले एक दयाळू विश्वस्त तिच्यातील हे वेगळेपण, तिची बुद्धिमत्ता ओळखून तिच्या कॉलेज शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरत पाहिलेलं, तेही पाठमोरं. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव - ‘डॅडी लाँगलेग्ज’! यांची अट मात्र विचित्रच - जेरुशानं त्यांना अगदी नियमित पत्रं लिहायची; पण उत्तराची अपेक्षा करायची नाही. पत्रांमध्ये खंड पडू द्यायचा नाही. आणि मग सुरू होतो एक भावपूर्ण पत्रप्रवास. अशी सुरुवात आहे, ‘डॅडी लॉंगलेग्ज’ या पुस्तकाची!
अनामिक वडलांना पत्रं
आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी. भरल्या घरात राहणाऱ्या माणसाला नात्यांचं काही अप्रूप नसतं. उलट अनेकदा नातेवाइकांचा कंटाळाच येतो. भरल्या पोटी उपाशी असण्याचं दुःख कसं कळावं? पण अनाथ मुलासाठी आपण कोणाचं तरी असणं, आपण कोणाला तरी पत्रं लिहिणं हे निव्वळ अमूल्य असतं. कोणाशी तरी नातं जोडण्यासाठी ती आसुसलेली असतात. आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरावा, कोणाशी तरी चार शब्द तरी मनातले बोलता यावेत एवढीच माफक अपेक्षा असते त्यांची! आणि अशी एखादी व्यक्ती भेटल्यावर होणारा आनंद काही निराळाच. जेरुशाचंही हेच झालंय. भले ती व्यक्ती निनावी का असेना, तिला आपण कधी पाहिलंही नाहीये, नसेना का. ते पत्राला उत्तर देणार नाहीत; ठीकच; पण ज्याला पत्र लिहावं, असं कोणी तरी आता असेल. ते उत्तर जरी देणार नसले, तरी पत्रं वाचतील नक्कीच. मी लिहीन, मी व्यक्त होईन. कदाचित माझी मलाच मी सापडत जाईन. हाच विचार करून जेरुशा कॉलेजजीवनाला सुरुवात करते. जॉन ग्रीअर होमच्या कोंडवाड्यातून बाहेर पडून तिच्या स्वप्नांना आता नवं आकाश लाभलंय.
उत्कंठा वाढवणारं कथानक
या कादंबरीचे मूळ लेखक आहेत जीन वेब्स्टर आणि मराठी अनुवाद केला आहे सरोज देशपांडे यांनी. मूळ इंग्रजी पुस्तक आवर्जून वाचावं असंच; पण मराठी अनुवादही तितकाच सरस उतरला आहे. कादंबरीतील पात्रांची इंग्रजी नावं सोडली, तर तो अनुवाद आहे हे सांगूनसुद्धा खरं वाटणार नाही. कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिची पत्ररूप शैली. कथा पुढे पुढे सरकते ती पत्रांमधूनच. कॉलेजच्या हॉस्टेलमधली आपली खोली, मैत्रिणी, कँटीन, अभ्यास, प्रोफेसर्स, खेळ अशा कित्येक गमतीजमती, किस्से सगळं जेरुशा पत्रांमधून शेअर करते. यामध्ये सगळं काही आहे - कृतज्ञता आहे, उत्तर न येण्याची चीड आहे, हताशपणा आहे, मनोमन पोखरणारा एकाकीपणा आहे. स्वप्नं आहेत, आकांक्षा आहेत आणि खूप प्रेमही आहे. प्रत्येक पत्र एका वेगळ्या भावनेची सैर आहे. कधी न पाहिलेल्या, ‘जॉन स्मिथ’ हे नाव सोयीसाठी म्हणून धारण केलेल्या माणसाला आपलं कुटुंब समजून पत्र लिहायची; सगळं सगळं त्यातच ओतायचं. अंधारवाटेनं जाताना दूरवरून दिसणाऱ्या प्रकाशाच्या एका छोट्याशा तिरिपीमुळेही उमेद यावी आणि त्या दिशेने जात राहावं, असंच काहीसं जेरुशाचं झालंय. तिला डॅडी लॉंगलेग्जचं उत्तर कधी येतं का? तिला ते भेटतात का? कोण असतात ते? या प्रश्नांची उत्तरं पुस्तक वाचून जाणून घेणंच इष्ट.
‘स्व’ गवसण्याचा प्रवास
या पत्रांमधून जेरुशाला तिचा ‘स्व’ गवसण्याचा, तिची लेखनशैली विकसित होण्याचा प्रवास आपल्यालाही अंतर्मुख करून जातो. तिच्या शब्दांमध्ये ताकद आहे, ती ओळखली आहे डॅडी लॉंगलेग्जनी आणि तिने उत्तम लेखिका व्हावं, असं वाटतंय त्यांना. कॉलेजच्या चार वर्षांचा खर्च, राहणं-खाणं, कपडालत्ता याव्यतिरिक्त तिला वरखर्चासाठी म्हणून दर महिना ३५ डॉलर देण्याची सोयही त्यांनी केलीये. त्यांचं ना खरं नाव कळण्याची सोय, ना त्यांच्याशी संपर्क करण्याची सोय; पण तरीही जेरुशाच्या या एकतर्फी सुंदर पत्रांमधून कथा वेग घेते.
सोळा वर्षांच्या कोवळ्या मुलीच्या मनातील भावनांच्या सर्व बारीकसारीक छटांचं दर्शन तिच्या लिखाणातून होतं. केवळ एकदाच पाठमोऱ्या पाहिलेल्या जॉन स्मिथ यांना आपल्या जीवनाचा खरा आधार समजून पत्रातून ती त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. पहिल्या पत्रात ‘अनाथ मुलांना कॉलेजला पाठविणारे प्रिय दयाळू विश्वस्तसाहेब,’ असा मायना लिहिणारी जेरुशा त्यांना आपली वडिलकी मोठ्या कौतुकाने बहाल करते. ‘जॉनसाहेब उंच आहेत, श्रीमंत आहेत,’ एवढ्या दोनच गोष्टी तिला त्यांच्याबद्दल माहीत आहेत. त्याचा उपयोग करून पुढील सर्व पत्रांमधून ‘डॅडी लॉंगलेग्ज’ असा मायना ठरवून ती त्यांचे नवीन नामकरण करते व ते त्यांना आवडलं का, हेही विचारते. उत्तराची अपेक्षा, अर्थात नाहीच. त्या मायन्यात व तिच्या पत्राखालील सहीतही अधूनमधून सार्थ बदल झालेला आढळतो.
रेखाचित्रांतूनही संवाद
कॉलेजजीवनातील सर्वच गोष्टी तिला संपूर्णपणे अनोळखी. त्याबद्दल समवयस्क मुलींकडून काही वेळा होणारी कुचेष्टा, ‘अनाथ बिचारी’ म्हणून टाकले जाणारे दयाळू कटाक्ष, त्यावर मात करण्यासाठी तिने केलेली धडपड, वाचनालयाचा केलेला पुरेपूर उपयोग, मैदानी खेळात मिळवलेले नैपुण्य, वक्तृत्व, तिच्या खोलीची तिनं आपल्या परीनं केलेली सजावट अशा सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींची माहिती देत पत्रातून जेरुशा आपल्या वडिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत राहते. यातूनच तिची भाषाशैली सुधारत जाते. तिच्या काही कथा, लघुनिबंध प्रसिद्ध होतात. एवढेच नव्हे, तर ती एक कादंबरीसुद्धा लिहिते. या लेखनातून तिला थोडे पैसेही मिळू लागतात. जॉन स्मिथ यांच्यामुळेच आपल्याला शिक्षण घेता आलं, याची पुरेपूर जाणीव तिला आहे; पण नैसर्गिकपणे येणारी हक्काची भावनाही आहे. शिवाय ती त्या पैशाची परतफेड करते, हे विशेष. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेरुशानं पत्रातील आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी काही वेळा रेखाचित्रं काढली आहेत. चित्रं साधीच आहेत; पण ती आपल्याशी अक्षरशः बोलतात.
कालातीत कादंबरी
सॉनेटच्या शेवटच्या ओळीत जसं कवितेला एकदम वेगळं वळण दिलेलं असतं; तसंच काहीसं या कादंबरीतील शेवटच्या पत्रात आहे. ते वळण कोणतं, ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचाच. जेरुशा उर्फ ज्युडी (तिने स्वतःचंच ठेवलेलं लाडकं नाव), मास्टर जर्वी (जेरुशाच्या आयुष्यात आलेला पहिलाच पुरुष - ज्युलिआचे जेरुशाच्या मैत्रिणीचे काका) आणि डॅडी लॉंगलेग्ज यांच्यातील नात्याचा गौप्यस्फोट यामुळे कादंबरीला थेट वेगळीच उंची प्राप्त होते, आपले सगळे आडाखे कोसळतात आणि आपलं मन एक सकस कादंबरी वाचल्याच्या समाधानानं भरून जातं. ही कादंबरी टाइमलेस तर आहेच; शिवाय आपल्या रोजच्या वाचनआहारातून मिळालेला एक ‘डीटॉक्स’ आहे. व्यवहारानं भरलेल्या आयुष्यातून मिळालेला एक भावपूर्ण विराम आहे. ती इंग्रजीत वाचा किंवा मराठीत, तिला जे पोचवायचं आहे, ते ती थेट हृदयात पोचवेल! आजकाल पत्र लिहिणं जवळजवळ नामशेषच झालंय. पत्रप्रेमी असाल, तर ही लोभस ‘पत्रापत्री’ अजिबात मिस करू नका!