द सेव्हन्थ सिक्रेट

लेखक: आयर्विंग वॅलेस अनुवादक: विजय देवधर

मेहता पब्लिशिंग हाऊस

/media/pzByqXvATSoh.jpg

पाने : ☀ 300 मुल्य (₹): 300.0

हिटलरच्या सातव्या खंदकाचे रहस्य - तेजसी आगाशे

३० एप्रिल १९४५, जर्मनी. दुसरं महायुद्ध निर्णायक वळणावर येऊन पोचलेलं. रशियन सैन्य जर्मन चॅन्सेलरीच्या अगदी जवळ येऊन पोचल्याची खबर ॲडॉल्फ हिटलरच्या कानांवर येऊन धडकली. जर्मनीची हार डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसते आहे. या क्रूर, महत्त्वाकांक्षी नेत्याला आपला अंत जवळ आल्याचं कळून चुकलं होतं. रशियन सैन्याच्या हाती लागलो, तर आपली अवस्था काय होईल, याची त्याला अर्थातच पूर्ण कल्पना. मरणापेक्षाही दुःसह गोष्ट म्हणजे शत्रूच्या हाती लागणं. त्यामुळे, याच दिवशी फ्युररनं बंकरमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली आणि त्याच्यासोबतच त्याची प्रेयसी इव्हा ब्राउन हिनं सायनाइडची गोळी खाऊन मरण जवळ केलं. आपल्या मृतदेहाची शत्रूकडून विटंबना होऊ नये म्हणून तो जाळून टाकण्याचा आदेश हिटलरनं आत्महत्येपूर्वीच आपल्या सैनिकांना दिला होता. म्हणूनच रशियन सैन्यानं बंकरचा ताबा घेण्याआधीच हिटलरच्या विश्वासू सहकाऱ्यांनी दोघांचेही मृतदेह जाळून टाकले.
वरील आशयाची, हिटलरच्या आत्महत्येची बातमी १ मे १९४५ च्या जगभरातल्या वृत्तपत्रांमध्ये छापून आली होती आणि हाच आपल्याला माहीत असलेला इतिहास आहे. पुढे काही दिवसांनी रशिया आणि ब्रिटननं या बातमीची आपापल्या परीनं खात्री करून घेतली; पण हिटलर खरंच मेला होता, की तो त्या दिवसानंतरही जिवंत होता, असे प्रश्न अनेकदा उपस्थित केले गेले आहेत. विविध ’कॉन्स्पिरसी थिअरी” यावर मांडल्या गेल्या आहेत. हिटलरनं दोस्त राष्ट्रांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी केलेलं हे आत्महत्येचं नाटक होतं का? तोतयाचा वापर करून तो निसटला तर नव्हता ना? यांसारख्या सामान्य माणसाला आणि इतिहासप्रेमींना पडणाऱ्या अनेक अनुत्तरित प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणारी, कल्पना आणि वास्तव यांचं अतिशय रंजक मिश्रण असलेली कादंबरी म्हणजे, ‘द सेव्हन्थ सिक्रेट’. आयर्विंग वॅलेस या अमेरिकन लेखकानं लिहिलेली ही कादंबरी १९८१ मध्ये प्रसिद्ध झाली आणि इतिहासप्रेमी; तसंच सस्पेन्स थ्रिलर्सच्या फॅन्सना तिनं भुरळ घातली. याचा अतिशय सुरेख अनुवाद लेखक आणि अनुवादक विजय देवधर यांनी साकारला आहे.

एक धक्कादायक पत्र!
सन १९४५ मधून आपण थेट १९८० च्या दशकात येतो. सर हॅरिसन ॲशक्रॉफ्ट - इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि आधुनिक इतिहासाचे प्राध्यापक. विश्वविख्यात जर्मन हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर याचं चरित्र लिहिण्याच्या ध्यासानं पछाडलेले. ‘हेर् हिटलर’ नावाचं हे चरित्र त्यांना परिपूर्ण करायचं होतं, ते त्याच्या आत्महत्येमागचं रहस्य उलगडून. गेली अनेक वर्षं यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतलेली आणि आता कादंबरी लेखन शेवटच्या टप्प्यात आलेलं. एक गौप्यस्फोट त्यांना आता या चरित्राद्वारे करायचा होता. हिटलर आणि इव्हा ब्राउन यांचा मृत्यू ज्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला होता, अशा पश्चिम बर्लिनमधल्या काही हयात साक्षीदारांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या. काम अविश्रांतपणे चालू होतं आणि आता कादंबरीचा शेवटचा शब्द लिहून होईपर्यंत ॲशक्रॉफ्ट बर्लिनमध्येच राहणार होते. अशातच त्यांना मॅक्स थाएल नावाच्या माणसाकडून एक पत्र येतं. आपण हिटलरचे शेवटचे दंतवैद्य असल्याचा याचा दावा असतो. हिटलरला व्यक्तिशः ओळखणाऱ्या मूठभर हयात लोकांपैकी हा एक होता, आणि म्हणूनच पूर्वी प्रसिद्ध झालेल्या हिटलरच्या इतर चरित्रांपेक्षा डॉ. ॲशक्रॉफ्ट यांचं चरित्र अधिक अचूक असावं, अशी आपली मनःपूर्वक इच्छा आहे, म्हणूनच आपण पत्राद्वारे संपर्क करत आहोत असं त्यानं म्हटलेलं असतं. पत्राचा शेवट अत्यंत स्फोटक असतो,

‘ॲडॉल्फ हिटलर आणि इव्हा ब्राउन यांच्या मृत्यूबद्दलचे आत्तापर्यंतचे सर्व दाखले चुकीचे आहेत. १९४५ मध्ये हिटलर आणि इव्हा यांनी फ्यूरर बंकरमध्ये आत्महत्या केलेली नसावी, अशी माझी पूर्ण खात्री आहे. त्या दोघांनी सबंध जगालाच गंडवलं असावं. ती दोघं कदाचित आजही जिवंत असतील! माझ्याजवळ यासंदर्भात एक पुरावाही आहे... तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, तुम्ही लिहिलेल्या चरित्राद्वारे सत्य प्रकाशझोतात येऊ शकेल आणि त्यामध्ये माझाही हातभार लागेल, एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. तुमची इच्छा असेल, तर या पत्रात दिलेल्या पत्त्यावर, मला लवकरात लवकर येऊन भेटा. हातात वेळ फार कमी आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला संपूर्ण यश मिळो’.
- आपला विश्वासू, मॅक्स थाएल.
हे पत्र वाचून हादरलेले डॉ. ॲशक्रॉफ्ट आता पुढे काय करतात हे जाणून घेण्याची जबरदस्त उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते, आणि अशा रीतीने वाचकमनावर सुरुवातीपासूनच पकड घेते, ‘द सेव्हन्थ सिक्रेट!’

हिटलरच्या ‘भूमिगत’ साम्राज्याच्या शोधात
असंख्य धागेदोरे जुळवत हिटलरच्या आत्महत्येचं रहस्य उलगडण्याच्या खडतर वाटेवर थाएलच्या या पत्रामुळे डॉ. ॲशक्रॉफ्ट यांना एक दिशा मिळते. त्या रस्त्यावर ते चालायला सुरुवात करतात न करतात, तोच इथं एक ट्विस्ट येतो. हाती काही येण्याआधीच त्यांचा संशयास्पद मृत्यू होतो. एक अवजड ट्रक त्यांना धडक देऊन पुढे जातो, तेही ते रस्त्याच्या कडेला उभे असताना. या घटनेमुळे हिटलरच्या जीवनावर येणारं बहुप्रतीक्षित पुस्तक अर्धवट राहतं; पण इथं एंट्री होते डॉ. ॲशक्रॉफ्ट यांची मुलगी एमिली हिची. काहीही झालं, तरी वडलांचं पुस्तक, त्यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहू द्यायची नाही, हा विडा एमिली उचलते आणि इथूनच हिटलरच्या भूमिगत साम्राज्याचा प्रवास…

एमिलीने घेतलेला शोध
ब्रिटनमधल्या वातानुकूलित खोलीत बसून आपलं काम काही पूर्ण होणार नाही हे लक्षात आल्यावर एमिली थेट जर्मनी गाठते. इथं तिची भेट होते, अशा तीन व्यक्तींशी, ज्या काही ना काही कारणानं हिटलरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जर्मनीत आलेल्या असतात. पहिली, ‘मोसाद’ या गुप्तचर संघटनेची हेर तोवाह, दुसरा असतो रशियाच्या प्रसिद्ध संग्रहालयाचा क्युरेटर निकोलस आणि तिसरा, हिटलरच्या वास्तुकलेवर पुस्तक लिहिण्याचा चंग बांधलेला रेक्स फोस्टर. हिटलरनं महायुद्धाच्या काळात स्वत:च्या सुरक्षेसाठी सात भूमिगत बंकर बांधून घेतले होते. फ्युरर बंकर सोडला, तर इतर सहा बंकर्सबद्दल कोणाला फारसं माहीत नव्हतं आणि ही गोष्ट पुस्तकासाठी संकलन करताना रेक्सच्या निदर्शनास आलेली असते. एमिलीच्या मदतीनं यातल्या सहा बंकर्सची माहिती मिळवण्यात तो यशस्वी होतो; पण सातव्या बंकरविषयी मात्र कुठेही माहिती मिळत नाही. खुद्द या बंकरची रचना ज्या व्यक्तीनं केली होती, त्यालाही हिटलरचा सातवा गुप्त बंकर कुठे बांधला गेला, याची कल्पना नसते. कदाचित सातवा बंकर बांधलाच गेला नसावा, या कल्पनेनं त्यानं सातव्या बंकरचा विचार कधीच सोडून दिलेला असतो; पण रेक्सचं अंतर्मन मात्र हे मानायला तयार नसतं. या सातव्या बंकरच्या माहितीविना आपल्या पुस्तकाला शून्य किंमत आहे हे तो पक्कं जाणून असतो.
दुसरीकडे, निकोलस आपल्याजवळ असणाऱ्या चित्राबद्दल अधिक शोध घेण्यासाठी धडपडत असतो. हे चित्र हिटलरनं काढलं होतं, अशी माहिती त्याला मिळते; पण त्यावर हिटलरची स्वाक्षरी मात्र नसते. इथं वाचकांसमोर हिटलरचे काही वेगळे पैलू उलगडतात. हिटलर उत्तम चित्रकार होता अन् वास्तुकलेची त्याला जाण होती, हे निकोलस ऐकून असतो. चित्राच्या शैलीवरून ते हिटलरनंच काढलं असावं, असं जाणकारांचं ठाम मत असतं; पण विचित्र गोष्ट अशी, की हिटलरनं आत्महत्या केल्यानंतर दहा वर्षांनंतर ते चित्र रेखाटलं गेलेलं असतं. आता हे कसं, ते निकोलसला कळत नसतं.
हेर तोवाहला हिटलर आणि इव्हा ब्राउनचे तोतया असल्याची धक्कादायक गोष्ट समजलेली असतो. अनेक कार्यक्रमांत या तोतयांनी हिटलर आणि इव्हाच्या जागी उपस्थिती लावली होती, अशीही माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून तिला मिळते.

फ्युरर बंकरचं पुनरुत्खनन
महायुद्ध संपल्यानंतर रशियन आणि ब्रिटिशांनी हिटलरच्या जळलेल्या मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढले होते; पण, हिटलरच्या डेंन्टिस्टनं यावर शंका उपस्थित केली होती. हिटलरनं आपल्याकडून सोन्याचा एक विशेष दात बसवून घेतला होता, असा त्याचा ठाम दावा होता आणि रशियन संशोधकांनी हिटलरच्या मृत्यूनंतर जे अहवाल प्रकाशित केले होते, त्यात या सोन्याच्या दाताचा उल्लेख नव्हताच. म्हणून यामागचं सत्य शोधून काढण्यासाठी फ्युरर बंकर पुन्हा खोदून काढण्याचा सल्ला दंतवैद्य थाएल एमिलीला देतो. सरकारकडून आवश्यक ते परवाने घेऊन एमिली फ्युरर बंकर उत्खननाच्या कामाला सुरुवात करते. इतर तिघंही त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी धडपडत असतात. या चौघांच्या प्रयत्नांत हिटलर युद्धानंतरही जिंवत असल्याचे अनेक थक्क करणारे पुरावे सापडत जातात. या उत्खननादरम्यान हिटलरचा सातवा बंकर, हिटलर आणि इव्हा यांचे तोतया, हिटलर शैलीतलं चित्र या गोष्टींबद्दल पुढे जी महत्त्वाची माहिती येते, ते कादंबरीतच वाचावं! कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणासोबत उलगडत जाणारी नवी कोडी आपल्याही मनात हिटलरबद्दलचं कुतुहल अधिक गडद करत जातात. पूर्वीचा कट्टर नाझी समर्थक आणि आता नाझी विरोधक अशी ओळख मिळवलेला बर्लिनचा पोलिस प्रमुख वोल्फगॅंग श्मिड्टस आणि ईव्हलीन हॉफमन नावाची एक वृद्ध स्त्री या दोघांच्या एन्ट्रीनंतर कादंबरीला जबरदस्त कलाटणी मिळते. ती कोणती, ते जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचून सेवन्थ बंकरची सफर करणंच आवश्यक!

अचंबित करणारी ‘इतिहास’ काल्पनिका!
इतिहासावर आधारलेली ही काल्पनिक कथा असली, तरी यामध्ये लढवण्यात आलेले तर्क, काही स्पष्टीकरणं वास्तवाशी जोडणारं वाटतं. वास्तवाशी पूर्ण फारकत घेऊन नुसतेच कल्पनेचे पतंग उडवणारी ही कादंबरी नाही आणि म्हणून ती जास्त भावते. अगणित रहस्यांनी ओतप्रोत भरलेली ही कादंबरी ऐतिहासिक संदर्भ देताना कुठेही कमी पडत नाही. कादंबरीतली प्रत्येक व्यक्ती, तिचा भूतकाळ, वर्तमान, तिला हिटलरविषयी जाणून का घ्यायचं आहे, हा प्रश्न आणि या प्रत्येकाचे बुरख्यामागे असणारे खरे अस्तित्व या बारीकसारीक तपशिलाला कथेत न्याय मिळाला आहे. इटली, रोम, फ्रान्स, जर्मनी या वेगवेगळ्या युरोपीय देशांमधल्या ठिकाणांचं रोमांचक दर्शनही कादंबरीत होतं. एमिली, रेक्स, तोवाह यांच्यासोबत आपणही या स्थळांची सफर करून येतो. हिटलरच्या मृत्यूविषयी जाणून घेण्याच्या प्रत्येक पात्राच्या हट्टामागची कारणं समर्थनीय वाटतात. शेवटाकडे जाता जाता रहस्याची एकेक गाठ सुटत जाते. कथानिवेदनाच्या बहुरेषीय पद्धतीचा प्रभावी वापर लेखकानं करून घेतला आहे. एकाच वेळी अनेक माणसं, जागा, प्रसंग कथेत येत राहतात; त्यामुळे काही काळ गोंधळ उडू शकतो; पण प्रत्येक तपशील बारकाईनं वाचला, तर शेवटचा गुंता सोडवताना मजा येते!

हिटलरच्या अज्ञात पैलूंचा मागोवा
हिटलर हा नाझी भस्मासुर, क्रूर हुकूमशहा म्हणूनच आपल्याला माहीत असतो; पण या कादंबरीतून लेखकानं त्याच्या फारशा ज्ञात नसलेल्या पैलूंचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं वास्तुकलेतील ज्ञान, चित्रकलेची आवड, त्याची स्वतःची शैली यांचीही ओळख कथेच्या प्रवाहाबरोबर होत जाते. हिटलर कलासक्त माणूस म्हणून पुढे येतो. हिटलरचा उदय, अस्त आणि त्याच्यातील कलागुण यांविषयी कथेच्या अनुषंगाने वेळोवेळी करण्यात आलेलं भाष्यही वाचनीय आहे.

का वाचावं ‘सेव्हन्थ सिक्रेट’?
या कथेत मांडण्यात आलेल्या घटनांना कोणताही ठोस ऐतिहासिक आधार, पुरावा नाही. हा काही ऐतिहासिक दस्तावेज नाही. युद्धांनंतरही हिटलर काही काळ जिवंत असावा आणि त्याचा एक गुप्त अज्ञात बंकर असावा, या प्रचलित तर्कावर कथेचा अख्खा मनोरा उभारला गेला आहे. मग तरी का वाचावं हे पुस्तक? कारण आपल्याला शक्यतांची जगं भुरळ घालतात. शक्यता पडताळून पाहायला मानवी मनाला आवडतं. म्हणूनच तथ्यांना कल्पनेचीही जोड लागते. रहस्यांची आवड असणाऱ्या, इतिहासप्रेमी अशा वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. आपलं पुस्तक पूर्ण करण्याची एका इतिहास संशोधकाची धडपड अनुभवण्यासाठीही सातव्या बंकरची ही सफर एकदा केलीच पाहिजे!

द्वारा : महाराष्ट्र टाईम्स वृत्तसेवा