ध्यान विज्ञान

डॉ. यश वेलणकर

मनोविकास प्रकाशन

/media/B6kJ00WFswQg.jpg

पाने : ☀ 178 मुल्य (₹): 180.0

प्रस्तावना - ध्यान म्हणजे नक्की काय? - डॉ. यश वेलणकर

अध्यात्मशास्त्रांनी व दर्शनांनी, विविध ध्यानप्रकारांकडे कसे पाहिले आहे', हा या पुस्तकाचा विषय नाही. किंबहूना ध्यानाविषयीच्या सर्व पारलौकिक बाबी
कटाक्षाने बाजूला ठेवून डॉ. यश वेलणकर यांनी नास्तिक असणार्‍यांनाही पटेल असा ध्यानाचा उलगडा केलेला आहे. पुस्तकाचे शीर्षक 'ध्यान विज्ञान' असे जरी असले, तरी आपण ते 'ध्यान ही प्रक्रिया विज्ञानाच्या कसोटीवर कसकशी उतरत गेली याची कहाणी' असे वाचले पाहिजे. स्वत:ची सेवाशुश्रूषा करण्याचा, स्वत:ला जास्त आनंदी, उदार आणि कार्यक्षम बनविण्याचा व्यवहारनिष्ठ मार्ग किंवा एक उपचारपद्धती इतकेच आणि हेच ध्यानाचे महत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे.

अध्यात्माची आवड असो बा नसो, प्रत्येक माणसाला ध्यान करण्याची गरज आहे, असे वेलणकर म्हणतात. त्यांच्या मते ही गरज का असते, याचा युक्तिवाद आपण थोडक्यात पाहू. आपण प्रत्यक्ष कृतीची पूर्वतयारी म्हणून जो विचार करतो तो आवश्यकच असतो; पण आपण बिनकामाचा, व्यर्थ आणि त्याच त्याच चक्कात अडकलेला विचारही प्रचंड प्रमाणात करत असतो. समजा, मला एखाद्या व्यक्‍तीला असे काहीतरी सांगायचे आहे की, ज्यामुळे ती दुखावली जाईल; पण मला तिला दुखवायचे तर नाही आणि सांगितल्याशिवाय गत्यंतरही नाही. जेव्हा हा समरप्रसंग प्रत्यक्षात घडेल, तेव्हा मला जो काय असेल तो त्रास भोगावा लागणारच आहे. पण मी समरप्रसंग टाळाटाळ करून पुढे ढकलत नेतो. जणू काही तयारी म्हणून मी समरप्रसंगाचा सराव चालू ठेवतो. तिचा उद्रेक कसा होईल, मग मी सांत्वन कसे करीन, याच्या अनेक कल्पना मी करून पाहतो. प्रत्येक सराव हा भावनांसकट केला जातो. मुख्य अडचण अशी आहे की, हे सरावामधील अनुभव-घटित काल्पनिक आहेत, की आता वास्तवात घडत आहेत, याने शरीराला काही फरक पडत नाही. त्यामुळे बिकट प्रसंगातून जाताना द्यायचे ते सर्व प्रतिसाद शरीर देतच राहते. यामुळे आपल्याकडे असलेल्या मानसिक शक्‍तीचा क्षय होत राहतो आणि शारीरिक आजारही बळावतात. शिवाय सरावामध्येच इतके दमतो की, .ऐन 'प्रयोगा'च्या वेळी ढेपाळतो.

वरील उदाहरण भविष्यलक्ष्यी व्यर्थतेचे होते.

त्याचबरोबर आपण, पूर्वी घडून गेलेल्या घटनांवर चरफडत राहणे, आपल्या भाग्यात जे नाही त्याविषयी कुढत किंवा झुरत राहणे, कोणाचा राग आला असेल तर तो धुमसत ठेवणे, डूख धरून ठेवणे, तिष्ठावे लागले तर चिडचिड करणे, विचारा मी किंवा विचारी मी असा धोशा लावून हळहळत राहणे, तुलना करून दुःखी होणे, अशा अनेक मार्गांनी आपण आपले मानसिक, शारीरिक आरोग्य बिघडवण्याचा जणू चंगच बांधलेला असतो. या घाणेरड्या सवयीपासून मुक्‍त होण्याचा (एक) मार्ग म्हणजे ध्यान होय.

ध्यान म्हणजे नक्की काय?

ध्यान समजून घेण्याअगोदर ध्यानकाळात नव्हे, तर व्यवहारकाळात सर्वसामान्यपणे आपल्या जाणिवेची रचना कशी असते हे स्पष्ट केले पाहिजे.

रोजच्या जगण्यात आपल्याला भिडणारे, भोगावे लागणारे विषय आणि त्या विषयाला वेगवेगळ्या भावनांनी सामोरे जाणारे आपण, याशिवाय माणूस म्हणून आपल्याच भावनांकडे तटस्थपणे पाहणारे आपण, या तीन गोष्टींचा विचार ध्यानाविषयी बोलताना करायला हवा. रोज भिडणारा विषय हा कुणा व्यक्‍तीविषयी असेल, एखाद्या घटनेविषयी असेल किंवा एखादी कृतीविषयी असेल; त्यावर प्रतिक्रिया देत असताना आपलेच मन या सगळ्याचे साक्षीदारही असते. जाणिवेतल्या प्रत्येक घडामोडीची जाणीव असणारे तटस्थ मन हे फक्त माणसाकडेच आहे. त्याला आपण प्रत्येक कृतीचे, वृत्ती-विचारांचे साक्षी म्हणूयात. जेव्हा जेव्हा आपण व्यग्र (एनग्रॉस्ड) असतो त्या त्या वेळी साक्षी मिटलेला राहतो. आपण इतके एनग्रॉस्ड असतो की, आपल्यात एक साक्षीसुद्धा आहे हेच आपण विसरलेले असतो. उमटणारे विषय आणि उद्‌भवणाऱ्या वृत्ती, भावना यांचा कोलाहल माजलेला असतो. पण यातून वाचण्यासाठी (साक्षीखेरीज) आपल्या जाणिवेला आणखी एक महत्त्वाची शक्‍ती लाभलेली असते.

ती शक्‍ती अशी की, आपले अभिलक्ष्यीत्व (अटेन्शन) कुठे वळवायचे याचे स्वातंत्र्य आपल्याला असते. ही झाली निवडयुक्‍्त जाणीब. ह्या शक्तीमुळे आपण बराचसा कोलाहल म्यूट केलेला असतो. कोणत्या विषयात किती रस घ्यायचा आणि कोणत्या वृतीला कृतीपर्यंत पोहोचण्यासाठी वाव द्यायचा, हे आपण अभिलक्ष्यीत्व निवडकपणे कुठे वळवायचे यानुसार नियंत्रित करू शकतो. 'निशाना मानके नजर डाले, तो बाकी सब नजरअंदाज हो ही जाता है।'

द्वारा : पुस्तकातुन साभार