बिविल्डरमेण्ट

रिचर्ड पॉवर्स

/media/बिविल्डरमेण्ट_9781785152641.jpg

परदु:खासारख्या शीतळ प्रकाशात… - पंकज भोसले

अंतराळामधल्या जीवसृष्टीच्या शक्यता पडताळून पाहण्याकरता निरनिराळ्या ग्रहांच्या वातावरणाची प्रारूपे प्रत्यक्षात आणण्याचे काम थिओ करतो. त्याच्या निवेदनातून दिसणारा रॉबिन सर्वसामान्य मुलांसारखा नाही.

बाप आणि मुलगा या दोनच प्रमुख पात्रांची ही कादंबरी कथानकाची वळणे घेत नाही; पण निसर्गाच्या वळणवाटांवर भरपूर हिंडवते आणि भविष्यकाळासाठी काय जपायचे याचे भानही देते…

यंदाच्या बुकर लघुयादीतील सहापैकी पाच कादंबऱ्यांचे कथानक भूतकाळाचे कल्पितीकरण असून रिचर्ड पॉवर्स या अमेरिकी लेखकाची ‘बिविल्डरमेण्ट’ ही एकमेव नजीकच्या भविष्यातल्या जगाला कथेमधून रांधते. हे जग आजच्या इतकेच कोलाहल आणि भयंकराच्या दारापलीकडल्या विश्वासारखे आहे. म्हणजे कसे? तर भ्रष्ट आणि सुमार राज्यकर्त्यांची सुबत्ता असलेले, पर्यावरणाप्रती दक्षदिखावा त्रिखंडात मिरवूनही त्याच्या ºहासाला थोपवू न शकणारे, गॅझेट्स आणि समाजमाध्यमांच्या रेट्यात परदु:खाची जागतिक आवर्तने जाणून घेताना त्या शीतल प्रकाशात आपले टिचभरले चौकोनी आयुष्य बरे असल्याचे समाधान मानणाऱ्या माणसांनी भरलेले. जन्माने अमेरिकी असलेल्या रिचर्ड पॉवर्स यांची घडणीची वर्षे वडिलांच्या स्थलांतरामुळे थायलंडमधील बँकॉक शहराने व्यापली. पूर्वेकडल्या देशातून त्यांचे कुटुंब पुन्हा अमेरिकेत परतल्यावर त्यांच्यातील साहित्यप्रेमाची झलक १९८५ साली आलेल्या कादंबरीद्वारे उमटली. त्यानंतर दोन दशकांत विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, मेंदूविज्ञान, आभासी वास्तव अशा वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी तब्बल दहा कादंबऱ्या लिहिल्या. पण अमेरिकेतर राष्ट्रांत लेखक म्हणून त्यांची ओळख २०१८ साली बुकरच्या लघुयादीत दाखल झालेल्या ‘द ओव्हरस्टोरी’मुळे झाली. जंगल आणि झाडे वाचविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या नऊ अमेरिकी व्यक्तींची कहाणी हा ‘द ओव्हरस्टोरी’ची रुपरेषा होती. तत्त्वज्ञान-सूक्ष्मविज्ञानाचे संदर्भ, खूप संवेदनशील वर्णने आणि भवतालातील घटना-घटकांना कथानकातील पात्रांत गुंफण्याचे कसब ही पॉवर्स यांच्या लेखनाची ढोबळ वैशिष्ट्ये. त्यांच्या तेराव्या कादंबरीतही ती बेमालूमपणे उतरली आहेत. माणसाने मोडकळीला आणलेला पृथ्वीच्या वातावरणाचा समतोल ‘बिविल्डरमेण्ट’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. अन् त्यात भोवतालातल्या जीवसृष्टीला वाचवण्याची कथानायकाची आर्त निकडही ठळक बनली आहे. ट्रम्पसदृश नेत्याची निवड करणाऱ्या अमेरिकेमध्ये नऊ वर्षांचा इथला कथानायक रॉबिन राहतो. खगोलजीवशास्त्रज्ञ असलेला त्याचा बाप थिओ हा कादंबरीचा निवेदक. अंतराळामधल्या जीवसृष्टीच्या शक्यता पडताळून पाहण्याकरता निरनिराळ्या ग्रहांच्या वातावरणाची प्रारूपे प्रत्यक्षात आणण्याचे काम थिओ करतो. त्याच्या निवेदनातून दिसणारा रॉबिन सर्वसामान्य मुलांसारखा नाही. रॉबिनची आई ‘अ‍ॅली’ एका अपघातात वारल्यापासून आजूबाजूच्या जगाशी जुळवून घेताना त्याची दमछाक होते. अन् त्याला वाढविताना थिओचीही. लहानसहान गोष्टींमुळे रॉबिनला राग अनावर होतो. भांडणे होतात. आरडाओरडा होतो. कधीकधी स्वत:ला इजा करून घेणेही घडते. त्याच्या मानसोपचारासाठी औषधे देणे आवश्यक आहे, असा आग्रह थिओपुढे धरणारी त्याची सहानुभूतीशून्य शाळा आणि पर्यायाने एकंदर समाजव्यवस्था एका बाजूला, तर रॉबिनचा वेगळेपणा, त्याची संवेदनशीलता, त्याचे जुळवून घेणे स्वीकारणारा आणि त्याला वाढायला अधिकाधिक निरामय अवकाश देऊ बघणारा त्याचा बाप थिओ दुसऱ्या बाजूला, असा हा सततचा गप्प किंवा आक्रस्ताळा झगडा आहे. रॉबिन या दोन्ही टोकांच्या बरोबर मधोमध उभा असलेला भेटतो. कधी जगापासून संरक्षण आवश्यक असलेला, तर कधी जगाशी एकरूप होऊन बिनसलेला समतोल सावरण्याच्या प्रयत्नात असलेला. त्याच्या मनोवृत्तीही या दोन टोकांमध्ये झुलत राहतात. कधी अंतहीन दु:खाची दरी, तर कधी सर्वांभूति परमेश्वर असण्याच्या साक्षात्कारातून आलेल्या आनंदाचे शिखर. त्याला आनंदाचे हे शिखर अनुभवू देण्यात डॉ. कुरियर या त्याच्या आईच्या ‘अ‍ॅली’च्या जुन्या सहकाऱ्याचा आणि विज्ञानाचा हातभार लागतो. सहानुभावाच्या सहाय्याने दुसऱ्याच्या भावनांशी एकरूप होण्याचे प्रशिक्षण देणारा एक प्रयोग डॉ. कुरियर करीत असतात. त्या प्रयोगामध्ये अ‍ॅलीच्या भावनिक प्रतिसादांचे मुद्रण उपलब्ध असते. ते वापरून रॉबिनचे प्रशिक्षण सुरू होते आणि रॉबिनमध्ये आमूलाग्र फरक पडू लागतो. आईच्या आनंदाशी एकरूप होताना तो अवघ्या सृष्टीच्या चैतन्याशी एकरूप होणे शिकू लागतो आणि माणसाने जीवसृष्टीच्या वैविध्याची, समृद्धीची चालवलेली धूळधाण त्याला अधिकाधिक विद्ध करीत राहते. ही विज्ञानकाल्पनिका आहे, अवकाळाचे (डिस्टोपिया) संदर्भच्छेदन आहे, आणि एका मोडकळीला आलेल्या कुटुंबाची प्रेमाच्या असोशीने एकत्र राहण्यासाठी धडपडत राहण्याची गोष्टही आहे.गोष्टीत विलक्षण चित्रदर्शी भाग येतात. खगोलजीवशास्त्रज्ञ थिओच्या अभ्यासामुळे निरनिराळ्या ग्रहांवरील अद्भुताची वर्णने येथे येतात. कथेतले बापलेक (आणि वाचकही) त्या वातावरणात, तिथल्या जीवसृष्टीच्या थक्क करून टाकणाऱ्या चित्रविचित्र आणि कल्पनातीत अवकाशात एकरूप होतात. तिथल्या वातावरणामधल्या गोष्टींना, रंग-गंधांना आणि संवेदनांच्या तपशीलांना लेखकाने जिवंत केले आहे. प्रख्यात हॉलीवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांच्या ‘अवतार’ चित्रपटातील जगासारख्या तंतोतंत अनेक दुनियांचा प्रवास इथे घडतो. चैतन्याच्या आविष्काराला मर्यादा नाहीत, मर्यादा असतील तर त्या मानवी कल्पनाशक्तीला, या सत्याची साक्ष पटवून देणारी ही वर्णने आहेत. या कादंबरीतला दुसरा अद्भूतरम्य नसलेला तरी वास्तवात पक्के पाय रोवून असलेला एक भाग आहे, तो या भूतलावरील निसर्गवर्णनांचा. यात सतत नद्यांचे जंगलांचे, झाडांचे, पक्ष्यांचे आणि जलचर-भूचर-उभयचर प्राण्यांचे तपशील सादर होतात. अस्तंगत होत चाललेल्या जीवांचे उल्लेख होतात. त्यांचे विलक्षण गुण, त्यांची रंगरूपे आणि मोराच्या पिसाऱ्यासारखे त्यांचे एकमेवाद्वितीय, चित्तथरारक अवयव, उत्क्रांतीने त्यांना बहाल केलेली समजूत, त्यांचे भवतालाशी जुळलेले असणे हे सगळे कथानकाच्या ओघात येतात. माहितीलेखाचा स्पर्श या लेखनाला होत नाही. निसर्गाच्या एकतानतेचा अनुभव देण्याकरता पेरलेले हे तपशील वाचणाऱ्याला श्रीमंत करू शकतात आणि त्याच्या सुप्त निसर्गओढीला जागवू शकतात. लेखकाची भाषाशैली अतिशय गोळीबंद आहे. एखाद्या कवितेचा भाग वाटावी अशी, आपल्याला ठाऊक असलेल्या निसर्गचक्राच्या शाश्वतपणाचा अंत जवळ आला आहे, या धोक्याच्या घंटेला शोभेशी आर्त आहे. कादंबरीची वीण मात्र काहीशी एकरेषीय आहे. परिस्थितीशी, माणसाच्या बथ्थड क्रूरपणाशी, माणसांनी चालवलेल्या निसर्गाच्या हेळसांडीशी जुळवून घेताना पूर्णपणे विदीर्ण होणारा रॉबिन आणि त्याच्या काळजीने उद्ध्वस्त होणारा त्याचा एकाकी बाप असा दुहेरी पसारा वापरत गोष्ट अतिशय धीम्या गतीने उलगडत जाते. वर्णनांमधली अद्भूतता आणि सुरसपणा कितीही जबरदस्त असला आणि गद्याला एखाद्या पद्यासारखी अचूक आर्तता असली, तरीही दोनच पात्रांसह पुढे जाणारी ही गोष्ट वाचताना वाचणाऱ्याला किंचित गुदमरल्याचा अनुभवही देऊ शकते. हा अनुभव देणे, अशीच लेखकाची इच्छाही असू शकेल. अन् तसेच असेल तर त्यात तो पूर्णपणे यशस्वी झाला आहे. कथा अमेरिकेत घडते. तिला ताज्या ट्रम्पकालीन राजकारणाचे उघड संदर्भ आहेत. किंबहुना कथेतला अवकाळ त्याच्या पुन्हा निवडून येण्यानंतरच आकाराला येताना दिसतो. पर्यावरणाच्या समस्येविषयी भाष्य करणाऱ्या या कादंबरीत अर्थातच पर्यावरणरक्षक युवा कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गची आठवण करून देणारे एक पात्रही येते. कथानायकही तिच्याहून वेगळा नाही. यूट्युबवर तिच्या कार्याची क्लिपाटने पाहून तोदेखील पर्यावरण बचावाची शस्त्रे उगारतो. त्या अर्थाने वर्तमानकाळाला अतिशय जवळची अशी ही भविष्य काळात घडणारी कादंबरी. तटस्थपणे काहीएक भाष्य करण्याकरता लागणारे पुरेसे अंतर ती वास्तवापासून राखून आहे का, असा प्रश्न पडावा अशी. पण इतके अंतर राखण्यासाठी लागणारा अवकाश आता माणसांपाशी उरला तरी आहे का, असा प्रश्न मनाशी आणणारीही.संपूर्ण चराचरात मी आहे आणि माझ्यात चराचर आहे, ‘सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:, अहं ब्रह्मास्मि…’ या धाटणीचे तत्त्वज्ञान कादंबरीत पुन्हा-पुन्हा पुन्हा-पुन्हा समोर येत राहते. आध्यात्मिक म्हणावेत असे प्रचंड संदर्भ येतात. ‘माइंडफुलनेस’ या बुद्धप्रणित संकल्पनेचे, तसेच ध्यानधारणेचे तपशील येतात. बुद्धाचा तर चक्क उल्लेखच येतो. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे परदु:खाच्या शीतळ प्रकाशात वावरणाऱ्या आपल्या सर्वांना त्यात भवताल दाखविणारा आरसाही सापडू शकतो.

यातील चित्ररुपी तपशीलांमुळे ही कादंबरी बुकरच्या लांबोडक्या यादीत दाखल होण्याआधीच वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होती. तिचे चित्रपटाचे हक्क बड्या रकमेला विकले गेल्यामुळे. अर्थात नजीकच्या भविष्यात त्यावर बनलेला चित्रपट गाजला वगैरे तर या कादंबरीला गाजण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध झालेली असेल. तूर्त बुकरच्या स्पर्धकांत तिचे स्थान काय राहील हे समजायला दोन आठवड्यांचाच कालावधी उरला आहे.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा