गुरुजी तू मला आवडला - युवराज माने

दिलीपराज प्रकाशन

पाने : ☀ 0 मुल्य (₹): 280.0

/media/गुरुजी तू मला आवडला_guruji1.jpg

गुरुजी तू मला आवडला - हर्षल भानुशाली ९६१९८०००३०

गुरुजी तू मला आवडला
लेखक: युवराज माने
शाळेतील पहिली इयत्ता किती आनंददायी त्यावरून मुलांच्या मनात शिक्षणाचे चित्र उमटत असते. युवराज गुरुजींच्या शाळेतील मुले भाग्यवान बहारदार अनुभव मिळाले आहेत त्यांना. पहिल्या इयत्तेतील त्यांचे प्रेमळ स्वागत आपुलकीचा संवाद आणि वत्सल सहवास यांतून या गुरुजींनी मुलांशी गाढ नाते जोडले. मुलांना वाचन लेखनाकडे अलगदपणे नेण्यासाठी वेगवेगळे कल्पक प्रयोग केले. उत्सुक मनांची मशागत करण्यासाठी अनेक खटपटी केल्या.

पुस्तकाचे लेखक आणि गुरुजी युवराज माने स्वतः सांगत आहेत या पुस्तक लीहण्यामागची प्रेरणा

मनातला गुरुजी साकारतांना.

"गुरुजी, तू दोन-तीन दिवस झालं शाळेत का आला नाहीस? आम्हाला अजिबात करमत नव्हतं,आम्ही तुझी खूप वाट पाहिली." वर्गाच्या उंबऱ्यावर उभं राहून ,कल्याणीसह इतरही लेकरांचं बोलणं ऐकत होतो.लेकरांनी गुरुजींना जाब विचारावा ! आणि तोही वर्गाच्या उंबऱ्यावर उभे करून....ही वास्तव गोष्ट मी स्वतः अनुभवत होतो.आणि आनंददायी शिक्षणाच्या चांदण्यात भिजत उभा होतो.वर्गातलं प्रत्येक लेकरू मला हक्काने शाळेत न येण्याचं कारण विचारत होतं.आपलीही कुणीतरी मनापासून वाट पहातं.आपणही कुणालातरी हवेहवेसे आहोत.याची प्रचिती मला आली.आपलं नसणं या लेकरांसाठी किती चूकचुकल्यासारखं आहे हे त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून कळलं...... मनातला गुरुजी बऱ्यापैकी साकारत आहे,रुजत आहे याचं समाधानही वाटलं.माझ्या बालपणातील मला हवा वाटणारा गुरुजी आज माझ्याच रूपाने वास्तवात उतरत आहे याचं अप्रूप वाटलं.

आतुरतेने माझ्याकडे पाहणाऱ्या त्या निरागस डोळ्यांकडे पहात मी माझ्या बालपणात गेलो... माझ्या जीवनात गुरुजी नावाच्या व्यक्तीने प्रवेश केल्यापासून व मला कळायला लागल्यापासून गुरुजी मला हवेहवेसे वाटू लागले.तसं पाहिलं तर मी अभ्यासात जेमतेम होतो.गरीबी परिस्थिती आणि इतरही कारणांमुळे वर्गात इतर मुलांपेक्षा आपण वेगळे आहोत अशी अपराधाची भावना यायची.पण गुरुजींच्या सहवासामुळे विसरून जायचो.मला माझे गुरुजी मित्र म्हणून हवेहवे वाटायचे.गुरुजी वडीलासारखे पाठीवरून हात फिरवणारे असावेत असं सतत वाटायचे.मला माझे गुरुजी 'आनंदाची डहाळी' म्हणून हवे होते...

अशी आनंदाची डहाळी जीच्यावर मनसोक्त झुलता यावं,मनातलं गीत झुलता झुलता गुणगुंणता यावं,गणितातले शत्रु वाटणारे आकडे अडकून झोपाळ्यावर झुलता यावं,मनातल्या कल्पकता शिकता शिकता मनसोक्त उड्या मारता याव्यात,मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या डहाळीवर बसून मिळवता यावं... प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अशी आनंदाची डहाळी मला लाभलीच नाही. म्हणून आनंदाच्या डहाळीवर झुलायचं राहूनच गेलं...आपली स्वतःची एक हक्काची आनंदाची डहाळी असावी असं वाटायचं ज्या डहाळीवर बसून मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळवता यावीत,ज्या डहाळीवर समजून घेण्याची,शब्बास म्हणण्याची फळे यावेत व ते मनसोक्त चाखता यावीत."गुरुजी,खरंच मला गणित नाही आवडत हो;त्यातली अंक,गुणाकार-भागाकाराची चिन्ह मारायला येतात स्वप्नात माझ्या आणि करतात आनंदाची वजाबाकी.नाही शिकलो गणित तर चालणार नाही का ?"असं सांगता यावं,अन हक्काचे बोट पकडून मनभर सोबत हुंदडता यावं.अशी आनंदाची डहाळी हवीहवीशी वाटायची.ज्या डहाळीने पाठीवर शाबासकीची थाप टाकावी.चुकून एखादा गणित बरोबर आलं तर प्रेमाने गालाचा गालगुच्चा घेऊन पाठीवर मायेने हात फिरवावा असं वाटायचं.काही प्रसंगी काही गुरुजींमधे ती आनंदाची डहाळी दडलेली कधी कधी जाणवली.मात्र त्या आनंदाच्या डहाळीवर मनसोक्त झुलता आलं नाही. मनातलं हे झुलणं तसच राहून गेलं...

आनंदाच्या डहाळीचं मनातील हे स्वप्न उराशी बाळगून सोळा वर्षांपूर्वी स्वतः गुरुजी बनलो.तेव्हा ठरवलं बालपणी जसे आपल्याला गुरुजी हवे वाटत होते तसा गुरुजी होण्याचा प्रयत्न आपण करायचा.आपलं अपूर्ण राहिलेलं बालपण या लेकरासोबत पूर्ण करायचं.मुलांना स्वतः होऊन शाळेत यांवस वाटेल,आनंदाने शिकावंसं वाटेल असे सुंदर ठिकाण निर्माण करण्याचे काम हाती घेऊन मी माझ्यातला गुरुजी साकारण्याचा प्रवास सुरू केला.शिक्षण ही एक आनंददायी घटना आहे. याची जाणीव मुलांना अगदी बालपणापासून करून दिली तर भविष्यातील स्वतःची दिशा स्वतः निवडतील.असं मला नेहमी वाटायचं.

मुलांनी त्यांच्या जीवनातील सगळ्यात जवळचा मित्र मला म्हणावे,मी त्यांचा गुरुजी कधीच वाटू नये.मी त्यांना त्यांचा सखा,मित्र सोबतीच वाटावा.माझ्याशी हक्काने भांडावं,अरे-कारे करावं,जेणेकरून आनंदाची डहाळी बहरेल.माझ्या बालपणातील माझ्या गुरुजींनी जशी आनंदाची डहाळी बनावे वाटलं तसे किंबहुना त्यापेक्षा उत्तम आनंदाची डहाळी बनण्याचा मी प्रयत्न करत होतो.कारण 'लिहिण्या वाचण्यापेक्षा शिक्षणाचे क्षेत्र कितीतरी विस्तृत विशाल आहे'.,आणि हे विशाल क्षेत्र माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक मुलांनी पादाक्रांत करावं आणि भविष्यात अभिमानाने सांगावं की, माझ्या जीवनात अशी आनंदाची डहाळी आली होती.ज्या डहाळीवर बसून मनसोक्त आनंद लुटता आला आणि त्यावर झुलता झुलता मनाला वाटल तसा आनंद घेता आला. माझ्याप्रमाणे त्यांच्या मनाला असं वाटू नये अरे,आनंदाच्या डाळीवर झुलायचे राहूनच गेलं ना....!

विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुजींचं स्थान साधारण नसतं.प्राथमिक शाळेत तर गुरुजी म्हणजे प्रमाण !गुरुजी जे सांगतात तेच सत्य! हा विश्वास येतो कुठून...ही श्रद्धा मनात रुजते तरी कशी.याचं सर्व श्रेय गुरुजींच मायेन जवळ घेऊन शिकवण्याला जातं.मुलांकडे पहाताच ज्याला मायेचा पाझर फुटतो तो खरा गुरुजी.प्रवीण दवणे शिक्षकांविषयी एका ठिकाणी सांगतात, प्रतिभा ही ईश्वरी देणगी आहे,मान्य आहे पण आपल्या व्यवसायावर निरतिशय प्रेम करीत नव्या पिढ्यांना जिव्हाळा देणं; हे तर आपल्या हातात आहे ना! माझी तर अशी श्रद्धा आहे ,माउलीच्या करुणेने तुम्ही वर्गापुढे नुसते उभे राहा; तुमच्या वाणीला केव्हाही पाझर फुटतील ते तुम्हाला कळणारही नाही. विषय कुठलाही शिकवा आपण तो शिकवताना आनंद घेत आहोत,याचाच मुलांना आनंद होतो.आणि आनंदात एखाद्या गणितातूनही संगीत केव्हा झंकारतं ते कळतही नाही. भिंतीअलीकडच्या जगातलं शिक्षकाचं अध्यापन जेव्हा चटकन भिंतीपलीकडे जातं तेव्हा ती 'शाळा' न राहता ते 'गुरुकुल' होतं,तिथंच शिक्षकाचा-'गुरू होतो.

मला बालपणी गुरुजीविषयी वाटणाऱ्या सर्व अपेक्षा मी आज स्वतः सत्यात उतरत होतो.लेकरांना आपलंसं करून शिक्षण देणे शक्य व्हावं यासाठी आणखी एक कला गुरुजीत असणं गरजेचं आहे; ती म्हणजे 'वय बदलण्याची कला'! ती सुद्धा आपसूक माझ्यात उतरली.त्यामुळे मी मुलांचं भावविश्व चांगलं ओळखू शकत आहे.मी गुरुजी म्हणून तर सोबत आहेच पण त्याच्यातला एक मित्र म्हणून राहतोय.त्यामुळे त्यांच्या अपेक्षा व कमतरता माझ्या लक्षात येतात.त्यावर मला काम करता येतं. मागील सोळा वर्षात मला अनेक लेकरांनी माझ्यातला गुरुजी समृद्ध केला.मुलंच शिक्षणातील नव्या दिशा शोधून देतात.शिक्षणातील लावण्य जवळून पहायचं असेल तर लेकरांवर प्रेम करावं."गुरुजी, तुम्ही शाळेत नाही आले तर आम्हाला करमत नाही."ही गुरुजींच्या प्रेमाची व शिक्षकपणाची गुरुदक्षिणा!जी मी सतत स्वीकारत आहे.

शाळेत लेकरांना शिकवताना मला त्यांच्यात माझे स्वतःची मुलं दिसतात.ही जादू फक्त माझ्या बालपणातील हवा वाटणारा गुरुजी साकारत असल्याने माझ्यात निर्माण झाली हे जाणीवपूर्वक नोंदवावे वाटतं.मलाही आता लेकरांशिवाय करमत नाही.माझ्यातला गुरुजी साकारताना मला खूप काही अमूल्य सापडत गेलं.अनेक प्रसंगी मुलंच माझे गुरुजी झाले. अनेक सुख दुःखात मुलांनीच मला साथ दिली.काही कठीण प्रसंगी मुलंच माझे प्रेरणा व ऊर्जा बनले.मुलांमुळेच माझ्याकडे खूप सारे ग्रंथ मित्र जमा झाले.मुलांनीच मला श्रीमंत केलं.ही श्रीमंती आता कधीच संपणार नाही हेही तितकच खरं आहे.भविष्यात आणखी खूप काही नवं साकारायचं आहे.स्वतः तला गुरुजी आणखी उन्नत करायचा आहे.

द्वारा :
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.