होम इन द वर्ल्ड

अमर्त्य सेन

अ‍ॅलन लेन

/media/IMG20210813.jpg

पाने : ☀ 480 मुल्य (₹): 899.0

बुद्धाच्या मार्गावरले बुद्धिजीवी.. - अरुंधती देवस्थळे

बुद्धाच्या मार्गावरले बुद्धिजीवी..
अमर्त्य सेन काय सांगताहेत हे वाचायला, अनेक उत्सुक उडय़ा या पुस्तकावर प्रसिद्ध होताच पडल्या आहेत.

अमर्त्य सेन यांची घडण या आत्मपर लिखाणातून उमगते..

अमर्त्य सेन म्हणजे भारतीयांसाठी एक आदरस्थान- या नि:स्पृह अर्थतज्ज्ञाच्या ज्ञान आणि सल्ल्यांचं चीज आपण एक प्रगतिशील अर्थव्यवस्था म्हणून कितपत करू शकलो, हा विवादात्मक मुद्दा. पण विषय तो नाही. विषय आहे, त्यांच्या आठवणींचं नुकतंच बाहेर आलेलं संकलन : ‘होम इन द वर्ल्ड’. अनेक वैश्विक सन्मानांनी गौरवलेला हा संवेदनशील अर्थ तज्ज्ञ घडला कसा, याची त्यांनी स्वत: सांगितलेली कहाणी. अमर्त्य सेन काय सांगताहेत हे वाचायला, अनेक उत्सुक उडय़ा या पुस्तकावर प्रसिद्ध होताच पडल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी अपेक्षित भाष्य न आढळल्याने काही वाचक निराश झाल्याचंही ऐकण्यात येतं. पण हे अमर्त्य सेनांनी आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धाचं केलेलं सिंहावलोकन आहे, ज्याचा अर्थशास्त्र एक भाग आहे, हेही लक्षात घेणं आवश्यक. नोबेल असो, भारतरत्न असो, ते सन्मानांचा क्वचित उल्लेख करतात, त्याची लोकांना समग्र आठवण करून देत नाहीत हेही किती ताकदीचं !

१९४३ चा बंगालचा दुष्काळ आणि रोगराई जवळून पाहिल्याने अमर्त्य सेनांच्या अभ्यास आणि शोधाच्या परिघात दोन्हींवर सखोल विचार होता. दुष्काळ आणि गरिबीचा परस्परसंबंध शोधणाऱ्या सेनांनी आपल्या ‘एन्टायटलमेंट अँड डिप्रायव्हेशन’ या शोधनिबंधात (१९८१) मांडलेला महत्वाचा निष्कर्ष : भुकेचा प्रश्न निर्माण होण्यामागे धान्यटंचाई नसून असमानतेने ग्रासलेली वितरणव्यवस्था आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते काही कल्पना मांडतात. धान्य उत्पादन आणि पुरवठाविषयक सरकारी धोरणांत बदल करून किमान प्रयत्नांती आपल्या देशातून भूक आणि अपुरा आहार या दोन्ही समस्या हद्दपार करता येतील,दारिद्रय़,अन्याय, कुपोषणाने उद्भवणारे आजार वा अज्ञानामुळे प्रश्न वाढवणारं दुष्टचक्र रोखता येईल, असं त्यांना वाटतं. सत्ताधीशांच्या कलानुसार आर्थिक समीकरणं बसत असतात, हे स्पष्टवक्त्या सेनांना चांगलंच माहीत आहे, तरीही त्यांच्या आशावादाचे पाय जमिनीत घट्ट रोवलेले आहेत.

अमर्त्यांचे वडील आशुतोष सेन ढाका युनिव्हर्सिटीत रसायनशास्त्राचे प्रोफेसर, आई शास्त्रीय नृत्य शिकून टागोरांच्या नृत्यनाटिकांत धीटपणे काम करणारी, सांस्कृतिक मासिकांचं संपादन करणारी. अमर्त्यला शिक्षणासाठी आजीआजोबांकडे शांतिनिकेतनमध्ये ठेवलं गेलं. शांतिनिकेतन हा अमर्त्य सेनांना घडवणारा आणि आयुष्यभर साथ देणारा संस्कार. सुरुवातीलाच अमर्त्य लिहून जातात, ‘नोबेल मिळवल्यावर मला माझ्या ढाक्याच्या प्राथमिक शाळेत सत्कारासाठी बोलावलं आणि तेव्हाचा वार्षिक निकाल शोधून काढला. तो पाहून गडबडलेले मुख्याध्यापक म्हणाले, ‘अरे, तुझा तर ३७ विद्यार्थ्यांंपैकी ३३ वा नंबर आलाय. पण तू नंतर नक्कीच चांगला विद्यार्थी झाला असणार’ आणि त्यांचं म्हणणं बरोबर होतं शिस्त, अपेक्षा आणि चाकोरीच्या जंजाळातून बाहेर पडल्यानंतरच मला शिक्षणाची गोडी लागली’.

स्वत: च्या आई- वडिलांपेक्षा, सेन, आजोबा क्षितीमोहन सेन आणि टागोरांच्या काळातल्या शांतिनिकेतनाबद्दल भरभरून बोलतात. टागोरांनी पौर्वात्त्य आणि पाश्चिमात्त्य प्रणालीचा मेळ घालू पहाणाऱ्या आधुनिक शिक्षणाचं एक मॉडेल बनवायचं स्वप्न पाहिलं होतं: शांतिनिकेतन. अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपणाऱ्या, चाकोरीपासून सुटका देणाऱ्या शिक्षणाच्या उभारणीसाठी आपले सहयोगी समाजातून वेचून घेतले होते. क्षितिमोहन संस्कृतचे विद्वान, वैदिक साहित्य आणि संस्कृत नाटकांचा गाढा अभ्यास. शांतिनिकेतनात टागोरांनी आग्रहाने नियम वाकवून, त्यांना अध्यापनासाठी बोलावून घेतलं. क्षिती मोहनांनी तो वसा आयुष्यभर निभावला. ते परंपरांचे अभ्यासक असून रूढीवादी नव्हते. ऋग्वेदातल्या निधर्मवादी वृत्तीकडे झुकणाऱ्या अमर्त्यला स्वतंत्रपणे विचार करायला उत्तेजनच दिलं.

दुष्काळाचं समीपदर्शन

बंगालच्या दुष्काळाचा प्रत्यक्ष अनुभव शाळकरी अमर्त्यकरता जीवनाची दिशा ठरवणार होता. ठिकठिकाणी हाडाचा सापळा बनलेल्या भूकग्रस्तांचे लोंढे कलकत्त्याच्या दिशेनं, पाय ओढत चाललेले दिसत होते.शाळेजवळ एका माणसामागे वेडा वेडा म्हणून मुलं लागली होती. तो वेडा नसून महिनाभर पोटात अन्न नसल्यानं मनाचा तोल गमावून बसला होता हे उघड झाल्यावर अमर्त्यांनं मित्र व शिक्षकांच्या मदतीनं त्याला वाचवलं. कलकत्त्यात सरकार धान्य वाटतंय अशी अफवा ऐकून आलेले, कंगालांचे जत्थे दारोदार हिंडत काही तरी पोटाला द्या अशी करुण याचना करत होते. सरकारी मदत नाममात्र आणि सहानुभूतिशून्य होती. अमर्त्यच्या आजीने सिगारेटचा पत्र्याचा डबा मापटं म्हणून ठेवला होता. दारी आलेल्या प्रत्येकाला तेवढे तांदूळ द्यायचे असं ठरवलं होतं. ते फार पुरणार नाहीत, पण आपण सगळ्यांना मदत करायचीय म्हणून एवढेच द्यायचे सध्या, असं आजीने समजावून सांगितलं होतं.. आज इतक्या वर्षांनीसुद्धा केविलवाणं करणाऱ्या त्या आठवणी मनातून जाता जात नाहीत असंही ते लिहितात. जगातली दु:खं पाहून त्यावर इलाज शोधायला निघालेला बुद्ध आणि आसपासचं दारिद्रय़ आणि भूक पाहून अर्थशास्त्राचा अभ्यासक बनणारा अमर्त्य, यांच्यातलं साम्य जाणवतंय ?

ढाक्याच्या घराचं नावही बोलकं : जगत कुटीर. जगातील सर्व संस्कृतींचं आदरपूर्वक स्वागत करणारं घर आणि उदारमतवादी कुटुंब. किशोरवयीन अमर्त्यला ढाक्यात डोळ्यादेखत एक कमालीचा गरीब मुस्लीम माणूस निर्घृण सांप्रदायिक हत्त्येचा बळी जाताना बघावा लागला. अशा घटनांत जाणारे बहुतांश बळी गरीबच असतात हे त्यांचं निरीक्षण, पुढे दुर्दैवानं बरोबरच ठरलं. बंगालमधल्या समाजात हिंदू- मुसलमान वैरभाव पहाता, वडिलांना आपला देश कधी इंग्रजांचं राज्य संपवून स्वतंत्र होऊ शकेल अशी फारशी आशा वाटत नसे, पण डाव्या विचारसरणीच्या आईला मात्र स्वातंत्र्य लढय़ाबद्दल उमेद असायची. तिच्या माहेरी सगळी भावंडं, कोणी काँग्रेसी, सोशालिस्ट तर कुणी मार्क्‍सिस्ट असत; त्यांपैकी सतत कोणी ना कोणी स्वातंत्र्य लढय़ात सक्रिय असल्याने तुरुंगात असे. उदारमतवादी शांतिनिकेतनात मात्र धर्मभेद कमीतकमी राहून दोन्ही संप्रदायांचे लोक एकमेकांत मिसळत. स्वत: टागोरांनी सहजपणे ऑक्सफर्डमधल्या त्यांच्या एका भाषणांत, ‘मी हिंदू, मुस्लिम, आणि ख्रिस्ती संस्कृतींच्या मिलाफातून घडलेलो आहे’ असं विधान केलं होतं,ते त्या काळाच्या सुशिक्षित विचारसरणीचं प्रतिबिंबच होतं.

प्रेसिडेंसी कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि गणितात पदवी घेतल्यावर अमर्त्य बोटीनं, केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करायला दाखल झाले. बोटीवर त्यांच्याबरोबर रोमिला थापर, ऑक्सफर्डला निघालेले तपन रॉयचौधुरी आणि पार्थ गुप्ताही होते. तिघांची अशी झालेली मैत्री आयुष्यभर टिकली. रोमिला बडय़ा घरच्या, बुद्धीची धार आणि खानदानी सुसंस्कृतपण देखण्या चेहऱ्यावर तेव्हाही विराजमान असायचं. तिच्याबरोबर नृत्य करताना नवशिके अमर्त्य बावचळलेच होते.

अर्थशास्त्रातले विचारप्रवाह

अमर्त्य सेनांचं स्मृतिचित्रण म्हणजे अर्थशास्त्रावरील त्यांचे विचार जाणण्याची सामान्य वाचकांना लाभलेली संधी, हे लक्षात घेऊन त्यांनी क्लिष्ट अकॅडेमिक थिअरीत न जाता सोप्या शब्दांत आपल्या प्रावीण्याच्या क्षेत्रातलं पदार्पण ‘व्हॉट इकॉनॉमिक्स ?’ या तिसऱ्या भागातील लेखात मांडलं आहे. सेन ट्रिनिटीत आले तेव्हा साम्यवादी मार्क्‍स आणि सरकारी धोरणात नव्याने आलेल्या मॅक्रोइकॉनॉमिकसचे प्रणेते ठरलेले जॉन मेनार्ड केन्स या भिन्न विचारसरणींचा अर्थशास्त्राच्या तरुण विद्यार्थ्यांवर प्रभाव होता. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत एकीकडे ‘स्टँडर्ड इकॉनॉमिक्स किंवा ‘मेनस्ट्रीम इकॉनॉमिक्स’ आणि दुसरीकडे ‘मार्क्‍सिअन इकॉनॉमिक थिंकिंग’चं समर्थन करणारे दोन गट तयार झालेले होते. हे सगळे पुढे आपापल्या क्षेत्रांत आघाडीचे विद्वान ठरले. पण एकंदरीत युनिव्हर्सिटी डाव्या राजकीय विचारसरणीकडेच झुकणारी होती. जोन रॉबिन्सनसारखी मित्रमंडळी भांडवलवादाचं हिरिरीने समर्थन करणारी होती. देशानं प्रथम श्रीमंत व्हावं आणि नंतर आरोग्य, शिक्षण वगैरेंकडे बघावं ही त्यांची बांधणी सेनना तेव्हाही पटली नव्हती आणि आजही त्यांचा हाच आग्रह आहे की आरोग्यसेवा आणि उत्तम शिक्षण विकसनशील देशाची सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. पण या वैचारिक आखाडय़ात असमानता,गरिबी आणि शोषण यांकडे मॉरिस डॉब आणि पीटर बाऊअर यासारखे अपवाद वगळता कोणाला लक्ष द्यावंसं वाटलं नव्हतं, आणि ‘समाजकल्याणकारी अर्थकारण’ हे तर भारतात पाय घट्ट रोवलेल्या सेनांच्या शोधाच्या केंद्रस्थानी! मायदेशी अनुभवलेल्या समस्यांवर त्यांना उत्तरं शोधायची होती. ‘विकास कसा घडतो?’ हे आपण बाऊअर यांच्याकडून शिकलो असा ऋणनिर्देश सेन आवर्जून करतात. ‘समाजकल्याणकारी अर्थशास्त्र’ म्हणजे खोलात नेऊन रुतवणारा खड्डा असं मानलं जाऊ लागलं होतं, पण ‘अ‍ॅकला चालो रे’ चे संस्कार घेऊन आलेले अमर्त्य सेन त्या वाटेनं गेलेच. हुषार मित्रमैत्रिणींनी संशोधनासाठी विषय निवडताना व्यवसायात यश मिळवून देईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरांना आकर्षित करेल ही कसोटी वापरली असावी, त्यादृष्टीने स्मार्ट निवड करण्यासाठी त्यांनी अमर्त्यला आपापल्या दिशेनं ओढायचा प्रयत्नही केला. मध्यमवर्गीय असूनही, सेनांना भांडवलवाद आणि पैसा आकर्षित करू शकला नाही, गरीब देशाच्या जनकल्याणासाठीच त्यांनी आपलं ज्ञान वापरायचं ठरवलं होतं. हा लेख फक्त ट्रिनिटीपुरताच आहे, हे डाचतं. कदाचित पुढल्या भागात त्यावर विस्तृत मांडणी असेल .

पुढे पीएच.डी. साठी विषय निवडतानासुद्धा ‘सोशल चॉइस’च्या दिशेने विचार करायला केम्ब्रिजची फॅकल्टी तयार नव्हती. सेनांच्या प्रयत्नांचा रोख जाणणाऱ्या डॉबना, गणिताचं वावडं होतं,आणि पिएरो स्राफ्फा यांना, शोधविषयाच्या पुढल्या टप्प्यात म्हणजे सामाजिक संवादांत जास्त रस होता. सेनना केनेथ अ‍ॅरोच्या ‘सोशल चॉइस अँड इंडिव्हिजुअल व्हॅल्यूज’ मार्गावर पुढे जाणारा विषय हवा होता, पण डॉबच्या सल्ल्यानुसार सध्या फॅकल्टी मेंबर्सना रस नाही अशा विषयावर अडून राहण्याऐवजी, विषयाचा रोख बदलून ‘चॉइस ऑफ कॅपिटल इंटेन्सिटी इन डेव्हलपमेंट प्लॅनिंग’ असा झाला. त्यात बेकारी असलेल्या आणि स्वस्त मजूर उपलब्ध असलेल्या विकसनशील देशांत उत्पादनतंत्रं कशी आणि का निवडावीत, याचा सामाजिक दृष्टिकोनातून विचार करण्यात येणार होता. डॉब ,स्रफ्फा आणि रॉबर्टसन या ट्रिनिटीतल्या घडवणाऱ्या तिन्ही शिक्षकांवर आणि त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणीवर एक स्वतंत्र लेख आहे. तेव्हा केम्ब्रिजला फारसं न पटलेलं संशोधन पुढे नोबेल मानकरी ठरणाऱ्या सेनांच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवणारं होतं, जगभरातल्या गरीब देशांना त्याचा फायदा होणार होता. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजची कॅम्पसेस म्हणजे विविध विषयांवरच्या वादविवादांचे अड्डे. असं म्हटलं जातं की, ‘इथे सोडवला जात नाही असा एकही प्रश्न, जगात नाही!’ हेही अमर्त्यांना आवडायचं. आपली भूमिका बनवायला, तपासून घ्यायला या चर्चा पोषक ठरत!

अध्यापन आणि संसार!

डॉक्टरेटसाठी दोनतीन वर्ष तरी लागणार होती. घराची याद सतावू लागली होती म्हणून १९५६मध्ये परतल्यावर, वयाच्या २३ व्या वर्षी जादवपूर विश्वविद्यालयात शिकवणं सुरु केलं. इतक्या तरुण अननुभवी पोराच्या हाती अर्थशास्त्र विभाग सोपवल्यानं आता जगबुडी होणार असं भाकीत एका ज्येष्ठ विद्वानांनी केलं होतं. पण सेनना या अध्यापनसंधीमुळे आपली व्यावसायिक दिशा लक्षात आली. त्यात त्यांना चार वर्षांची ‘प्राईझ फेलोशिप’ मिळाली आणि ते केम्ब्रिजला परतले. प्रबंध स्वीकृत होताच नामवंत प्रकाशनाने मागून घेऊन छापला. पुढे त्यांना अमेरिकेच्या ‘एमआयटी’त शिकवण्याचं निमंत्रण मिळालं आणि विद्यापीठांत शिकवण्याचा जो सिलसिला सुरू झाला, तो आजवर चालूच आहे. १९५३-६३ या दशकात सेन यांनी टप्प्याटप्प्याने विद्यार्थी ते स्टाफ फेलो हा प्रवास केला. २००४ मध्ये ते ‘मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज’ निवडले गेले. केम्ब्रिज विश्वविद्यालयाचा हा सर्वोच्च सन्मान, नोबेल मिळाल्याच्या वर्षीच मिळालेला!

अमर्त्य आणि जाधवपूर युनिव्हर्सिटीत इंग्लिश शिकवणाऱ्या विदुषी, कवयित्री नवनीता देब सेन हे अत्यंत अनुरूप जोडपं. त्यांना अंतरा आणि नंदना या दोन मुली. सहजीवनाबद्दल सेन त्रोटकपणे लिहितात. पुढे घटस्फोट झाला पण दोघांमधले बंध नवनीताच्या मृत्यूपर्यंत टिकून राहिले. अमर्त्यांवर बनवलेल्या ‘अ‍ॅन अग्र्युमेंटेटिव्ह इंडिअन’ या लघुपटावर क्षुल्लक आक्षेप घेऊन सेन्सॉरबोर्डाने परवानगी नाकारली होती तेव्हा नवनीतांनी आक्षेपांचं खंडन करत सेनांच्या समर्थनार्थ रान उठवलं होतं. पुढे अमर्त्यनी इकॉनॉमिक्सची प्रोफेसर एवा कोलोर्नीशी लग्न केलं. त्यांना इंद्राणी आणि कबीर ही दोन मुलं झाली. मुलं लहान असतानाच एवा यांना कॅन्सरने गाठलं. त्यांच्या मृत्यूनंतर अमर्त्यनी इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या एमा रॉथ्सचाइल्डशी विवाह केला. हे पुस्तकही त्यांनी एमांना अर्पण केलं आहे. त्यांच्या वडिलांच्या ‘प्रतिची’ या शांतिनिकेतनमधल्या बंगल्यात ते दरवर्षी हिवाळ्यात येऊन राहात असतात, इतकंच नव्हे तर त्यांच्या चारही मुलांना त्या घराबद्दल जिव्हाळा वाटतो, ते घर म्हणजे आता सगळ्यांनी एकत्र भेटायचं स्थान झालं आहे.

‘हे विश्वचि माझे घर’ मानणाऱ्या सेनांच्या मित्रमैत्रिणींची यादी, अटलांटिकच्या दोन्ही बाजूंना सारखीच! पुस्तकाच्या प्रत्येक पानावर नवे गणगोत हजेरी लावताना दिसतात. मेहबूब अल हकम्, ई एम फॉर्स्टर, बरून डे, ए सी पिगू, राल्फ मिलीबँड.. आकाशगंगेसारखी वाहती मैत्री! विविध क्षेत्रांतल्या नामवंत मित्रमैत्रिणी,आयुष्य समृद्ध करणाऱ्या. गाजावाजा न करता मूल्यांवरची जपलेली निष्ठा, प्रांजळ निवेदन, सुसंस्कृत विनम्र वृत्ती आणि नर्म विनोदी शैली ही या पुस्तकाची वैशिष्टय़ं (शेवटच्या प्रकरणात एक असाच किस्सा येतो. भारतात परतताना बांधाबांधीसाठी मदतीला आलेली मैत्रीण पॉल गोगँचं ‘पॉलिनेशिअन मित्र’ हे भिंतीवरचं चित्र निरखून पहात, अमर्त्यना विचारते, ‘हे तुमचे कुटुंबीय?’ मनोमन हबकलेले अमर्त्य म्हणतात, ‘हो.. फक्त अजून कधी भेटलो नाहिये त्यांना!’)

अनेक वर्ष परदेशांत सन्माननीय वास्तव्य असूनही भारतरत्न अमर्त्य सेन यांनी आपली ओळख ‘भारतीय नागरिक’ अशीच ठेवली आहे हे पुरेसं बोलकं! त्यांच्याजवळ देण्यासारखं अमाप आहे आणि शिक्षकीतच साफल्याचा आनंद मिळतो हे त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अनुभवल्याचं अनेकदा व्यक्त केलं आहे. अगदी इतकं की, नवविवाहित नवनीतासह ग्रीसच्या निसर्गरम्य किनाऱ्यांवर हिंडतानाही ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आठवणीने बेचैन होत आणि कधी भारतात परततो आणि शिकवू लागतो असं होई. कलकत्त्यात आणि नंतर केम्ब्रिजमध्ये शिकता- शिकवताना ब्रिटिश आणि स्कॉटिश राजनैतिक अर्थव्यवस्थेचा पाय घालणारे अ‍ॅडम स्मिथ आणि डेव्हिड ूम या दोघांच्या वर्णभेद/ गुलामगिरीविरोधी भूमिकांचा अभ्यास सेनांनी केला. भारतीय समाजकारणातल्या असमानतेशी आणि त्यावर संभवित उपाययोजनेसाठी या दोन्ही अर्थतज्ञांची मांडणी अतिशय महत्त्वाची वाटली, तिला भारतीय विद्यार्थ्यांचा प्रतिसादही प्रोत्साहित करणारा आहे असंही ते म्हणतात. त्यांच्याकडे कुठलाही राजकीय अजेंडा नाही पण गरिबांसाठी कळकळ आणि बौद्धिक प्रामाणिकपणाचा आग्रह मात्र आहे. त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त बुद्धीची चमक नव्हे, सामाजिक प्रश्नांना भिडण्याची ताकद आणि इच्छाही प्रकर्षांने जाणवते आणि(म्हणून) देशाचं भवितव्य आशादायी वाटतं.

‘होम इन द वर्ल्ड’ हा त्यांच्या आठवणींचा पहिला भाग असून ते सध्या दुसऱ्या भागावर काम करत आहेत, तोही लौकर प्रकाशित व्हावा आणि त्यातून आपल्याला खूप काही टिपता यावं. पुस्तकांतही, स्वत: बद्दल बोलणं जड जात असलेल्या सेनांनी फोकस स्वत: वर न ठेवता, फिरत ठेवला आहे आणि म्हणून पुस्तक जरा विस्कळीत झाल्यासारखं वाटतं, एवढंच.

arundhati.deosthale@gmail.com

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा