The Dharavi Model

किरण दिघावकर

नोशन प्रेस

/media/JQTAwpEESXCl.jpg

पाने : ☀ 200 मुल्य (₹): 299.0

धारावीचे धडे… आता पुस्तकातही ! - लोकसत्ता टीम

पुस्तकाच्या अखेरीस काही वृत्तपत्रांची कात्रणे जोडली आहेत ती स्तुतिपर असल्याने पुस्तकात टाळता येण्याजोगी ठरली असती.

‘आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी’ हीच जुनी ओळख आजही सांगितली जाणाऱ्या धारावीत, करोनासाथीच्या पहिल्या लाटेमुळे २०२० च्या एप्रिल-मे महिन्यांत मृत्यूदर कमालीचा वाढला. लागण धारावीभर पसरल्याचे चित्र होते. मात्र जानेवारी २०२१ पर्यंत साथ आटोक्यात आणून, मृत्यूदर ०.५ टक्के करण्यात धारावीने यश मिळवले. हा भाग मुंबईचे एक आर्थिक केंद्र असला तरी इथले अनेक रहिवासी अशिक्षित, त्यांच्यामध्ये बदलासाठी जागृती करणे कठीण, हे पुनर्वसनाच्या निमित्तानेही याआधी दिसलेले आहे. अशा स्थितीत धारावीने करोनावर मात करणे हे कौतुकास्पदच होते. त्यामागे अर्थातच नियोजनबद्ध परिश्रम होते. पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा या दोघाही यंत्रणांचा समर्पित सहभाग होता. या यंत्रणांनी कसे काम केले, याची सांगोपांग आढावा धारावी भागातील महापालिका उपायुक्त किरण दिघावकर यांनी ‘द धारावी मॉडेल’ या पुस्तकात घेतला आहे. आकडेवारी, तक्ते, प्रत्यक्ष अनुभव आणि निवेदन यांतून हे पुस्तक साकारते. धारावीने आदर्श कसा उभा केला, करोनाशी लढण्याचे एक प्रतिरूप कसे दिले, याची ही उजळणी केवळ आत्मगौरवासाठी नसून ती इतरांनाही उपयोगी पडावी, असा पुस्तकाचा हेतू आहे.

मात्र त्यामुळेच, पुस्तकाच्या अखेरीस काही वृत्तपत्रांची कात्रणे जोडली आहेत ती स्तुतिपर असल्याने पुस्तकात टाळता येण्याजोगी ठरली असती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी धारावी मॉडेलचा खास उल्लेख करून ‘हे प्रतिरूप आता दिल्ली आणखी पुढे नेईल’ असे म्हटले होते, तीही बातमी येथे दिसते! अर्थात, पुस्तकाच्या अन्य पानांवर प्रत्यक्ष कार्यस्थळावरील अनुभवच दिले असल्याने ते वाचनीय झाले आहे. ‘भूक माणसाला कार्यरत बनविते’ यासारखी वाक्येही टाळता आली असती असे सराईत वाचकांना वाटेल, परंतु एकंदर पुस्तकाचा भर भाषेच्या साधेपणावर आहे. कार्यकर्ते, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारे कर्मचारी, प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी तसेच धारावीबद्दल, मुंबईबद्दल कुतूहल असणारे सारेजण यांनी वाचावे, असे हे पुस्तक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संदेशवजा प्रस्तावना लाभलेल्या या २०० पानी पुस्तकाचे प्रकाशक आहेत ‘नोशन प्रेस’ आणि किंमत आहे २९९ रुपये.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा