ए पॅसेज नॉर्थ

अनुक अरुदप्रगासम

/media/9781783786947.jpg

उपयुक्त सर्वनाश.. - पंकज भोसले

उपयुक्त सर्वनाश..
कादंबरी तीन प्रकरणांत उभी राहिली आहे. पहिला भाग ‘मॅसेज’, दुसरा ‘जर्नी’ आणि निम्म्या कादंबरीनंतर शेवटचा ‘बर्निग

संवादाविना, भाषिक चमत्कृतींविना केवळ विषय आणि आशयाच्या बळावर ही कादंबरी वाचकाला धरून ठेवते. आकर्षकतेचा अभाव हा कादंबरीच्या दोषाऐवजी गुणही ठरू शकतो, हे अनुक अरुदप्रगासम सिद्धच करतो..

कोणताही लेखक आपल्या आयुष्यातील संस्मरणीय अथवा कटुस्मरणीय भूतकाळाला, आपल्या भवतालच्या भल्या-बुऱ्या इतिहासाला कल्पनेचे खतपाणी घालून साहित्यकृतीत उतरवत असतो. या घडून जाणाऱ्या म्हणजेच मृत घटना त्याच्यासाठी आपसूक बीजं ठरतात. त्याच्या अनुभववर्षांच्या, लेखन कौशल्याच्या खत-पाण्यावर त्याच्या कथाकृतीचा डोलारा उभा राहतो. ‘आम्ही किती वाईट अवस्थेत जगलो आणि तगलो’ ही सांगणारी कोणत्याही भाषेतील लोकप्रिय आत्मकथने, वैयक्तिक इतिहासाचा आधार असणाऱ्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा ढोबळ आढावा घेतला, तरी दु:ख, जखम-जाणिवांच्या समृद्ध अडगळ पसाऱ्यात निवेदकाची सुटका वा अटकाव या दोन पर्यायांत त्यांचा समारोप झालेला दिसेल. घटनेच्या सर्वनाशाची ही प्रक्रिया लेखकासाठी किती उपयुक्त ठरू शकते, याचा दाखला घ्यायचा असेल, तर साठ-सत्तर वर्षांत खूपविक्या ठरलेल्या इंग्लंड-अमेरिकेतर देशांतील लोकप्रिय लेखकांच्या कथा-कादंबऱ्या-आत्मकथने पाहता येतील.

स्वातंत्र्योत्तर भारतातून पहिली वीसेक वर्षे जगात सर्वाधिक साहित्यनिर्यात झाली ती फाळणीच्या व्यथा-वेदनांनी पोळलेल्या अनुभवांची. ही पोतडी परदेशी वाचकांसमोर उघडणारे लेखक आपसूक जागतिक झाले. नंतरच्या काळातील भारतीय लेखकांना आंतरराष्ट्रीय होण्यासाठी इथल्या नक्षल चळवळी, भ्रष्टाचारात भरडणारी जनभक्ती, दंगल-वेदनांचा विस्थापित अवकाश कच्चामाल म्हणून वापरण्यासाठी आवश्यक वाटू लागल्या. रशियातील जाचक राजवटींच्या कथा-कादंबऱ्यांना त्यांच्या सरकारने कितीही दडपून टाकण्याचा, बंदी आणण्याचा प्रयत्न केला, तरी त्यामुळेच त्यांना जगभर पसरण्याचा मार्ग उपलब्ध झाला. आज पश्चिम आशियातील पुरुषप्रधान राष्ट्रांत स्त्रियांचा अस्तित्वासाठी लढा, नायजेरियासह आफ्रिकेतील टिकलीएवढय़ा युद्धखोर राष्ट्रांतील जगण्याची धडपड ही जगाला ‘आंतरराष्ट्रीय खूपविक्या’ पुस्तकांच्या माध्यमांतून कळते. या लेखक-लेखिकांचा ब्रिटन वा अमेरिकेत राहून स्वदेशाबाबतच्या मुळोपासनेचा उद्योग त्या-त्या देशातील नागरिकांना कसाही वाटत असला, तरी ‘अनाकलनीयाचे आकर्षण’ या नियमापोटी इतर जगाला प्रामाणिक वाटण्याशिवाय पर्याय नसतो. ‘ए पॅसेज नॉर्थ’ ही श्रीलंकेतील अनुक अरुदप्रगासम या लेखकाची दुसरी कादंबरी या नियमानुसार वाचनीय आणि अद्भुत जगाचा प्रवास घडविते. या कादंबरीत श्रीलंकेच्या ईशान्य भागात तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या हिंसाचाराचे पडसाद आहेत. पण त्याचबरोबर भारतातील शहरांतून केलेला फेरफटका, इथल्या माणसांच्या स्वभावैशिष्टय़ांची निरीक्षणे, संस्कृत काव्य-साहित्य, बुद्धाचे तत्त्वज्ञान यांचा बराच मोठा स्मृतिसाठा विशिष्ट कारणामुळे आलेला आहे. कोलंबो ते जाफनाच्या रेल्वे प्रवासात वेदनांची गाठोडी मोकळी करणाऱ्या श्रीलंकेच्या तरुणाची ही स्मृती आणि वास्तवचित्रे आहेत. जगण्या-मरण्याच्या बऱ्याच रूढी-परंपरा श्रीलंकेतदेखील भारतीयांसारख्याच असल्याने ती अधिक पचू शकतील.

अनुक अरुदप्रगासम हा तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी. गेल्या दहाहून अधिक वर्षांपासून त्याचे शिक्षणासाठी अमेरिकेत वास्तव्य आहे. ब्रिटन-अमेरिकेत नातेवाईक- आप्तमित्र मुरलेल्या पिढीचा दुसऱ्या पिढीचा श्रीलंकेतील प्रतिनिधी असेही त्याला म्हणता येईल. भारतातही त्याने काही काळ भटकंती केली. तमिळ संघर्षांची झळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भोगून त्याने परदेशाचा स्वीकार केला. आपल्या देशातील हिंसाचाराच्या घटना, उखडली गेलेली शहरे, मोडलेली घरे, त्यांतून झालेले विस्थापन, बेपत्ता झालेले लाखभर तरुण, तितकेच हकनाक बळी गेलेले सामान्य नागरिक, डोळ्यासमोर आप्त गमावताना पाहिलेले गोरगरीब यांचे देशात असतानाचे दर्शन आणि देशाबाहेर गेल्यानंतर या सर्व घटनांच्या कटुस्मृतीचे मंथन म्हणजे ‘द स्टोरी ऑफ ब्रीफ मॅरेज’ (२०१६) आणि ‘ए पॅसेज नॉर्थ’ या दोन कादंबऱ्या. या दोन्ही कादंबऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात एकही संवाद नाही. निबंधांसारखी स्मृती आणि घटनांची वर्णने आहेत. त्यातही सर्वात महत्त्वाची बाब या लेखकावर पूर्वसुरी किंवा समांतर अशा कसल्याही कथासाहित्याचा पगडा नाही. ‘पॅरिस रिव्ह्य़ू’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने इंग्रजी कथासाहित्य वाचलेच नसल्याची कबुली दिली आहे. पीएचडीच्या निमित्ताने तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि त्याला पूरक ठरणारी पुस्तके हाच या तिशीतील लेखकाचा वाचनप्रवास. याची खंत न बाळगता तयार झालेली त्याची स्वत:ची संवादशून्य कथात्मशैली जगाला पहिल्या कादंबरीच्या निमित्ताने उमगली. एका वाक्याचाही संवाद न घडविता वर्णनांच्या बळावर कादंबरी गाजविण्याची क्षमता असलेला खूप कच्चा माल अरुदप्रगासमकडे होता. तमिळ वाघांना नेस्तनाबूत करण्याच्या काळातील लष्कराचे आश्रयकेंद्र आणि त्यातील बंदिवानांचे जिणे उभे करणाऱ्या पहिल्या कादंबरीने या अगदीच तरुण लेखकाचा बराच बोलबाला झाला. ‘ए पॅसेज नॉर्थ’मध्ये युद्ध संपून शांतता प्रस्थापित झाल्यानंतर या भागातील माणसांच्या सर्वनाशाची अवस्था दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.

कादंबरी सुरू होते तृतीयपुरुषी निवेदनातून. क्रिशन या कोलंबोजवळच्या मरिन ड्राइव्ह (आश्चर्यकारकरीत्या मुंबईतील समनामी भागासारखाच इथला इतिहासही कादंबरीत आहे.) या परिसरात आई आणि जर्जर आज्जीसोबत राहणाऱ्या तरुणाच्या आयुष्यातील एका दिवसापासून. हा तरुण सामाजिक संस्थेत काम करतो. त्याची आई शिक्षिका आहे, वडील काही वर्षांपूर्वी शहरातील सेण्ट्रल बँकेत घडलेल्या आत्मघाती हल्ल्यात दगावलेत. तर आज्जी म्हणजेच अप्पम्मा वृद्धापकाळातील विविध आजारांनी त्रस्त असली, तरी जगण्याला कवटाळून बसलेली दिसते. तमिळ वाघांची सद्दी संपली आहे खरी, पण युद्धातील पडझड सावरण्याचे आणि शहरांना आधुनिक करण्याचे सरकारचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. क्रिशनच्या सामाजिक संस्थेचे काम त्याला पूरक. तुटपुंज्या पगारातले. तरीही जगण्यासाठी स्वीकारलेले. तुलनेने बरेच सुखवस्तू आणि नातेवाईकांमुळे परदेशवारी करून आलेल्या या कुटुंबाची ओळख झाल्यानंतर क्रिशनच्या (आणि कादंबरीच्याही) आयुष्यातील पुढच्या दोन दिवसांना बदलून टाकणाऱ्या घटना एकाच संध्याकाळी घडतात. क्रिशनच्या आज्जीची काही वर्षे जिवापाड देखभाल करणारी आणि काही दिवसांच्या सुट्टीवर ईशान्येतल्या गावात गेलेली राणी नावाची नोकराणी तेथे विहिरीत पडून मेल्याची माहिती त्याला फोनवरून मिळते. त्याच वेळी भारतात शिक्षणाच्या निमित्ताने दिल्लीत वास्तव्यास असताना काही काळ क्रिशनची सोबत करणाऱ्या अंजुम या मैत्रिणीचा ई-मेल तब्बल चार वर्षांच्या अंतराने आलेला असतो.

राणी ही जाफनाजवळच्या खेडय़ात तमिळ वाघांच्या लढय़ात उद्ध्वस्त कुटुंबाचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून कादंबरीत येते. तिचा एक मुलगा तमिळ वाघांसाठी लढण्यात तर दुसरा युद्धामुळे बनलेल्या भीषण परिस्थितीत तिच्यासमोरच मारला गेला. त्या दु:खांतून उद्भवलेल्या मानसिक आजाराशी लढत असताना क्रिशनच्या संपर्कात आल्यानंतर तिने कोलंबोत अप्पमाची देखभाल करण्याचे काम स्वीकारलेले असते. क्रिशनमुळे तिला वैद्यकीय मदत मिळते आणि अप्पमाची काळजी घेताना तिच्या दु:खांचा निचरा होण्याची प्रक्रियाही घडते. हिंसाचारातून बचावलेल्या आपल्या मुलीकडे काही दिवसांसाठी राहायला गेलेल्या या राणीच्या मृत्यूची वार्ता क्रिशनच्या कुटुंबासाठी धक्कादायक ठरते. तिच्या उत्तरकार्यासाठी आज्जीने दिलेल्या २० हजारांची रक्कम राणीच्या मुलीला देण्यासाठी क्रिशन न पाहिलेल्या ईशान्येतील गावाच्या दिशेने रेल्वेतून निघतो. राणीचा नैसर्गिक मृत्यू झाला, तिने आत्महत्या केली, की तिची हत्या झाली हे अनेक प्रश्न छळत असल्याने या प्रवासास तो तयार झालेला असतो. या प्रवासात अंजुम या भारतीय मैत्रिणीसह घालविलेल्या दिवस-रात्रींचाही हिशेब सुरू होतो.

हे झाले रूढ कथानक नसलेल्या या कादंबरीचे ढोबळ वर्णन. पण श्रीलंकी पार्श्वभूमीसह कालिदासाच्या मेघदूतापासून ते दिल्लीतील मेट्रोमधला प्रवास, दिल्ली ते मुंबई रेल्वेसहलीची एक रात्र, उत्तर प्रदेशी माणसांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, दिल्लीतील चळवळ्या विद्यार्थ्यांच्या चर्चा-गप्पा यांच्याविषयी तपशिलात ऐवज उपलब्ध होऊ शकतो. कादंबरी तीन प्रकरणांत उभी राहिली आहे. पहिला भाग ‘मॅसेज’, दुसरा ‘जर्नी’ आणि निम्म्या कादंबरीनंतर शेवटचा ‘बर्निग’. शेवटच्या भागात क्रिशनने पहिल्यांदा अनुभवलेल्या ग्रामीण अंत्यसंस्काराचे वर्णन येते, जे सूक्ष्मलक्ष्यी रिपोर्ताजइतके परिणामकारक झाले आहे.

संवाद किंवा कारागिरीयुक्त वाक्ये न वापरता दोन-सव्वादोनशे पानांचा कादंबरीचा पल्ला अनुक अरुदप्रगासमने सहज पार पाडला आहे. श्रीलंकेबाबत रावणसंदर्भापासून अचानक उसळलेल्या क्रिकेट महोत्तमांव्यतिरिक्त आपल्याला किती कमी माहिती आहे, याचीही जाणीव ही कादंबरी देऊ शकेल. आकर्षकतेचा अभाव हा कादंबरीच्या दोषाऐवजी गुणही ठरू शकतो, हे अरुदप्रगासमने आधीच्या कादंबरीतून दाखवून दिले होते. याही कादंबरीत त्याने ते पुन्हा एकदा ठसवून दिले आहे. संयतपणे चालणारी त्याची स्मृती निवेदनाची गाडी सुरुवातीला उल्लेख केलेल्या लेखकांसाठीच्या उपयुक्त सर्वनाशाची प्रक्रिया कशी पूर्ण करते, हे अनुभवणे एक अभ्यास ठरू शकेल. कादंबरी प्रायोगिक नाही. कौटुंबिक भाव-भावनांचा बराच मसालाही त्यात बराच आहे. तरीही विषय आणि आशयाबाबत यंदाच्या बुकर लघुयादीतील इतर स्पर्धकांपेक्षा पूर्णपणे भिन्न. हे भिन्नत्व त्याला श्रेष्ठ ठरवेल का, हे आत्ताच सांगणे अवघड आहे.

pankaj.bhosale@expressindia.com

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा