वसा पालकत्वाचा

मृगा मंदार परांजपे

/media/वसा पालकत्वाचा_vasa.jpg

सुजाण पालकत्वाचे सोपे कानमंत्र - स्मिता प्रकाशकार

असं म्हणतात, की जेव्हा पहिलं अपत्य जन्माला येतं, तेव्हाच पालकांचाही आई आणि बाबा म्हणून नव्यानं जन्म होत असतो. आई-वडीलही मुलाबरोबर मोठे होत असतात. पहिल्या बाळाची चाहूल लागते आणि होऊ घातलेल्या पालकांचं भावविश्व बदलून जातं. सगळं घरदार त्या जीवाचं स्वागत करायला उत्सुक होतं आणि सुरू होतो सूचनांचा भडीमार, काळजीपोटीचे अनाहूत सल्ले, बाळाच्या आगमनापर्यंतची निरंतर धडधड. ज्यातून आपल्याला बाळ होणार ही जाणीव या दोघांच्या मनात आनंदासोबत अनामिक भीतीही नकळत रुजवते. आपण आपल्या बाळाला चांगलं आयुष्य देऊ शकू ना? त्याच्यावर उत्तम संस्कार करणं आपल्याला जमेल ना? आई-वडील म्हणून कर्तव्य पार पाडताना आपल्याकडून काही कसर तर राहणार नाही ना? असे अनेक प्रश्न त्यांना नित्य नव्यानं भेडसावू लागतात.

अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं आपल्याला संधिकाल प्रकाशनच्या 'वसा पालकत्वाचा' या पुस्तकात मिळतात. आपल्या कुटुंबातील लहान बालकाशी त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, मामा, मावशी, आत्या-काका इतकंच नाही, तर मोठ्या भावंडांनी कसं वागावं किंवा त्या बालकाला कसं वागवावं, याविषयी लेखिका मृगा परांजपे अतिशय सोप्या भाषेत भाष्य करते.

पुस्तकाचं शीर्षक 'वसा पालकत्वाचा' असं असलं, तरी लेखिकेनं नवविवाहित जोडप्यांनी दोघांत तिसऱ्याचा विचार करण्यापासूनच्या घटनांची चर्चा केलेली आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार म्हटल्यावर, होऊ घातलेल्या आई-वडिलांना घरीदारी जे काही अनुभव येतात तिथपासून गर्भसंस्कार, बाळाचा जन्म, त्याला वाढवताना येणारे अनुभव, त्याच्या संगोपनाबाबत दोन पिढ्यांमधली मतं-मतांतरं, त्यातून साधायचा सुवर्णमध्य, मूल एकत्र कुटुंबात वाढतंय की विभक्त कुटुंबात? या दोन्ही गोष्टींचे संभाव्य फायदे आणि तोटे, त्यांचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घ्यायच्या क्लृप्त्या, मुलांच्या शाळेची, शिक्षणाच्या माध्यमाची निवड, त्यांचा अभ्यास, शाळेतले उपक्रम आणि त्यात पालक म्हणून सहभाग, मुलांच्या सवयी, संस्कार, आहाराबाबतच्या आवडीनिवडी, मुलांचे लाड, शिस्त, नोकरी करणारी आई असल्यास बाळाला संभाळण्यासाठी पाळणाघर की घरी बाईचा पर्याय, दोन मुलं असतील तर त्या दोघांत; विशेषत: मोठ्या भावंडाच्या मनात धाकट्याविषयी इर्ष्या, असूया निर्माण न होता प्रेम आणि आपुलकीची भावना कशी रुजवावी, जुळ्या मुलांना वाढवताना कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, मुलांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांचा मुलांच्या जडणघडणीवर काय प्रभाव पडतो, मित्र-मैत्रिणींच्या प्रभावातून आपलं मूल घरी चुकीचं वागत असेल, तर त्यावर कशा पद्धतीनं तोडगा काढावा, मुलांचा आयक्यू (बुध्यंक) आणि इक्यू (भावनिक भाग) यानुसार संगोपनात काय बदल करायला हवेत, अशा एक ना अनेक गोष्टींचा ऊहापोह पुस्तकात केलेला आहे.

प्रत्येक मूल वेगळं असतं. स्वतंत्र व्यक्तित्व म्हणून घडत असतं आणि त्या जडणघडणीत पालक म्हणून आई-वडिलांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो, याचं भान लेखिकेकडून कुठेही सुटलेलं नाही. प्रत्येक मुद्दा मांडताना त्या इतर पालकांच्या वागण्याची, सवयींची उदाहरणंही देतात. हे दाखले देताना ते पालक चुकीचे आहेत की बरोबर, याची चर्चा लेखिका करत नाही. त्या त्या दाखल्यात नमूद केलेल्या पालकांच्या सदर वर्तनाचे जे बरे-वाईट परिणाम मुलांच्या वागण्यातून समोर येतात, ते मांडण्याकडे लेखिकेचा कल जास्त जाणवतो.

पुस्तकाची भाषा साधी सोपी आहे. पुस्तक लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं त्यांनी आपल्या मनोगतात म्हटलं आहे. एखादा मुद्दा मांडताना लेखिका 'सायकोलॉजी टुडे'मधील एखाद्या लेखाचा दाखला देतात, तर कुठे 'युनिसेफ'च्या हस्त पुस्तिकेत प्रकाशित झालेले निष्कर्ष उदाहरण म्हणून देऊन, एखादा मुद्दा अधिक ठळकपणे मांडतात.

यातील प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी लेखिका एक कानगोष्ट सांगते. त्या कानगोष्टीतच तिचं आणि पर्यायानं पुस्तकाचंही यश लपलेलं आहे. या कानगोष्टी जरी येता-जाता वाचल्या, त्या आचरणात आणायच्या ठरवल्या, तरी कित्येक पालक आपल्या वागण्याचा अंतर्मुख होऊन विचार करू लागतील. मुलांना वाढवताना स्वत:मध्ये सकारात्मक आणि आवश्यक बदल करू शकतील. आपलं मूल एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याची जडणघडण करताना आपली स्वप्नं, अपेक्षा त्याच्यावर लादण्यापेक्षा, त्यांची स्वप्नं ओळखून ती पूर्ण करण्यासाठी, त्याच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न पालकांनी करणं योग्य आहे. त्या दृष्टीनं हे पुस्तक नक्कीच मदत करेल.

मुखपृष्ठ : सतीष खानविलकर

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा