अंगारवाटा... शोध शरद जोशींचा - भानु काळे

ऊर्मी प्रकाशन, औंध, पुणे

पाने : ☀ 510 मुल्य (₹): 500.0

/media/Sh98HXL6MdL.jpg

बहुपैलू व्यक्तिमत्त्वाचं समग्र दर्शन - दत्तप्रसाद दाभोळकर

शेतकरी आंदोलनाची धग आज भारतभर सर्वत्र जाणवते आहे, अशा वेळी शरद जोशींची आठवण नकळत होत राहते. ‘शेतीमालाला रास्तभाव’ हा शेतकऱ्यांचा एकमेव प्रश्‍न आहे, हे शेतकऱ्यांना पटवून देत, त्यांची संघटना बांधत त्यांनी भारतातल्या शेतकऱ्यांना आक्रमकपणे रस्त्यावर आणलं. लोकमान्य टिळक यांना ‘भारतीय असंतोषाचा जनक’ असं म्हणतात. तेवढ्याच सार्थपणे शरद जोशी यांना ‘भारतीय शेतकऱ्यांच्या असंतोषाचा जनक’ असं म्हणता येईल. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लेखणीतून समजावून दिला. शरद जोशी यांनी तो रस्त्यावर वाजवला.
मात्र, हे शरद जोशी व्यक्ती म्हणून नक्की कसे होते? त्यांची जडणघडण कशी झाली? त्यांनी मांडलेला अर्थशास्त्रीय विचार नक्की काय आहे? त्यातल्या मोक्‍याच्या आणि धोक्‍याच्या गोष्टी कोणत्या?

त्यांच्या आंदोलनाचं यशापयश नक्की काय आहे? शरद जोशी आज असते, तर त्यांनी काय सांगितलं असतं किंवा भारतातील शेती आंदोलनाची उद्याची रचना कशी असावी, हे सारं समजून घ्यायचं असेल, तर पाच वर्षांच्या अथक एकाकी प्रयत्नातून भानू काळे यांनी सिद्ध केलेलं ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ हे पुस्तक वाचायला हवं. हे सारं नको असेल, तरी वि. स. खांडेकर यांच्या कादंबरीतच शोभेल अशा एका विलक्षण बुद्धिमत्तेच्या, असामान्य प्रतिभेच्या, सर्वस्व वाऱ्यावर उधळून समाजातला अन्याय दूर करायला निघालेल्या एका महानायकाचं हे चरित्र आहे, म्हणून तरी हे पुस्तक वाचलं पाहिजे....खांडेकर यांच्या कल्पनेतच बसणारं एक वास्तव!
पाच वर्षांच्या कालावधीत भानू काळे यांनी जोशी यांच्याबरोबर शंभराहून अधिक बैठका घेतल्या. प्रत्येक बैठक दोन-अडीच तासांची! जोशी यांनी आपला सर्व पत्रव्यवहार त्यांना दिला. त्यांनी तो अभ्यासला. जोशी यांचं सर्व लिखाण, आंदोलनानं प्रसिद्ध केलेलं सर्व साहित्य वाचलं. या लिखाणाला नेमकेपणा यावा, म्हणून एक तीनपानी टिपण करून संघटनेतल्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आलं. शेतकरी संघटनेतल्या सुखावलेल्या आणि दुखावलेल्या मंडळींच्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक आणि पंजाब इथं जाऊन मुलाखती घेतल्या. शरद जोशी आठ वर्षं स्वित्झर्लंडला तत्कालीन संयुक्त राष्ट्रसंघामध्ये (यूएनए) भल्या मोठ्या पगाराची नोकरी करत होते. तिथं जाऊन ती संस्था, त्यांचे सहकारी, त्यांचे शेजारी यांच्याही मुलाखती घेतल्या. चाकण, नाशिक, निपाणी, चंडीगड अशा ठिकाणी झालेल्या आंदोलनांचं स्वरूप समजावं, म्हणून कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणांना भेटी दिल्या आणि मग हे पुस्तक सिद्ध झालं.

या पुस्तकाचे नकळत चार भाग पडतात. पहिला भाग आपल्याला सहज-सोप्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात किती कठीण असतात, हे सांगणारा. एक गोष्ट लक्षात घ्या. कामगारांची संघटना बांधणं फारसं कठीण नसतं. कारखान्यातली प्रत्येक पाळी संपल्यावर एकगठ्ठा कामगार तुमच्यासमोर येतात. प्रश्‍न फक्त त्यांची संघटना बांधण्याचा असतो. शेतकरी मात्र सर्वत्र विखुरलेले असतात. त्यावेळी मोबाईल नव्हते. खेड्यात असलाच तर एखादा टेलिफोन असायचा. तोही तलाठ्याच्या किंवा पाटलांच्या घरी! शेतकरी अक्षरशत्रू, त्यातून अनेक खेड्यांत पोस्टमनसुद्धा आठवड्यातून एकदाच जाणार. पावसाळ्यामध्ये सारी खेडी एकमेकांपासून पूर्णपणे तुटलेली. या सर्वांतून शरद जोशी यांनी अभिनव पद्धतीनं शेतकऱ्यांचं संघटन कसं केलं, हे पुस्तकात वाचायला मिळतं.

दुसरा भाग जोशी यांच्या आंदोलनाचा आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाला ही आंदोलनं थोडी फार किंवा खरं तर फार थोडी माहीत आहेत! चाकण, निपाणी या नावांभोवती ही माहिती घोटाळत राहते. त्यालाही कारण आहे. एकतर त्यावेळी वेगवेगळ्या वाहिन्याच काय दूरदर्शनसुद्धा नव्हतं. त्यातून बहुसंख्य मराठी वृत्तपत्रांनी याबाबत फार जुजबी माहिती प्रसिद्ध केली. त्या युद्धभूमीवरून हिंडून, अनेकांना बोलतं करून आणि त्यावेळची इंग्रजी वृत्तपत्रं वाचून, लेखकानं आंदोलनाचं स्वरूप आणि त्यांची स्फोटकता फार ताकदीनं उभी केली आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आंदोलन अभूतपूर्व स्वरूपात पंजाबात पोचलं. त्याचं नेतृत्व शरद जोशी यांच्याकडं होतं. त्यावेळी एका पंजाबी वृत्तपत्रानं लिहिलं होतं - ‘आमच्या भगतसिंगांच्या मदतीला महाराष्ट्रातून राजगुरू आले होते. आज भगतसिंग महाराष्ट्रातून येतोय आणि पंजाबचे राजगुरू त्यांची वाट पाहताहेत.’ खासदार भूपिंद्रसिंग मान हे पंजाबमधल्या शेतकरी आंदोलनाचे नेते. काळे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते दिल्लीहून पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं - ‘‘आम्ही पंजाबी माणसं. आमचं मोठेपण (हमारी आन) प्राणपणानं जपतो. मी खासदार. हा आमदारसुद्धा नाही! मात्र, जोशी यांची तळमळ, त्यांची मांडणी, त्यांचं वक्तृत्व यांनी प्रभावित होऊन आम्ही एकमुखानं त्यांना आपला नेता मानलं. त्यांच्या नेतृत्वाखाली एक लाख शीख आणि हिंदू शेतकऱ्यांनी एकत्रितपणे राजभवनला वेढा घातला. आंदोलनाची तयारी करायची, तर किती बारकाईनं अनेक पैलूंचा विचार करून रचना करायची ते आम्ही जोशी यांच्याकडून शिकलो.’’ एका मराठी माणसाच्या अद्‌भुत यशाचं हे महाकाव्य आहे, ते समजावं म्हणून तरी प्रत्येक मराठी माणसानं या पुस्तकातलं ‘अटकेपार’ हे प्रकरण वाचायला हवं.

पंजाबच्या झंझावती यशाइतकंच किंवा खरंतर त्याहूनही खूप मोठी अशी जोशी यांची कामगिरी म्हणजे स्त्रियांच्या संघटना आणि त्यांची आंदोलनं. महात्मा गांधी यांनी स्त्रियांना घरातून बाहेर काढून चळवळीत आणलं. जोशी यांच्या रचनेत शेतकरी स्त्रियांनीच आंदोलनं केली. चांदवडसारख्या ठिकाणी पन्नास हजार शेतकरी महिलांच्या भव्य सभा झाल्या. बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या, घोषणा देणाऱ्या फक्त स्त्रियाच! या पुरुषप्रधान देशातले लोक विस्मयचकित नव्हे, तर भयचकित होऊन पाहत होते. पुरुषांचं राहूदेत; स्त्री मुक्ती आंदोलनातल्या दिल्लीतल्या स्त्रियांच्यासुद्धा कुठल्याच कोष्टकात हे बसणारं नव्हतं. मधू किश्‍वरपासून अनेकजणी फक्त हा चमत्कार पाहायला दिल्लीतून चांदवडला गेल्या. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ यांतले स्त्रियांचे प्रश्‍न, मानसिकता आणि कुवत या फार वेगळ्या गोष्टी आहेत, हे या आंदोलनांनी अधोरखित केलं. या आंदोलनांतून ‘परसदारची शेती’ किंवा ‘सीता शेती’ ही अभिनव गोष्ट राबवण्यात आली. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरुषप्रधान देशातल्या अनेक शेतकऱ्यांनी सातबारा एकत्रितपणे नवरा आणि बायको यांच्या नावावर केला!

जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलूही लेखकानं नीटपणे समजावून दिले आहेत. असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रतिभा, प्रामाणिक, पारदर्शक स्वभाव, स्वच्छ प्रतिमा, यातना सहन करत धडाडीनं पुढं जाणं अशा अनेक गोष्टी आहेत. जोशी यांचं पाठांतर विलक्षण होतं. अनेक मराठी, इंग्रजी कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्यातली आवडलेली केशवसुतांची ‘सावध ऐका पुढल्या हाका’ ही ओळ त्यांनी संघटनेसाठी स्वीकारली होती. महत्त्वाचं म्हणजे एखाद्या कॉपीरायटरप्रमाणं ते सहजपणे वाक्‍यं फेकत. लोकमान्य टिळक म्हणाले होते - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ शरद जोशी यांनी सांगितलं - ‘जन्मसिद्ध हक्क वगैरे काही नसतं. आपण म्हणूया- शेतीमालाला रास्त भाव हा आमचा ‘श्रमसिद्ध’ हक्क आहे.’

अर्थात हे सारं सांगत असतानाच लेखक व्यक्तीपूजेत अजिबात गुंतलेला नाही. या आंदोलनाला मिळालेल्या मर्यादित यशाच्या कारणांचीही लेखकानं वस्तुनिष्ठ चर्चा केली आहे. ‘आंदोलनाची मांडणीच कदाचित चुकली असेल. खेडेगावातल्या लोकांचंच हे आंदोलन आहे किंवा हे शहरी लोकांच्या विरुद्ध आहे, असा समज कळतनकळत समाजात पसरवला गेला. एकाच मुद्‌द्‌याभोवती, चकव्यात सापल्यासारखं आंदोलन फिरत राहिलं. प्रथम राजकारण नाकारणे आणि नंतर अयोग्यवेळी राजकारणात उतरणं,’ अशी अनेक कारणं त्यात आहेत.

शरद जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या कमकुवत गोष्टीही लेखकानं सांगितल्या आहेत. स्वभावातला एककल्लीपणा आणि तिरसटपणा, संघटनेचा एकतंत्री कारभार, मिळालेल्या यशात इतर कुणालाही वाटा मिळणार नाही याची काळजी! ...खरंतर या एकतंत्री आणि एकस्तंभी रचनेमुळं संघटना अनेकदा फुटली; पण तरीही संघटनेत कधी उभी फूट पडली नाही आणि या माणसाचा करिष्मा असा होता, की वेगळे झालेले बहुतेक गट जोशी यांचं मोठेपण मान्य करत राहीले. राजू शेट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन केली, त्यावेळी मी स्वत: त्यांची एक विस्तृत मुलाखत घेतली होती. त्यात ते म्हणाले होते - ‘मी शेतकरी संघटनेत उशीरा आलो. म्हणजे जोशी माझे आजोबा, मी त्यांचा नातू असे काहीसे! एकदोन मुद्‌द्‌यांवर कळीचे मतभेद असले, तरी आमच्या मनात तेच आमचे नेते आहेत.’ असा हा करिष्मा जवळ होता; पण त्याचवेळी कारण नसताना दुखावू शकणारा अहंकारही होता. चांदवडची सभा झाल्यावर त्यांनी मृणालताई आणि प्रमिलाताईंना विचारलं होतं - ‘असं काही करणं तुम्हाला स्वप्नात तरी जमेल का?’

हा माणूस कसा घडत गेला असेल, याची अस्वस्थ शोधयात्रा या पुस्तकात आहे. या प्रयत्नांतली फक्त एक गोष्ट लक्षात घेऊ. भारतात परत येऊन अंगारमळ्यात शेती करण्यापूर्वी जोशी हे स्वित्झर्लंडमध्ये यूएनएच्या कार्यालयात फार मोठ्या पदावर भरभक्कम पगारावर नोकरी करत होते. ही नोकरी सोडून ते अंगारमळ्याला का आले, हे समजावं म्हणून काळे थेट स्वित्झर्लंडला गेले. तिथं जोशी यांचे आठ वर्षे शेजारी आणि सहकारी असलेल्या टोनी डेर होवसेपियांबरोबर त्यांनी प्रदीर्घ चर्चा केल्या. जोशी यांच्या स्वभावातले आणखी अनेक मजेशीर पैलू या चर्चेतून पुढं येतात. त्याचप्रमाणं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या या कार्यात गरीब देशांचं काहीही कल्याण न होता फक्‍त उधळपट्टी होते. आपली नोकरी अप्रत्यक्षरित्या या भ्रष्ट यंत्रणेचा भाग आहे, हे त्यांना जाणवलं आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. दोन अतिशय वेगळे मुद्दे या पुस्तकाच्या वाचनातून नकळत आपल्यासमोर येतात. महाराष्ट्रातली जातीयता फार वरवरची आहे. खेड्यापाड्यातील आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी जीन्स घालत हिंडणाऱ्या जोशी यांना आपला नेता मानलं. दुसरी गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच माणसानं नवा कोरा करकरीत विचार दिला, त्याच्या आधारावर संघटना उभारली आणि त्या संघटनेच्या जोरावर रस्त्यात आंदोलनं केली, असं दुसरं उदाहरण नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातही हे फक्त महात्मा गांधी यांनी केलं होतं. तसं पाहिलं, तर त्यांनाही तयार असलेली संघटना मिळाली होती, त्यांनी फक्त ती वाढवली.

या पुस्तकाच्या वाचनातून अशा अनेक गोष्टी समोर येतात. गेल्या पन्नास वर्षांतल्या महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पट उलगडतो. म्हणजे मराठी साहित्याचा मानदंड ठरावं, असं हे पुस्तक आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्रं, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं सुमती देवस्थळे यांचं ‘टॉलस्टॉय एक माणूस’... या मार्गावरचं हे एक पुढचं दमदार पाऊल आहे.

पुस्तकाचं नाव - ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’
लेखक : भानू काळे
प्रकाशक - ऊर्मी प्रकाशन, औंध, पुणे
पृष्ठं : ५१०/ मूल्य : ५०० रुपये

द्वारा : https://www.esakal.com/saptarang
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.