अवघा देहचि वृक्ष जाहला

वीणा गवाणकर

/media/अवघा देहचि वृक्ष जाहला_index.jpg

वृक्षकारणे नृत्य - लोकसत्ता टीम

"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! " हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्‍या पर्यावरणरक्षकाची ही प्रेरणादायी चरितकहाणी...

वृक्षसंवर्धनाची चळवळ जगभर उभारणारे रिचर्ड बेकर यांच्यावरील ‘अवघा देहचि वृक्ष जाहला’ हे वीणा गवाणकर लिखित पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील संक्षिप्त प्रकरण..
केनियातील स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं नवी जंगलं उभी करण्याचं स्वप्न बेकर पाहत होते. पण हे काम वाटलं तेवढं सोपं नव्हतंच. कुऱ्हाडीचे घाव घालून वृक्षतोड करण्याची आणि आगी लावून जमिनी भाजून काढण्याची परंपरा असणाऱ्या लोकांना झाड लावायचं असतं, हे माहीतच नव्हतं. रोपं तयार करून ती नेऊन अन्यत्र लावण्यासाठी कोणी तयारच होईना. बेकर यांनी आपली ही समस्या किकूयू नायक अंजोंजो याच्यासमोर मांडली. अंजोंजोशी चर्चा करताना, आपल्या अडचणींविषयी बोलताना बेकरना कारण समजलं : पूर्व आफ्रिकेत स्थानिक टोळय़ांच्या आचारामागे, रिवाजामागे एक परंपरा होती. रूढींची बंधनं होती. धार्मिक समजुती होत्या. विवाहविधी, नवजात बालकांचं स्वागत, फळतोडणी, शेतीची कामं, पीक कापणी.. प्रत्येक विधी परमेश्वरी आदेशानुसार, त्यासाठी असलेल्या खास नृत्यसमारंभात पार पाडला जाई. प्रत्येक कार्यासाठी, विधीसाठी विवक्षित नृत्य असे. वृक्षारोपणाचं नृत्य नव्हतं. म्हणून तो विधी वा संस्कार त्या लोकांत नव्हता.

‘‘झाडं लावणं हे देवाचं काम! आम्ही त्यात ढवळाढवळ करू शकत नाही.’’ नायक अंजोंजोनं स्पष्ट शब्दांत कारण सांगितलं तेव्हा शेवटी निकरानं बेकर यांनी विचारलं, ‘‘देवानं लावलेली झाडं तुम्ही कापता. अशी सगळीच झाडं नष्ट झाली तर तुमचं, माझं, जगाचं भवितव्य काय?’’ वृक्षारोपणाचं महत्त्व बेकर यांनी त्याला परोपरीनं पटवून दिलं. देवानं जन्माला घातलेले मातृवृक्षच राहिले नाहीत तर नवे वृक्ष कुठून येतील? पुढच्या पिढय़ांचं काय? नायक अंजोंजोशी चर्चा करून बेकर त्याचं मतपरिवर्तन करण्यात यशस्वी झाले. जोसाया अंजोंजोनी त्यांना सांगितलं, ‘‘एखादं खास नृत्य तयार करा. त्याच्यासाठी नृत्यस्पर्धा घ्या. आमचे तरुण योद्धे त्या स्पर्धेत भाग घेतील.’’ रिचर्ड बेकर नव्या अभ्यासाला लागले. त्यांनी स्थानिक तालवाद्यांचा, लोकगीतांचा अभ्यास केला. स्थानिक भाषेत गीत रचलं. सर्व टोळी नायकांकडून त्यासाठी मान्यता मिळवली. एकूण १२ टोळी नायकांच्या सहकार्यानं रिचर्ड बेकर यांनी नृत्य-स्पर्धा आयोजली. या टोळय़ांतील तरुण नर्तक हे खरे तर तरुण योद्धेच. स्थानिक भाषेत ‘मोरान’. कायम शस्त्रसज्ज असणारे. हे तरुण अविवाहित आणि लढवय्या गटातले. अशा या नर्तकांना नृत्याच्या या कार्यक्रमात तरुण नर्तकीही भेटणार होत्या. तीन हजार स्पर्धक जमतील असा अंदाज होता.

ही वार्ता नैरोबीत वरिष्ठांच्या कानी न जाती तरच नवल. तीन हजार सशस्त्र योद्धे-नर्तक एकसमयावच्छेदेकरून एकत्र जमणार असतील तर? ते अचानक भावनोद्दीपित झाले तर? किती आणि काय विपरीत घडू शकेल! अशी आशंका इंग्रज वरिष्ठांना आली असली, तरी अमेरिकन कॉन्सल जनरलनी मात्र या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी बेकरना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं. या कार्यक्रमासाठी इटलीचे कॉन्सल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. २२ जुलै १९२२ रोजी ही स्पर्धा होणार होती. एक दिवस आधीपासूनच ‘मोरान’ स्पर्धक मुगुगावर जमायला सुरुवात झाली. बेकर यांच्या निवासस्थानाभोवतीच त्यांची पालं पडली. तीन एक हजार नर्तक जमले. दुसऱ्या दिवशी त्यात सुमारे दोन हजार बघ्यांची भर पडली. सकाळपासूनच नर्तकांनी आपल्या रंगभूषेला सुरुवात केली.

बेकर यांनी खास निमंत्रित केलेली पाहुणे मंडळी दाखल झाली. बंगल्याच्या व्हरांडय़ात दुपारचं भोजन झालं. १२ टोळी नायकही उपस्थित झाले. दुपार कलली. नायक अंजोंजोने दुभाषा म्हणून सूत्रं हातात घेतली. बेकर यांना स्वाहिली भाषा उत्तम अवगत असली, तरी जमलेल्या इतर टोळय़ांच्या भाषा थोडय़ा वेगळय़ाच होत्या. त्यामुळे अंजोंजोची भूमिका महत्त्वाची होती. बेकर यांनी व्हरांडय़ात उभं राहून स्वाहिलीत बोलायला सुरुवात केली. वृक्ष लावण्याचं, त्यांचं संवर्धन करण्याचं महत्त्व सांगितलं. मग किकूयू टोळय़ांच्या वर्मावर बोट ठेवत म्हणाले, ‘‘ते मसाई तुम्हा किकूयूंना काय म्हणतात माहिताय? तुम्हाला ते ‘जंगलविनाशक’ म्हणतात.’’ बेकर यांच्या तोंडचं हे वाक्य ऐकून सगळीकडे नि:शब्द शांतता पसरली. किकूयूंचे मसाई हे परंपरागत शत्रू. त्यांनी आपल्याला असं म्हणावं, हे किकूयूंना खुपलंच. चांगलंच झोंबलं. ‘‘..पण त्यांचं तरी काय चुकंलं? तुम्ही झाडं तोडता. लाकडं जाळता. तुमच्या स्त्रियांना दोन दोन दिवस हिंडून जळणासाठी लाकूडफाटा गोळा करावा लागतो. तेव्हा कुठे तुमची चूल पेटते. तुम्ही जंगलंच नष्ट केलीत. आता तुम्ही जंगलं तयार केली पाहिजेत. वाढवली पाहिजेत. तरच तुम्हाला लाकूड मिळेल. उंच उंच वृक्ष पुन्हा तयार होतील तेव्हा दिवस बदलतील. तुम्ही झाडं लावणारी माणसं बनलात, तरच मसाई तुमचा आदर करतील. नव्हे, तुमची असूयाही करू लागतील..’’ बेकर बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकता ऐकता नर्तकांतून हुंकार भरले जाऊ लागले.

‘‘मला स्वयंसेवक हवेत. आपण झाडं लावू आणि वर्षांनुवर्ष त्यांची देखभाल करू – असं त्या स्वयंसेवकांनी शपथपूर्वक सांगावं.. आहे कोणी तयार?’’ बेकर यांनी आवाहन केलं. मोठय़ा प्रमाणावर तरुणांनी संघटित होऊन वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन करावं, हे काम त्यांनी स्वयंस्फूर्तीने करावं – अशा हेतूनं बेकर तरुणांना आवाहन करत होते. ‘‘आपण Watu wa Miti, (Men of the Trees)(वृक्षमित्र) संघटना स्थापन करणार आहोत..’’ बेकर यांचे हे उद्गार ऐकताच शेकडो तरुण पुढे सरसावले.

बेकर यांचं भाषण संपलं. आफ्रिकन ड्रम्सनी ताल धरला. एरवी युद्धासाठी प्रोत्साहन देणारे, युद्धासाठी ललकारणारे ड्रम्स आता शांततेसाठी, वृक्षारोपणासाठी ताल देत होते. रिचर्ड बेकर भरल्या मनानं, समाधानानं समोरचं नृत्य पाहत होते. वृक्षारोपणासाठी त्यांनी तयार केलेल्या ताल- रचना ड्रम्सवर वाजू लागल्या.. त्या तालावर नृत्यस्पर्धा सुरू झाली. एका एका टोळीचा नर्तक समूह त्या तालावर रिंगणात येत होता. आपला नृत्याविष्कार सादर करत होता. सर्व टोळय़ांच्या नृत्यपथकांनी आपापलं नृत्य साकार केलं. ड्रम्स जलद गतीत वाजू लागले. तीन हजार नर्तक त्या तालावर पदन्यास करू लागले. वातावरण भारल्यागत झालं. नेहमी युद्धसज्ज असणारे ‘मोरान’ नृत्यात देहभान विसरले होते.. बेकर यांचा नवा संस्कार पेरला जात होता. तो रुजणार.. अंकुरणार.. वाढणार होता.

वृक्षारोपणासाठीचं हे पहिलं नृत्य. The First Dance of the Trees. (पुढे १९७० सालापासून सामाजिक वनीकरणाचा विचार राबवला जाऊ लागला. बेकर यांनी त्याची पेरणी भटक्या विमुक्त आफ्रिकन टोळय़ांत ५० वर्ष आधीच सुरू केली होती.)

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा