स्फुट लेखन

वीणा गवाणकर

/media/स्फुट लेखन_ch-12.jpg

श्रेयस दिसत गेले.. - veena.gavankar@gmail.com

आठ-नऊ वर्षांच्या आमच्या मुलीच्या आग्रहाखातर मी ‘काव्‍‌र्हरची गोष्ट’ लिहायला घेतली, त्या वेळी माझ्याही नकळत माझ्या मदतीला आले ते माझे वाचन. या वाचनाने मला उदंड शब्दसमृद्धी दिली. वाचनाने मला सादरीकरणासाठी ‘भाषा’ दिली. काढलेल्या नोंदीत भर टाकताना ग्रंथपालन मदतीला आलं. मी हे का करत होते? सुखवस्तू जीवन जगत असताना श्रेयसचंही दर्शन त्यांना घडावं, पैसा-कीर्ती-मानसन्मान यातच जीवनाची सार्थकता नसते, यश पैशात मोजायचं नसतं हे त्यांना काव्‍‌र्हरच्या उदाहरणाने कळावं म्हणून.. लिहिलं माझ्या लहान मुलांसाठी आणि झालं मात्र ते सर्वासाठीच. काव्‍‌र्हरच्या श्रेयसला सर्वानीच दाद दिली. काव्‍‌र्हर चरित्राच्या यशाने मला आत्मविश्वास दिला. माझ्या वाचनात ‘निवड’ आणली. मला श्रेयस दिसत गेले. मी त्याचा अधिक शोध घेत गेले..

चाळीस वर्षांपूर्वी माझी लेखनाची सुरुवात झाली तीच मुळी ‘श्रेयस’चे बोट धरून. ‘प्रेयस’मध्ये न रमता आयुष्यभर ‘श्रेयस’ अनुसरत राहाणारा काव्‍‌र्हर. विपरीत परिस्थितीवर मात करत, अपार कष्ट घेत त्यानं स्वत:च्या सुरक्षित जीवनाला सुरुवात केलीही; पण डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन यांची मदतीसाठीची हाक येताच कीर्ती, पैसा, यश साऱ्यांकडे पाठ फिरवून तो एका खेडय़ात गेला. तीच त्याची कर्मभूमी झाली. स्वत:च्या बांधवांना अज्ञानाच्या आणि भुकेच्या खाईतून वर काढण्याच्या प्रयत्नात त्याने अवघ्या मानवजातीलाच नवा विचार दिला, नवी दिशा दाखवली. या डॉ. जॉर्ज वॉ. काव्‍‌र्हरनीच मला श्रेयसचं मोल पटवून दिलं. श्रेयसचा पुरस्कार करणं किती गरजेचं आहे हे दाखवून दिलं. लेखक एकच पुस्तक पुन:पुन्हा लिहीत असतो म्हणतात. माझ्याबाबतीत तसंच घडलं असावं आणि त्याचं कारणही काव्‍‌र्हरच असावा. प्रेयस बाजूला सारून श्रेयस अनुसरत आलेले माझ्या अभ्यासाचा आणि पुस्तकांचा विषय झाले. मात्र, मी जे लिहिलं ते मला केवळ काही सांगायचं आहे म्हणून नव्हे, तर माझ्याकडे सांगण्यासारखं काही आहे, हे मला पटल्यावरच आणि लिहिलं तेही मला स्वत:ला वाचायला आवडेल तसंच. कारण मी मुळात एक वाचक आहे.

बालपणापासून जपलेल्या आणि जोपासलेल्या वाचनाच्या छंदानेच मला इथवर आणून पोचवलंय. ज्या किशोरवयात रोमहर्षक, प्रणयरम्य, भावविभोर कथा-कादंबऱ्या-कविता वाचल्या जातात त्या वयापासून मी चरित्र-बखरी-प्रवासवर्णनं – विज्ञानकथा वाचत आलेय. वाचनाचा हा नाद अधिक पोसला गेला तो पुढे फग्र्युसन कॉलेजच्या समृद्ध जेरबाई वाडिया ग्रंथालयात आणि पुणे विद्यापीठात ग्रंथपालन पदविका अभ्यासक्रम पार पाडत असताना जयकर ग्रंथालयात. शिक्षण संपताच नोकरी मिळाली, तीही औरंगाबादेत मिलिंद कला महाविद्यालयात गं्रथपाल म्हणून. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलेलं दर्जेदार, समृद्ध ग्रंथालय ते आणि मी तिथे गं्रथपाल. तिथल्या साडेचार वर्षांच्या वास्तव्यात केलं ते फक्त वाचन, वाचन आणि वाचन. मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल दिवंगत के. द. वडजीकर हे मला सीनियर, उत्तम वाचक. त्यांनी मला काय, कसं वाचावं याची दीक्षाच दिली. त्या ग्रंथालयात नोकरी करताना, आपला कार्यभार सांभाळताना प्रामुख्यानं जाणवत गेलं ते हेच – ‘‘आपण फक्त साक्षर आहोत.’’ ज्ञानाची विविध क्षेत्रं, त्यात संदर्भ शोधणे, विविध पुस्तकांना त्यांच्या योग्य वाचकांपर्यंत पोचवणे, वाचकाची गरज समजून घेऊन तिची पूर्तता करणे वगैरे कामं पार पाडताना माझीच समजूत वाढत गेली. ग्रंथपालाला कोणताही विषय वर्ज्य वा नावडणारा असू शकत नाही हेही समजत गेले आणि पुस्तकं जोखायलाही मी तिथंच शिकत गेले.

आठ-नऊ वर्षांच्या आमच्या मुलीच्या आग्रहाखातर मी ‘काव्‍‌र्हरची गोष्ट’ लिहायला घेतली, त्या वेळी माझ्याही नकळत माझ्या मदतीला आले ते माझे वाचन. या वाचनाने मला उदंड शब्दसमृद्धी दिली. वाचनाने मला सादरीकरणासाठी ‘भाषा’ दिली. काढलेल्या नोंदीत भर टाकताना ग्रंथपालन मदतीला आलं. वाचणं, माहिती जमवणं हा माझ्या कामाच्या नव्हे तर आनंदाचाच भाग होता आणि कुणाला काय सांगायचंय हा फोकस आधीच मनाशी निश्चित झालेला असल्याने वाचता वाचता संदर्भाची निवडही होत होती आणि मी हे का करत होते? सुखवस्तू जीव जगत असताना श्रेयसचंही दर्शन त्यांना घडावं, पैसा-कीर्ती-मानसन्मान यातच जीवनाची सार्थकता नसते, यश पैशात मोजायचं नसतं हे त्यांना काव्‍‌र्हरच्या उदाहरणाने कळावं म्हणून.. लिहिलं माझ्या लहान मुलांसाठी आणि झालं मात्र ते सर्वासाठीच, काव्‍‌र्हरच्या श्रेयसला सर्वानीच दाद दिली. काव्‍‌र्हर चरित्राच्या यशाने मला आत्मविश्वास दिला. माझ्या वाचनात ‘निवड’ आणली. मला श्रेयस दिसत गेले. मी त्याचा अधिक शोध घेत गेले.

संपन्न अमेरिकन जीवन मागे सोडून ग्रामीण भारतात आरोग्य सेवा देण्यासाठी आलेली डॉ. आयडा स्कडर मला भेटली ती अमेरिकन इन्फर्मेशन सेंटरच्या ग्रंथालयाच्या पायरीवर. नको असलेली जुनी पुस्तकं त्या पायरीवर मांडलेली होती. त्यातलं सहज एक उचललं. त्यातल्या छायाचित्रांनी माझी उत्सुकता चाळवली. एका गोऱ्या बाईच्या कडेवर काळं मूल. तिच्या अवतीभवती अशीच काळी-सावळी, उघडीवाघडी, मुलं. ते पुस्तक मी घरी आणलं आणि पुढची दीड वर्ष मी आयडाचा शोध घेत राहिले. तिच्या कर्मभूमीत काडपाडी – वेल्लोरला जाऊन तिचा शोध घेतला. ही गोष्ट १९८३-८४ मधली. संपर्काची माध्यमं म्हणावी तर फक्त साधा, डायल फिरवून ट्रंक कॉल नोंदवायचा फोन. ना इंटरनेट, ना मोबाइल. आठ दिवस तिथे राहून आयडाचा शोध राहिले. आयडाच्या डॉक्टर होण्याच्या आणि ग्रामीण भारतातील स्त्रीच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील राहाण्याच्या निर्णयाने मला श्रेयसाचा एक नवा पैलू दाखवला. डॉ. आयडा स्कडरवर लिहून ते हातावेगळं करते न करते तोच दिलीप माजगावकरांनी डॉ. सलीम अलींच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द फॉल ऑफ ए स्पॅरो’चा (ळँीों’’ ऋ ं २स्र्ं११६) अनुवाद करावा म्हणून मला सुचवलं. मी ते आत्मचरित्र वाचले आणि अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना एकदा भेटावं असं ठरवलं. त्यांची भेट मागण्याच्या प्रयत्नात मी असतानाच डॉ. सलीम अली गेले आणि मग मी सहज म्हणून ‘बीएनएचएस’मध्ये जाऊन त्यांच्या सहकाऱ्यांना भेटले. त्या सहकाऱ्यांनी आपल्या या थोर गुरूच्या अनेक आठवणी सांगितल्या. पुढचे किती तरी दिवस मी छोटा वॉकमन घेऊन ‘बीएनएचएस’मध्ये जात होते. आठवणी ध्वनिमुद्रित करत असे आणि हे करता करता मनाशी ठरवत गेले. अनुवादाचे नंतर पाहू. प्रथम या आठवणी जमवू.. डॉ. सलीम अलींच्या जुन्या पत्रव्यवहाराच्या कार्बन कॉपीज, या मुलाखती, वृत्तपत्रीय कात्रणे, लेख यांच्यातून एक स्वतंत्र चरित्र साकार झाले. डॉ. सलीम अलींनी आत्मचरित्रात न भरलेले तपशील मला त्यांच्या चरित्रात सांगता आले. कोणत्याही कामगिरीचं श्रेय आत्मचरित्रात स्वत:च्या नावे नोंदवायचं त्यांनी टाळलंय. आत्मश्लाघा टाळलीय. भारतीय पक्षिशास्त्रातील त्यांचं योगदान सांगण्याची संधी मला लाभली; हे मला विशेष वाटतं. हे चरित्र लिहिण्यासाठी मी खूप माहिती जमवली होती. ती नेमकी कशी ग्रथित करावी ते समजत नव्हतं. मग मी ते बाड चक्क तीन महिने बासनात बांधून ठेवलं. काय आणि कसं सांगायचं हे नक्की झाल्यावर मजकुरासाठी निवड केली. जी माहिती चरित्रासाठी वापरली त्याच्या दुप्पट साहित्य संदर्भ मी बाजूला केले. आपण जमवलेली माहिती काहीही करून संहितेत घुसवलीच पाहिजे हा मोह टाळला.

आपणच जमवलेली माहिती न वापरता ती ‘निर्दयपणे’ बाजूला सारण्याचा अवघड निर्णय घ्यायला मी शिकले. हा अनुभव मला नंतरही उपयोगी पडला. माहिती निवडण्यात तारतम्य आलं. मराठी साहित्यात आणि राजकीय इतिहासात अत्यंत तुरळक नोंदी असलेल्या

डॉ. पां. स. खानखोजेंचा शोध चार वर्ष मी घेत होते. मुंबई – दिल्ली – कोलकाता – नागपूर – पुणे असा महिनाभराचा शोधप्रवास होता तो. घरी परतले तेव्हा भाराभर झेरॉक्स कागदांनी बॅग्ज भरल्या होत्या, त्या कागदपत्रांची छाननी करून विगतवारीने ती मांडताना वर्ष-दीड वर्षांत वाचलेली त्यांच्या समकालीनांची चरित्रे मदतीला आली. त्या गुहेत वावरताना प्रकाशकिरण माझा मार्ग उजळत गेले. त्या अभ्यासात डॉ. खानखोजे यांच्या आगळ्या वृत्तीनं मी विलक्षण भारावून गेले होते. १९११ मध्ये अमेरिकेच्या टस्कगीत डॉ. जॉर्ज वॉशिंग्टनना भेटलेले हे क्रांतिकारक. सात दिवस तिथे मुक्काम ठोकून तिथल्या कृषी प्रणालीचा अभ्यास करतात. स्वतंत्र भारतात ती प्रणाली वापरून शेती सुधारणा घडवून आणण्याचे स्वप्न पाहतात.

डॉ. खानखोजेंनी अमेरिकन विद्यापीठातून कृषी विषयात बी.एस., एम.एस. केलेलं. डॉक्टरेटसाठी नावही नोंदवलेलं. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी गदरचा उठाव घडवून आणण्याचे प्रयत्न विफल झाले. खानखोजेंचे नाव ब्रिटिशांनी काळ्या यादीत टाकले. मातृभूमीला पारख्या झालेल्या या कृषितज्ज्ञाने मेक्सिकोत आश्रय घेतला. पुढची पंचवीस वर्ष भारतातल्या नव्हे, मेक्सिकन इंडियन्सच्या उत्कर्षांसाठी आपलं ज्ञान राबवलं. कृषिशास्त्राचा उचित वापर करत तिथला अन्नधान्य तुटवडा संपवला, कृषिशाळा चालवून इंडियन्सना प्रशिक्षित केलं. तिथल्या विद्यापीठातून स्पॅनिशमधून जेनेटिक्स शिकवलं. ‘वसुधैव कुटुंबकम्’ उक्तीचं अनुकरण इतक्या सार्थपणे करता येण्यासाठी मनाची एक वेगळी घडण असावी लागते. मला खानखोजेंचं वेगळेपण जाणवलं ते त्यांच्या या वृत्तीचं.

विलासराव साळुंखे यांचं चरित्र लिहिण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला गेला तेव्हा मी तो लागलीच स्वीकारला नाही. दोन महिने आधी अभ्यास करते, मग कळवते सांगितलं. विलासरावांचे अवघे जीवनकार्य जलव्यवस्थापनाभोवती गुंफलेलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारण, जलव्यवस्थापन वगैरे उपाययोजना त्यांनी राबवलेल्या. मी शंभर इंच पावसाच्या प्रदेशातली. पाण्याचा दुष्काळ मला माहीतच नाही. त्यांचे समन्यायी पाणीवाटपाचे विचार तर मला गांगरून सोडणारे. त्या चरित्रासाठी साहित्याची जमवाजमव करत असताना विलासरावांच्या पाणी पंचायत योजनेच्या लाभार्थीच्या मुलाखती घेणे अपरिहार्यच होते. तज्ज्ञांच्याही मुलाखती घ्याव्या लागल्या. आपले व्यवस्थित चालणारे दोन कारखाने कर्जात लोटले गेले तरी त्याची तमा न बाळगता हा इंजिनीयर आपल्या विहित सामाजिक कार्याची पूर्तता करत राहिला. कारखाने फारच अडचणीत आले तेव्हा समाजकार्य काही काळ बाजूला ठेवून कारखान्यांना पूर्व-सुस्थितीत आणण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडून ते पत्नीच्या आणि सहकाऱ्यांच्या ताब्यात दिले आणि पुन्हा स्वत:ला पाणीप्रश्नाला जुंपून घेतलं. ग्रामीण भागातील बहुसंख्य ‘नाही रे’वाल्यांचा विकास व्हायचा असेल, तर विकासाचं मुख्य साधन पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, या एकाच ध्यासानं विलासराव जलव्यवस्थापनांचे प्रयोग करत होते. त्या प्रयत्नांना आधार होता तो त्यांनी कष्टपूर्वक उभ्या केलेल्या प्रयोग-प्रकल्पांचा, पाणीपंचायत योजनांचा.

समन्यायी पाणी-वाटपाचा आणि पाणी व्यवस्थापनाचा नवा विचार मांडून पाणी चळवळीला वेगळी दिशा देणारे विलासराव हे भारतात पहिले. प्रगती तरी कशाला म्हणायचं! आदर्श विचार व्यवहारात उतरवणं म्हणजे प्रगती. ‘आहे’कडून ‘असावं’कडे जाणं हाच विकास. ‘आहे’ आणि ‘असावं’ यात नेहमीच संघर्ष असतो. या संघर्षांत ‘असावं’ची बाजू निर्धाराने, निधडेपणाने लढवणारे काव्‍‌र्हर, खानखोजे, विलासराव यांचं वेगळेपण मला अभ्यसनीय वाटत राहिलं.

माझ्या पुस्तकवेडाने दोन महत्त्वाच्या शास्त्रज्ञ-स्त्रिया माझ्या आयुष्यात आल्या. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भौतिकशास्त्रात महत्त्वाच्या अणुविखंडनाचा शोध लावणारी लीझ माईट्नर आणि उत्तरार्धात जीवशास्त्रात डीएनएवर मोलाचं संशोधन करणारी रोझलिंड फ्रँकलिन.. दोघींचंही संशोधन नोबेल पुरस्काराच्या तोडीचं; पण दोघीही त्यांच्या चलाख सहसंशोधक पुरुष शास्त्रज्ञांमुळे नोबेल पुरस्काराला वंचित झाल्या. त्या श्रेयाला मुकल्या. त्यांची वैज्ञानिक कारकीर्द धूसर राहिली. त्या दोघींचं मोठेपण, वेगळेपण हे की, त्या काळात पुरुष मक्तेदारीला खंबीरपणे तोंड देत, विज्ञाननिष्ठा कायम राखत त्यांनी आपलं संशोधन अखंड राखलं. प्रसिद्धी, पैशाच्या आमिषाला बळी न पडता स्वत्व राखलं. अत्यंत अडचणीच्या काळातही कोणत्या प्रकारे स्वत:चं स्खलन होऊ दिलं नाही. पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ स्त्रियांसाठी त्या ‘रोल मॉडेल’ ठरल्या. त्यांची परिचयात्मक चरित्रे लिहिताना मला खूप अभ्यासून, त्यांना समजून घेऊन सादर करावे लागले. त्यातून एक वेगळे समाधानही लाभले.

‘‘तुम्ही फक्त चरित्रेच का लिहिता? कादंबरी लेखनाकडे कशा वळला नाहीत?’’ असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. त्याचं उत्तर एकच असतं, मला न जमणाऱ्या पट्टीत गाता येत नाही. कादंबरी लिहिण्यासाठी आवश्यक ती क्षमता माझ्याकडे नाही; पण मी लिहिलेली चरित्रं अनेकांना कादंबरीसाठी विषय देऊ शकतात. चरित्रकार म्हणून मी त्या त्या चरित्रनायकाच्या आयुष्यातील घटना, तपशील एक्सपोज करते. वाचकांवर माझे विचार, माझी मतं इम्पोझ करत नाही. मात्र, वाचत असताना वाचकाचे अ‍ॅक्टिव्ह रीडिंग होणे मला महत्त्वाचे वाटते. उदाहरणार्थ, भारतातील आद्य डिझायनर्सपैकी एक आमच्या वसईतले रॉबी डिसिल्वा. त्यांच्या शैक्षणिक काळातील अडचणी सांगताना एक प्रसंग मी सांगते. विपन्नावस्थेत ते लंडनमध्ये जगत असताना स्वत:ला जगवण्यासाठी ते शौचालये स्वच्छ करण्याचे काम स्वीकारतात, प्रसंगी रस्त्याच्या कडेला पडलेलं उचलूनही खातात. हे प्रसंग सांगताना मी काही भाष्य करत नाही, रॉबींच्या मनात कोणते भावनाकल्लोळ उसळले असतील त्याचे वर्णन करत नाही. मी ते वाचकांवर सोपवते. नुकताच मी ‘गोल्डा मेयर’ चरित्राचा पहिला मसुदा तयार करत होते. प्रसंग असा होता की, नुकतेच इस्रायलमध्ये योम किपूर युद्ध संपलेय. त्यात अडीच हजार इस्रायली सैनिक मारले गेलेत. काहीशे इस्रायली सैनिक युद्धकैदी म्हणून सीरिया-इजिप्तच्या ताब्यात आहेत. काही दिवसांनी त्यांची सुटका होते. ते तेल अविवच्या विमानतळावर उतरतात तेव्हा इस्रायली नागरिक आणि पंतप्रधान गोल्डा मेयर त्यांच्या स्वागतासाठी हजर असतात. गोल्डा मेयरला तिथे पाहून जमावातून त्यांच्या निषेधाच्या घोषणा होतात. त्यांना ‘खुनी’ म्हटलं जातं. गोल्डा मेयर गोठून नि:शब्द उभ्या राहतात. मान खाली घालून तिथून निघून जातात. काहीच आठवडय़ांपूर्वी ती जनतेच्या गळ्यातला ताईत असते. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात तिला ८० टक्क्यांवर लोकप्रियता लाभलेली असते. काय वाटलं असेल त्या राष्ट्रमातेला? मी ते वाचकांवर सोपवते.

मी कथा-कादंबऱ्या उदंड वाचल्यात. अजूनही वाचत असते; पण त्यात कुठेही मला आवडणारे हिरो-हिरॉइन्स नसतात. इंग्रजीत अशा स्वरूपाच्या चरित्रात्मक कादंबऱ्या आहेत, पण मराठीत अपवादानेच. मी माझी ती तहान चरित्रलेखनाने भागवते.

माझं हे चरित्रलेखन माझ्यासाठी श्रेयस आणि प्रेयसही ठरत आलंय. काव्‍‌र्हर चरित्र तर आज चाळीस वर्षांनंतरही तिसरी पिढी वाचतेय. ही तिसरी पिढीही मोबाइल, फेसबुकवरून माझ्या संपर्कात येते. माझ्याशी जोडली जाते. दुसऱ्या पिढीतला कुणी संशोधनाकडे वळलेला असतो, कुणी ‘काव्‍‌र्हर’मुळे नैराश्यातून बाहेर पडलेला असतो. कुणी रस्त्यावरच्या निराधारांसाठी आसरा उभा करून त्याला काव्‍‌र्हरचं नाव दिलेलं असतं. आज तोच ‘कुणी’ दीडशे निराधार रुग्णांची, मनोरुग्णांची काळजी घेतोय.. एखादा पाली, सर्प संशोधक माझ्या सर्पतज्ज्ञ रेमंड डिटसार्स, ‘एक होता काव्‍‌र्हर’मुळे आपण प्राणिशास्त्राकडे कसे वळलो, पालींचा अभ्यास कसा केला आणि आज आपल्या नावावर चार नव्या पाली-प्रजाती आहेत असं व्यासपीठावरून सांगतो.. अण्डा सेलमध्ये एकांतवासाची कैद भोगणारा तरुण त्याच्या वाचनात विलासरावांचे चरित्र ‘भगीरथाचे वारस’ आल्यावर मला पत्र लिहितो. कैद संपल्यावर पाणी पंचायत विचार समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यासाठी कल्पनाताई साळुंखेंचा पत्ता मागून घेतो, नंतर तो त्यांना भेटतोही.. चांगल्या पगाराच्या नोकरीत जम बसलेल्या तरुणाला रस्त्यांवरच्या जुन्या पुस्तकांच्या ढिगात माझं ‘डॉ. सलीम अली’ सापडतं. ते वाचल्यानंतर तो नोकरी सोडून निसर्ग, पर्यावरण रक्षणाकडे वळतो. स्वत:ची तशी संस्थाही उभी करतो. त्याचं श्रेय जाहीरपणे मला देतो.. असे किती तरी अनुभव.

अगदी नुकतीच एक नवलाईची घटना समजली. रत्नागिरीतील एक परिचित कुटुंब आमच्या भेटीला आलं होतं. त्यांच्या घरात रोज संध्याकाळी ४ ते ५ या कालावधीत चाळीसेक स्त्रिया जमतात. आध्यात्मिक पठण करतात. सुरुवातीची दहा-पंधरा मिनिटे नवीन काही साहित्य वाचून दाखवण्याचा, एखाद्या पुस्तकावर बोलण्याचा उपक्रम तिथे चालतो. त्या भगिनींनी ‘रॉबी डिसिल्वा’ चरित्राचं तिथे सामुदायिक वाचन केलं. ‘‘आम्हाला हे पुस्तक वाचून ‘डिझाइन’ म्हणून असा काही प्रकार असतो. हे प्रथमच समजलं आणि एखादी व्यक्ती त्यासाठी किती नि कसे कष्ट घेते हेही लक्षात आलं,’’ असं पाहुण्याबाईंनी सांगितलं. १९८०च्या दशकात काव्‍‌र्हरचं असं सामुदायिक वाचन अनेक ठिकाणी होत असल्याचं कानी होतं. आजी रॉबी डिसिल्वाही असे वाचकांपर्यंत पोचताहेत याचा आनंद वेगळाच.

अलीकडे समाजमाध्यमात (फेसबुकवर) वावरू लागल्यावर माझे अनेक तरुण वाचक माझ्या संपर्कात आले, प्रत्यक्षात भेटले. कोणी काव्‍‌र्हरमुळे पुस्तकवाचनाकडे वळला होता, तर उमेद हरवून बसलेल्या कोणाला नवा मार्ग माझ्या पुस्तकातून दिसला होता, कोणी माझं पुस्तक विकत घ्यायला पुरेसे पैसे हातात नसल्याने जवळच्या रक्तपेढीत स्वत:चं रक्त विकून पुस्तक मिळवलं होतं, कुणी त्याच्या धडपडीचं श्रेय मला देऊन त्याची पीएच.डी. त्याच्या मातेला आणि मला अर्पित केली होती.. असे अनुभव किती म्हणून सांगावेत! किती श्रीमंत केलंय या अनुभवांनी मला.. पण त्याचबरोबर जबाबदारीची प्रखर जाणीवही दिलीय. माझ्यावर विश्वासणाऱ्या वाचकांची माझ्याविषयीची विश्वासार्हता मी टिकवणं.. त्यासाठी प्रयत्नांत कमी न पडणं – त्यासाठी स्वत:शी प्रामाणिक राहाणं.. मग श्रेयस की प्रेयस याच्यात संघर्ष उरणार नाही.

मी वयाची पंचाहत्तरी ओलांडलीय. शारीरिक क्षमता कमी पडू लागलीय. दीड वर्षांपूर्वी पेसमेकर बसवून घ्यावा लागला. पेसमेकर बसवण्याची शस्त्रक्रिया चालू होती. माझ्या तोंडावर ऑक्सिजन मास्क होता. चेहऱ्यावर हिरवी चादर. दिसत काही नव्हतं, पण ऐकू येत होतं. ते डॉक्टर आपल्या साहाय्यकाला सांगत होते – ‘अरे, तुम्ही हल्लीचे तरुण काही वाचत नाही.. मी लहानपणी शाळेत यांची पुस्तकं वाचलीत.. या वीणा गवाणकर. लेखिका आहेत, बरं!’ मी धन्य धन्य झाले.

अशीच धन्य धन्य झाले होते २००१ मध्ये. औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात गेले होते. तिथल्या संचालकांनी सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांसमवेत भेटीचा कार्यक्रम ठरवला होता. त्यांनी तेव्हा सांगितलं होतं- ‘‘आमच्या रुग्णालयात प्रत्येक डॉक्टरने आणि कर्मचाऱ्याने इथे रुजू झाल्या झाल्या ‘काव्‍‌र्हर’ आणि ‘आयडा स्कडर’ वाचलं पाहिजे असा आमचा दण्डक आहे!’’

आज गोल्डा मेयर चरित्राचा अंतिम मसुदा तयार करत असताना माझी बौद्धिक आणि शारीरिक क्षमता कसाला लागली. गेली दीड वर्ष मी रोज दहा ते बारा तास यावर काम करत होते.. असं स्वत:ला गुंतवून घेणं ही माझी कमजोरी आहे. आणि ती मला प्रिय आहे.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा