अंकल पै : ए बायोग्राफी - राजेश अय्यर

फिंगरप्रिंट पब्लिशिंग

पाने : ☀ 344 मुल्य (₹): 299.0

/media/अंकल पै : ए बायोग्राफी_Uncle Pai.jpg

केले रंजन ज्यांनी मुलांचे - राहुल गोखले

'अमर चित्र कथा', 'टिंकल' या अनोख्या आणि तितक्याच यशस्वी प्रयोगांतून ज्यांनी मुलांचे रंजन व मूल्यशिक्षण केले, त्या अनंत पै यांचे आयुष्य बहुपेडी होते. त्यांचे बालपण खडतर होते.
'अमर चित्र कथा', 'टिंकल' या अनोख्या आणि तितक्याच यशस्वी प्रयोगांतून ज्यांनी मुलांचे रंजन व मूल्यशिक्षण केले, त्या अनंत पै यांचे आयुष्य बहुपेडी होते. त्यांचे बालपण खडतर होते. बालपणातील अनुभव आणि संस्कार यांचा पगडा त्यांच्यावर आयुष्यभर राहिला. १९७० ते १९९०चे दशक एवढा मोठा कालखंड पै यांच्या अनेकविध प्रयोगांनी गाजला. पै यांच्या जीवनाचा आणि त्यांनी केलेल्या या प्रयोगांचा रंजक धांडोळा राजेश अय्यर यांनी 'अंकल पै : ए बायोग्राफी' या पुस्तकात घेतला आहे.

पै लहान असताना, त्यांच्या मातापित्याचे निधन झाले. त्यांचा सांभाळ आजी-आजोबांनी केला. लहानपणी गावात हरिकथा ऐकताना पै हरखून जात. रंजकतेने कथा सादर करण्यात जादू आहे, याची ओळख त्यांना झाली. कोणत्याही धार्मिक प्रथेकडेही तार्किकतेच्या नजरेतून पाहण्याचा त्यांचा पिंड बनला. आजोळचे छत्र हरपले आणि पै, बहिणी मुंबईला आले. ओरिएंट हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथे त्यांना पु. ल. देशपांडे शिक्षक म्हणून लाभले, ही अनोखी नोंद लेखकाने केली आहे. यूडीसीटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून रासायनिक अभियांत्रिकीचे पदवीधर झाल्यानंतर, पै यांनी काही महिने नोकरीही केली; तथापि तेथे त्यांचे मन रमले नाही. याचे कारण, कथा सांगणे हाच त्यांचा ध्यास होता आणि त्यासाठी योग्य माध्यमाचा शोध चालू होता.

दरम्यान पै यांनी संस्कृतपासून प्राकृत, पाली, बंगाली या भाषांचे शिक्षण घेतले आणि भास, कालिदास येथपासून रवींद्रनाथ टागोरांपर्यंतचे साहित्य वाचून काढले. पै यांनी जेजे स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचाही विचार केला; मात्र आपले मन चित्रकलेपेक्षा कथा सांगण्यात अधिक रमते, हे त्यांनी ओळखले. पै यांना पहिली संधी टाइम्समध्ये मिळाली. 'इंद्रजाल कॉमिक्स'च्या निर्मितीचा ते महत्त्वाचा भाग होते. 'फँटम कॉमिक्स'बरोबर त्याच माध्यमातून भारतीय आशय देण्याची कल्पना त्यांच्या मनात आली ती तेव्हाच.

'इंडियन बुक हाउस'चे जी. एल. आणि एच. जी. मीरचंदानी यांनी पै यांच्यावर दाखविलेला विश्वास हा 'अमर चित्रकथा' लोकप्रिय आणि यशस्वी होण्यातील मोलाचा घटक होता. मासिकाला नाव कोणते द्यायचे, त्यासाठी 'लोगो' कोणता निश्चित करायचा अशा बाबींवर पै यांचा निर्णय अंतिम असे. ते सर्व ते किती निगुतीने करीत, याचे वर्णन लेखकाने केले आहे. 'कृष्णा'पासून या कॉमिकच्या प्रकाशनास सुरुवात झाली आणि लवकरच वाचकांचा त्यांनी ठाव कसा घेतला, राम वाईरकर, भा. रा. भागवत, यज्ञ शर्मा, कमला चंद्रकांत, प्रताप मुळीक, कवडी अशा लेखक-चित्रकारांचा चमू त्यांनी कसा तयार केला, हा प्रवास रसाळपणे येतो.

या कॉमिकचा अधिकाधिक प्रसार व्हावा, म्हणून अगदी हॉटेल आणि पेट्रोल पंपांवर त्या प्रती ठेवण्याचे अभिनव प्रयोगही पै यांनी कसे केले, 'अमर चित्रकथा'च्या माध्यमातून भारतीय इतिहास शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी पै यांनी शाळांशी संपर्क कसा साधला, त्यास पहिल्यांदा प्रतिसाद न मिळाळ्याने खट्टू झालेल्या पै यांनी काही शाळांत विद्यार्थ्यांच्या चाचण्या आयोजित करून, 'अमर चित्रकथां'मधून विद्यार्थ्यांना भारतीय प्राचीन साहित्य, इतिहास यांचे आकलन अभ्यासक्रमांच्या पुस्तकांच्या तुलनेत अधिक चांगले कसे होते, हे कसे पटवून दिले; त्यामुळे 'अमर चित्रकथा'च्या लाखो प्रती कशा खपू लागल्या, याच यशातून पुढे 'टिंकल' हे मासिक कसे तयार झाले, अनंत पै यांचे अंकल पै कसे झाले, इत्यादी सगळा पट लेखकाने मांडला आहे.

अर्थात, पुढे तंत्रज्ञान बदलले आणि 'अमर चित्रकथा'ही त्या रेट्यातून वाचली नाही. पै यांनी ही प्रकाशने वाचावीत, म्हणून शेवटपर्यंत केलेली धडपड, संपादकीय विभागात काहींनी पै यांच्या कथित एकाधिकारशाहीविरोधात उठविलेला आवाज, 'इंडियन बुक हाउस'च्या अन्य प्रकाशनांकडे पै यांनी केलेले दुर्लक्ष इत्यादी काही भाग देऊन लेखकाने चरित्राचा समतोल राखला आहे. पत्नी ललिता हिचे एकाकीपण दूर करण्याच्या इराद्याने 'रंगरेखा फीचर्स'ची निर्मिती पै यांनी केली. एका संस्कृत सुभाषिताचा नेमका अर्थ हवा होता, म्हणून रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी आपल्या सचिवाला तो पै यांना फोन करून विचारायला सांगितले होते किंवा पराराष्ट्रमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी एका शिष्टमंडळाला पै यांची ओळख 'चाचा नेहरूंनंतर सगळ्यात लोकप्रिय चाचा (अंकल)' अशी करून दिली होती, इत्यादी रंजक माहितीच्या चौकटी पुस्तकाची खुमारी वाढवितात.

द्वारा : https://maharashtratimes.com/
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.