शिवछत्रपतींचे आरमार

गजानन भास्कर मेहेंदळे, संतोष प्र. शिंत्रे

/media/शिवछत्रपतींचे आरमार_A1.jpg

शिवछत्रपतींची आरमारी यशोगाथा - सुहास फडके

गजानन भास्कर मेहेंदळे हे चाकोरीबद्ध इतिहासकारांपेक्षा वेगळे आहेत. त्यांनी लिहिलेले महाराजांचे कार्य, राजांच्या उदयापूवीर्चा काळ अशा अनेक बाबींचा उहापोह करणारे दोन खंडांतील चरित्र हे इतिहास लेखनातील आदर्श मानले जाते. कोणत्याही बाबीची कागदपत्रांच्या सहाय्याने खात्री झाल्याशिवाय ते तो मुद्दा मांडत नाही. त्यामुळेच त्यांचं कुठल्याही लेखनाला भक्कम आधार असतो.

ते आणि संतोष प्र. शिंत्रे यांनी लिहिलेले 'शिवछत्रपतींचे आरमार' हा प्रसिध्द झालेला ग्रंथही त्यांचा हा लौकिक कायम राखणारा आहे. या ग्रंथाची पाने २१८ असली तरी महाराजांनी नौदलाची उभारणी किती प्रतिकूल परिस्थितीत केली त्याचा पूर्ण तपशील या पुस्तकात लेखकद्वयाने दिला आहे.

शिवकालाच्या प्रारंभी हिंदुस्थानाभोवतीच्या समुदावर राज्य होते पोर्तुगीज, इंग्लिश, डच आणि फ्रेंच यांचे. या चारही देशांतील व्यापारी कंपन्या येथे होत्या आणि वसाहतींच्या, वखारींच्या आणि सागरी व्यापाराच्या संरक्षणासाठी त्यांनी स्वत:चे सैन्यही उभारले होते. युद्धनीतीचा एक भाग म्हणून त्यांनी कोटकिल्लेही उभारले होते. किल्ल्यांच्या मदतीने वसाहतींचे रक्षण करायचे आणि सागरी मार्गाने किल्ल्यांना रसद पुरवायची अशी पोर्तुगीजांची व्यूहरचना होती. हिंदी महासागराच्या पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर अरबस्तान, पशिर्या, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, गोवा तसेच तेव्ह्ाच्या सिलोनमध्ये यांच्या वसाहती होत्या. या देशाचे सागरी सार्मथ्य किती होते हे दर्शवणारी एकच बाब आहे. पोर्तुगालचा राजा स्वत:ला हिंदी महासागराचा सम्राट म्हणवीत असे आणि हिंदी महासागरात पौर्वात्य जहाजांना संचार करायचा असेल तर पोर्तुगीजांची परवानगी घेणे कायद्याने बंधकारक होते. ठरावीक रक्कम भरल्याशिवाय हा परवाना मिळत नसे आणि जहाजातून कोणता माल न्यायचा हेही पोर्तुगीज कायद्यात नमूद केले होते. याचा भंग करणाऱ्या जहाजाला पोर्तुगीज समुदाचा तळ दाखवत. वसाहती, वखारी, किल्ले यांच्या कारभारात एक शिस्त लावून दिलेली असायची. मुख्य म्हणजे पोर्तुगीज व्यापारी जहाजावरही तोफा लावलेल्या असायच्या.

या नौदल सार्मथ्याचे तपशीलवार वर्णन लेखकांनी केले आहे. पोर्तुगीजांना शह देऊन इंग्लंडने हिंदुस्थानच्या समुदावर वर्चस्व मिळवले. अर्थात त्यांनीही किल्ले, सैन्य या बाबींकडे लक्ष दिले होतेच. याच काळात डचांनीही आपले वर्चस्व निर्माण केले. त्यांनीही पौर्वात्य जहाजांसाठी परवाना पद्धत अवलंबली आणि यातून आदिलशाही, मुगल, कुतुबशाही असे कोणीच सुटले नाहीत.
हे सांगायचे कारण इतकेच की महाराजांना आरमाराची उभारणी करणे हे किती मोठे आव्हान होते, याची कल्पना यावी. इतके प्रबळ शत्रू सागरावर वर्चस्व गाजवत असताना, मराठेशाही टिकवण्या-साठी, वाढवण्यासाठी महाराजांना एका वेळी इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी यांना तोंड द्यायचे होते. यात आणखी एक मेख अशी होती की, या तिघांनाही महाराजांना आरमार उभारू दिले तर आपल्याला किती मोठ धोका आहे हे जाणवले होते आणि या एका मुद्यावर ते एकमेकाशी हातमिळवणी करत होते. एरवी ते एकमेकावर कुरघोडी करत असत, ही बाबही येथे लक्षात घ्यायला हवी.
महाराजांची आरमार उभारणी अयशस्वी व्हावी म्हणून पोर्तुगीजांनी, महाराजांच्या युद्धनौका बांधणीत गुंतलेल्या पोर्तुगीज कामगारांना फितवले आणि तेथून बाहेर काढले ही बाब जशी गंभीर होती, तशीच महाराजांना या कामासाठी परदेशी तंत्रज्ञांवर अवलंबून रहावे लागत होते ही बाब हिंदुस्थानात सागराचे महत्त्व किती दुय्यम होते हेही अधोरेखित करते. अर्थात, महाराजांचे शत्रू राजेंना शह देण्यासाठी एक होत तसेच वेळप्रसंगी महाराजांना मदत करून शत्रूला अडचणीत आणण्यासही तयार असत. त्यामुळे मिर्झा राजे जयसिंह यांनी महाराजांविरुद्ध मोहीम उघडली तेव्हा पोर्तुगीजांनी महाराजांना कळवले की, वेळ पडल्यास आपण आश्रयासाठी गोव्याला यावेे. यामागे उद्देश हाच होता की, सत्तेचा समतोल राखण्यासाठी दक्षिणी सत्तांनी एकजूट राखावी, निदान त्यांच्याविरुद्ध मोगलांना मदत करू नये हे पोर्तुगीजांचे धोरण होते.

एकीकडे असे चित्र असताना, महाराजांना जरी आपण आश्वासन दिले असले तरी त्यांच्याविरुद्ध सिद्दीला गुप्तपणे मदत करावी असेही पोर्तुुगीज अधिकारी एकमेकाला कळवतात. थोडक्यात सांगायचे तर एकप्रकारे हा बुद्धिबळाचा पट मांडून सगळे बसलेले होते. महाराजही राजनीतीनिपुण असल्यामुळे या सत्तांना एकमेकाविरुद्ध झुंजवून आपले इप्सित साध्य करण्यात ते यशस्वी झाले.

खांदेरीचा किल्ला बांधताना महाराजांनी नेमके हेच धोरण राबवले. मुंबईजवळ समुदात हा किल्ला बांधायला घेणे म्हणजे मुंबईवर राज्य असणाऱ्या ब्रिटिशांना थेट आव्हान देणे होते. शिवाय सिद्दीला यामुळे धोका निर्माण होणार होताच. मुंबई जवळच्या प्रदेशात, वसई येथे वर्चस्व गाजवणाऱ्या पोर्तुगीजांनाही तेथे किल्ला होणे त्रासदायक होते. त्यामुळे महाराजांना रोखण्यासाठी हे तिघे एकत्र आले. मात्र त्यांना गुंगारा देऊन, त्यांच्याशी लढून महाराजांनी हे साधले.
राजांच्या आरमार उभारणीचे काम यशस्वी होऊ नये म्हणून त्यांना सागवानी लाकडे वगैरे मिळू नयेत, यासाठी पोर्तुगीज-इंग्रजांची आघाडी होती. मराठ्यांच्या नौका, बांधकाम सुरू असलेल्या खाड्यांच्या अथवा नद्यांच्या मुखातून समुदात येऊ नयेत म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले.
महाराजांच्या आरमार उभारणीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण देशात मराठे वगळता कोणालाही, या सत्तांच्या सागरी सार्मथ्याला शह देणे जमले नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांच्या आत मराठ्यांचे नौसेनानी कान्होजी आंग्रे, त्यांचे उत्तराधिकारी धुळप यांची भीती इंग्रज, पोर्तुगीज यांना वाटू लागली हे महाराजांचे यश होते.

आरमार उभारणे म्हणजे केवळ नौका बांधणे नसते. त्या बांधण्याचे ज्ञान, भूगोलाचे ज्ञान, समुद, वारे, खगोल यांचे विज्ञान अशा अनेक बाबींचा वर्षानुवषेर् अभ्यास करावा लागतो तेथे महाराजांनी हे अवघ्या काही वर्षांत साध्य केले, तेदेखील अनंत अडथळ्यांना तोंड देत. आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे, असे राजांनी आज्ञापत्रात नमूद केले होते ते त्यांनी स्वत:च खरे करून दाखवले.
इंग्लिश आणि इतर युरोपीय सत्ता येथे तराजू घेऊन आल्या आणि नंतर तलवारीच्या जोरावर देश जिंकला असे म्हटले जाते. हा ग्रंथ वाचल्यावर जाणवते की, त्यांच्या एका हातात तराजू होता आणि दुसऱ्या हातात तलवार. हा समृद्ध प्रदेश ताब्यात घेण्यासाठीच ते आले होते आणि त्यासाठी साम, दाम, दंड, भेद यापैकी कोणताही उपाय योजण्यास ते मागेपुढे बघत नव्हते. मुख्य म्हणजे सोबत तंत्रज्ञानातही ते पुढे होते. या देशावर परकी सत्ता का आली याचे उत्तरही याच ग्रंथातून मिळते. त्या दृष्टीनेही हा ग्रंथ वाचकाला अंतर्मुख करणारा आहे.

द्वारा : पुस्तक स्टेशन