फॉर हिअर ऑर टू गो

अपर्णा वेलणकर

/media/फॉर हिअर ऑर टू गो_forhereor2go.jpg

आवडलेले पुस्तक...फॉर हिअर ऑर टु गो - भडकमकर मास्तर

फ़ॊर हिअर ऒर टु गो
या पुस्तकाला नुकताच एक पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली... अमेरिकेवरचे पुस्तक म्हणजे काही ठराविक कल्पना मनात घेऊन वाचायला सुरुवात केली होती. पण हे पुस्तक वेगळे आहे.
हे एक टिपिकल ठराविक प्रवासवर्णन नाही.... ( अबब, केवढ्या त्या उंच इमारती अन केवढे ते गुळगुळीत रस्ते... काय ती स्वच्छता अन काय तो प्रामाणिकपणा...काय तो नायगारा अन कशी ती स्वातंत्र्यदेवता, असलं यात काही सापडणार नाही)...
ही एकाच माणसाची यशोगाथाही नाही...( ते आले, त्यांनी कष्ट केले अन ते श्रीमंत झाले वगैरे वगैरे )...

हे पुस्तक म्हणजे एका समूहाची गोष्ट आहे; उत्तर अमेरिकेतल्या अनेक मराठी माणसांच्या मनाचा ; त्यांच्या आकांक्षांचा, त्यांच्या प्रश्नांचा क्वचित त्यांच्या वैफ़ल्याचा अभ्यासपूर्ण शोध आहे.... यात कुठेही निष्कर्षाची घाई नाही.... अमेरिकेला टिपिकल शिव्याशाप नाहीत किंवा भारावून जाऊन केलेलं कौतुकही नाही. ( खरंतर इतक्या मोठ्या समूहाचा अभ्यास करताना टोकाचे निष्कर्ष काढणं अवघड आहे हेच या लेखनातून अधोरेखित होत राहतं)

या पुस्तकाच्या निमित्ताने स्थलांतरितांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या इतिहासाचा पुष्कळ अभ्यास लेखिकेने केला आहे....एकोणिसाव्या शतकापासून मजूर अमेरिकेत जाऊ लागले, त्यानंतर डॉक्टर होण्यासाठी आनंदीबाई जोशी यांनी केलेला प्रवास याचे संदर्भ आहेत.... आणि स्थलांतरित प्रामुख्याने वाढले ते साठच्या दशकात अमेरिकेने इमिग्रेशन कायदे बदलल्यानंतर ...तत्कालिन भारताची परिस्थिती ( दुष्काळ, युद्धं वगैरे) आणि तत्कालिन अमेरिकेची स्थिती ( कुशल कामगार / वैद्न्यानिकांची गरज इ.)...यावरही छान लिहिले आहे.

पुस्तकाची रचना मोठी वैशिष्ट्यपूर्ण वाटली... छोट्याछोट्या धड्यांमध्ये विविध उदाहरणे देतदेत ही गोष्ट पुढे सरकते.साठच्या दशकातला तरूण मुलगा काही डॉलर खिशात घेऊन बोटीने नशीब काढायला अमेरिकेत पोचल्यापासून ते पुढे त्याची नोकरी, प्रमोशन्स,स्थिर झाल्यावर लग्नाचा निर्णय, मग संसार, मुले , x+१ सिन्ड्रोम, मुले मोठी होताना दुरावणं आणि त्यांचे प्रश्न, भारतातल्या नातेवाईकांचे/ आईवडिलांचे प्रश्न, क्वचित अनुभवाला येणारा रंगभेद आणि ग्लास सीलिंग, ब्रेन ड्रेन आणि त्याबद्दलची काहींची अपराधी भावना अन काहींचे स्पष्टीकरण, काहींचे परत येणे आणि त्याबद्दलचे अनुभव, मुलांची लग्ने / डेटिंग इ.,महाराष्ट्र मंडळे अन त्यांची नियतकालिके आणि त्यांचे लेखन, निवृत्तीची चाहूल अन त्याबद्दलची तरतूद, म्हातारपणाचे प्रश्न...
....भारताततल्या नातेवाईकांची त्यांच्याबद्दलची मते आणि मराठी पर्यटकांचे अनुभव, मराठी लेखकांचे बरेवाईट अनुभव..
.. पुस्तकाला चांगली लय आहे.. एकातून एक धडे पुढे सरकतात....

सगळ्यात आवडलेली यातली गोष्ट म्हणजे एबीसीडींवरचा लेख.. ( लेखिका याला अमेरिकन बॉर्न कॉन्फ़िडंट देसि असे म्हणते.).... बर्‍याच जणांच्या मते त्यांचं बालपण हॉरिबल होतं, पालकांच्या सांस्कृतिक अपेक्षा,( शुभंकरोति म्हणून दाखव, पालकांच्यात ग्रेड्सबद्दल स्पर्धा, पालकांचं अभ्यासाचं प्रेशर वगैरे) आणि शाळेत बाहेर निराळी परिस्थिती. ( इतरांचे चिडवणे वगैरे वगैरे)... मग इन्डिपेंडंट होण्यासाठी बाहेर राहणे वगैरे.... पण पुढे अशी काही उदाहरणे लिहिली आहेत की घराच्या बाहेर पडल्यावर त्या मुलांना इमिग्रंट मन कसं असतं हे जास्त चांगलं समजून घेता आलं.आणि आपले आईवडील आपण अधिक चांगले समजू शकलो , हे त्यांना मान्य करावं लागलं...

( या पुस्तकाला बी एम एम ने स्पॊन्सर केले असले तरी ) हे नुसतंच अमेरिकेचे आणि अमेरिकन मराठी माणसांचे गुणवर्णन नाही... तिथले भरपूर प्रश्न मांडले आहेत. पण अनेक लेखकांनी तिकडे जाऊन अमेरिकेवर अंदाजाअंदाजाने तलवार चालवली तसे यात नाही.... ( रमेश मंत्री, सुभाष भेंडे,बाळ सामंत यांच्या प्रवासवर्णनांनी खूप जण दुखावले गेले होते हेही पुस्तकात आले आहे)

लेखिकेने तिथल्या भरपूर मंडळींशी संवाद साधला आहे आणि त्याचे पाल्हाळिक वर्णन मात्र नाही. सारांशाने संदर्भापुरते उल्लेख येतात...पुष्कळ संदर्भग्रंथांचा अभ्यास करून आणि इमिग्रेशन स्टडीजवर यापूर्वी अनेकांनी केलेला अभ्यासाचे , लिहिलेल्या पुस्तकांचे आणि त्यातल्या रिलेव्हंट गोष्टींचे संदर्भ जागोजागी येत राहतात..शिवाय सगळ्याच यशोगाथा नाहीत . अपयशाच्या आणि वैफ़ल्याच्या अंधारात खचलेल्या कुटुंबांच्याही काही कथा आहेत.त्याला त्यांनी अमेरिकन क्लोझेटमधली मराठी बोचकी असे नाव दिले आहे.......

थोडक्यात चुकवू नये असं हे पुस्तक आहे.
जरूर वाचा.

हे भारतात राहणार्‍या माझे मत झाले.

द्वारा : https://www.misalpav.com/